मानसिक घटस्फोट भाग चार

शरीरापेक्षा मनाने घेतलेल्या घटस्फोटाची कहाणी
"मला माझ्या आयुष्याची पस्तीस वर्ष परत हवी आहेत."
विभाने अंगदरावांच्या डोळ्यात बघत ठामपणे सांगितलं.
"काय?"
ती काय बोलते हे न कळून अंगदरावांनी तिला परत प्रश्न विचारला.
"हो माझ्या आयुष्याची 35 वर्ष मला परत हवी आहेत."
"अगं काय बोलतेस तू हे?म्हणजे तू माझ्याशी लग्न करून इतकी वर्ष खुश नव्हतीस?सुखी नव्हतीस?"
"सुख?सुख म्हणजे कायं असत हो?अग्नीच्या साक्षीने साथ फेरे घेऊन तुमच्याशी जन्मोजन्मीच नातं जोडलं.देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुमची अर्धांगिनी झाले.सुखदुःखात तुमच्या सोबत राहायचं वचन दिलं.आणि ते निभवलं सुद्धा. पण तुम्ही काय केलं?"
"अगं इतकी वर्ष राबराब राबलो. हे घर,गाडी वैभव उभं केलं हे तुझ्यासाठी आणि मुलांसाठीच होतं ना?"
"हो केलं ना, पण पैशाने प्रेमाची तहान भागवता येत नाही.लग्न करून आले तेव्हा तुमच्या आईने माझा छळ करायला सुरुवात केली.सुखदुःखाचे भागीदार तुम्ही माझे म्हणून तुमच्याशी माझं दुःख शेअर करायला गेले.तुमच्या आईच्या विरुद्ध भडकवून तुम्ही भांडण करावं अशी माझी इच्छाही नव्हती.फक्त माझ्यावर होत असलेला अन्याय तुम्हाला कळावा आणि कमीत कमी तुम्ही तरी मला समजून घ्यावं म्हणून तुमच्याशी बोलायला गेले.पण माझं दुःख ऐकून घेण्या इतकाही वेळ तुमच्याकडे नव्हता.ते तर सोडाच पण गरोदरपणामध्ये माझ्या नवऱ्याने माझं कोड कौतुक करावं कमीत कमी माझ्यासोबत वेळ घालवावा एवढी माफक अपेक्षा ठेवली मी तुमच्याकडून. पण तुम्हाला तर तेवढी ही गोष्ट करता आली नाही. बायको म्हणून शारीरिक व्यवहारा व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही प्रकारचा बायकोचा दर्जा दिला नाहीत मला. तुमच्या आणि तुमच्या आईच्या हट्टामुळे मिच जन्म दिलेला मुलांची आई ही होत आलं नाही मला."
अंगदराव अगदी सुन्न होऊन विभाने बोललेला शब्दा न शब्द ऐकत होते.

" अहो प्रत्येक मुलगी लग्न करून सासरी येते ती तिच्या नवऱ्यासाठी.आपल्या नवऱ्याने आपली काळजी घ्यावी. सुखदुःखात आपली साथ द्यावी.प्रसंगी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहावं.आपल्या आयुष्यातल्या नाजूक क्षणी प्रेमाने आपल्याला सावराव एवढी लहान अपेक्षा असते तिची.कुठलीही मुलगी सासरची माणसं तोडायचा विचार करून सासरच्या घरात पाऊल टाकत नाही.काही प्रसंग तसे घडतात काही परिस्थिती तशी उभी राहते.मुलगी आपलं माहेर,माहेरची माणसं सोडून तुम्हाला आणि तुमच्या माणसांना आपलंसं करते.पण तुम्ही करता?तुम्हाला तर साधं बायकोसाठी आपली एक सवय बदलता येत नाही."

अंगदरावांचे डोळे अगदी भरून आले.खरंच 35 वर्षात बायको म्हणून त्यांनी विभाची एकही इच्छा कधी पूर्ण केली नाही.
त्यांनी परत एकदा विवाचा हात हातात घेतला.
"विभा झालं गेलं विसरून जा.चुकलो मी.एकदा मला माफ कर आपण परत एकदा नव्याने सुरवात करू."
"नव्याने सुरुवात?आज तुम्ही एकटे पडलात तुमची मुलं तुम्हाला सोडून गेली म्हणून तुम्हाला माझ्याशी नव्याने सुरुवात करायची आहे."
आनंदरावांनी चमकून विभाकडे बघितलं.
"हो ऐकल मी तुमच आणि मुलांच आठ दिवसापूर्वीचं बोलणं.रिटायरमेंट चे पैसे देणयाच्या बहाण्याने,गावाकडची जमीन विकून आलेले पैसे देण्याची लालच दाखवून बोलावून घेतलत ना मुलांना?"
आता मात्र आनंदरावांचे डोळे भरून आले होते.खरंच किती विनंत्या केल्या होत्या त्यांनी मुलांना बोलवून घेण्यासाठी.जेव्हा पैशाचं लालच दाखवलं तेव्हा मुलं यायला तयार झाली.आली तसं चार दिवस राहून पैसे घेऊन भुर्कन उडून गेली.

"झालं ते होऊन गेलं.पैशामागे धावताना मुलांवर योग्य संस्कार होतात की नाही हे बघायला ही मला वेळ मिळाला नाही.तुझ्याशी तर मुलांची कधीच जवळीक झाली नाही.माझी मुलंही माझ्यासारखेच पैशांनी नाती मोजणारे निघाले.पण आता आयुष्याच्या उत्तरार्धात मला सगळं ठीक करायच आहे.एक संधी दे मला."अंगदराव अगदी काकुळतीला येऊन म्हणाले.
विभाने आनंदरावांकडे बघून एक मंद स्मित केलं.
ती काय बोलते ऐकण्यासाठी अंगदरावांचे कान अगदी अतुर झाले होते.मोठ्या अपेक्षेने ते विभाच्या चेहऱ्याकडे बघत होते.या उतार वयात आता त्यांना विभाशिवाय दुसरं कोणीही नव्हतं.
काय असेल विभाचा निर्णय? अंगदरावांना माफ करेल का?
बघूया पुढच्या भागात.
क्रमशः


🎭 Series Post

View all