मनातला गणेशोत्सव..

मनातला गणेशोत्सव..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

गोष्ट माझ्या गणरायाची..


बाप्पाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत त्याच्या वाटेवर डोळे लावून आतुरतेने वाट बघत बसलेल्या सर्व भक्तजनांची प्रतिक्षा अखेरीस संपली आणि बाप्पा घरी आले. अगदी फार धुमधडाक्यात नसलं तरी खूप जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं. देव घरात विराजमान झाले. सगळीकडे आनंदी आनंद आणि मंगलमय वातावरण. धूप अगरबत्तीच्या सुंगधाने अवघी वास्तू भक्तिमय सुवासाने दरवळून गेली. रंगीबेरंगी सुवासिक फुलांची आरास बाप्पा समोर मांडण्यात आली. दिव्यांची रोषणाई करण्यात आली. रोज सकाळ, दुपार,संध्याकाळ देवदेवतांच्या आरत्या करून ईश्वराला आळवणी सुरू झाली. नैवेद्यासाठी गोड पदार्थांची रेलचेल सुरू झाली. तिन्ही सांजेला गणपती बाप्पा पुढे तेल-तुपाचा दिवा सतत दिवस रात्र तेवू लागला आणि त्या मंद प्रकाशात बाप्पा माझा गालातल्या गालात हसताना भासू लागला. 


सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाचं ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत झालं. बापाच्या भक्तीगीतांनी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी, विविध उपक्रमानी सारा परिसर दुमदुमून गेला आणि मन माझं मात्र भूतकाळाकडे धाव घेऊ लागलं. लहानपणीचा आमच्या विक्रोळीमधल्या जुन्या चाळीतला गणेशोत्सव आठवला. २००४ सालची गोष्ट. किती छान दिवस होते ते..


'सिद्धिविनायक युवामित्र मंडळ' आमच्या सोसायटीच्या मंडळाचं नाव. ८० घरांची चाळवजा सोसायटी. गणपती बाप्पा येणार म्हणून अगदी १५ दिवस आधीच घरची साफसफाई सुरू असायची. मंडळातल्या सदस्यांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात केलेली असायची. बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशी रात्रभर जागून मुलं सजावट करायची. दोन चाळींच्यामध्ये मंडप टाकलेल्या असायचा. स्टेज बांधलेला असायचा. झगमगत्या दिव्यांची रोषणाई असायची. सर्वांच्या दारावर आंब्याच्या पानांची तोरणे सजायची. दारात सुरेख रांगोळी रंगायची. आणि मग आम्ही सर्व बच्चेकंपनी बापाच्या स्वागताला सज्ज व्हायचो. मुंबईत मंडळाच्या बाप्पाची मूर्ती खूप उंच असते आणि प्रत्येक वर्षी नवीन मूर्ती प्रस्थापित करतात. ही मुंबईची खासियत म्हणून ओळखली जाते. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जल्लोषात बाप्पाचं आगमन व्हायचं आणि मग मोठ्या दिमाखात बाप्पा आपल्या स्थानावर मखरात विराजमान व्हायचे. दहा दिवस नुसती धम्माल असायची. रोज सकाळ संध्याकाळ देवदेवतांच्या आरत्यानी वातावरण भक्तिमय होऊन जायचं. ईश्वराला 'सर्वांना सुखी ठेव' असं साकडं घातलं जायचं. दहा दिवस गणपती बाप्पाच्या सेवेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मला आठवतं मी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला होता. आईने छान नऊवारी साडी नेसवली होती. मी झाशीची राणी झाले होते. माझा बालमित्र हरिश्चंद्र चव्हाण हा टिळक, महेश महाडिक गांधीजी, संतोष होळकरने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सुदेश, मुकुंद रवी शिवरायांचे मावळे झाले होते. माझी बालमैत्रीण शिल्पा कांबळे जिजाऊ आणि सुजाता गावडे इंदिरा गांधी झाली होती. साडी कशीबशी सावरत कमरलेला हात लावून खोटं खोटं म्यांनातून उपसलेली तलवार आणि 'मेरी झांसी नही दूंगी' अशी केलेली गर्जना. म्यानातून तलवार काढताना माझी निसटलेली साडी आणि रडकुंडीला आलेला माझा जीव.. अजूनही आठवलं की नकळत ओठांवर हसू आणि डोळ्यांच्या कडा पाणावतात. 


चाळीतल्या काहींच्या घरी गौरी असायच्या. गौरींची सजावट रात्र रात्र जागून सगळी मोठी माणसं मिळून करायची. घरातल्या सर्व बायका एकमेकांना फराळ करण्यास मदत करायच्या. अगदी दिवाळी सण असल्यासारखं सगळे पदार्थ केले जायचे गौरींच्या सजावटीसाठी स्पर्धा व्हायच्या. सजावट अप्रतिम करण्यासाठी चुरस लागायची पण मनात हेवेदावे मुळीच नसायचे. आम्हा बच्चे मंडळींची गोड प्रसादाची एकदम चंगळ असायची. खरंतर सर्वजण प्रसाद खाण्यासाठीच जमायचो जणू! रोज प्रत्येक घरातून वेगवेगळ्या प्रकारचा गोड नैवेद्य असायचा. 


साश्रु नयनांनी घरातल्या गौरींगणपती बाप्पांना निरोप देताना पुन्हा 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी करत घरातल्या बाप्पांचं विसर्जन केलं जायचं. मग सर्व मोठी मंडळी आम्हा छोट्यांना घेऊन मंडळाचे मोठे गणपती पाहायला घेऊन जायचे. प्रचंड गर्दी असायची पण सारेजण शिस्तभंग न करता वडीलधाऱ्यामंडळींचा हात धरून गणेशदर्शनाचा आस्वाद घ्यायचो. प्रत्येक मंडळाच्या बाप्पा समोर भल्या मोठ्या रांगा लागायच्या. मोठमोठे देखावे असायचे. कधी ऐतिहासिक गोष्टींवर भर दिलेला असायचा तर कधी सामाजिक प्रश्नावर.. मनमोहक डेकोरेशन केलं जायचं. बोलते, फिरते देखावे पाहायला खूप मज्जा यायची. विक्रोळी स्टेशनला मोकळ्या मैदानात जत्रा भरायची. उंचच्याउंच आकाशपाळणे असायचे. पाळण्यात बसल्यावर एकदम पाळणा उंच गेला की भीतीने पोटात असा गोळा यायचा काय सांगू! फिरते घोडे, फुगेवाले फुगे घेऊन यायचे. बर्फाचा आंबट गोड सरबत घालून दिलेला गोळा खायला धमाल यायची. चणेफुटाणे, खट्टामिठा, मडक्यातली कुल्फी, लिंबूमीठ लावून शेगडीच्या निखाऱ्यावर भाजलेलं मक्याचं कणीस, मीठ घालून शिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, घेऊन फेरीवाले मंडळाच्या बाजूने ठाण मांडून बसलेले असायचे. मग काय! आमची खाण्याची नुसती रेलचेल असायची. रात्रभर कन्नमवार नगर, टागोर नगर, विक्रोळी स्टेशन, विक्रोळी पार्क साईड सगळे मंडळाचे गणपती न कंटाळता, न दमता पाहून घरी यायचो. दुसऱ्या दिवशी पाय असे ठणकू लागायचे काय सांगू!! पण गणपती दर्शनाच्या आनंदापुढे त्या वेदना, ते दुखणं कुठल्या कुठे धूम ठोकून पळून जायच्या.. 


दहा दिवस कसे निघून जायचे कळायचंच नाही. अनंतचतुर्दशीच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असायची. महाप्रसाद असायचा. रात्री भजनीमंडळ यायचं आणि रात्रभर भजन कीर्तनाचा गजर, टाळ-चिपळ्या मृदुंगाच्या स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध व्हायचे. सारे भक्तिरसात नाहून जायचे. दुसऱ्या दिवशी मग बाप्पाला निरोप द्यायची वेळ यायची अनंतचतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करायचो. खरंतर मला खूप रडू यायचं. मी आईच्या कुशीत जाऊन खूप रडायचे. मग आई समजवायची.

"बाप्पा त्याच्या आईला म्हणजे पार्वतीमातेला भेटायला जातोय.. तुला कोणी तुझ्या आईपासून दूर ठेवलं तर तुला आवडेल का? परत पुढच्या वर्षी बाप्पा नक्की येणार आहे.. मग असं रडून बाप्पाला निरोप नाही द्यायचा.." 


माझी समजूत पटायची. बाप्पा त्याच्या आईला भेटायला निघाला आहे आणि तो पुढच्या वर्षी येणार आहे. मी मनाला समजावून सांगायची. मग मंडळाच्या गणपती बाप्पाची पूजा करायचो. बाप्पाला निरोप देताना का कोणास ठाऊक! त्याच्याही डोळ्यांत पाणी आल्याचं भास होऊ लागायचा. मोठ्या ट्रकमध्ये बाप्पाला बसवून सर्व मोठी माणसं दादरला समुद्रकिनारी घेऊन जायचे. शेवटची आरती करून विशाल समुद्रात बाप्पाचं विसर्जन व्हायचं आणि सर्वजण आपल्या घरी परतायचे.


आज तो माझा लहानपणीचा चाळीतला गणेशोत्सव आठवला. डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. पुढे काळ बदलला आणि गणेशोत्सवाचे स्वरूपही पण काहीही म्हणा आजही बाप्पाच्या येण्याचा उत्साह मात्र कायम आहे. मनातला हा गणेशोत्सव आता पुढे कधी पहायला मिळेल कोणास ठाऊक! पण हे गणराया, दरवर्षी तुझ्या भेटीची आस लागलेले तुझे भक्तजण असेच आतुरतेने वाट पाहतात आणि त्याच जल्लोषात तुझं स्वागत करण्यास उत्सुक असतात.


हे गणराया, तू असाच आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी उभा रहा.. आपल्या भक्तांचं रक्षण कर हेच तुझ्या चरणी मागणं रे देवा..


!!गणपती बाप्पा मोरया!!


©निशा थोरे( अनुप्रिया)