मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.३०

मनीषाचे आपल्या कुटुंबाबद्दलचे मतपरिवर्तन होवून ती आल्या पावली माघारी जाईल की, तिथेच ठाण मांडून बसेल? सुबोध आणि अंजू तिला समजावू शकतील का?
"काय गरज नाय. ती आपली अंजी असती तर, चुकून बी दुसऱ्याच्या घरी गेली नसती. सवताच्या आयचा राग ठाव नाय वय तिला? जरा म्हणून सुदिक दम नाय तिला तर, जावं दे. म्या बी नाय लय पाणी लावणार."
तेवढ्यात महादेव आणि आबा घरी येतात. झाडाखाली एकत्र बसलेल्या, सुबोध आणि मनीषाला पाहून, त्यांना ही राग येतो. ते दोघे नळा जवळ येत, हात पाय धुतात. आणि आपल्या पंचा ने तोंड पुसत, अंगणात येऊन बसत, आत्त्याबायंना विचारतात "पावणं कधी आलतं म्हणायचं?"

"आल्यात, मघाशीच. अंजीबी हाय सोबत. बाळाला घीवून वनीच्या घरात बसली हाय. तिला आपल्या घरातला पाणी बी नको म्हणती. आत्त्याबाय मनात येईल ते बोलतात."
"अस काय?
वं पावणं! बोला काय म्हणता?"

आबा' सुबोधला आवाज देत बोलतात.
सुबोध आणि मनीषा जागेवरून उठून पुढे येतात. आणि सुबोध बोलतो. "काही नाही सासरेबुवा. तुमची सून आता बरी झाली आहे. म्हंटले, तिला आता घरी सोडावे. म्हणून आलो होतो."
सुबोध अगदी शांतपणे बोलतो. मनीषा तोंड खाली करून शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत असते.

महादेव अचानक पुढे येत बोलतो. "कोण सून? आमच्या घरची सून, या इथ उभी हाय." (विजूकडे हात दाखवत.)
सुबोध बोलतो' "अहो तुमच्या लहान भावाची बायको. विसरलात का तुम्हाला एक भाऊ पणं आहे ते?"

आबा मध्येच बोलतात. "पावणं' आम्हाला एकच पोर हाय. आणि त्याची बायको इथंच उभी हाय. दुसरा पोरगा बी नाय अन् पोरगी बी नसल्यात जमा हाय. तवा आलाय तसं निघा आता. आम्हासंनी काम हायत.
काय ग एवढ्यासाठी फोन करून बुलवायची काय गरज हुती? तुझी तू बघायचं हुतं ना?"

"आवं म्या सांगूनच्यान दमलिया. म्हटंल तुम्ही बुलल्या शिवाय, ह्यांच्या डोस्क्यात शिरायचं नाय. म्हणूनच्यान, तुम्हासणी बुलवून घेतल म्या."
"हम्म"

"आबा असं नका बुलू. म्या... म्या कुठं जाणार? तुमच्या शिवाय मला हायचं कोण?"
"ये बये, तू जायची तिथं जा. पणं, इथ काय आता तुझ कुणी नाय."
"आत्त्याबाय.."
मनीषा रडू लागते.

महादेव पुन्हा बोलतो. "ये ते रडणं बिडण बंद कर तुझं.
तुझा नवरा दुसरा संसार थाटून मोकळा झालाय. आता त्याच्याशीच आमचा संबंध नाय. तर, तुझ्याशी कसला संबंध? निघा आता. उगाच आम्हाला वैताग दिवू नका."

"नाय. अस नाय हूनार. तुम्ही लोकं खोटं बोलताय."

"ये बये, तो कश्याला खोटं बुललं? अन् काय ग्ं? लय हौशेने गेलतीस तवापासन, एक फोन तरी केलतास का आम्हासनी? आम्ही मेलो का? जगलो? तरी, माहीत हुतं का तुला? जरा ताप काय भरला की, गेली पावण्यांसोबत. लोकं आम्हासंनी काय बाय बोलत बसल्यात. जरा तरी लाज वाटून घ्यायची होती. तुझ्यामुळंच, आमचं पोरग बी, आमच्या हातून गेलं. आता पोरग नाय तर, तुला कश्याला फुकटात पोसू आम्ही?"

"अहो सासरेबुवा' तुम्ही ही सासूबाईंसारखेच बोलू लागला की. तुम्हाला तर माहीत ही नव्हते. त्या वेळी मनीषा कोणत्या अवस्थेत होती ती. आणि फोनचे म्हणाल तर, मी करत होतो ना! आणि तिची अवस्था सांगायला इथे आलो ही होतो. तरी तुम्ही?"

"ये बाबा' तुझ्यासंग बोलतोय का मी? तू तुझ काम केलंस ना? आता मग, गप राहायचं. नायतर आम्हासंनी बी उत्तरं द्यायला येतात. कळलं का?"

"अहो मग द्या उत्तर?"

अचानक सुबोध आणि मनीषाच्या पाठीमागे येऊन, अंजू बोलते.
तसे, सगळेच तिच्याकडे पाहतात.
"का काय झाले? मला पाहून उत्तरे अडखळलीत का तुमची?"

सुबोध तिच्याकडे येत विचारतो.
"अंजू अग, तू इथे आलीस! आणि बाळ कुठे आहे?"
"काळजी नका करू सुबोध. बाळ' वनिताच्या घरात शांत झोपले आहे. ती आहे त्याच्या जवळ. उठलाच तर, आवाज देते, म्हंटली ती मला. म्हणून, मी इथे आले.
"ओह. ओके."

"या. तुमचीच कमी हुती इथ. ती पणं भरली." आबा त्वेषाने बोलतात.

अंजू पुढे येत बोलते.
"हो आले ना. येवून बराच वेळ झाला मला. पणं, तुमचाच पत्ता नव्हता. आणि आता आलात तर, आमची बाजू समजून घेणं तर सोडाच. पण आपणच किती योग्य म्हणून, आम्हालाच, स्पेशली स्वतःच्या सुनेला कसे ही बोलत आहात तुम्ही?
हे शोभत नाही तुम्हाला आबा."

"काय शोभत अन् काय नाय. हे ठरवणारी तू कोण ग?
आम्ही नव्हतं म्हटंल, आमच्या सूनला घिवूंन जा ते."

"अरे! अजीब आरेरावी आहे की तुमची.
मघास पासून पाहतेय मी. तुम्ही ना ह्यांची बाजू ऐकताय. ना मनीषाची.
जे मनात येईल ते बोलत सुटला आहात. आबा' किमान तुम्ही तरी परिस्थिती समजून, आपल्या सूनेला आधार द्यायला हवा होतात. अहो तुमच्या चुकांमुळे ती एकटी पडली आहे. तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला. ह्यात तिची काहीच चूक नसताना, सगळा दोष तुम्ही तिला एकटीला देत आहात."

"ये बये, कोण म्हणत आमची चूक हाय? तुला समद ठाव तरी हाय का? आमी एवढ्या आशेने ह्या पोरीसंग त्याच लगीन लावलं. वाटलं हुतं, एक दोन वर्षात घरात पाळणा हलला की, समद ठीक हूईल. पणं, पाळणा सोड. हिला साधं नवरा सुदीक मुठीत ठेवता आला नाय."

"आवं कसा ठेवणार आबा. हीच चित्त शेरात म्हंटल्यावर कस सुचलं?" महादेव बोलला.

"भावजी' काय बी बुलु नका. म्या..म्या काय मजा मारायला गेले नव्हते शेरात." (शहरात)

"तू कशी बी गेली असशील. पणं, गेलीस ना?"
"दादा तू यात पडूच नको. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्या बद्दल बोलण्याचा अधिकार ही नसतो."

"ये अधिकार गाजवणारी, वकीलिन बाय. लय माहिती हाय ना तुला? मग आता जा अन् हिच्या नवऱ्याला इचार. का तिला वाऱ्यावर सोडली म्हणूनच्यान?
आमचा हिच्याशी काय बी संबंध नाय. तर आता निघायचं बघा. उगाच आमचा येळ घालवत बसू नका.
पावणं' मागल्या येळेस पाहुणचार चुकला हुता. आता या येळस करायला लावू नका. तुम्हासनी तवा मोकळं सोडलं. पणं, या येळस, नाय सोडणार. मग तुम्ही आमच्या पोरीच कोण बी असा."

" हे काय बोलत आहेत सुबोध? कश्याबद्दल बोलत आहेत हे?"
"अंजू जाऊदे. मनू चल निघूया."
"नाही आधी सांगा मला. मघास पासून, हे भलतेच काय तरी बोलत आहेत. कसला पाहुणचार करणार होते हे?"

"अंजू!"
"सुबोध प्लीज बोला." अंजू रागात बोलते.
तसा सुबोध' मनीषाकडे पाहतो. आणि एक सुस्कारा सोडून बोलतो.
"या लोकांना वाटत आहे की, माझे आणि मानिषाचे..."
"बास.. कळले मला."
मनीषा तर पायातून जीव गेल्या सारखी लटपटते. पणं, सुबोध आणि अंजू तिला दोन्ही कडून पकडतात.
मनीषा पटकन सुबोधचा हात झटकत, अंजूकडे पाहत बोलते. "अंजू ताय.. तुमाला माहीत हाय. म्या... म्या पवित्र हाय. म्या भावजींना.. .."

तोच, आबा बोलतात. "तुमची पकडा पकडी झाली असल तर, निघा आता.
उगाच चार लोकात तमाशा नका करू. आधीच झालंय तेवढं लय हाय आम्हासंनी."

"शी.. किती गलिच्छ विचार आहेत तुम्हा लोकांचे. अहो सख्खे भाऊ बहिण जेवढे जपत नसतील, तेव्हढे हे दोघे एकमेकांना जपतात. माझ्या सासू, सासऱ्यांना मुलगी नाही. सुबोधला बहीण नाही. म्हणून, ह्यांनी मनीषाला आपली बहीण मानली. तिला आमच्या घरात एका मुलीचं स्थान दिले. आणि तुम्ही लोकं?"

"ये बये, जगाला दाखवायला हे असल समद करावं लागत." मांजर नेहमी डोळ मिटून दूध पीत." कळत नाय व्हय तुला? तू बी सावध हो नायतर."
आत्त्याबाय बोलतात.

"अंजूचा पारा आणखी चढतो. आणि ती बोलते. "सुबोध' तुम्ही हे आधीच का सांगितले नाही आम्हाला?"
"कसे सांगणार अंजू? मला स्वतःला ह्या लोकांच्या विचारांची किळस येत होती. पणं, शेवटी ही तुझ्या माहेरची लोक आहेत. म्हंटल्यावर!"
"असेल हे माझे माहेर. म्हणून काय ह्या लोकांना तुमच्या किंवा स्वतःच्या सूनेवर असेल घाणेरडे आरोप करायला संधी द्यायची का?"
मनू तू का शांत झालीस? तुला काही बोलायचे नाही का! बघतेस ना? तुझे आबा आणि आत्त्याबाय ..?

"झालं का समद बुलून. नाय. झालं असल तर, निघा बीगी बीगी. अन् तू ग बये, आता जी निघशिल ते परत इथ पाऊल बी नाय टाकायचं. हे शेवटचं समज. चालती व्ह इथून." आबा बोलतात.

"नाय आ.." मनीषाला बोलताना रडू आवरत नाही.
"ये थांब. म्या तुझा कोण बी नाय. जे होत ते कवाच संपलय. तू अन् तुझ नशीब आता मोकळं हाय. आम्हासंनी अशी बी तुझी कायच गरज नव्हती. नुसत धुपाटन गळ्यात पडल हुतं ते गेलं म्हणतो आमी."

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

ता. क.
"सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास, ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी."

🎭 Series Post

View all