पाण्याशी मनोगत...

Mind

सदर कविता मला एका नवी पेठेतल्या आजींच्या एकाकी पनावरून स्फुरलेली आहे...

पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय,
तुझ्यासारखंच स्थितप्रज्ञ राहायला शिकायचंय,
ना जुनं काही आठवायचंय, ना नवं काही जमवायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

कसारे इतका अचल तू,गूढ रहस्यच दडवलय जणू,
कशाला तुझ्यात उगा दगड मारून आठवणींना हिंदकळायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

वाटे सारे जीवनरंग कोळून प्यायलास तू,
चांगले न वाईट फरक ना करता एकच माने जणू,
मलाही त्या भल्या बुऱ्या अनुभवांना "detox" करायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

मी कुणासाठी किती केले,त्यातले परतुनी कोण कामी आले,
याचा जमाखर्च आता ना कुठेच नोंदवायचय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

कुणास भेटावयाचे राहून गेले,मनातले सांगावयाचे मनातच विरून गेले,
काय भोगिले,काय सोसिले याने मन ना सचींत करायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

चला....झाली आता माझी निघावयाची वेळ,
स्वतःशीच स्वतःकडे व्यक्त व्हावयाची वेळ,
येईल नातवाचा video call,मग होईल चहाची वेळ,
दोन घास पोटात ढकलून निजावयाची वेळ,
अनंत विचारांनी फेर धरून गर्दी करावयाची वेळ,
नुसताच गलबला डोक्यात ना लागे कशाचाच कशाशी मेळ...

मग मात्र झोपेची गोळी घेऊन निद्रेच्या स्वाधीन व्हायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...

स्वाधीन होता होता पुन्हा तुझे शांत रूप आठवायचंय,
पाण्या मला तुझ्याकडं एकटक बघायचंय...