मंतरलेला क्षण

एका ध्येय वेड्या शिक्षकाला बदलून टाकणाऱ्या मंतरलेल्या क्षणाची छोटीशी गोष्ट

श्रीरंग नुकताच प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाला होता.मनात अपार असा उत्साह , खूप सारी स्वप्न आणि आशावाद.नोकरीचा पहिलाच दिवस.तालुक्यापासून 50 किमी असणारे छोटेसे गाव.जाताना अनेक शेरे मिळत होते,काही नकारात्मक गोष्टी कळत होत्या आणि मनावर मळभ दाटून येत होत.एक तासाने एस टी फाट्यावर थांबली, पावसाळी दिवस लाल माती तुडवत चालू लागला.पाऊण तासाने शाळा दिसली,कागदपत्रे पूर्ण करून सरकारी नोकरीचा श्रीगणेशा झाला.आता खरतर खूप छान फीलिंग यायला हवे होते .परंतु वातावरण तसे नव्हते.वर्गावर पहिला दिवस ओळखी करून घेण्यातच संपला. हळु हळू वातावरण माहित झाले,शाळेची सद्यस्थिती खूप नकारात्मक होती विद्यार्थी गरीब शेतकरी कुटुंबातले होते.बिचारे खूप आशेने पाहतात असे श्रीरंगला अनेकदा जाणवत होते.त्याच्याबरोबर आणखी तरुण 2 मित्र शाळेत रुजू झाले, संख्या वाढली पण काहीतरी मिसिंग होतं. मूल थोडी लांब लांबच होती.एकदा असेच मीटिंग मध्ये एका वरिष्ठ शिक्षकाने सहज म्हंटले,"इथे काय होणार आहे का?"आपण आपलं यायचं आणि जायचं.श्रीरंग अश्या गोष्टींनी खचत होता.नोव्हेंबर संपला आणि क्रीडास्पर्धा जाहीर झाल्या.श्रीरंग आणि त्याचे दोन्ही सहकारी जीवाच रान करून सराव घेत होते.खुप खुश होती मुलं, स्वतः शिक्षक आपल्याबरोबर खेळतात आणि जपतात पण.स्पर्धा सुरू झाली तेव्हा त्याची शाळा कोणाच्या खिजगणतीत सुद्धा नव्हती.पहिलाच खो खो चा सामना सुरु झाला आणि बघता बघता नूर पालटला, मूल चेव येऊन खेळत होती पहिला सामना जिंकला आणि मुलांनी सगळं मैदान डोक्यावर घेतले.एक मुलगी सहज बोलून गेली ,"गुरुजी,तुम्ही इतके कष्ट घेऊन शिकवलं तर येणारच ना आम्हाला".ती स्पर्धा मुलांनी गाजवलीच,पण श्रीरंग ला तो मंतरलेला क्षण सापडला होता.मनावर आलेलं सगळं नैराश्य दूर पळून गेल होत.दुसऱ्या दिवशी एस टी मधून एक नवा शिक्षक उतरला होता.मनात एक दुर्दम्य आशा आणि जिद्द घेऊन.तो एक मंतरलेला क्षण मुलांना ,श्रीरंग ला आणि शाळेला संपूर्ण बदलून गेला.