Jun 14, 2021
ललित

माणूस

Read Later
माणूस

ती वोल्वो बस उत्साहाने नुसती ओथंबली होती. सकाळचे ७ वाजलेले. मुलांना नुकतीच नाताळची सुट्टी लागलेली.

तशी ती सोसायटी उच्चभ्रू लोकांचीच होती. सगळ्यांचेच वेळापत्रक अतिशय व्यस्त असायचे. त्यामुळेच जेंव्हा ही सलग ४ दिवसांची गोव्याची सहल आयोजित करायचा प्रस्ताव मांडला गेला तेंव्हा बऱ्याच जणांना ती अतिशयोक्तीच वाटली. पण एक एक करत सगळ्यांनीच तो प्रस्ताव उचलून धरला आणि बऱ्याच काळापासून घाटत असलेली ही कल्पना अमलात आणली गेली. मग काय ... बरेच दिवस चर्चेला आणि प्लांनिंगला नुसते उधाण आले होते. बायकांनी हे निमित्त धरून बरीच खरेदी करून घेतली. इतकेच काय तर अगदी गोव्याच्या बीच वर फिरायला जाताना घालायचे कपडे पण सगळ्यांनी एकाच पॅटर्नचे विकत घेतले. त्या निमित्ताने सोसायटीत बरेच दिवस हलचल जाणवत होती. आणि हो ना करता करता सरतेशेवटी सहलीचा दिवस उगवला.

सगळ्या लहान मुलांची खिडकीत बसायची लगबग सुरु होती. प्रत्येक छोट्याला मागच्या किंवा पुढच्या खिडकातल्या मैत्रिणीला व मित्राला बाहेर दिसणारे काही तरी दाखवायचे होते. सगळे बाबा लोक हातातल्या पिशव्या वरच्या रॅकवर बसवण्यात दंग होते आणि आया सगळे पॅक केलेले सामान नीट आणले की नाही या विवंचनेत. बस मध्ये सगळ्यांच्याच परफ्यूम्सचा मिळून एक मिश्र सुवास तयार झाला होता. कोणाहीकडे पाहीले तरी ते उच्च वर्गातले आहेत हे त्यांच्या कपड्यांवरून सहज कळत होते. काही जण आपल्या ऑफिसमधल्या हाताखालच्या स्टाफला ४ दिवसाच्या इंस्ट्रकशन्स देण्यात तर काही आपल्या बिजिनेस मीटिंग पुढे ढकलण्यात मग्न होते. पण या सगळ्यातही ती दोघे विशेष उठून दिसत होती.

आरुष आणि समारा.. दोघेही तरुण.. लग्नाला पाच सहा वर्ष उलटलेली.. पण अजूनही प्रचंड चार्म ठेवून असणारी. त्या सोसायटीतल्या किटी पार्टीमध्ये त्यांचा विषय निघाला नाही असे व्हायचेच नाही. आरुष पस्तिशीच्या आसपासचा. बायकांना लाजवेल असा गोरा रंग. त्याच्या चेहऱ्याचा तो कट, त्यांची बिअर्ड ठेवण्याची स्टाईल, त्याची उंची आणि त्यांचे मधाळ बोलणे. समारा त्याला साजेशीच. गोरी, बांधेसूद, उंच, थोडे हायलाईट केलेले केस, मोजकेच बोलणे, अतिशय स्मार्ट पर्सनॅलिटी. त्यांचा सतत एक पाय भारतात असायचा आणि एक परदेशात. आरुषचा बिजिनेस होता कसलातरी. त्यानिमित्ताने बरेच फिरायचे दोघे जण. तीही मॉडेलिंग करायची कुठे कुठे. एकूण काय तर सोसायटीतले गोल्डन कपल होते ते. अगदी या वेळीही त्यांचा सिंगापुर ट्रिपचा प्लॅन होता. पण फक्त आणि फक्त या सोसायटी पिकनिक साठी त्यांनी तो रद्द केला आणि सोसायटीच्या सर्व मेम्बर्सनी जातीने त्यांना कॉल करून त्याबद्दल धन्यवाद दिले होते. त्यांच्याशी सलगी ठेवण्याबाबत कोणीही कधीही मागे पडत नव्हते. दोघांचे व्यक्तिमत्वच तसे होते म्हणा.

आता जवळ जवळ सगळी बस भरत आलेली. मधल्या सीटवर बसलेल्या साठेंच्या हाती सगळ्या येणाऱ्या सभासदांची यादी होती. त्या यादीवर नजर टाकत साठेंनी बसल्या जागेवरून सगळ्या बसवर नजर टाकली. सगळ्यात मागच्या २ सीट्स अजून रिकाम्या होत्या. त्यांच्यावर नजर पडताच नाही म्हटले तरी साठ्यांना मनातून हायसेच वाटले.

"निघूया का? उशीर होईल नाही तर. कोण यायचे राहिले आहे अजून?" सिन्हाच्या या प्रश्नावर साठ्यांनी 'निघू या' अशा अर्थाचा इशारा केला. सिन्हाने पण मग पुढे होत खालीच उभ्या असलेल्या ड्रायव्हरला आवाज दिला.

सगळ्या बाळगोपाळांनी एका आवाजात जल्लोष सुरु केला. सभासदांची दुसरी यादी हातात घेऊन पुढेच बसलेल्या आघोष डेशी साठ्यांची नजरानजर झाली. साठ्यांची लबाडी आघोषला पण कळली होती. पण तोही "'तेरी भी चूप मेरी भी चूप" या तत्वावर गप्प बसला. मागची सीट रिकामी राहिल्याचा खरं तर सगळ्या बसलाच आनंद झाला असता.

"गणपती बाप्पा ...मोरयाSSSSS..." सगळ्यांनी एका आवाजात आरोळी ठोकली आणि बस जागची हलली. बस जेमतेम सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडते तोच ड्रायव्हरने बसचा ब्रेक करकचून दाबला. उभे असलेले काही जण पुढे तोल जाऊन आदळले. मागोमाग बसच्या दरवाजावर जोरजोरात थापा पडल्या.

"राजू काका.." पुढे बसलेला छोटा मंथन आनंदाने ओरडला.

कोणीतरी पुढे होत निमूटपणे दरवाजा उघडला. राजू आणि त्याचा धाकटा भाऊ हातात साध्या सुटकेस घेऊन बसमध्ये शिरले. बस पकडण्यासाठी धावल्यामुळे दोघांना जराशी धाप लागली होती. तेआत शिरताच एक सूक्ष्म तिरस्कार बऱ्याच चेहऱ्यांवर उमटून गेला. हा एकच माणूस तिथल्या सगळ्यांना नकोसा होता. नाही म्हटले तरी सोसायटीच्या त्या वर्गाला राजूच्या कुटुंबाचा एक बट्ट्याच लागल्यासारखा होता.

राजू म्हणजे राजन पाटील. खरं तर तो एक साधा भाजीवाला. पण मेहनती मुलगा. साध्या भाजीच्या गाडीवरून मेहनत करत त्याने त्याचे स्वतःचे दोन गाळे टाकले होते. एक फळांचा आणि एक भाजीचा. त्याच्या दृष्टीने त्याचे एकदम उत्तम चालले होते. स्वतःच्या प्रगतीवर राजू एकदम खुश होता. मुंबईत आला होता तेंव्हा घाटकोपरच्या एका झोपड्पट्टीसारख्या चाळीत त्याने बस्तान मांडले. आणि हळू हळू करत एक एक पायरी चढत गेला. तसा त्याचा फ्लॅट सोसोयटीतील सर्वात लहान होता. कारण के सी रामनला ४ bhk हवा होता. म्हणून त्याने बिल्डरच्या कडून बाजूचा फ्लॅटचा अर्धा भाग थोडे जास्त पैसे मोजून घेतला. पण हा उर्वरित छोटा भाग विकला जाईना. कारण तिथे राहणाऱ्या सगळ्यांनाच थोडे मोठे फ्लॅट्स हवे होते. त्याच वेळी घर शोधत असलेल्या राजूला त्याच्या एजंट मित्राने हा फ्लॅट सुचवला. राजुचे दुकानही याच भागात असल्याने त्याने तो तात्काळ घेतला. तो फ्लॅट घेताच जग जिंकल्याचा आनंद राजूला झाला होता. एवढ्या छान आणि उच्चभ्रू सोसायटीत घर हे केवळ एक स्वप्नच होते त्याच्यासाठी. आणि त्याची आई पण खुश झाली होती कारण सोसायटीमध्येच कृष्णाचे मंदिर पण होते. आईच्या खुशीने राजुचा आनंद आणखी द्विगुणित झाला. मग त्याचे घर गावावरून येणाऱ्या साऱ्यांसाठीच त्यांचे इथले बस्तान बसेपर्यंत वसतिस्थान झाले होते. त्या दोन खोल्यात राजू सगळ्यांची मनापासून आवभगत करायचा. पण त्याच्याकडे सतत येणाऱ्या या कनिष्ठ वर्गातील लोकांमुळे सोसायटीत नेहमीतच गोंधळ उडत असे. नेहमी दारासमोर इतस्ततः पसरलेल्या चपला, वेळी अवेळी येणारी लोक, त्यांची गावरान भाषा, मोठमोठ्याने भसाड्या आवाजात चालेल्या गप्पा यांनी सोसायटी एकदम उबसून गेली होती खरं तर. बऱ्याच वेळा राजूला नोटीस पण गेली होती. पण तो या सगळ्याकडे दुर्लक्ष करत स्वतःची जनसेवा चालूच ठेवत होता.

त्यामुळेच असेल पण आज आधी होकार देऊनही ते दोघे शेवटपर्यंत न आल्यामुळे ते आता येणारच नाहीत अशी खात्री पटून बरीच मंडळी मनातून खुश झाली होती.

"अरे आला रे आला ...राजू काका आला.. क्या बच्चा पार्टी अपुनको छोडके कायको जा रहा था रे?" राजू आपल्या कर्कश आवाजात खिदळत बोलला. सगळ्या बच्चा पार्टीचा नाही म्हटले तरी तो लाडका काका होता तसा. रविवारी बऱ्याच वेळा तो खाली मैदानात जाऊन मुलांशी क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळायचा. आपल्या येण्याने बऱ्याच चेहऱ्यावर बारा वाजले हे नेहमीसारखे लक्षात येऊनही राजूने आनंदाने साठयांकडे पाहत आरोळी ठोकली.

“हजssssर साठे साहेब. बस थांबवल्याबद्दल धन्यवाद." साठ्यांनी कसनुसा चेहरा करत उसने हसू आणले.

राजू मग भावाबरोबर गडगडाटी हसत आपल्या मागच्या सीटच्या दिशेने सरकला. त्याला सीटही मुद्दाम मागची दिली होती.

आता मात्र बसने गती पकडली. गतीबरोबर हळूहळू गाण्याच्या भेंड्या रंगल्या. हळूच कोणी तरी आणलेले स्नॅक्स ची पाकीट बसभर फिरू लागली. भेंड्याच्या ग्रुपमध्ये दोन्ही बाजू आरुष आणि समाराला आपल्यात घ्यायला धडपडल्या. शेवटी आरुष एका ग्रुप मध्ये आणि समारा दुसऱ्या अशी विभागणी झाली. आरुष जिथे आला तिथला महिला वर्ग आणि समाराच्या इथे पुरुषवर्ग जरा जास्तच खुलला. राजूही बळजबरीने एका गटात घुसलाच. पण कोणी त्याला गाण्याचा फारसा चान्स देतच नव्हते.

राजूलाही ही वागणूक अपेक्षित होतीच. पण त्याचे या ट्रिपला येण्याचे कारण वेगळे होते. एक तर भावाला त्याच्या परीक्षेनंतर त्याला कुठेतरी फिरवून आणता येणार होते. आणि दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे त्याच्या आईला शांतादुर्गेच्या देवळात देणगी द्यायची होती. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजुने थोडे थोडे करून अकरा हजार बाजूला काढून ठेवले होते. येताना ते पैसेही तो एका वेगळ्या पाकिटात घेऊन आला होता. आईला प्रवास झेपला नसता म्हणून नाही तर त्याने तिलाही आणायला कमी केले नसते.

हळूहळू दुपार जवळ येऊ लागल्यावर सगळ्यांचा भुकेमुळे थोडा उत्साह कमी झाला. मग भेंड्या काही काळ स्थगित करून जो तो आपापल्या जागेवर ठरलेले जेवणासाठी ठरलेले हॉटेल येण्याची वाट पाहू लागला.

आरुषने आपला टॅब उघडून त्यात नेहमीप्रमाणे शॉपिंग साईट उघडली. समारा शांतपणे बाहेर बघत होती. तिची सहज नजर त्याच्या टॅबवर पडली. आता तो बाजारात नवीन आलेले इअर बड्स पाहत होता …. समाराच्या मस्तकात एकच तिडीक गेली.

"यावेळी तरी पहिल्यांदा माझे डायमंड स्टड्स घ्यायचेत आरुष. दर वेळा पैसे येणार असले की तू काहीतरी नवीन पालुपद घेऊन तयार असतोसच. बाजारातली प्रत्येक नवीन गोष्ट तुझ्याकडे असलेच पाहिजे असा काही नियम नाही आहे." दबक्या आवाजात समारा धुसपुसली. आता तिचा आवाज पलीकडच्या सीट वर जाईल या भीतीने टॅब बंद करत आरुषने हळूच हसत तिच्या गालावर हात फिरवला. समाराने नाक उडवत नजर परत बाहेर वळवली.

थोड्याच वेळात त्यांचे रेस्टॉरंट आले आणि सगळ्यांनी जेवायला जाण्यासाठी एकच गल्ला केला. साठ्यांच्या बायकोला बस लागायची म्हणून ती मात्र एकटी बसमध्ये थांबली. सगळे सामान नीट ठेवण्याच्या निमित्ताने रेंगाळलेला आरुष मग लगेच खाली उतरला. रेस्टॉरंट मध्ये शिरताच समाराच्या प्रश्नार्थक नजरेला नकारार्थी मान हलवत त्याने आपली जागा पकडली. पण तसा त्याच्या हातात अजून बराच वेळ होता. घाई कसली होती? जेवून सगळे परत बसमध्ये शिरले. आणि बस परत सुरु झाली.

आता घाट लागायला सुरु झाली होती. बस घाटाच्या तीव्र वळणावरून हळूहळू धावत होती. सगळे बाहेरचे सौंदर्य न्याहाळण्यात दंग होते तर काही आपल्या कॅमेरामधून ते सौंदर्य टिपण्यात...

इतक्यात हासभास नसताना एका तीव्र वळणावर अचानक समोरून एक जीप जोरात आली. ड्रायव्हरने तिच्याशी होणारी टक्कर टाळण्यासाठी ब्रेक मारत बसचे चाक जोरात वळवले. पण होणारे अघटित तो टाळू शकला नाही. वळणावर एका बाजूला असलेल्या खड्ड्यात पुढचे चाक जाऊन बसचा तोल ढळला आणि ती कर्कश आवाज करत फरफटत जाऊन एका अंगावर जोरात कलंडली. आणि समोरच असलेल्या एका वृक्षाला जाऊन धडकली. सगळा डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच घडलेला प्रकार. कोणाला काही समजायच्या आत सारे घडून गेले होते. किंकाळ्यांनी आणि आक्रोशाने तो घाट एकदम दुमदुमून गेला. ती जीपही या सगळ्यात भेलकांडत बाजूच्या दरीत जाऊन कोसळली. बसची एकदम दैनावस्था झाली होती. पुढचा भाग एकदम चेपला गेला होता. दुर्दैवी ड्रायव्हर जागच्या जागीच इहलोकीची यात्रा संपवून गेला होता. पुढच्या २-3 सीट वर बसलेली सगळीच जण गंभीर जखमी तरी होती किंवा ड्रायव्हरच्या सोबतीला गेली होती. मागच्यांचीही काही वेगळी कहाणी नव्हती. पण जे जगले होते ते प्रचंड धक्क्यात होते. आरुषही त्यातलाच एक. त्याने शुद्धीवर आल्यावर समाराकडे नजर टाकली. ती बहुदा अजूनही बेशुद्ध होती. त्याच्या अंगाखाली कोणी तरी विव्हळत होते. थरथरत्या अंगाने तो बाजूला झाला. आघोष होता तो. त्याच्या पायातून खूप रक्त वाहत होते. ते पाहून आरुषच्या नजरेसमोर परत अंधारून आले. त्याचा हात फारसा हलवता येत नव्हता. मागून कोणीतरी लहान मूल ओरडत होते. आरुषने तिकडे दुर्लक्ष केले. तो ज्या अंगावर बस कलंडली त्याच्या दुसऱ्या बाजूला बसल्याने नशिबाने वाचला होता. इथून स्वतःच्या पायावर बाहेर पडत येईल का या विवंचनेत तो होता. हळुवार उठण्याच्या प्रयत्न करत तो जागचा हलला.

"आरुष प्लिज हेल्प." या कोणी तरी केलेल्या विनवणीकडे दुर्लक्ष करत त्याने वर गेलेल्या खिडकीचा अंदाज घेतला. पण बस वोल्वो असल्याने काचबंद खिडक्या होत्या. तो सुन्न होऊन काही वेळ बसल्या जागीच थंडावला. त्याला मागून बरेच आवाज ऐकू येत होते. कोणीतरी मागून काहीतरी धडपड करत होते. थोड्या वेळात त्याला मागून एक कर्कश आवाज ऐकू आला.

राजू.. त्याचे डोके पुढच्या सीटवर जोरात आपटले गेले होते. गडगडत तो बसच्या खाली गेलेल्या दुसऱ्या बाजूला भेलकांडला. नशिबाने मागची सीट असल्याने त्याला जराशी किरकोळ जखम सोडता काहीच दुखापत झाली नव्हती. तसे त्याचे आपटल्याने डोके भणभणत होते. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला आता राजुकडे वेळच नव्हता. प्रसंगावधानी राजू झालेल्या प्रकारातून लगेच भानी आला. त्याने मागेच असलेला आपत्कालीन दरवाज्याची मूठ थोडा हात वर करून उघडली. आता बसमधून बाहेर पडणे सुलभ होणार होते. त्याने प्रथम आजूबाजूला प्रचंड धक्का बसलेल्या लोकांना हात धरून एकेकाला बाहेर नेऊन बसवायला सुरु केले. बरेच कठीण काम होते. त्याचा भाऊ पण पुढे फेकला जाऊन बेशुद्ध होता बहुतेक. त्यामुळे जे शुद्धीवर असतील त्यांना हलवायचे काम राजूने प्रथम सुरु केले. कारण ही लोक थोडी सावरली की त्याला बचत कार्यात मदत करू शकली असती. इतक्यात मागून आलेल्या एका ट्रक ड्रायव्हरने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. वरवर जखमा न दिसणाऱ्या लोकांना पण प्रचंड मुका मार लागल्याने व अंतर्गत इजा झाल्याने हलताच येत नव्हते. नशिबाने त्या धक्क्यातून विशाल पण लवकर सावरला. त्याने आणि विशालने मिळून मग बऱ्याच जखमींना हलवायला सुरु केली. खरं तर आरुषला पण मुका मार सोडला तर फारसा मार लागला नव्हता. पण राजूने बाहेर आणून बसवल्यावर तो जागचा हलला नाही. आतापावेतो त्या दुसऱ्या ट्रॅकचा ड्रायव्हर आणि भानावर आलेले इतरही काही राजूच्या मदतकार्यात सामील झाले होते. पण काही जण अगदीच चेंगरल्याने कोणालाच पोलिसांनी येऊन उपकरणांनी बसचा पत्रा कापेपर्यंत काहीच करणे शक्य नव्हते. यथावकाश राजुचा भाऊपण शुद्धीवर आला. पण त्याचा बहुदा हात दुखावला होता. आणि प्रचंड धक्क्याने तो काही बोलायच्या मनस्थितीत नव्हता. त्याला झाडाखाली बसवून पाणी देऊन राजू परत आपल्या कार्यात मग्न झाला. बऱ्याच जखमींना त्याने खांद्यावर टाकून बाहेर काढले. त्यातच साठेही एक होते. काही तासातच पोलीस आणि काही जवान तिथे हजर झाले. आता मात्र बचतकार्याला वेग आला. पोलीस पंचनामा होत बोलावल्या गेलेल्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना प्रथम हलवण्यात आले. त्यात बरेच जण पुढच्या सीटवरचेच होते. आरुष एकटक न हलता चित्रपट पाहावा तशी ती घटना पहात बसला होता. कोणीतरी उचलून समारालाही त्याच्या बाजूला आणून बसवले होते. नशिबाने ती पण किरकोळ जखमांवर निभावली होती. बाहेर आलेल्या आणि बऱ्यापैकी शुद्धीवर असणाऱ्यांनी मात्र आता आपल्या इतस्ततः पसरलेल्या सामानाची शोधाशोध सुरु केली होती. साठ्यांची बायको पण त्यातली एक. हवालदिल होऊन ती स्वतःची पर्स शोधत होती. पर्स नाही मिळाली तर नवऱ्याच्या शालजोडीतले ऐकून घ्यायची तिची आता हिम्मत नव्हती. घरात असले नसलेले सारे पैसे तिने नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता गोव्यातल्या खरेदीसाठी उचलून आणले होते. त्यातच तिचे सोन्याचे कानातले पण होते. आणि ती पर्स दृष्टोत्पत्तीस पडत नाही म्हणून साठीण आता हवालदिल झाली होती.

इतक्यात नुकत्याच बाहेर काढलेल्या सिन्हाच्या छोट्या मुलीने राजूकाकाला घट्ट मिठी मारली. बहुदा तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिला बसता येत नव्हते. प्रचंड वेदनांनी ती रडत होती. सिन्हा बहुदा जेवल्यावर पुढच्या सीटवर बसला होता. त्यामुळे वाचला असल्याची शक्यताच कठीण होती. त्याची बायको मात्र जिवंत होती पण गंभीर जखमी होती. वॉर्डबॉईजनी छोटीला रुग्णवाहिकेत ठेवायचा फोल प्रयत्न केला. पण ती घाबरून राजूला सोडायला तयारच होत नव्हती. आता मात्र राजुचा नाईलाज झाला. तो निमूटपणे तिच्याबरोबर रुग्णवाहिकेत शिरला. हॉस्पिटलमध्ये शिरल्यावरही ती एका हाताने राजूचा शर्ट घट्ट पकडून होती. डॉक्टरनी तिला चेक केले. तिला अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. पायाला पण तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. राजू थकून एका खुर्चीवर सुन्न मनाने आता बसला होता.

कुठल्यातरी नर्सने येऊन त्याच्या हातात ऍडमिट करायचे कागद दिले आणि काही महत्वाची औषधें आणि इंजेक्शनची यादी दिली. राजू एकदम भांबावला. त्याच्याकडे देवळात द्यायच्या देणगीचे आणि वरचे असे मिळून पंचवीस एक हजार असतील. पण ते दिले तर.. राजूने खिशात हात घालून सारे पैसे मोजले आणि सांगितलेल्या गोष्टी आणि ऍडमिशन प्रोसेस पूर्ण केली. नाही तरी एका चिमुरडीच्या जीवापुढे देवाची देणगी मोठी होती का? आणि तिचा पाय वाचला की देवाला दान पोहचणारच होते ना..देव तरी असा वेगळा कुठे राहतो.. माणसांतच तर असतो ना.. सगळ्यांना नकोसा असलेला हा माणूस आज माणसातल्या देवाचे दर्शन घडवत होता.….

जवळ जवळ पाच सहा तासांनी सगळे बचत कार्य पूर्ण पार पडले होते. सगळ्या जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले गेले होते आणि किरकोळ जखमींना मलमपट्टी करून मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना केले गेले. आता तसेही गोव्याच्या ट्रिपचे तीन तेरा वाजलेच होते. नशिबाने आरुष आणि समारा दोघेही किरकोळ जखमांवर निभावले होते. आणि सुदैवाने दोघांचे बरेचसे सामान, समाराची ब्रँडेड पर्स, आरुषची टॅब ठेवलेली बॅगपॅक सगळे आरुषने खटपट करून शोधून काढले होते. समाराने आपली पर्स चेक करून आतले सर्व सामान आणि पैसे मोजून घेतले. पैसे मोजून झाल्यावर त्या दोघांची नजर मिळाली. आरुषची नजर पाहून कधी नव्हे ते समाराचे काळीज हलले. पोलिसांनी त्या दोघांना आणि ३-४ जणांना एका रिकाम्या इनोवा मध्ये बसवून दिले. त्यांच्याच गाडीत इतरांबरोबर साठीण पण होती. साठ्यांना तिने खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले होते आणि घरी जाऊन पैशाची आणि इतर तजवीज करून ती परत येणार होती. सगळे शांत होते. आरुषचे नेहमीप्रमाणे टॅबवर काही तरी काम चालले होते. कोणीच बोलायच्या मनस्थितीत नव्हते. थोडा वेळ गेल्यावर त्याने टॅब मांडीवर ठेवून डोळे मिटून घेतले. बॅकपॅक मात्र त्याने घट्ट मिठीत पकडून ठेवली होती. थकव्याने आणि त्राणामुळे त्याला पटकन झोप लागली. समारा खिडकीबाहेर नजर लावून शांत बसली होती. थोडा वेळ गेला नाही तोच साठीण मुसमुसायला लागली. समाराने तिच्या हातावर हात ठेवताच तिचा बांध फुटला.

"नशीबच खोटं ग माझे. हे सांगत होते दोन्ही कार्ड्स आहेत मग इतके पैसे कशाला घेतेस? मीच अडाण्यासारखे त्यांचे न ऐकता सगळे पैसे उचलून आणले. एका फटक्यात जवळ जवळ सत्तर हजाराचे नुकसान करून घेतले मी. वर कानातले पण घालवले ते वेगळेच." ती हाताचे तळवे चोळत बोलत होती.

समाराने चमकून झोपलेल्या नवऱ्याच्या मांडीवरचा टॅब हलकेच उघडला. अजूनही त्यावर अमॅझॉनची साईट उघडीच होती. इअर बड्स बुक करून झाल्यावर तो साईट बंद करायला विसरला होता. पंचवीस हजाराचे होते ते. त्याने नेहमीप्रमाणे कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. नाही तरी त्यांच्या धंद्यात सगळं व्यवहार पैशांचाच असायचा. समाराने हलकेच उघडून परत आपली पर्स चेक केली. आता तिला हिशेब बरोबर लागला. तिच्या मोजण्यात मगाशी चूक नव्हती झाली. तिच्याकडे सत्तरमधले पंचेचाळीस हजारच आले होते…..

माणसातल्या माणसाचे, देवाचे आणि हैवानाचे दर्शन त्या एकच दिवशी घडत होते.