मन की बात

It is a letter to husband from wife .

मन की बात

अहो माझी बरं का !
कुठ पर्यंत मनातच ठेवायचं म्हणून लिहूनच टाकलं
काय गं .... ? काय विचारता .... !
माझ तोंडभरुन कौतुक न करणार्‍या नवर्‍याला पत्र की .... 
हो तुम्हालाच हो .. पाहीले ना मी तुला तू मला का पाहीले ....
{ दुसर्‍या कुणाला तरी पाहायचं असतं ना ! }
कान पकडून हवंतर गळा पकडून क्षमा मागते हो वरील गाण्याच्या ओळी मी चुकून लिहील्या . 
एकच पान पत्र लिहीण्यासाठी माझ्या भावना तुमच्या गळ्यात ऊतरवण्यासाठी ... साॅरी मेंदूत ... नाही नाही मनात पोस्ट करण्यासाठी ... अरे चुकलचं की ... मनात घालायसाठी ...
{अरे बापरे काही खरे नाही माझे आज } अहो तुमच्या सारख्या प्रेमळ मनाच्या प्राण्याच्या मनात ... साॅरी दोन पायाच्या मनुष्याच्या मनात स्थान मिळवण्यासाठी हा खटाटोप ... हुश्श !
मी माझ्या काही मनातील ओळी तुमच्या बद्दलच्या भावना ह्या पत्ररुपी पोस्टमनच्या हवाली करते ... साॅरी लिहीते .
मला माहीत आहे ते किती पोहोचेल तुमच्या डोक्यात म्हणजे मनात ... खात्री आहे ढांक के तीन पात ही होते हैं ज्यादा की अपेक्षा नाही बाई ह्या भोळ्या मनाला .
मै चाहें ये करु मैं चाहें वों करु ... तेरी मर्जी ... असच ना ?
अहो तेच तर तुम्हाला जे आवडतं ते करायला मला खरेतर फारच मज्जा { खरेतर काही वेगळ वाटतं } येते हो !
तुमच्या सारखा सालस ,भोळा , प्रेमळ नवरा मिळाला माझं अहो भाग्य आणि हो " बोलका " मला समजुन घेणारा ! 
पण आपण कितपत मोकळं बोलतो , प्रश्नच ?
बरं ते आपलं कधी मी गोलू { मनात हो } पप्पाजी { मुलांचे } म्हणते ना , म्हणजे म्हणायचे ? खरं सांगते ,
ते ही मी मोकळे पणाने कधी म्हंटले नाही आधी !
मला तर ते ' अहो ' म्हणायला ही लाजच भारी वाटायची !
सुरुवातीला तर काहीच नाही म्हणायचे , आठवतं का ?
नाही ना ? वाटलचं !
देते ना आठवण आहे कशासाठी मी ... भरपुर म्हणजे 33 वर्षांपासुनचा खजिनाच आहे मनाच्या तिजोरीत ठेवलेला !
काही खायला द्यायचं असल की , " हं घ्या , हं कधी येणार , 
हं इकडे बघा " नसता हं हं हं चा पाढा .... बरं पलिकडून तरी आवाज जरा वेगळा यावा तर तिकडून ही .... हं हं हं .... काय हो ... हे !
तुम्ही मोठे तर माझी रास्त अपेक्षा , 
तुम्ही काहीतरी वेगळं बोलायच ना !
ह्यावर तुम्ही काय म्हणाल मला सगळं माहीत आहे ,
काही चांगल बोलण्यासाठी आहे की नाही माझ्या खात्यात ,
का नाही ! आहे तर , हळवे , ऊत्कट क्षण भरभरुन आलेत जीवनात दररोज तुम्ही मला नवीन वाटायचे आज मी तुम्हाला पुर्णपणे जाणले असे कधी झालेच नाही म्हणजेच तुम्ही कधी काय कराल माहीत नसायचे युनिफाॅर्म घातला की मी तर जसे तुमच्या जीवनातून बाद असायची ' आपल्याला हे ओळखतात की नाही कधी कधी असे वाटायचे ', हो खरेच !
पण तुम्हाला जाणुन घेण्यात जे थ्रील अनुभवल ते ही वेगळचं ! नाहीतर आजकालची गंम्मत - सगळं लग्नाआधीच माहीत व्हायला हवं नाहीतर बोल यायचा 
'' तू मला आधी बोलला नाहीस ''
बरं तुम्हाला आठवतं लग्नानंतर पहील्यांदा तुम्ही मला माहेरी सोडून परत घ्यायला आठ दिवसाने येणार होते ,
मी काय केलं असेल ? अहो मी तुमच्या कमरेला पकडून हमसून रडले होते हा..हा..हा..आज मला आठवुन हसायला येतय पण त्या वेळेस अगदी लहान मुलासारखं झाल होत मला तुम्ही मला सोडून कुठे जाऊच नये वाटत होतं हीच तर ओढ होती प्रेम फुलत होत मनात आपल्या फुलणार्‍या संसाराची नांदी होती ती .. अगदी मनातलं बोलले हो .. !
बरं पुढे लिहीते ,
गोलू म्हणन्या मागची गंमत आठवते का ?
नाहीच !
मैं हूँ ना ... आठवण देने के लिये !
खामगाव ला नवीनच कपड्यांच दुकान ऊघडल होत , 
तिथे गोलू ह्या ब्रँड चे टि शर्ट्स होते , मुलांना आणि स्वतःला भरपुर टि शर्ट्स आणत होते तुम्ही , छातीवर " गोलू " लिहून असायचं टि शर्ट्स च्या मग काय मला तर नावच मिळालं 
" गोलू " आठवलं असेल ना आता !
पत्र लिहीताना आठवतायत जुन्या खानाखुना !
आणि अश्या काही "आठवणींची " तुम्हाला मी ह्या पत्राद्वारे चांगलीच आठवण करुन देणार आहे ... समजलं ?
आपण एकदा जेवली गावाला जेवाय साठीच गेलो सरपंच्यांच्या आमंत्रणावरुन ... आलं ... नाहीच ... बरं पुढे ... परत येताना रात्रीचे नऊ वाजलेत मधे जंगल घरी पोहोचायला एकतास वेळ लागणार होता ते पण बुलेट ने , सगळे म्हणाले थांबा रात्री इथेच पण ढिम्म ... अरे नाही हो हा शब्द असाच आला बरं , ते आता स्पष्टच करते मी आधी , इथे मी लिहू तर शकते ... पण लिहीलेले शब्द मी माझ्या मनाने मागे नाही घेऊ शकत , डिलीट नाही करु शकत ... पर्याय नाही ... तुम्हाला राग आला 
{ तरी तुम्ही मुग गिळतात तसा गिळुन घ्यायचा हं } तरी ... आणि जे शब्द कंसातले तुम्हाला आवडले नाहीत ते मी लिहीलेच नाहीत ... असे कसे लिहू शकते मी ?
बरं पुढे ... बुलेट वर बसुन आपण निघालो जंगला मुळे थंडी 
वाढली , तुमचा सालस प्रश्न , बरं थंडी वाजते का तुला ? 
हो ! माझ्या पाठीवर मान टेकवं आणि मला पकडून ठेव , 
झोप हवं असल्यास ! 
बरं ... मनोमन मी खुश ... how romantic 
तुमच्या आज्ञेचे लगेच पालन केले 
कारण ते घरचे संस्कारच ना ! 
नवर्‍याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही 
मग काय ... झेलला बापडीने !
थंडी वाजू नये मला म्हणुन हळुहळू चालणार्‍या बुलेटने अचानकच वेग पकडला 
घट्ट पकड !
अरे बापरे ... आज्ञेचे लगेच पालन केले 
घरी दहा साडे दहाला आपण पोहोचलोत 
मी गारठून गेलेली ... बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते 
सकाळी काही कामानिमीत्त आलेल्या शिपायाला तुम्ही सांगत होते काल रात्री मोठ्ठा वाघ दिसला रस्त्याच्या कडेला बांधावर बसलेला होता !
मी तर सुन्नच झाले होते ऐकुण 
नंतर तुम्हाला विचारले ... खरचं वाघ दिसला ? 
हो मोठ्ठा होता ,
अच्छा ... मला का नाही दाखवला ?
पडली असती ना तिथेच .. घाबरुन ! 
आणि तुम्ही जोरात हसलेत 
आणि वेगा चा ... मी बापडी वेगळाच विचार करत होते !
मला आठवतं लग्न झाल्यावर सात आठ दिवसाने पोस्टींग च्या ठिकाणी मला घेऊन आलेत माझ्या आज्जी सकट ,
दुसर्‍या दिवशी तुम्ही दोन बाटाच्या स्लीपर्स आणल्यात 
एक आज्जी साठी दुसरी माझ्यासाठी , 
आमच्या दोघींच्याही पाया जवळ ठेवल्यात तुम्ही स्लीपर्स , 
ह्या घरात घालायच्या ... थंड होतात पाय ... कचरा लागतो पायाला !
माझी आज्जी तर अवाक होऊन बघतच राहीली ... बाप्पा घरातही घालाव काय चप्पल आता , 
अकडतील ना थंडीने पाय तुमचे ... तुम्ही म्हणाले !
खरं सांगते माझ्या माहेरी बाहेरच चप्पल वापरायचे , 
घरात अजीबात चप्पल तोपर्यंत कुणीच वापरलेली नव्हती 
आज्जी साठी तर नवलच होतं आणि तुम्ही माणुस म्हणुन किती ऊत्तम आहात त्याचे ते ऊत्तम ऊदाहरण होते .
हॅलो जानू क्या कर रहे हो ?
हेडेक बहोत हैं 
ओ हो ...
कहाँ ...?
भगवान .... है .... तू .... कहाँ !
रितेश जेनेलियाचा शाॅर्ट विडीओ , त्यातील हे संभाषण !
तुम्हाला आठवत ! मी पण असे खुपच भारी प्रश्न तुम्हाला सुरुवातीला विचारलेत आणि आजही कायम आहेत , 
आपल्याला खरे बोलायला लाज वाटत नाही बुवा .... !
पण प्रमाण अगदी बोटावर मोजण्या इतपत !
अहो , तेव्हां जर मोबाईल असते ना 
आपले तर खुप सिनेमे बनले असते 
हे तर फक्त शाॅर्ट विडीओ बनवतात ... हो ना !
खुप खुप अश्या गोष्टी आहेत ज्यातून मला वाटायचे , 
नेहमी नेहमी काय हे सांगत असतात , हे करा ते नका करु ,
कुठे जायचं असल्यास पोहोचवुन देणे घ्यायला येणे 
ते ही पोलीस आॅफीसरची व्यस्त नोकरी करताना ,
मैत्रिणींसोबत घरी कार्यक्रम करायचे असल्यास , 
अगदी मंडप टाकुन देण्यापासुन व्यवस्था करुन देणे , 
हवं नको ते बघणे , खरेच 
मी कधीच कबुल नाही केले तुमच्या प्रमाणे मी ही चुपच राहीले पण आज परत फिरुन बघताना कळतयं तुम्ही किती काळजी करणारे आहात ते !
काळजी पोटीच सगळं करत आलात !
पण सांगू का बायकोचा एक स्वभाव असतो ,
आणि ती तो सोडून वागूच शकत नाही !
कळल नसेलच तुम्हाला !
खालचं वाक्य वाचा म्हणजे ट्युबलाईट लागेल .
बायको खरोखरचं खुप प्रेम करत असते नवर्‍यावर
शेवटी महत्वाचे काय ? बायको म्हणजे बायकोच असते ,
by the way ती तुमची वर्गमैत्रीण ? 
नाहीच आठवली ना ?
कशी आठवेल .... ? आठवुन का संकट ओढवुन घ्यायचे आहे ह्या वयात ! नाही का ....?
आशा आहे ती जिथे कुठे असेल मला एकदा तरी भेटावी ,
प्रश्न पडला असेल ना ... कशाला ?
नाही ते मला बघायचे आहे 
म्हातारीच्या तोंडात किती दातं शिल्लक आहेत , 
एक पंच पाजला असता की .... !
कशाला ? ओ हो .. गहन प्रश्न .. उकल करावीच लागेल !
बाय गे , का हात सोडला गे , ह्या देवमाणसाचा ....!
हो ना केवढा मोठ्ठा धोंडा पाडला पायावर ....!
तिने हो ... स्वतःच्या !
बरं अजुनही तुमच्या बद्दल खुप लिहावसं वाटत , 
माझ तुमच्यावरच प्रेम व्यक्त करावसं वाटत ,
{ ते पत्र पुर्ण वाचल्यावर लक्षात येईलच तुमच्या ... }
हे पान पुरणार नाही बहुतेक तरीही लिहीते ,
महत्वाच्या म्हणजेच कुटूंबासाठीच्या निर्णयावर आपल मात्र एक मत असत ... बेलाशक ! 
कुरबुरी आपल्या होतच असतात पण आपण त्यातून लगेच बाहेर येतो , कारण काय ?
अहो एवढ्या वर्षाच्या सोबतीने मोकळे न बोलताही आपण एकमेकांना समजतो !
म्हणजे मी { आपके रग़ रग़ से वाकीफ़ हूँ } तुम्ही एखाद्या वस्तूच्या दिशेने बघीतलेत तरी मला कळतं तुम्हाला काय म्हणायच आहे , ह्यावर कधी कधी तुमचा भाबडा प्रश्न असतो , तुला कस कळलं ? 
माझं ऊत्तर " त्यासाठी बायको व्हाव लागेल " .
मला न विचारता सगळे निर्णय एकतर्फी घेणारे
प्रत्येक वेळेस आपलचं खरे करणारे जेव्हा ....
कोणतीही जड वस्तू ऊचलू न देणारे
अर्ध्यारात्री बाळ रडत ऊठल्यास 
तू थकली असशील झोप मी बघतो 
ऊशीरा घरी आल्यावर 
अरे जा तू झोप बाळाजवळ मी घेतो जेवण
बाळाला अंगठी , बांगड्यांनी इजा होऊ नये म्हणुन 
ते काढुन ठेव आधी , अहो घरातले काय म्हणतील !
तू फक्त बाळाला लागणार नाही ते बघ म्हणनारे
पाहुणे जास्त आल्यास काय मदत करु म्हणनारे
बाहेरच्या कोणत्याच गोष्टींचा राग -
तनाव कधीही घरी न दाखवणारे
घरात काही बिघडलय म्हंटल रे म्हंटल की तू बाजुला हो म्हणुन आपली tool kit काढणारे 
लाॅकडाऊन सुरु होणार कुणकुण लागल्यावर 
एरवी दिदी ला फोन केला होता का ?
सदा मलाच विचारणारे ,
पप्पा म्हणतात , तिला लगेच निघायला सांग नाहीतर मी येऊ का घ्यायला , विचार तिला !
मध्यरात्री यदाकदाचीत ऊठल्यावर मुलांच्या , 
माझ्या ऊघड्या पायांवरच ब्लँकेट व्यवस्थित करणारे 
कधीच तू मला आवडतेस न म्हणनारे
पण तुमची कृती माझ्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत हे दर्शवतात , 
त्याला व्यक्त करण्याची सुद्धा गरज नाहीये !
काय म्हणू तुम्हाला .... ! 
कुटूंबाचा बाप माणुस .... माझ्यावरही पितृतुल्य { न दिसणारी }माया करणारा माझा नवरा !
खुप भरुन आलय पण ...
आवराव लागेल मला ... थोडक्यातच लिहीते , 
तुम्ही केअरींग आहात ... शंकाच नाही !
सदा जपत आलात काळजी पोटी हे नको ते नको ,
आणि तो अधुन मधुन परवलीचा शब्द ,
" तुला कुठे काय येत ? तू कुठे काय करते ? " एका झटक्यात धारातिर्थी पाडणारे शब्द पचवुन पुन्हा हसत खेळत डाव खेळणे ... काय होतं माहीतेय ?
अहो माहीत्येय मला तुम्ही सहजच बोलुन जाता ... त्यात मनाला लावुन घेण्यासारखं काय....?
अहो त्यातच तर किक मिळते मला !
तो नाही का कोरोना आला मागच्या वर्षी आणि मला म्हणाला ,
घें न्ना बाई कशी जिरविली
बाहेर फिरण बंद करुन घरात बसविली
झालं ... मिळाली ना किक ... कशी काय ?
अहो लेखणी आली ना हातात ... कळलं !
अहो तो सलमान आठवला का ? 
त्याला कुणी अमुक एक काम करु नको म्हंटल रे म्हंटल , 
की त्याला लगेच किक मिळायची ... तशी ... बोलो तो अपुन फिमेल है ... डेअरींग में सलमान से कम नही ! 
अहो ते असचं बरं ,
हे मनातले बोल कसे काय इथे ऊड्या मारत आहेत ,
माहीत नाही ! 
एरवी तुम्हाला माहीत आहे ,
ते मी बिचा बिचात बिचकत होतो ना ,
कडेचना बाई मला ,
रस्त्याच्या बिचात म्हसाड बसली होती
{ आपण नागपुरीयन }
तुमच्या समोर बोलताना 
का बोबडी वळे , 
सख्या ! ना मला कळे ?
मग कुठलीही गोष्ट कुठे ही आठवे ..
नेहमी असचं होतं ना !
अहो जरा भाव खात आहे , वयाच्या ह्या टप्प्यावर !
आधी तुमचाच खुप .... खुप .... भाव होता हो !
झेलायला आवडायचा मला , 
आता मी पण थोडी मोठी झालीच ना .... !
तुमच्या समोर माझ्या लिखानाची ' स्कील ' दाखवायची संधी मला आज मिळाली . { कशाला सोडते मी }
बरे पण एवढ्यात तुम्ही फार बदलले बुवा ... कसे काय ?
मैं हूँ ना आठवण देने के लिये
{ वैसे वो हिंदी के किडे बिचबिच में डोके में वळवळ करते है , समझे ना ! }
I know that सध्या तुमच्या जास्त जवळ zandu glycomet navratan parachute आणि तुम्हाला चिरतरुण असल्याचे भासवणारे garnier dye अती जवळचे आहेत . पण मला त्यांचा राग येणे बंद झालय आताशा ,
कारण मी सुद्धा तुमच बघुन त्यांच्याच आहारी गेलेली आहे ! तेव्हा ह्या बाबतीत आता no camplaint कुठं कुठं एकट्या बाईने लढाया लढवायच्या ना !
शेवटी काय आपण कुणाचही प्यारं असो किंवा नसो 
खुदच प्यारं तर असावच माणसाने इति.सुश्री करीना मॅम .
बरे मन मानत नाहीये पण लेखणीतली शाई संपत आलीय , अनलाॅक झालय पण वेळेच्या बंधना मुळे जरा दऊत नाही आणू शकली वेळेत म्हणुन शेवटचच एकदा ,
रुसवे फुगवे हेवे दावे चालायचे
त्याशिवाय संसार अळणी व्हावे
आंबट तुरट खारट कडू गोडाचे
मिलाफ व्हावा ! ऊगविती अंकुरे
संसाराचे वटवृक्ष झाले आता काही ऊरले नाही ,
असे समजू नका , त्याला नेहमीच अंकुरी ठेवुया ,
बस्स झाले आता ! भरुन पावले , नाही लिहून पावले !
ओ .. ओ .. ओ ... बाई .. भुलली का वं मले ,
माह्य तं त्या नावच घेतल नायी बाई ,
मायी ओळख तुया " लक्तेजीगर " ले करुन देतं का नायी ?
अगं ते मी आता तुला .. तुझी .. ओळख .. सांगणारच होते ह्यांना ,
रावू दे वं समजल मले ... माह्या सारख्या गावठी बाईची तुले ओळखच दाखवाची नायी तुया नवर्‍याले ,
आता ऊगीमुगी राह्य ... माही म्याच बोलीन नायीतं नायी बोलीन ,
तुमाले सांगतो बुवा हिच्या मैतरनी संग आसली का तुमच्या चहाड्याच करत राह्यते जवा पाहाव तवा ,
आन मोठ्ठी आली तुमच्या सामने तं तुमच्या ओव्या म्हनत होती आन तुमच्या मांग तुमचे पोवाडे सांगते नायी थे वाभाडे म्हन्ते ,
घेन्न बाई भुलशीन मले ... चाल्लो मी आता !
अरे अगं नको रागावू ! 
बरं मी लिहीणे थांबवते , 
ती थांबणे महत्वाचे , 
तिला बघते .. टा .. टा ..
अहो ती काहीपण बोलते राग आल्यावर !
तुमचा प्रश्न असेल कोण ती ? अशी का बोलते ?
ऐका तर मग , आजवर मी तुम्हाला सांगीतले नाही ,
तिच्या शिवाय मी अधुरी , 
बोलायची माझी हौस करते ती पुरी ,
जी तुमच्या समोर राहते अधुरी
ता.क. let me introduce 
फटाकडी .... सुरसुरी .... ती अगदी खरे बोलते , मग ती अशी फुटून फुरफुरत मला खजील करत असते कधी कधी .... तरी सुद्धा सगळे हक्क तिच्याकडे राखीव आहेत .... माझ्यावर टिका करण्याचे .... माझ लाडकं अंर्तमन .... तुझे नजर ना लगे ..... बाई ! 
परमनंट टिकाकरन किया है वैसे इसका !
अरे हो अजुन एक , मला माहीत आहे तुम्हाला व्याकरणातील चुका अजीबात सहन होत नाहीत , पण माझे अगाध ज्ञान जोखा की , शब्दांच्या मधे एका पेक्षा जास्त पुर्णविराम 
हे तुमच्या अल्पविरामासाठी आहेत , माझ्या भावना तुमच्या ह्यदयात पोहोचवण्या साठी आहेत , थोडा श्वास घेण्यासाठी आहेत नसता धाप लागायची खापर माझ्यावर फुटायचे !
जाता जाता लिहीतेच 
' रोज वाटे ऊमगला तू मला
सल ह्या ऊरातली कशी सांगू तुला
स्मित हास्य बघता लोचणी
वाटे गवसला तू मला '
आता स्वतःच्या हातात लेखणी पकडलेली 
{ अहो मी गमतीने बोलू शकते हे दाखवण्यासाठीच फक्त , आदरणीय नवरोबा ! }
फक्त तुमचीच !
दिलसे दिलतक पोहोचलेली !
एक ऐतिहासीक अद् भुत नायाब बायको 
संगीता अनंत थोरात
30/06/2021
०००००००००