मानसिक घटस्फोट भाग तीन

शरीरापेक्षा मनाने घेतलेले घटस्फोटाची कहाणी.
सासुबाई आत निघून गेल्या आणि थोड्याच वेळात रूम मधून धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला.अंगद आणि विभा धावतच रूम मध्ये गेले.बघितलं तर सासुबाई बेशुद्ध होऊन खाली पडल्या होत्या.ते बघून विभा तर अगदी घाबरून गेली.अंगदरावांनी पटकन डॉक्टरला फोन केला.डॉक्टर आले,तपासून काळजी करण्याचे कारण नाही टेन्शनमुळे असं झालं असावं असं सांगून निघून गेले.पण त्या दिवशी पार्टीला जायचं राहून गेलं ते राहूनच गेलं.पुन्हा कधीही अंगदरावांनी विभाला कुठे बाहेर नेलं नाही.कुठेही पार्टी असेल की ते एकटेच जायचे.आताही अनुराधाला हे सगळं सांगताना तिचे डोळे पाणावले.
"अगं एवढेच आहे ना? मग आता जा ना कुठेतरी दोन दिवस निवांत." अनुराधा
"अगं सासूबाईंना जाऊन अजून महिनाही झाला नाही असं कसं जायचं." विभा.
"अगं कुठे बाहेर फिरायला जा असं म्हणत नाही.इथे जवळच लोणावळ्याला माझं फार्म हाऊस आहे.दोघेजण शनिवार रविवार दोन दिवस जाऊन या."अनुराधा.
अनुराधाचं बोलणं ऐकून विभाला खूप आनंद झाला.आणायसे या शनिवारी रविवारी.निशांत त्याच्या मित्रासोबत बाहेर जाणार होता.तर नेहा तिच्या आत्याकडे गेली होती.
संध्याकाळी अंगदराव आल्यावर विभाने त्यांच्याकडे विषय काढला.
"अहो आज माझी मैत्रीण आली होती.तिच म्हणे लोणावळ्याला फार्म हाऊस आहे.ह्या शनिवारी रविवारी आपण जाऊया का?"
तिचं बोलणं ऐकून अंगदरावांच्या डोळ्यात राग उतरला.
"माझ्या आईला जाऊन महिना झाला नाही आणि तुला फिरायला जायचे आहे."
"अहो खूप दगदग झाली माझी जाऊन आलो तर बरं वाटेल थोडं." विभा.
"एवढी कसली दगदग झाली ग तुझी?माझी आई गेली म्हणून तुला आनंद उत्सव साजरा करायला जायचे की काय?" अंगदराव
"अहो काय बोलताय तुम्ही हे?" विभा अगदी सुन्न झाली.
"काय बोलतोय?अग खरं तेच बोलतोय.माझी आई गेली तुझ्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूस आला नाही.उलट तुला तर मनातून आनंद झाला असेल.सुटका झाली ना तुझी.अगं बाई आहेस की कैदशीन?एखाद्याच्या मरणानंतर आनंद साजरा करायची कसली ग घाई तुला"
हे आणि असं बरंच अंगदराव बराच वेळ बडबडत होते.विभाचा तर कानापर्यंत काही शब्द पोहोचतही नव्हते.मेंदू अगदी सुन्न झाला होता.
त्यानंतर विभाने अंगदरावांकडे कुठलीही गोष्ट बोलून दाखवली नाही.यानंतर वर्षभरातचअंगदरावांनी बहिणीच्या मुलाशी नेहाचं लग्न लावून दिलं.लग्नामध्ये विभाचं मत विचाराव असं कुणालाही गरजेचं वाटलं नाही.विभानेही कुठल्याही प्रकारचे मत प्रदर्शन केलं नाही.ती अगदी यंत्रवत सगळे काम करत होती.अगदी नेहाच्या पाठवणीच्या वेळी ही अंगदराव अगदी लहान मुलासारखे ढसाढसा रडले.तेव्हाही निर्विकार भाव होते.
निशांत अमेरिकेला निघून गेला.आणि दोन वर्षातच तिकडच्याच मुलीशी लग्न करून तिकडेच स्थायिक होण्याचा निर्णय त्याने आईवडिलांना कळवला. तेव्हाही विभाने सगळं सहज स्वीकारलं.अंगदरावांना मात्र मुलांचं दूर जाणं खूपच मनाला लागलं.त्यांनी स्वतःला जास्तच कामांमध्ये गाढून घेतलं.

पाच वर्षांनी पहिल्यांदाच नात आणि सुनेला घेऊन निशांत घरी आला होता.नेहा आणि निशांत ने मिळूनआई-वडिलांच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस अगदी धुमधडक्यात साजरा केला.दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले.घरट्यामध्ये आलेली पाखरे आपापल्या दिशेलागेल्यावर जसं घट्ट रिकाम होतं तसं विभा आणि अंगदरावांचे घर सुनं सुनं झालं.

"विभा, ये विभा,अग कसल्या विचारात हरवलीस ?"
अंगदराबांच्या आवाजाने विभा भानावर आली..

आज लग्नाच्या 35 वर्षानंतर पहिल्यांदाच अंगदरावांनी विभाचा हात हातात घेऊन काहीतरी विचारलं होतं.
"अग बोल ना काय हवय तुला?"अंगदरावांनी परत एकदा तिला प्रेमाने विचारलं.
"खरंच द्याल?"विभाने अंगदरावांच्या डोळ्यात बघत विचारलं.
"अग तू मागून तर बघ."अंगदराव प्रेमाने म्हणाले.
विभाने आनंददावांकडे बघितलं आणि एक सुस्कारा सोडला.

काय असेल बरं विभाची इच्छा?अंगदराव करू शकतील का पूर्ण?बघूया पुढच्या भागात.
क्रमशः





🎭 Series Post

View all