मानसिक संसर्ग

This is conversation between two friends. Who are sharing there opinion about surrounding situation.

    #मानसिक_संसर्ग

©️ अंजली मीनानाथ धस्के

               एकांतवासाला कंटाळलेले जीव  विरंगुळा म्हणून आप्तस्वकीयांना फोनवर बोलतात . ज्या विषयाला   टाळायचे म्हणून फोन करतात नेमकी त्याच विषयावर सविस्तर चर्चा रंगते.

           एकाने अमुक गोष्टीचा कंटाळा आला म्हणावं आणि दुसऱ्याने त्याचीच री ओढवी असच संभाषण सुरू रहात .

     कोरोना संसर्गजन्य रोग आहे. त्याच्या निमित्ताने इतर अनेक छोटे छोटे मानसिक संसर्गजन्य रोग या कालावधीत प्रकर्षाने जाणवायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे.....

   दोघेही  स्वतःच चित्त प्रसन्न ठेवण्याचा खटाटोप करत असतांना एकाने दुसऱ्याला फोन करावा. दुसऱ्यानेही नकळत चिंताजनक विषयाला हात घालावा आणि मग दोघानींही ज्या गोष्टीवर आपला जोर चालत नाही त्या विषयावर तासभर चर्चा करून अखेर तो विषय अनुत्तरित ठेवावा.... जणू पुढच्या वेळी पुन्हा नव्याने जुनाच विषय चघळायला घ्यायचा आहे असा करारच त्यांच्यात झालेला  असावा.

       सगळी गंमतच आहे.....

आमचंच उदाहरण घ्या ना...

आज नेहमीप्रमाणे मैत्रिणीशी फोन वर बोलणे सुरू झाले. तिने तक्रारीचा सूर लावला .

भाज्या मिळत नाही.

घरातले सारखे भूक भूक करतात काय करावं .

घरातली कामं तर संपतच नाही.

मुल टीव्ही वर सतत कार्टून बघत बसतात.

कधी हे सगळं थांबणार आहे .

कधी बाहेर फिरायला मिळणार आहे

इति ...

       खरं तर भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तेव्हा ही... काय बाई त्याच त्याच भाज्या करायच्या .. म्हणणाऱ्या आम्ही  आमच्याही नकळत "भाजी भेटणं कठीण झालंय " ही  गंभीर समस्या मानून  हिरीरीने त्याबद्दलच्या तक्रारी मांडायला सुरुवात केली.

ऋतु कोणताही असो घरात असले म्हणजे सगळेच कायम भूक भूक करतात . त्यात नवीन ते काय पण ही समस्याही अती गंभीर वाटून  घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करतांना  होणारी तारांबळ एकमेकींनाल दुःखी स्वरात... पण रंगवून सांगितली.

घरातली कामं वाढली हे जरी खरं असलं तरी ती करतांना जगातील इतर समस्यांचा भुंगा डोक्यात शिरत नाही. हाताला काम असल्याने  रिकाम्या वेळेचं काय करावं असे प्रश्न पडत नाही. हे फायदे अनावधानाने कबूल केले असले तरी त्यामुळे शरीरावर पडणारा ताण विसरून कसं चालेल ? म्हणून मग त्यावरही तीने मला आणि मी तिला सांत्वनपर बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.

      नवऱ्याला एक वेळ बायकोच्या हातातून टीव्ही चे रिमोट स्वतः कडे घेता येईल पण स्वतःच्या लहान मुलाकडून रिमोट मिळवण्यात त्याला कधीच यश येत नाही. किंबहुना घरातल्या कोणालाच यात यश येत नाही.  आम्हा दोघींना  तर जेव्हा कधी टीव्ही सुरू होतो तेव्हा  कार्टून शो बघण्याची सवय झालेली आहे.  आम्ही अनेक कार्टून शो आमच्या मुलानपेक्षाही आवडीने बघतो. अँनिमेटेड मूव्ही तर मला विशेष आवडतात म्हणून नवीन मूव्ही आला आणि तिने तो बघितला की ती मला आवर्जून सांगते.

पण आज तिच्या कोण्या मैत्रिणीने तिला  मुलांच्या टीव्ही बघण्याच्या तक्रारी ऐकवल्या आणि  तिने त्या मला अगदी तिच्याच तक्रारी असल्या सारख्या मला ऐकवल्या. मीही भूतकाळ, वर्तमान काळ यातील अनेक दिवसांचा शोध घेवून फुटकळ का होईना तक्रारी शोधून काढल्याच.

हे सगळं कधी थांबणार याच उत्तर तर माझ्याकडे नव्हतं पण मैत्रिणीने येवढ्या आशेने विचारल तर सांगायला हवंच म्हणून मग आहे नाही ते गणिती ज्ञान वापरून मी तिला कडक नियम पाळले तर लवकरच हे सगळं आटोक्यात येईल असं साचेबद्ध उत्तर दिलं.

तेनेही हे उत्तर पहिल्यांदाच ऐकतो आहे असे भाव शब्दात मांडून मी दिलेल्या उत्तराबद्दल समाधान व्यक्त केलं.

      एरवीही कामाशिवाय  घराबाहेर न पडणारी  मी पण मनसोक्त भटकायला आवडणाऱ्या तिची घरात होणारी घुसमट ऐकुन माझं मन हेलावून गेलं. खिडकीतून येणारी मोकळी हवाही माझा भावना आवेग थांबवू शकली नाही.

जड झालेल्या स्वरात ," जातील ग हे दिवस ही जातील... लवकरच आपल्या नेहमीच्या ठिकाणी आपण भेटू आणि मज्जा करू. " असा दिलासा मी तिला दिला.

          सरते अखेरी आमच्या चर्चेची गाडी एकमेकींना दिलासा देत सकारात्मक विचार कसे ठेवायचे या उपयांकडे वळली .

बोलता बोलता एकमेकींच्या सहवासातील सुवर्ण दिवस आम्ही आठवायला सुरवात केली. भूतकाळातील गंमती आठवून , आम्ही  मूर्खपणाने केलेले  उद्योग आठवून  एकमेकींची अक्कल काढत दिलखुलास हसून घेतलं. थोड्या वेळाने आपण आवडीने भाज्या कधी खातो ग ... भाज्या मिळत नाही याची आपल्याला काय चिंता ... टीव्ही बघायला वेळच कुठे मिळतो? सासू सून हेवेदावे बघण्यापेक्षा कार्टून, डिस्कवरी बघणं बरं ... घरातल्या कमीत कमी पदार्थात आज पोटभरीचा  काय नवीन पदार्थ  बनवला आहेस? यावर मनसोक्त संवाद साधला.

अचानक कसली तरी आठवण होवून कामाचा डोंगर वाट बघत बसला आहे म्हणत संभाषण आटोपतं घेतलं.

       नवीन काय बोललो ? किती खरं किती खोटं बोललो? या प्रश्नाची उत्तरे आम्ही  शोधली नाही. त्याची गरजही भासली नाही.

फोन ठेवल्यावर माझ्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या विचाराने माझ्या चेहऱ्यावर हसू मात्र फुललं .

निखळ मैत्री अशीच असते भावनिक संसर्ग देणारी पण तेवढीच हवी हवीशी .

अनेकदा एखाद्या समस्येवर आपण आपल्या पुरता उपाय शोधलेला असतो. अवतीभवतीच्या वातावरणाबद्दल तक्रार करायची नाही. जे आहे त्यात चांगल काय हे शोधून मार्गक्रमण करायचं असं ठरवलेलं ही असत. पण......

भेटणारा तक्रारीचा पाढा वाचत असेल तर आपल्याही नकळत  आपणही तक्रारींचा पाढा वाचायला लागतो .

आणि आपला हाच तक्रारींचा पाढा इतर अनेक जणांना ही उद्युक्त करतो. अनेक बाबतीत हा मानसिक संसर्ग पसरत जातो.

तेव्हा " स्टे होम.. स्टे सेफ " सारखंच  "नेव्हर कंप्लेंट ... फायिंड बेस्ट ... इमप्रुव्ह मेंटल हेल्थ .. स्टे हॅपी.... लिव लाँग" हेही आवर्जून करायला हवं.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः सदर लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे.

यावेळी फुलांची रांगोळी काढली आहे . अपेक्षा आहे की ही रांगोळी ही तुम्हाला आवडेल.

तुमच्यापैकी किती जणांना या मानसिक संसर्गाचा मजेशीर अनुभव आलाय. तुमचे अनुभवही वाचायला आवडतील.