माणसातील देव पांडुरंग

देव चराचरात सामावलेला आहे.


          माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म आहे...प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसांसोबत वागताना माणुसकीने वागले पाहिजे म्हणजेच कुणाला अडचणीत पाहता निस्वार्थ भावनेने मदत केली पाहिजे...त्या क्षणी तुमचं त्या माणसाची माणुसकीच नातं जोडलं जाते...नि तुमच्या रुपात त्या माणसाला देव दिसतो...
जात,धर्म ह्यापालिकडे जाऊन माणुसकी हाच आपला धर्म आहे हे रुजवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे.


          माणसांमध्ये पांडुरंगाचे रूप असते आणि देव माणसाची प्रवृत्ती असते फक्त ती जागृत होण्याकरिता माणसाला आपल्यातील स्वार्थ,गर्व,अहंकार,मीपणा बाजूला ठेवावा लागतो...कुणी संकटात दिसता फक्त बघून चर्चा रंगवणारे खूप असतात पण मोजकेच लोक मदतीला धावून येतात ते असतात माणसातील देव...पांडुरंग.


जीवनात बरेच असे अनुभव येत असतात जिथे नकळत विठू माऊली आपला पांडुरंग माणसाच्या रुपात आपल्या मदतीला धावून आलेला दिसतो.

           कधी रस्त्याने जाताना अपघात झालेला पाहिला तर बरेच जण नुसते बघून निघून जातात,नाहीतर चर्चा करत वेळ घालवतात पण काही जण थांबून लवकरात लवकर जखमी झालेल्या लोकांना उपचार कसे मिळतील ह्याचे प्रयत्न करतात नि त्यांचा जीव वाचवणारे देवमाणूस बनतात...

        एकीकडे उपचारासाठी खूप पैसे घेणारे डॉक्टर दिसतात तर दुसरीकडे अगदी मोफत उपचार करून कित्येक जीवांचे प्राण वाचवणारे डॉक्टर आहेत जे खरोखरीच माणसातील देव आहेत...
कोरोना काळात तर डॉक्टरांनी रात्रीचा दिवस नि दिवसाची रात्र केली जिथे आपल्याला साधा मास्क लावून थोड्या वेळानंतर गुदमरायला होतं तिथे ह्या कोरोना यौध्यानी तर पीपीई किट घालून वीस वीस तास रुग्णांची सेवा केली...देव याहून वेगळा तो काय??

        आपले सफाई कामगार जे नित्यनियमाने सगळ्यांचा कचरा घेऊन जातात आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला मोलाचे वाटेकरी होतात...कोरोनाकाळात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता कचऱ्याची विल्हेवाट लावुन सगळ्यांची काळजी घेतली...देवासारखेच ते आपल्यासाठी आहेत.

            आपले आईवडील जे जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यँत मुलांचं चांगलं व्हावं,मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून कष्ट करतात ते खऱ्या अर्थाने आपले देव असतात.जणू विठ्ठल रुक्मिणीचे ते रूप भासतात.प्रत्येक बाबतीत ते स्वतःच्या आधी मुलांचाच विचार करत असतात.त्यांचे ऋण ह्या जन्मात तरी फेडता येणं कठीणच...

            जन्मभर आपल्याकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरु,खाकी वर्दीत लोकांचे रक्षण करणारे पोलिस,गरजू अनाथ मुलांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू पुरविणारे समाजसुधारक,वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत करणारे नि त्यांच्या मुखावर हसू आणणारे मदतगार, सगळ्या जगाचा पोशिंदा असणारे बळीराजा,डॉक्टर्स,नर्स,सफाई कामगार,फेरीवाले याव्यतिरिक्त नेहमी आपल्या कृत्यातून दुसऱ्यांना मदत करणारे असे सगळे लोक माणसातील विठुमऊलीचे एक स्वरूप आहेत...ह्या सगळ्यांमुळे आजही एक प्रकारची सकारात्मकता आपल्याला जाणवत असते नि वाईट गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टीचा बरोबरोने समतोल राहायला मदत होते.


              विठुमऊली चराचरात सामावलेली आहे.ती माऊली विविध रूपातून आपल्याला सदैव दर्शन घडवत असते.त्याच माऊलीच्या भेटीपोटी लाखो वारकरी तहान भूक विसरून दरवर्षी न चुकता वारी करतात.कोणताही जाती धर्माचा भेदभाव न करता,आपण सगळे एक आहोत हि सुंदर भावना वारी माणसांमध्ये रुजवत असते.त्या भगवंताला मनापासून धन्यवाद करण्यासाठी एकदा तरी वारी अनुभवावी.तो नयनरम्य सोहळा एकदा तरी जगावा.वारीचा प्रवास माणसाला नकळत जीवनाचे सार शिकवून जातो.



माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे
गरजवंताच्या मदतीला धावून जावे
भेदभाव सोडूनि सगळयांना एकसम मानावे

माणसातील माऊलीचे दर्शन असे घडावे...


©®सुप्रिया शिंदे महादेवकर

धन्यवाद??