मंतरलेले अंतर (भाग 6)

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर

भाग 6:

समीर आणि मयुरी दोघांनी आज दुपारची आतुरतेने वाट पाहिली. कधी एकदा संध्याकाळचे पाच वाजतात आणि वाचनालयात जाता येईल. समीरला आज त्याच्या वेन्धळेपणाबद्दल मयुरी सुनावणार होती . तर समीर तिला पुस्तक देऊन त्याचे अभ्यासाचे पुस्तक घेणार होता.

साडेचार वाजले तशी मयुरी पळतच वाचनालयाकडे निघाली. समीरही निघतच होता , परंतु त्याला शेठजीचा निरोप आला आणि हिशोबासाठी दुकानात जावे लागले. त्या मुलीला भेटण्याची जागा कर्तव्याने घेतली , आणि समीर वाचनालयात जाऊ शकला नाही. मयुरी मात्र मनातल्या मनात चरफडत घरी आली.


एवढ्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या ' काटा रुते कुणाला ' कादंबरीची उत्सुकता मयुरीला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच तळमळीत तिने तो दिवस काढला.


दुसऱ्या दिवशी मात्र तिला लवकर निघता आले नाही. वेळेचा पक्का असणारा समीर मात्र वाचनालयात आलेला होता. रेगे काकांना मदत करत होता.

फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट , खूप जुनी काळपट जीन्सची पॅन्ट. नीटनेटके केस , चेहऱ्यावर शोभणारे मिशी आणि तेजस्वी पण बोलके डोळे असणाऱ्या समीरला पाहताच मयुरीचा राग उफाळून आला..

तवा तावाने ती समीर कडे निघाली. पण तो रेगे काकांना कामात मदत करतो आहे हे पाहून थोडी थबकली.


आज नवीन पुस्तके आल्यामुळे त्यांच्या एन्ट्री साठी तो काकांची मदत करत असल्याचे तिने पाहिले. नेहमीच तो इथे अशी मदत करतो हे ऐकून तिचा राग जरा शांत झाला.


त्याला पाहून तिच्या हृदयात काहीतरी झाले. त्याच्यावरून नजर हटवावी, काही बोलावे हे देखील क्षणभरासाठी ती विसरून गेली. पण " आपल्याला नडला त्याला आपण फाडला. " या तिच्या मूळ स्वभावाने डोके वर काढले.


" अहो महाशय, इतका वेंधळेपणा कसा काय करू शकता हो तुम्ही? " मयुरीच्या कडाडणाऱ्या तोफेकडे समीरने तेवढ्याच शांततेने पाहिले.


समीर आणि तिची नजरा नजर झाली. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली. एकमेकांवर खेळलेली नजर तिथेच स्तब्ध झाली. दोन-तीन मिनिटे याच अवस्थेत गेल्यावर रेगे काकांनी आवाज दिला. त्याबरोबर दोघेही भानावर आली.


एव्हाना दोघांनाही एकमेकांची नावे माहीत झाली होती. मयुरीच्या मनातील रागाची, भांडणाची जागा मैत्रीने घेतली होती.वाचनालयात जाण्याचे मयुरीचे सातत्य जरा जास्तच वाढलेले होते. दोन-तीन दिवसांनी मयुरी पुस्तके बदलण्यासाठी वाचनालयात जाऊ लागली. नियमितपणे वाचनालयात येत होता. दोघांचे विचार जुळले आणि मैत्री झाली. समीरला तिच्या घरच्यांबद्दल बरीचशी माहिती समजली होती. मयुरी एका सधन घरातील एकुलती एक मुलगी होती. घरच्यांची स्वप्न आहे त्यांच्या अपेक्षा साहजिकच खूप वेगळा होत्या. समीरच्या मात्र आई-वडिलांचा पत्ता नव्हता.

हे अंतर कधीच जुळून येण्यासारखे नाही . हे समीर चांगले जाणत होता. त्यामुळे तो मयुरी सोबत खूप जपून वागत होता. न जानो काही कमी जास्त झाले आणि मयुरी सोबत असलेली मैत्री तुटली तर......

या विचाराने त्याचे मन हैराण होई. आणि मनात असून देखील तो मयुरीला काही बोलत नसे.


मयुरीला देखील त्याचा भूतकाळ माहीत झाला होता. तो अनाथ आहे. त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. त्याच्याकडे आपले म्हणावे असे कोणीही नाही. पण तिला मात्र या गोष्टींनी काही फरक पडत नव्हता. त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. रात्री, दिवसा, झोपेत, जागेपणी , काम करताना तिला फक्त समीरच दिसत असे..

तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार सापडला होता. पण समीर मात्र तिच्याबद्दल आपल्या मनात काय भावना आहेत हे काही कळू देत नव्हता. समीरच्या डोळ्यात दिसणारे ते भाव व्यक्त कधीच होत नव्हते.


आज काल तर समीर तिला भेटत देखील नव्हता. परीक्षा जवळ असल्याकारणाने त्याने स्वतःला काम आणि अभ्यास या गोष्टीत झोकून दिले होते.

दिवसभर काम आणि रात्रीची जागरण यामुळे समीर आजारी पडला. तापाने फणफणत होता.

अनाथालयातील मावशींकडून मयुरीला समीर बद्दल समजले. ती समीरला भेटायला आली.


तो तापेचे औषध घेऊन नुकताच झोपला होता. तिने त्याच्या अंगाला हात लावून पाहिले. त्याचे अंग तव्यासारखे तापले होते.

याही अवस्थेत तो अर्धवट ग्लानित एकाकी पडलेला होता. जवळ बसून मायेने डोक्यावर थंड पाण्याच्या पट्या ठेवणारे कोणी नाही कि आपल्या तब्येतीची काळजी असणारे कोणी नाही!,' या विचारानेच तिच्या पोटात खड्डा पडला.

अनाथ असणे म्हणजे नेमके काय याची तिला जाणीव झाली. या क्षणीच तिने कायम समीरची साथ देण्याचा ठाम निर्णय घेतला.

रुमालाच्या पट्ट्या करून मिठाच्या पाण्यात बुडवून ती समीरच्या डोक्यावर ठेवत होती. समीरने अर्धवट झोपेतच मयुरीला आवाज दिला. मयुरीने त्याचा हात आपल्या हातात घेतला.

मयुरीचा प्रेमळ स्पर्श आणि तापेची ग्लानी याचा अंमल समीर वर चढला. त्याने बरळतच मयुरीला 'आपले तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. '


मयुरीचा मात्र या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. इतके दिवस ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अशाप्रकारे येईल असा विचारही मयुरीने केला नव्हता.


पण कधी कधी काही घटना अकल्पितपणे घडतात आणि आयुष्य बदलून टाकतात.

तापेच्या ग्लानीत मयुरी आणि समीर दोघांचे आयुष्य बदलून गेले होते.


दोन मने एक झाली होती. प्रेमाच्या प्रेमळ बंधनात अडकली होती. आयुष्यभर साथ देण्याच्या वचनात बद्ध झाली होती..


कसे होईल मयुरी समीर चे लग्न? घरच्यांची परवानगी मिळेल का???

पाहूया पुढच्या भागात....

क्रमश :


गीतांजली सचिन.

🎭 Series Post

View all