मनपाखरू

Marathi katha


"अगं नेहा, असली का साडी नेसली आहेस? तुझ्याकडे दुसऱ्या रंगाची साडी नाही का? ही तुला अजिबात छान दिसत नाही."

"तुझ्या रंगाला सूट होईल अशा कलरच्या साड्या तुला नेसायला काय होतंय? इतके चांगले स्थळ आले, पण तुझ्या अशा अवतारामुळे हातचे चांगले तर निघून जाणार."

"थोडासा मेकअप तरी करायचा. आधीच रंगाने एवढी काळी, त्यात भडक रंगाची साडी. कसे लग्न जमणार आहे हिचे काय माहित?"

" कितीदा सांगितले, थोडे व्यवस्थित आवरत जा. थोडे शोभण्यासारखे कपडे घालत जा, पण ही काहीच ऐकत नाही. आता हिला परत स्थळे कोण काढेल?"

असे एक ना अनेक बोल नेहाच्या कानावर पडू लागले. पण ती तरी काय करणार? तिचा हा सावळा रंग. जन्मापासून रंगाने सावळी असणारी नेहा नाकीडोळी मात्र छान होती. तिचा स्वभाव खूप चांगला होता. ती सर्वांमध्ये मिळून-मिसळून राहत होती. नेहा दिसायला अगदीच चुणचुणीत होती. प्रत्येक काम ती हसतमुखाने करत होती. नेहाचे शिक्षण एमबीए झाले होते. ती एका कंपनीमध्ये जॉब करत होती, तसेच तिला पगारही चांगला होता. सगळ्या बाजूने तिचे चांगले होते, पण तिचा सावळा रंगच आडवा येत होता.

नेहाचे शिक्षण आणि जाॅब पाहून बरीच स्थळ येत होती, पण तिचा रंग पाहून त्या सर्वांचा नकार येत होता. जवळ जवळ पन्नास स्थळं पाहून झाले तरी एकाचाही होकार आला नाही. ते पाहून घरचे सगळे कंटाळून गेले. कधी एकदा नेहाला होकार येईल? याची सर्वजण वाट पाहत होते. आता नेहाचे बरेच वय झाले होते. घरचे देखील तिच्या रंगावर नाराज होते. नेहासुध्दा या सर्व गोष्टीला कंटाळली होती. आता तिला कोणी पसंत करेल ही आशाच तिने सोडून दिली होती.

एक दिवस नेहाला खूप छान स्थळ सांगून आले होते. मुलगा इंजिनिअर होता. त्यांचा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय होता. घरची परिस्थिती अगदी सधन होती. मुलाचा बायोडेटा पाहून नेहा हिरमुसली. \"इतकी स्थळे नकार देऊन गेली, हे स्थळ आतापर्यंत आलेल्या स्थळात उत्तम आहे. हे काय पसंत करणार?\" अशी तिच्या मनाची घालमेल सुरु होती. घरचे देखील काळजीत होते. आधीच त्यांना येण्यास नकार द्यावा की काय? असेही त्यांना वाटले, पण फक्त पाहून तरी जाऊ देत. इतकी स्थळे आली त्यात हे सुद्धा होते म्हणून समजायचे अशी त्यांनी मनाची समजूत घातली.

अखेर ते स्थळ नेहाला पाहण्यासाठी आले. हे स्थळ नेहाने मनावर घेतले नव्हते. तसेही यांचा नकारच येणार अशी तिने मनाची समजूत घातली. स्थळ आलेल्या मुलाचे नाव रोहन. रोहन हा इंजिनिअर होता. दिसायला अत्यंत देखणा, रुबाबदार असा रोहन नेहाला पाहायला आला. पाहुणे मंडळी आल्यानंतर नेहा चहा घेऊन बाहेर आली आणि ती समोर खुर्चीवर बसली. तिने रोहनकडे पाहिले. त्याचा तो देखणेपणा पाहून नेहा त्याच्यात गुंग झाली. \"इतका हँडसम मुलगा मला पसंत करेल का?\" असे विचार तिच्या मनात येऊन गेले.

बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. नेहा आज पिवळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या सावळ्या रंगात ती पिवळी साडी खूपच खुलून दिसत होती. पाहुणे मंडळींनी जातानाच मुलगी पसंत आहे, असा निरोप दिला आणि सर्वांच्या आनंदाला जणू आधनच आले. नेहाचे नशीब पालटले तिला अनुरूप स्थळ मिळाले, म्हणून सर्वजण नेहावर कौतुकाचा वर्षाव करत होते. जिकडे तिकडे आनंदाला पारावार उरला नव्हता. पण नेहा मात्र वेगळ्याच विचारात मग्न होती. \"मी इतकी सावळी, पण हे इतके हॅण्डसम असूनही माझ्यासारख्या मुलीला यांनी पसंत कसे केले? नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय?\" अशा अनेक शंकांनी तिच्या मनात थैमान घातले होते. तिने रोहनला भेटायचे ठरवले. बायोडाटावरून तिने रोहनचा नंबर घेतला आणि त्याला फोन फोन करावे की नको या संभ्रमात ती पडली. अखेर धाडस करून तिने रोहनला फोन लावला.

"हॅलो" रोहन म्हणाला

"हॅलो, मी नेहा." नेहा म्हणाली

"हा नेहा, बोल ना." रोहन म्हणाला

"मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं." नेहा म्हणाली

"हो, बोल ना. बिनधास्त बोल." रोहन म्हणाला

"फोनवर नाही. प्रत्यक्ष बोलायचं आहे." नेहा म्हणाली

"ओह्, मग शिवम् कॅफेमध्ये भेटू. ठिक चार वाजता." रोहन म्हणाला

"ओके." असे म्हणून नेहा तयारीला लागली. आता घरी काय सांगून जावे? असा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. इतक्यात तिला एक युक्ती सुचली. क्लायंट मीटिंग आहे असे ती रोहनला भेटायला ठिक तीन वाजता घरातून बाहेर पडली. कारण शिवम् कॅफे तिच्या घरापासून थोडे दूर होते. ती रिक्षाने गेली. त्या दिवशी ट्रॅफिक नसल्याने ती अर्ध्या तासात तिथे पोहोचली आणि रोहनची वाट पाहत बाहेर उभा राहिली. बराच वेळ झाला तरी रोहन आला नव्हता. चार वाजून गेले तरीही रोहन काही आला नाही.

"आज काही येणार नाही तो. का येईल? मुळात त्याला मी आवडलेच नाही. माझा हा रंग त्याला आवडला नसणार. नाहीतर तो माझ्या आधीच आला असता. त्याला मी सूट होत नाही, तो इतका देखणा, हॅण्डसम आणि मी इतकी सावळी, त्याच्याजवळ उभा राहण्याची माझी लायकीसुद्धा नाही. तो येईल असे मला मुळीच वाटत नाही. त्यापेक्षा गेलेले बरे." असा विचार तिच्या मनात घोळत होता. ती जावू की नको या संभ्रमात असतानाच रोहन येताना तिला दिसला. रोहनला पाहून तिचा चेहरा फुलला. तिच्या मनातील सर्व शंका निघून गेल्या. रोहन नेहाच्या जवळ आला.

"हाय, बाहेरच का उभी आहेस? आत बसायचं ना." रोहन म्हणाला

"तुमची वाट पाहत उभी होते." नेहा म्हणाली

"अच्छा, चल. आत जाऊन बसू." रोहन असे म्हणतच नेहाला घेऊन आत गेला.

"बोल. काय ऑर्डर करू?" रोहन म्हणाला

"तुम्हाला जे हवंय ते करा." नेहा म्हणाली

"कोल्ड काॅफी?" रोहन म्हणाला

"हो चालेल." नेहा म्हणाली

रोहनने कोल्ड काॅफीची ऑर्डर दिली आणि तो नेहाकडे पाहून बोलू लागला.
"बोल ना, काय बोलायचं होतं तुला?"

"तुम्हाला मी खरंच पसंत आहे का? की कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही मला होकार देताय." नेहा तिच्या मनातील भावना एका दमात बोलून रिकामी झाली.

"हो. मला तू मनापासून पसंत आहेस." रोहनच्या या उत्तराने नेहा अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागली.

"तुम्ही खरंच बोलत आहात? पण मला एक शंका आहे." नेहा म्हणाली

"बोल. जे काही बोलायचं आहे ते न लाजता स्पष्ट बोल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील." रोहन म्हणाला

"मी इतकी सावळी असतानाही तुम्ही मला कसे काय पसंत केलात?" नेहा म्हणाली

"मी तनाने सुंदर असण्यापेक्षा मनाने सुंदर असण्याला जास्त पसंती देतो." रोहनच्या या उत्तराने नेहाच्या शंकेचे थोडेफार निरसन झाले.

"पण माझे मन सुंदर असेलच असे नाही ना?" नेहा पटकन म्हणाली

"आता तू मला हा प्रश्न विचारत आहेस याचा अर्थ तुला माझी काळजी अथवा माझ्या मनाची स्थिती समजून घ्यायची होती. याचाच अर्थ तुझ्या मनात इतरांप्रती प्रेम, काळजी घेण्याची भावना आहे. शिवाय तुला तू सावळी आहेस याची जाणीव आहे, याचा अर्थ तुला अजिबात गर्व नाही. म्हणजे यातूनच तुझे मन किती सुंदर आहे! हे दिसून येते." रोहन हलकेच हसत म्हणाला.

"पण तुम्ही आधीच होकार दिला होता. आपण तर आता भेटलो. मग तुम्हाला माझे मन कसे समजले?" नेहा म्हणाली

"हे बघ नेहा, मी जेव्हा मुली पाहण्यास सुरूवात केली तेव्हाच माझी अट होती की, मी सावळ्या मुलीशीच लग्न करणार. त्यात तुझे स्थळ आले आणि तू मला पसंत पडलीस." रोहन म्हणाला

"सावळीच मुलगी का? सर्वांना तर सुंदर गोरी मुलगी हवी असते. तुम्ही सावळी मुलगी का पाहिलंत?" नेहाला वाटू लागले की, हा माझ्या नोकरीसाठी तर माझ्याशी लग्न करत नसेल ना? पण त्याला काय गरज? त्याचा मोठा बिझनेस आहे.

"खूप मोठी आणि जुनी गोष्ट आहे. माझी आत्या रंगाने थोडी सावळी होती, पण खूप हुशार आणि प्रेमळ होती. तिच्या सहवासात आलेल्या व्यक्तींना अगदी आनंद द्यायची. ती इतरांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असायची. तिचा स्वभाव निर्मळ होता, अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ. इतर मुली पाहतात तसे तिनेही तिच्या लग्नाची बरीच स्वप्नं पाहिली होती. घरात तिच्याच लग्नाची चर्चा सुरू होती. चार भावंडात ती एकुलती एक म्हणून सगळे तिचे लाड करत होते. तिला बरीच स्थळ येत होती, पण रंग सावळा असल्याने कोणीच होकार दिला नाही. आत्याला सुरूवातीला वाईट वाटले, पण नंतर सवय होत गेली. एकेक नकार ती पचवत होती. थोड्या दिवसांनी तिला एक स्थळ सांगून आले. मुलगा अत्यंत देखणा होता. सर्वांना स्थळ पसंत पडले आणि लगेच लग्न उरकले. आत्या तिच्या संसारात रमली म्हणून सर्वजण आनंदात होते, पण तो मुलगा मात्र आयता हुंडा मिळाला म्हणून आनंदात होता. तो तिला प्रेम देत नव्हता ना बायको असल्याचा अधिकार. फक्त पैशासाठी तिला घरात ठेवून घेतला होता. त्यावेळी जिथे लग्न करून दिले तिथेच आयुष्य काढायचे अशी रित होती. म्हणून आत्या आहे त्या परिस्थितीत तिथे राहत होती. तिची सर्व इच्छा, स्वप्न कधीच धुळीत मिळाली होती. ती फक्त पैसे देणारी कठपुतली बनली होती. नवरा तिला जवळही घेत नव्हता, अर्थातच तो तिच्यावर प्रेमच करत नव्हता. त्यामुळे तिला मूलबाळ झाले नाही. ती माझे खूप लाड करायची, मला हवे ते आणून द्यायची, माझ्यावर तिचा खूप जीव होता. ती तेव्हा मला म्हणायची, लोकांना सावळ्या मुलींचे मन दिसत नसेल का? रूप दिसते पण मन दिसत नाही. तेव्हाच मी ठरवले होते की, मी लग्न एका सावळ्या मुलीशीच करणार. पण मला कोठे माहित होते की, माझ्या नशीबात इतकी सुंदर मुलगी आहे." रोहनच्या या उत्तराने नेहाचे मन शांत झाले. तिच्या मनातील सर्व शंका नाहीशा झाल्या होत्या.

दोघेही बोलून झाल्यावर बाहेर आले. आता नेहाचे मन मोकळे झाले होते. ती रोहनची अर्धांगिनी होणार म्हणून खूप सुखावली होती. तिच्या आनंदाला उधाण आलं होतं.

"काय मॅडम? आणखी काही शंका आहेत का?" रोहनच्या या बोलण्याने नेहा लाजली आणि मानेनेच तिने नाही म्हणून मान हलवली. रोहनने तिचा हात हातात घेतला तेव्हा ती मोहरली. लाजेने चूर झाली होती.

"नेहा, मी रंगावरून कधीच तुला बोलणार नाही, कधीच तुला अंतर देणार नाही. सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घेतील. तुला कधीच दुःख देणार नाही. तू निश्चिंत रहा." हे बोलताना रोहनच्या डोळ्यात तिला खरेपणा दिसला आणि त्याच्याबद्दलचा तिच्या मनातील आदर आणखीनच वाढला.

खरंच, रोहनसारख्या विचारांनी युक्त मुलगा प्रत्येक मुलीला मिळाला तर आयुष्य नक्कीच सुखकर बनेल.

धन्यवाद.
©®प्रियांका अभिनंदन पाटील.