मानसिक घटस्फोट भाग एक

शरीरापेक्षा मनाने घेतलेल्या घटस्फोटाची एक कहाणी.
विभा आणि अंगादच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस कालच धुमधडाक्यामध्ये साजरा झाला.त्याला कारण नाही तसंच होतं.त्यांचा मुलगा निशांत पाच वर्षानंतर भारतामध्ये परत आला होता.चारच दिवसापूर्वी अंगदराव बँकेतून रिटायर झाले होते.मुलगी नेहा नातवंड आणि जावयासह बेंगलोरवरून आली होती.चार दिवस घर कसं भरलेलं वाटत होतं.आज पहाटेच लेक- सून, मुलगी-जावई,नातवंड सगळे आपापल्या दिशेने निघून गेले होते. घर परत रिकामा झालं.तिने सांजेला देवापुढे दिवा लावून विभा झोपाळ्यावरर बसली होती.इतक्यात मोगऱ्याचा मंद सुवास नाकात शिरला.हलकेच अंबाड्यावरून हात फिरवला तर लुसलुशीत फुलांचा स्पर्श झाला.त्यांनी मागे वळून बघितलं अंगदराव हसतच झोपाळ्यावर बाजूला येऊन बसले.विभाने त्यांच्याकडे बघून एक स्मित केलं.अंगदरावाने हळूच विभाचा हात हातात घेतला. विभा कडे एक प्रेमळ नजर टाकली आणिि म्हणाले, "विभा आयुष्याच्या वाटेवर अगदी सावली बनून माझ्यासोबत राहिलीस. आता रिटायरमेंट नंतरच आयुष्य मला तुझ्या सोबत घालवायचे आहे.तुझ्या सर्व इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत. बोल काय करू तुझ्यासाठी"
विभाने अंगदरावांकडे बघितलं.ते उस्तुकतेने तिच्याकडे बघत होते.विभा क्षणभर विचारात पडली, 'काय मागावं बरं?'
तिचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलं.
अगदी वीस -बविस वर्षाची होती तेव्हा विभा.नुकतच ग्रॅज्युएशन झालं होतं.ज्या बँकेत तिचे बाबा क्लार्क म्हणून काम करायचे.त्याच बँकेत नुकतेच मॅनेजर म्हणून आलेल्या अंगदरावांचं स्थळ विभागासाठी आलं.आपल्यापेक्षा सात-आठ वर्ष मोठे असलेल्या अंगदरावांशी तिची लग्नगाठ बांधली गेली.पाठी लहान भाऊ आणि बहीण त्यांचे शिक्षण, जास्त गरिबी म्हणता येणार नाही पण खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या कुटुंबाला आपली मुलगी सुस्थळी पडते यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट काय असेल.
अंगदरावांच्या घरात आई आणि अंगदराव दोघेच वडील लहानपणीच वारलेले. बहीण दोन वर्षांपूर्वीच लग्न करून सासरी गेलेली.विभाने गृहलक्ष्मी म्हणून अंगदरावांच्या घरात गृहप्रवेश केला.नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना त्याप्रमाणे काही दिवस सगळं अलबेल होतं.मग हळूहळू सासूबाईंनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली.विनाकारण करायचे काढून देणे,घालून पाडून बोलणे,माहेरच्यांचा उद्धार करणे.विभाला वाईट वाटायचं शक्य तितकं ती शांत राहायचा प्रयत्न करायची.
एक दिवस तर कहरच झाला.विभाने तिच्या माहेरच्या पद्धतीने भाजी बनवली.तर सासूबाईंनी भाजीचं पातेलं विभाच्या अंगावर फेकलं.खूप रडली विभा.रात्री आल्यावर तिने अंगदरावांच्या कानावर रडत रडत ही गोष्ट घातली.तिला वाटलं नवरा तिचं सांत्वन करेल. प्रेमाने जवळ घेईल.पण तिच ऐकून घेताच अंगदराव चिडले त्यांचे डोळे रागाने लाले लाल झाले.फाडकन तिच्या कानाखाली एक थप्पड लगावली.
"अग! दिवसभर मी तिकडे ऑफिसमध्ये मरमर राबायचंआणि घरी आल्यानंतर तुझ रामायण ऐकून घ्यायचं का?खबरदार! पुन्हा माझ्या आईविरुद्ध काही बोललीस तर."
त्यादिवशी रात्री विभा हमसून हमसून रडली.अंगदराव मात्र तिच्याकडे पाठ फिरवून झोपून गेले.तिथून पुढे ते नित्याचच झालं.पण विभाने अंगदरावांकडे कुठलीच तक्रार केली नाही.विभा निमूठपणे सर्व सहन करते हे बघून सगळ्यांनीच तिला गृहीत धरायला सुरुवात केली.
लग्नानंतर तीन-चार महिन्यातच विभाला दिवस केले.
खूप खुश होती ती त्या दिवशी.अंगदराव बँकेतून घरी आले.आणि तिने हळूच त्यांना ती गोड बातमी सांगितली.अंगदरावांना अत्यंत आनंद झाला.घरातही सर्वांना आनंद झाला.पहिले तीन महिने विभाला गरोदरपणाचा खूप त्रास झाला.सकाळी सकाळी अशक्तपणा जाणवायचा.उलट्या व्हायच्या.अन्न पचायचं नाही.विभाला वाटायचंअंगदरावांनी तिच्याशी बोलावं तिला काय हवं काय नको विचारावं.पण अंगदराव मात्र सर्व आईवर सोपवुन मोकळे व्हायचे.विभाला पाचवा महिना लागला.सासुबाईंनी तिला परत कामाला जुंपलं.दिवसभर त्यातील जिने चढ-उतार करायला लावायच्या.पायावर बसून फरशी पुसायला लावायच्या.का तर म्हणे नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे.
विभा कंटाळून जायची.रात्री हातपाय ठणकायचे. कंबर दुखायची.
एके दिवशी तिने डोळ्यात पाणी आणून अंगदरावांना सांगितलं,
"अहो!मला सहन होत नाही.थकून जाते मी दिवसभर.प्लीज तुम्ही आई सोबत बोलाल का?"
"अगं!आई तुझ्या भल्यासाठीच करते ना सगळं.तुला थोडं सहन करायला काय होतं."
"हो पण अशी होईलच ना नॉर्मल डिलिव्हरी.डॉक्टर बोलल्या ना आपल्याला तसं"
"हे बघ आईने आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेले आहे.तुझ्या अगोदर तिने दोन मुलांना जन्म देऊन लहानाचं मोठं केले.मग ती अनुभवाचेच बोल तुला सांगत असेल ना?"
"अहो पण.."
"बास आता मला ह्या विषयावर चर्चा नको.तुझं ऐकून मी माझ्या आईला काहीही बोलणार नाही."
विभा शांत बसली. तिला समजलं.नवऱ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.
अंगदरावांना विभाचं दुखणं कळेल का? बघूया पुढच्या भागात🎭 Series Post

View all