मनाली सकाळचे आवरून आपल्या बेडरूममध्ये निवांतपणे व्हॉट्सॲप पाहत बसली होती. तिचे आणि सासुबाईंचे नुकतेच भांडण झाले होते. त्याचा राग अजूनही तिच्या मनात धुमसत होता.
इतक्यात तिला आपल्या वहिनीचा स्टेटस दिसला. आपल्या सासुबाईंच्या हाताला धरून ती एका वृद्धाश्रमाच्या बाहेर उभी होती आणि बाजूला दोन मोठ्या बॅगाही होत्या. मनालीने हा स्टेटस तीन ते चार वेळेला पाहिला. 'वहिनी असे कसे करू शकते? आईला तिने वृद्धाश्रमात ठेवले?' मनालीला खूप राग आला.
खरं तर मनालीच्या आईचे आणि वहिनीचे संबंध खूप चांगले होते. दोघींत वाद झाला तरी समेट लगेच व्हायचा. पण गोष्टी या थराला जातील, असा विचारही मनालीने कधी केला नव्हता.
'आई आणि वृद्धाश्रमात?' आता वहिनीचा राग येऊन मनालीला रडू यायला लागलं. गडबडीने तिने दादाला फोन लावला. मात्र त्याने फोन उचलला नाही. 'काय वाटलं असेल त्याला? आणि आईला वृद्धाश्रमात ठेवायला त्याने संमती दिलीच कशी?' मनाली विचार करत राहिली.
'आईने तर आपले सगळे दागिने वहिनीला देऊन टाकले..अगदी सगळे! सारं घर तिच्या ताब्यात दिलं. कारभार तिच्या ताब्यात दिला आणि वहिनीने त्याचे चांगले पांग फेडले.'
न राहवून तिने आपल्या नवऱ्याला, मोहितला फोन लावला.
" हॅलो.." मोहितचा आवाज ऐकून मनालीला परत रडू आलं.
"मनू, किती वेळा सांगितलं तुला, कामाच्या वेळी फोन करत जाऊ नको गं. आई तुला परत काही बोलली का? की तू आईला बोललीस? एक काम करतो, घरी येताना दोघींना लाठ्या -काठ्या घेऊन येतो. मग काय भांडायचे ते भांडून घ्या एकदाचे." इतके बोलून मोहितने फोन ठेऊन टाकला.
'मला काय म्हणायचं आहे, हे निदान ऐकून तरी घ्यायचं.' आता मनालीला हुंदका फुटला. तिने खरं -खोटं करण्यासाठी वहिनीला फोन लावला. पण तिनेही फोन उचलला नाही. पुन्हा पुन्हा ती वहिनीला फोन करत राहिली. पण वहिनीने अजिबात फोन उचलला नाही.
'आता काय फोन उचलते वहिनी? बोलायला तर काहीच शिल्लक राहिले नाही.' मनाली स्वतःशी बोलत राहिली.
काही वेळाने ती सासुबाईंच्या खोलीत गेली.
"आई.."
सून आलेली पाहून सासुबाईंनी नाक मुरडले.
"आई, हे बघा." मनालीने तो स्टेटस आपल्या सासुबाईंना दाखवला.
"अगं बाई...ही तुझी आई ना? आणि ही वहिनी? दोघी वृद्धाश्रमात काय करत आहेत? तेही मोठाल्या बॅगा घेऊन?" सासुबाई एकसारखे प्रश्न विचारू लागल्या.
"बाई वृद्धाश्रमात गेली तरी कित्ती आनंदी दिसते! आणि तुझी वहिनी बघ, आपल्या मागची कटकट गेली म्हणून छान हसते आहे."
सासुबाई मनालीला चिडवत म्हणाल्या.
"आई, काहीतरीच काय बोलता? माझी आई आता तिथेच राहणार कायमची. माझं माहेर कायमचं सुटलं." मनाली रडू लागली.
हे ऐकून सासुबाई घाबरल्या. "अगं पण तुझ्या आईचे आणि वहिनीचे छान जमत होते ना? मग असे अचानक काय झाले?"
"ते मला माहित नाही. पण वहिनीचा खूप राग आला आहे. माझ्या आईशी असे कसे वागू शकते ती?" मनाली डोळे पुसत म्हणाली.
तिच्या सासुबाई मनातल्या मनात विचार करू लागल्या. ' मी सतत मनालीच्या चुका काढत राहते, तिला बोलत राहते. सुनेचे कौतुक करायला माझ्याकडे जणू शब्दच नाहीत मुळी. मग आता मनालीने तिच्या वहिनी सारखा विचार केला अन् मलाही वृद्धाश्रमात नेऊन टाकले तर? स्वतःच्या घरातून बाहेर काढले तर? मोहित माझा एकुलता एक मुलगा आणि अंश एकुलता एक नातू. तेही दुरावतील माझ्यापासून. नकोच. त्यापेक्षा हिच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करू. या घराशिवाय, आपल्या माणसांशिवाय मी राहू शकत नाही.'
"काय गं? तुझा विचार तर नाही ना असा?" सासुबाईंच्या मनातलं ओठावर आलं.
"आई, अहो मी असा विचार का करेन? आपण कितीही एकमेकींशी भांडत असलो तरी मला तुम्ही हव्या आहात." मनाली असे म्हणेपर्यंत तिच्या वहिनीचा फोन आला.
"ताई, किती फोन केले तुम्ही? काही काम होतं का?"
"वहिनी, तुला काहीच कसं वाटत नाही गं? वर तोंड करून काय विचारतेस, काही काम होतं का म्हणून?" मनाली चिडून म्हणाली.
ताई हे काय बोलत आहेत, हे वहिनीला कळेना. तिने आपल्या सासुबाईंकडे फोन दिला.
"हॅलो आई, कशी आहेस गं? मला माहिती आहे, बरी नसणारच तू. आपल्या घरातून बाहेर काढल्यावर कसं वाटत असेल आई तुला? पण तू नको काळजी करू. मी दादा आणि वहिनीला चांगलं खडसावते." मनाली एका दमात बोलून गेली.
"मनू, अगं काय बोलतेस हे? मी ठीक आहे गं. मला वाटलं तू वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केलास. भलतचं काय बडबडते आहेस?
अगं, आम्ही तिघे इथे वृद्धाश्रमात आलो आहोत. माझा एकसष्टावा वाढदिवस आहे ना आज! मग सकाळी तुझी वहिनी म्हणाली, आपण वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करू. तिथल्या लोकांना भेटही देऊ म्हणून दोन मोठ्या बॅगा भरून ब्लॅंकेट्स घेऊन आलो. ती साऱ्यांना वाटली सुद्धा. वाढदिवस अगदी मस्त साजरा झाला बघ.
खूप धमाल आली. इथली सारी मंडळी खूप खुश झाली आणि आश्चर्याची बाब म्हणजे, इथे बऱ्याच ओळखी निघाल्या. सविस्तर संध्याकाळी सांगेन. बरं, तुम्ही चौघांनी संध्याकाळी जेवायला घरी यायचं आहे. बाकी तुझी वहिनी सांगेल तुला." आईचे बोलणे ऐकून मनालीने डोक्यावर हात मारून घेतला.
"हे सारं असं आहे होय? आई, मी तुला थोड्या वेळाने फोन करते," असे म्हणत मनालीने फोन ठेऊन टाकला आणि सासुबाईंना सारी हकीकत सांगितली. नाही म्हंटल तरी सासुबाईंना थोडं दडपण आलं होतं, ते उतरलं.
"मनू, अगं कुठल्याही बाबतीत खरं -खोटं केल्याशिवाय असे गैरसमज करून घ्यायचे नाहीत. कळलं का? विनाकारण तू तुझ्या वहिनीला आज बोलली असतीस बघ. पण चला, यानिमित्ताने का होईना आपल्यातले भांडण मिटले म्हणायचे. आता गोष्टी टोकाला जातील असे अजिबात भांडायचे नाही आणि त्यातूनही भांडण झालेच तर लगेच मिटवून टाकायचे." सासुबाई मनालीला म्हणाल्या.
"आणि एक म्हणजे, मला वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचारही करू नकोस. मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय." बोलता बोलता सासुबाईंच्या डोळ्यातून पाणी आलं.
"आई, तुम्ही हा विचार सोडून द्या बरं. मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. खरचं तुम्ही मला माझ्या जवळ हव्या आहात." मनाली आपल्या सासुबाईंचा हात हातात घेत म्हणाली आणि दोघींच्या डोळ्यातल्या अश्रूंद्वारे एकमेकींबद्दल असणारे मनातले सगळे गैरसमज पार वाहून गेले.