आपल्या मुलीला सबला बनवा, अबला नाही... महिलादिन विशेष

तूच बनव स्वतःला सबला..

नेहमी ऑनलाईन क्लासला चिवचिव करणारी रेवा आज काहीच बोलत नाही हे पाहून चित्राला थोडे विचित्र वाटले.. तसे पाहायला गेले तर शाळेत सगळ्यात जास्त आवाज हिचाच असायचा.. तुला भूक लागली आहे का , चित्राने खुणेने विचारले.. रेवाने नाही म्हणून मान हलवली.. पण तिचे डोळे मात्र पाणावले होते. आता मात्र चित्रा तिच्या जवळ गेली..रेवाने तिचा ऑडियो आणि व्हिडिओ दोन्ही बंद केले होते. " काय झाले नक्की?" चित्राने विचारले. रेवाने काहीच न बोलता तिला चॅट बॉक्स मध्ये आलेला मॅसेज दाखवला.. तिच्याच वर्गातल्या एका मुलाने काहीतरी अश्लील लिहून वर I love you असा मॅसेज केला होता.. चित्राने आधी त्याचा फोटो काढला.. ती रेवाला म्हणाली.. "असेही शाळेत तुझे मन लागत नाहिये तर बंद कर ते.. आपण मॅमशी बोलू.."

" पण आई... "

" पण नाही आणि बिण नाही.. तो जो मुलगा आहे ना, त्याचे पूर्ण नाव दे मला.. तसा माहित आहे तो मला.. पण तुमच्याकडे दोन नावांची भरपूर मुले आहेत.. म्हणून म्हटले.."

" आई, नको ना काही इश्यू करू.. सगळी मुले चिडवतील मला.."

"अग दहावीतली मुलगी ना तू? येता जाता मला स्त्री स्वातंत्र्याबद्दल लेक्चर झोडणारी. आणि आता फक्त एका मुलाने मॅसेज केला म्हणून घाबरलीस.

आज त्याने तुला मॅसेज केला, तू काही बोलली नाहीस त्याची भीड चेपली आणि असेच मॅसेज त्याने बाकीच्या मुलांना केले तर चालतील?"

रेवा काही न बोलता फक्त मुसमुसत होती.. "आई, त्याची हिंमत बघ ना कशी झाली असं काही तरी लिहायची. मला ना खूप लाज वाटतेय.."

" तू कशाला लाजतेस.. लाज तर त्याला वाटली पाहिजे.. मला एक सांग, हा मुलगा एकटाच असतो कि यांचा काही ग्रुप आहे?"

" नाही आयडिया.. कारण मागचे पूर्ण वर्ष ऑनलाईन शाळा होती ना.."

" ठिक आहे.. आता बघते मी काय करायचे ते.. तू परत अटेन्ड करणार शाळा?"

" हो.." 

रेवा परत शाळा अटेन्ड करते आहे हे पाहून चित्रा बाहेर आली आणि तिने रेवाच्या वर्गशिक्षिकांशी बोलून घेतले.. त्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि चित्राची विनंती मान्य केली.. संध्याकाळी शाळेच्या वॉटसॲप ग्रुपवर एक मॅसेज आला.. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना अपवादात्मक परिस्थितीत शाळेत बोलावण्यात आले होते.. करोनाच्या काळात असे बोलावणे योग्य आहे का? मुलांनाच तेवढे बोलावले, मुलींना का नाही? अशी चर्चा ग्रुपवर चालली होती. पण शिक्षकांनी कोणाचेही काहीच न ऐकता ती सूचना मागे घेतली नाही..

बरेचसे पालक आपापल्या मुलांना घेऊन वेळेत पोचले होते.. दहावीचे वर्ष असल्यामुळे उगीच \"मार्कांची रिस्क\" नको हेही मनात होतेच.. मुले सूचनेप्रमाणे आपल्या वर्गात जाऊन बसले.. तिथे वर्गशिक्षिका त्यांच्यासोबत मुख्याध्यापक हे बघून काहीतरी घडले आहे, याचा पालकांना अंदाज आला.. कसलीही प्रस्तावना न करता बाईंनी सरळ समोर ठेवलेल्या पुतळ्यावरचे आवरण काढले.. कपड्यांच्या दुकानात असणारा एका स्त्रीचा तो नग्न पूर्णाकृती पुतळा होता. हातातल्या पट्टीने बाई एकेका अवयवाकडे निर्देश करून त्याला वैज्ञानिक भाषेत आणि सामान्य भाषेत काय म्हणतात ते सांगत होत्या. आलेल्या पालकांमध्ये बर्‍याचशा आईंना हे आपल्या मुलांसमोर बघताना लाज वाटत होती.. आपल्या बाईच हे सांगत आहेत हे पाहून मुलांच्या नजरा सुद्धा खाली झुकल्या होत्या. हे सगळे जरा जास्तच होते आहे असे वाटून एका पालकाने विचारलेच," हे दाखविण्यासाठी तुम्ही आम्हाला आमचा वेळ खर्च करून बोलावलेत?"

 यावर बाई काही बोलायच्या आत मुख्याध्यापकांनीच सुरुवात केली..

" हो, यासाठीच बोलावले आहे तुम्हा सर्वांना.. त्याचे कारण हे आहे, जी गोष्ट ऐकायला तुम्हाला लाज वाटते त्याच गोष्टी तुमची मुले त्यांच्याच वयाच्या मुलींना नको त्या भाषेत पाठवतात.. म्हणून बाईंनी ठरवले कि ज्या अवयवांबद्दल त्यांना एवढे कुतुहल आहे , तेच त्यांना दाखवायचे. आणि त्या गोष्टीला मी माझी संमती दिली. कारण मला हे पूर्णपणे माहित आहे कि या गोष्टी वेळेत थांबवल्या नाहीत तर त्याचे रूप फार भयंकर होऊ शकते." हे ऐकून सगळ्यांच्या माना खाली गेल्या.. आता बाईंनी बोलायला सुरुवात केली. "मला त्या मुलाचे नाव माहीत आहे. पण मला बघायचे आहे कि जो शूरपणा त्याने एका मुलीला अश्लील मॅसेज पाठवण्यात दाखवला तेवढाच शूरपणा आपण केलेली चूक कबूल करण्यात आहे का?" बाई दोन मिनिटे थांबल्या कोणीच काही बोलत नाही हे पाहून परत बोलू लागल्या.."तुम्ही पंधरा सोळा वर्षांची मुले.. मला जाणीव आहे कि सतत मोबाईलवर, टिव्ही वर दाखवल्या जाणार्‍या गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करतात. पण तिथे असलेल्या वाईट गोष्टी जशा तुम्ही पटकन घेता तशा चांगल्या गोष्टी का नाही घेत? अनेक ठिकाणी चांगले प्रेरणादायी , शैक्षणिक लागले असते ते का नाही पहात, अगदीच ते सोडा, अनेक वाचनालये आहेत, ग्रंथालये आहेत तिथून आणून पुस्तके का नाही वाचत? मनाचा दुबळेपणा आपण वेगवेगळ्या बुरख्याखाली झाकतो.. आज तुमच्यातलाच एकजण आपल्याच मैत्रीणीला मॅसेज पाठवतो, उद्या छेड काढेल, परवा अजून काही करेल.. मला माझ्या विद्यार्थ्यांकडून तरी ते अपेक्षित नाही.. म्हणूनच मी आज हि छोटी सभा बोलावली.. आणि इथे मला सगळ्यात जास्त कौतुक करायचे आहे ते रेवाचे आणि रेवाच्या आईचे.. त्यांच्या नात्यात एवढा मोकळेपणा आहे कि आपल्याला कोणी त्रास देत आहे हे रेवाने न घाबरता तिच्या आईला सांगितले. आणि तिच्या आईने सुद्धा यावर तिला जाऊदे, सोडून दे असे न सांगता हे सगळे मला सांगितले. आणि रेवाचे नाव लपवण्याची काही गरज नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. हि सभा याच वेळेस ऑनलाईन स्वरूपात शाळेतील इतर पालक सुद्धा पहात आहेत.. त्यांना एकच सांगावेसे वाटते. आपली मुले काय करतात यावरही थोडे लक्ष द्या. हे वय त्यांचे जरी भरकटण्याचे असले तरी त्यांना योग्य त्या वाटेवर आणण्याचे काम आपलेच आहे.. आणि मुलीच्या पालकांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या मुलीला \"काली\" बनवा , तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर, अभ्यासात लक्ष दे वगैरे सगळे नंतर.. तिच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याशी दोन हात करायला शिकवा.." 

बाईंचे हे बोलणे ऐकून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्हीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला हे वेगळे सांगायला नकोच....




कथा कशी वाटली नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर दादर मुंबई