मंतरलेले अंतर (भाग 2)

एक हलकी फुलकी प्रेमकथा
भाग : 2

मागील भागात आपण पाहिले की समीरने दुबईमध्ये गिरीश सोबत एक फर्म सुरू केली होती. नशिबाने त्याला जोरदार साथ दिली, आणि "ग्रीसम" असोसिएट चांगली नावारूपाला आली. खूप कमी वेळात म्हणजे जेमतेम बारा महिन्यात ग्रीसमने आपल्या क्षेत्रात चांगला जम बसवला होता.


या एक वर्षात समीर ने मात्र मान मोडेपर्यंत काम केले होते. दिवस आत्र एक करून त्यांनी या क्षेत्रात पाय रोवले होते. गिरीश चे कुटुंब दुबईतच होते. त्यामुळे तो रात्री घरी जात असे. समीरचे कुटुंब मात्र भारतात! मुलांच्या, मयुरीच्या आठवणीने त्याचा जीव खूप कासावीस होत असे. मग तो स्वतःला जास्तच कामात झोकून देई. दिवसभर कसातरी कामात वेळ जाई. पण रात्र समीरला खायला उठे.


त्यावर उपाय म्हणून त्याने रात्रीचे काम करण्यास सुरुवात केली. त्याने पूर्णपणे स्वतःला कामात झोकून घेतले. रात्री उशिरापर्यंत काम करायचे, मग सकाळी उशिरा उठायचे. तसाच काहीतरी नाश्ता करून धावत पळत ऑफिस! तेथे दिवसभर मेहनत.. ऑफिसची वेळ संपली की रात्री घरी फाईल्स आणायच्या. अन पुन्हा रात्री उशिरापर्यंत काम. हाच त्याचा दिनक्रम झाला होता.


मयुरी सोबत पाच दहा मिनिट बोलले हाच त्याचा विरंगळा. हे विरहाचे क्षण त्याला खूप जड जात होते.

की त्याला मयुरी ची आठवण होई. रात्री उशिरा चंद्र आणि चांदण्याचा साक्षीने मयुरीच्या हातात हात घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, रात्रीच्या शांततेत समुद्राची ऐकू येणारी का गाज, वाऱ्याची ती थंडगार झुळूक, मयुरी ची अखंड बडबड, हे सगळे तो मिस करत होता.

दिवसभरातल्या घटना सांगताना मयुरीच्या आवाजातील उत्साह, काही नवीन कल्पना सांगताना तिच्या डोळ्यात येणारी चमक तो नेहमीच डोळ्यात साठवून घेई.

एकटाच मयुरी कडे बघताना तिचं ते लाजणं आणि लटक्या रागाने,

" असं काय बघतोस रे माझ्याकडे? नवीन लग्न झालेले आहे का आपले? " असे म्हणत गालाच्या कोपऱ्यात तिचे हसणे समीरच्या हृदयाला जखमा करत असे.

समीरला या सगळ्यांची खूप आठवण येई. कधीकाळी आपले हे कुटुंब असेल, आपल्यालाही आई-वडील मिळतील, आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे कोणीतरी असेल, याचा स्वप्नात सुद्धा समीरने विचार केला नव्हता. लहानपणापासून एकट्याने वाढलेल्या समीरच्या आयुष्यात मयुरी मुळे हे सुखाचे चांदणे आले होते.


दहा-पंधरा दिवसांच्या बाळाला एका दुपटामध्ये गुंडाळून एका हतबल मातेने अंधारात्री सावली अनाथाच्या दारात सोडून पळ काढला होता. तास-दोन तासांनी ते बाळ रडू लागले आणि त्याच्या आवाजामुळे सावलीतील कर्मचारी बाहेर आले. त्यामध्ये गुंडाळलेले ते जिवाच्या आकांताने रडत होते.

गोरे गोमटे, भरपूर जावळ असलेले , रडता रडता तोंडात अंगठा चोखणारे ते गोंडस बाळ पाहता क्षणी सर्वांना आवडले. अनाथायालयातील सर्वांनी मिळून त्या गोंडस बाळाचे नाव " समीर" ठेवले.

त्या दिवसापासून समीर आपल्या रक्ताच्या नात्याशिवाय अनाथालयातील त्याच्यासारख्याच परिस्थितीने अनाथ बनवलेल्या मुलांसोबत वाढू लागला.

आवड निवड नाही, कुठला हट्ट नाही की नको असणारी गोष्ट " नाही" म्हणण्याचा अधिकार नाही.

मिळेल ते खायचे. कोणी दात्याने नवीन कपडे घेतले तरच ते मिळायचे नाहीतर एरवी दुसऱ्यांनी वापरून जुने झालेल्या कपड्यांवरच त्या अनाथालयातील मुलांना वेळ निभवावी लागे. छोट्या समीरला मात्र या गोष्टीबद्दल खूप चिड येई.


कधी वाढदिवस नाही की स्वतःसाठी केक नाही. एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलाचा किंवा समाजासाठी काही करावे अशी भावना असणाऱ्या सहृदय कुटुंबातील मुलाचा वाढदिवस अनाथालयात साजरा होत असे.

त्यावेळी सर्व मुलांना केक भेटवस्तू गोडाधोडाचे जेवन मिळे.

लहानगा समीर मात्र परिस्थितीवर चिडून आपल्या दोस्ताजवळ म्हणजे गणपती बाप्पा जवळ बसून आपल्या मनातील व्यथा सांगत असे. तीच अशी एक जागा होती की समीरला तिथे मनमोकळे करता येई. मनात साचलेल्या दुःखाला अश्रू वाटे रस्ता करून देता येत असे. हक्काने बाप्पाला काही जाब विचारता येत असे.

अनाथालयातही त्याची काळजी घेतली जात होती परंतु तेथील सर्वांचे दुःख सारखेच! कोण कोणाचे आणि कसे सांत्वन करणार??


हळूहळू समीर वाढू लागला. नगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागला. अनाथालया बाहेरचे हे जग त्याला आवडू लागले. शाळेत त्याचे मन रमत होते. पुस्तकांसोबत त्याची चांगली गट्टी जमली.

एकदा का पुस्तकांसोबत गट्टी झाली की ती व्यक्ती आयुष्यात कधीही एकटी राहत नाही.

पुस्तके त्याचे आईबाप,बहीण भाऊ,, मित्र बनले. समीर हुशार मेहनती असल्यामुळे शिक्षकांचा लाडका झाला. त्याला भरपूर मित्रमंडळी मिळाली.

त्याच्या हुशारीमुळे आज्ञाधारकपणामुळे आणि लाघवी व्यक्तिमत्वामुळे शिक्षणाच्या बाबतीत जास्त अडचणी शाळेत असेपर्यंत आल्या नाहीत. त्याची फीस,वह्या, पुस्तकांचा खर्च शाळेतील शिक्षक तर कधी त्याच्या मित्राचे आई वडील करायचे.

हुशारी , मेहनत आणि सातत्याच्या जोरावर तो दहावीला गुणवत्ता यादीत आला. त्याचे कौतुक झाले. सत्कार झाले. वर्तमानपत्रातून त्याला प्रसिद्धी मिळाली.. तो नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा कडे गेला. आज आपलं कौतुक पाहायला आपलं असं कोणीतरी हवं होतं, ही भावना त्याच्या मनात दाटून येत होती.

तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडला. त्याने वळून पाहिले तर एका आजोबांनी त्याचीही अवस्था पाहिली आणि त्याला म्हणाले, " धीर धर पोरा, खूप मोठा होशील. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बाप्पा आहे बघ तुझ्या सोबत. "

काय घडणार आहे त्याच्या आयुष्यात पाहूया पुढच्या भागात..

क्रमश :......

गीतांजली सचिन

🎭 Series Post

View all