मंतरलेले अंतर (भाग 8)

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर

भाग 8 :

बाबा खाली कोसळले आणि सगळे वातावरणच बदलून गेले. मयुरी ची आई जीवाच्या आकांताने आपल्या पतीला आवाज देऊ लागली. घाबरलेल्या मयुरीने ही टाहो फोडला. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले आणि लगेच मयुरी सावरली. तिने लग्न हॉस्पिटल मध्ये कॉल केला.


डॉक्टर आणि रुग्णवाहिका दोघेही घरी आले. तोपर्यंत मयुरीने बाबांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आई बाबांचे तळहात पाय चोळत होती. बाबा घामाने ओले चिंब झाले होते.


डॉक्टरांनी बाबांचा रक्तदाब तपासला, आणि त्यांच्या तोंडात एक गोळी ठेवून वॉर्ड बॉय च्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेत हलविले.


काळजाचा थरकाप उडवणारा आवाज करत रुग्णवाहिका निघाली. बाबांचे अशी अवस्था आपल्यामुळेच झाली आहे. या विचाराने मयुरी आतल्या आत स्वतःवर राग राग करत होती.

तर डोळे मिटून हात जोडून, " बाबांना काही होऊ देऊ नको. " अशी देवाकडे प्रार्थना करत होती.

रुग्णालय डॉक्टरांनी बाबांना तपासले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याचे सांगितले. अति तणावामुळे मयुरी ची आई चक्कर येऊन पडली. त्यामुळे तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. बाबांची तब्येत नाजूक, आणि आईची ही तब्येत खराब.... आता मात्र मयुरी खूप घाबरली. तिने समीरला कॉल करून या परिस्थितीबद्दल सांगितले.


समीर धावतच रुग्णालयात आला. त्याला पाहिल्याबरोबर तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडतच घडलेला प्रकार सांगितला. समीरने तिला धीर दिला. अस्वस्थ केले. परंतु मयुरी त्या धक्क्यातून सावरू शकत नव्हती. समीरने डॉक्टरांना भेटून दोघांच्या तब्येतीविषयी आणि उपचाराविषयी चौकशी केली.

डॉक्टरांनी बाबांची अँजिओग्राफी करावी लागेल असे सांगितले. आईची तब्येत स्थिर होती. बाबांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. पुढच्या 48 तास बाबांची काळजी घेणे गरजेचे होते.

मयुरी तर भीतीमुळे, धक्क्यामुळे बाबांच्या जवळ देखील येऊ शकत नव्हती. समीरने ते 48 तास मयुरीच्या बाबांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. क्षणभरासाठी सुद्धा तो बाबांच्या जवळून हलला नाही. बाबांना शुद्ध येईपर्यंत त्याने अन्नाला देखील स्पर्श केला नाही. सबंध वेळ तो बाबांजवळ लावलेल्या मॉनिटरवर त्यांच्या तब्येतीचा चढ-उतार बघत होता.


आपल्या आणि मयुरी मध्ये असलेल्या याच अंतरामुळे आज बाबांचा जीव धोक्यात आला होता. अनाथ आणि कुटुंबाचं दोघांमधील हे अंतर सांधता येण्यासारखे नाही, हे समीरला कळून चुकले होते.


बीपी शूट झाल्यामुळे, मयुरीच्या आईला दोन दिवस रुग्णालयात ठेवून नंतर घरी आराम करण्यास सांगितले. बाबांची तब्येत स्थिर होती. परंतु प्लास्टीमुळे त्यांना तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते.

या काळात समीरने मयुरीच्या कुटुंबाची काळजी घेतली. बाबांच्या जवळ थांबून तो त्यांची सेवा करत होता. त्यामुळे मयुरी घरी आणि हॉस्पिटलमध्ये लक्ष देऊ शकत होती.


आईची काळजी घेणे, हॉस्पिटलमध्ये बाबांची काळजी घेणे, घरातील कामे करणे, आणि हॉस्पिटलमध्ये येण्या-जाण्याची धावपळ, यात मयुरी थकून गेली होती. तर आपल्या समीर सोबत लग्न करण्याच्या निर्णयामुळेच, बाबांवर आणि आईवर ही वेळ आली ही अपराधीपणाची भावना मयुरीला अस्वस्थ करत होती.


आई-बाबांना सुखरूप ठेव. लवकर बरे कर, हीच प्रार्थना मयुरी करत होती. बाबांची तब्येत सुधारली. एक दिवसानंतर त्यांचा डिस्चार्ज होणार होता. संध्याकाळी मयुरीने समीर आणि बाबांसाठी चहा नाश्ता आणला. बाबांनी स्वतःच्या हाताने चहा घेतला.


समीर औषधी घेण्यासाठी मेडिकलमध्ये निघाला. निघताना त्याने मयुरीला बाहेर येण्याविषयी खुणावले. डॉक्टरांसोबत उद्याच्या डिस्चार्ज बद्दल चर्चा करण्यासाठी म्हणून मयुरी बाहेर निघाली.


हॉस्पिटल कॉरिडोर मध्ये विराजमान गणपती बाप्पा समोर समीर हात जोडून उभा होता. त्याला पाठमोरे बघताना मयुरीला गलबलून आले. काही अवधी साठी समीर सोबत भविष्याची सुख स्वप्ने बघताना, मयुरीला वास्तव जगाचा विसर पडला होता.


ते क्षण कितीही मंतरलेले असले, तरीही दोघांमधील हे 'अंतर 'घात ठरू पाहत होते.


म्हणूनच समीरने काही निर्णय घेतला होता. आणि तो मयुरीने देखील स्वीकारावा अशी त्याची इच्छा होती.


आज त्याच्या लाडक्या दोस्ताशी, गणपती बाप्पा सोबत हितगुज करताना समीरला भरून येत होते.

या चार-पाच दिवसात, त्याला आपली माणसं, प्रेम, काळजी याची जाणीव झाली होती. आणि काही काळापुरते नशिबाने त्याला मिळवून दिलेले हे कुटुंब, त्याला गमवायचे नव्हते. त्यामुळेच त्याने बाप्पाच्या साक्षीने मयुरीला,
"तू आपली सोबतची स्वप्ने बघू नको, मी तर अनाथच आहे. पण मी तुझ्या आयुष्यात आलो, आणि तू अनाथ होण्याच्या वाटेवर आली. म्हणूनच तू मला पूर्णपणे विसरून जा. आई बाबांच्या इच्छेविरुद्ध वागू नको. " असे सांगितले.

जड अंत:करणाने मयुरी ने त्याच्या या निर्णयाचा स्वीकार केला. आई बाबा दुखावले जातील, असे यापुढे वागायचे नाही. असा गणपती बाप्पा समोर निग्रह करून ती रूम कडे जाण्यासाठी निघाली.


देवाने अचानकपणे तिचं सुख, स्वप्ने ,भविष्य तिच्यापासून हिरावून घेतले होते.
तिच्या स्वप्नातला घोड्यावर येऊन तिला घेऊन जाणारा राजकुमार, तिला न घेताच निघणार होता....


पण आज ती स्तब्ध होती, निशब्द झाली होती. डोळ्यातून बाहेर येणाऱ्या अश्रूंना, तिने थोपवले. भावना शून्य झालेल्या समीर कडे पाहिले, परत मागे न वळता ती बाबांच्या रूम कडे निघाली.


बाबांच्या छातीवर डोके ठेवून ती हमसून हमसून रडू लागली.
" बाबा मी चुकले मला माफ करा. तुम्हाला आणि आईला मी परत कधीही त्रास देणार नाही. काही चुकीचे वागणार नाही. "

बाबांनी थरथरणारा आपला हात तिच्या डोक्यावर ठेवला, आणि म्हणाले,
" शांत हो मयुरी. मी आता बरा आहे. एवढे मनाला लावून घेऊ नको. घरी गेल्यावर आपण याविषयी बोलू. "


मात्र बाबांना तिच्या या भावना कळत होत्या. तिचा त्याग करत होता.


काय असेल बाबांचा निर्णय? पाहूया पुढच्या भागात......


क्रमश :..

गीतांजली सचिन

🎭 Series Post

View all