माणसाने माणसाशी माणसासम वागणे

Mansane mansasi mansasm wagne.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

एका खेडेगावात रखमा व श्रीपत यांचं छोटसं घर होतं.रखमा व श्रीपत दोघं मजुरी करीत. भल्या पहाटे रखमा उठे व चुलीत आग घाले.पाणी तापवत ठेवी. न्हाणं झालं की भाकऱ्या बडवायला घेई. चुलीवरच्या भाकऱ्या टम्म फुगायच्या.भाकऱ्या व कोरड्यास करुन त्याची शिदोरी बांधे. मुलांसाठी झाकून ठेवी.  

शिदोरी घेऊन आपल्या शेतातल्या कामाला ती दोघं बाहेर पडत. तोवर प्रभाकर व सुधाकर,त्यांचे लेक उठत. न्हाऊमाखू झाल्यावर आईने ठेवलेली भाकरी चहातून खात व शाळेत जायला निघत. पांढरा शर्ट व खाकी हाफपँट..तिलाही बऱ्याच ठिकाणी ठिगळं लावून शिवलेलं असायचं. ती ठिगळं केविलवाणं हसायची पण या दोघांच्या हास्यापुढे त्या दारिद्र्याचं हासू फिकं पडे.
दोघेही शाळेतला अभ्यास मन लावून करायचे. गुरुजींनाही हे दोघे खूप आवडायचे.

दुपारी घरी येताना वाटेवरच्या ओहोळात मनसोक्त डुंबायचे. तिथल्या चिंचेच्या गाभुळलेल्या चिंचा खायचे,बोरं खायचे अन् घरी यायचे. संध्याकाळपर्यंत आई यायची. तोवर एकमेकांना सांभाळायचे. आई आली की आईला शाळेतल्या गमतीजमती सांगायचे.
रात्री दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचे तेंव्हा त्या माऊलीला कोण समाधान वाटे.

एकदा रखमा या दोघांना,ती मजुरी करायची त्या शेतावर घेऊन गेली. या दोघांना मालकाच्या खळ्यात बसवून, श्रीपत, रखमा आपल्या कामाला लागले.
प्रभाकर व सुधाकर तिथे पकडापकडी खेळू लागले. तितक्यात शेतमालकाची चिंगी तिथे गेली व त्या दोघांबरोबर खेळू लागली.

खेळ रंगात आला होता,इतक्यात चिंगीच्या पाठीव्रर शेतमालकाचा धपका पडला.त्यांनी या मुलांना, चिंगीला हात न लावण्याचा धमकीवजा इशारा दिला. चिंगीला तिच्या आईने आंघोळ घातली.

दुपारी जेवताना या चौघांना पडवीत पत्रावळीवर आमटी भात वाढण्यात आला व प्लास्टिकच्या तांब्यातून पाणी दिलं गेलं पण प्रभाकर,सुधाकरला ही अस्पृश्यता रुचली नाही. ते भाताचे घास त्यांच्या तोंडात फिरत राहिले. ते जेवणावरुन उठले.मायने त्यांचे जेवण बांधून घेतलं.वाटेत कुणी कुणाशी बोलत नव्हतं. जणू ती नेहमीची पायवाट मुकी झाली होती. तिनेही जाणलं असेल या लेकरांच दु:ख. श्रीपतपण गप्पच होता. तो दुसऱ्या कामाला निघून गेला.

वाटेत  ती मायलेकरं ओहोळाच्या काठाला बसली. धाकटा म्हणाला,"आई ,आम्हांला गुरुजी तर शिकवतात,अस्प्रुश्यता नष्ट झाली म्हणून.मग हे काय गं आई. ती चिंगी आमच्याशी फक्त खेळली तर तिला मारलं."
आईने धाकट्याला जवळ घेतलं व त्याला म्हणाली," अरे लेकरा हे तर कायबी नाय. लय हालवनयास भोगलेत आपल्या पुरवजांनी.आपली सावली जरी ही मानसं जाताना तेंचे वाटेत पडली तरी चाबकानं फोडून काढायचे. परत घराकडं जाऊन तांबयान टकलेर बदाबदा पानी वतून घ्यायचे. आता हळूहळू कमी होतेय ही शिवाशिव पन तरीबी रकतात भिनलेय रे लोकांच्या."

 थोरलापण आईचं म्हणणं नीट लक्ष देऊन ऐकत होता. आई म्हणाली," बाबाचे खूप उपकार हायेत रे आपलेवरती.तुमी दोघंबी मोप शिका रे माझ्या लेकरांनो. इतकं शिका इतकं शिका की ह्ये लोक आपसूकच तुमच्याकडे येतील. तरच ही दरी कमी होईल बघा."

त्या दिवशी दोन्ही भावांत एक उर्मी उत्पन्न झाली,शिक्षणाची उर्मी. आपण स्वत: शिकून आपल्या समाजाला या दरीतून बाहेर काढण्याची उर्मी. दोघंही मग नेटाने अभ्यासाला लागले.आई काय भाकरतुकडा देई तो खाऊन अभ्यास करायचे,शाळेत जायचे.घराची झाडलोट,झाडांना पाणी,आईला स्वैंपाकात मदत सगळं सगळं करु लागले.

दोघांनाही दहावी बारावीला छान गुण मिळाले. मोठ्याने कला शाखा निवडली. सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करु लागला तर धाकटा मेडीकलच्या अभ्यासाला गेला. मोठा थोड्याच वर्षांत प्रशासकीय अधिकारी बनला. तर धाकटा  स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. त्याने त्याच्या जिल्हयात स्वतः चे इस्पितळ उभारले. त्याला रखमाई असे नाव दिले. आईवडलांच्या हस्ते इस्पितळाचे उद्घाटन केले.

मध्ये चारपाच वर्ष निघून गेली.शेतमालकाची चिंगी पोटुशी होती. अचानक तिच्या पोटात खूप दुखू लागलं.आठवा महिना चालू होता.गावातल्या डाक्टराला बोलवलं. तो म्हणाला,केस फार नाजूक आहे.तुम्ही जिल्ह्याच्या रखमाबाई रुग्णालयात हलवा.सोबत आपली चिठ्ठी दिली. शेतमालक व शेतमालकीण चिंगीला एम्बुलन्समध्ये घालून रखमाई इस्पितळात घेऊन आले.चिंगीला कळा सुरु झाल्या होत्या. ती गुरासारखी ओरडत होती. रखमाई तेंव्हा इस्पितळातच बसायची. पेशंटची आस्थेने चौकशी करायची.

चिंगीला,शेतमालकांना पाहून रखमाईने त्यांना नमस्कार केला. चिंगीवर ताबडतोब उपचार सुरु केले.
डाँक्टर प्रभाकरने शेतमालकाला आत बोलावून चिंगीच्या बाळाची स्थिती व शस्त्रक्रियेची गरज समजावून सांगितली.

शेतमालकाने त्यांना सांगितलं,"डाँक्टर, पोरगी माझी तुमच्याकडे सोपवलेय. आत्ता तुमीच माझे देव आहात."

मुलीला तात्काळ रक्ताची गरज होती तिचा रक्तगट,सुधाकरच्या रक्तगटाशी मेच झाला.प्रभाकरने शेतमालकाला विचारलं,"शेतमालक,माझ्या भावाचं रक्त,चिंगीला चढवलं तर चालेल का तुम्हाले?"शेतमालकाने अश्रुने डबडबलेल्या डोळ्यांनी डाँक्टर प्रभाकरला नमस्कार केला.त्यांच्यात शब्दाविण संवाद झाला. सुधाकरला फोन करताच,सुधाकर तिथे आला.

डाँक्टर प्रभाकरने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली.,बाळ चांगलंच मोठं होतं. गरोदरपणात जरा अतीच पौष्टीक खाल्ल्याने पिंड जरा जास्तच गुटगुटीत झालेलं. रखमाईने त्या बाळाला छान अंघोळ घालून फडक्यात लपेटून शेतमालकाच्या हातात दिलं.

शेतमालकीन रखमाईच्या पाया पडत होती.रखमाईने तिला हाताने वर घेतलं व मिठी मारली. शिक्षणाने त्या कुटुंबांमधली दरी कायमची दूर झाली.

सुधाकर व प्रभाकर दोघे मिळून गावातल्या मुलांना फावल्या वेळात करिअर मार्गदर्शन करु लागले.त्यांना शिक्षणाचे,समानतेचे,महत्त्व पटवून देऊ लागले.
माणुसकी या एका धर्माचा प्रसार गावोगावी करु लागले.

-----सौ.गीता गजानन गरुड.