मनातील घुसमट

Pain Of A Girl's Mind
रविवार असल्याने माधुरीला ऑफिसला सुट्टी होती. माधुरी निवांत झोपेतून उठली, एका हातात चहाचा कप व दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन बसली. माधुरीने निशांतला फोन लावला,

"हॅलो निशांत, तु परत केव्हा येणार आहेस?"

"अहो राणी सरकार, एवढे दिवस थांबलात, अजून आठ दिवस वाट बघा. मग आम्ही कायमचे आपल्या सेवेत हजर असणार आहोत." निशांतने त्याच्या हटक्या अंदाजात उत्तर दिले.

माधुरी म्हणाली,
"आज जाम बोअर होत आहे रे. इतर नवरे आपल्या बायकोला विकेंडला कुठेतरी फिरायला घेऊन जातात. माझंच नशीब फुटकं, गेल्या महिन्यापासून सातासमुद्रापार जाऊन बसलाय."

निशांत म्हणाला,
"राणी सरकार आपल्या बोलण्यावरुन आपण खूपच बोअर झालेल्या वाटत आहे. एक काम कर स्वातीला सोबत घेऊन छानपैकी बाहेर जा. मूव्ही बघ, शॉपिंग कर, बाहेरच काहीतरी खाऊन ये."

माधुरी म्हणाली,
"मला तेच करावं लागणार आहे. स्वातीच्या घरी जाऊनच तिला सोबत घेऊन जावे लागेल. मी पटकन आवरुन नाश्ता करायलाच तिच्या घरी जाते. चल बाय, आपण नंतर बोलू."

माधुरी पटकन तयार होऊन स्वातीच्या घरी गेली. माधुरीला घरी आलेलं बघून स्वातीची आई म्हणाली,
"आज सकाळी कसं काय येण केलंस?"

माधुरी म्हणाली,
"काकू सकाळी उठल्यापासून खूप बोअर होत होतं. निशांत घरी नाहीये ना. स्वातीला सोबत घेऊन कुठेतरी फिरुन येऊयात, असा विचार केला."

स्वातीची आई म्हणाली,
"तिचं सकाळपासून काहीतरी बिनसलं आहे, त्यात मला एका नातेवाईकाच्या इथे जायचं आहे. मी निघते, तुम्ही दोघीजणी काय करायचं बघून घ्या."

एवढं बोलून स्वातीची आई घराबाहेर पडली. माधुरी स्वातीच्या रुममध्ये जाऊन म्हणाली,
"स्वाती अशी काय लोळत पडली आहेस? उठ पटकन, आपण मूव्ही बघायला जाऊयात."

"मला यायचं नाहीये. तु जा." स्वातीने उत्तर दिले.

माधुरी म्हणाली,
"मी एकटी मूव्ही बघायला जाऊ का? एनिवेज तुझा चेहरा असा लटकलेला का आहे? काकूंसोबत भांडण झालं का? कारण त्याही तनख्यात कुठेतरी निघून गेल्या."

स्वाती म्हणाली,
"मी आईसोबत गेले नाही, म्हणून तिला राग आला असेल. आमच्या एका नातेवाईकाकडे गेट टूगेदर आहे."

माधुरी म्हणाली,
"अग मग जायचं होतं की."

स्वाती म्हणाली,
"माधुरी हल्ली मला कोणाकडेच जायची इच्छा होत नाही."

माधुरी म्हणाली,
"स्वाती गुपचूप तुझं काय आणि कुठं दुखतंय? ते सांगशील का? मी सारखं सारखं काहीही विचारणार नाही."

स्वाती म्हणाली,
"माधुरी माझं नेहमीचंच दुखणं आहे ग. माझं मुख्य दुखणं बाजूलाच राहत आहे आणि दुसऱ्याच आजाराची लक्षणे माझ्यासमोर येतात, मग त्यावर उपचार केला जातो आणि मुख्य दुखणं तसंच राहतं. मला त्याचा प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण माझ्यापेक्षा लोकांनाच ह्याचा त्रास जास्त होतो?"

माधुरी डोकं खाजवत म्हणाली,
"स्वाती मला समजेल अशा भाषेत बोलशील का?"

स्वाती म्हणाली,
"आज सकाळचीच गोष्ट सांगते. मी झोपेतून उठल्यावर मला माझ्या काकांनी एक लेख पाठवला होता, म्हणून तो वाचायला घेतला.त्या लेखाचा आशय असा होता की, मुलगी लग्नाच्या वयात येते, तेव्हा तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतात. मुलगी शिकलेली असल्याने तिच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या असतात. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला पाहिजे, त्याला पगार मुलीपेक्षा जास्त पाहिजे, मुलाचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, मुलावर आईवडिलांची जबाबदारी नको, मुलगा दिसायला रुबाबदार पाहिजे. मुलीला अनेक मुलांची स्थळं येतात, पण ती काहीना काही कारणावरुन मुलाला नकार देते. 
कालांतराने मुलीचा पगार आणि वय दोन्ही वाढत जातात. मुलगी आपल्या अपेक्षा कमी करते, पण नंतर तिच्या वयाचा मुलगाच तिला भेटत नाही. 
आता हा लेख मला माझ्या काकांनी मुद्दामहून पाठवला असेल, हे मला कळून चुकले. माधुरी पण त्या मुलीचं काय चुकलं? तिचं पुढील आयुष्य तिला कोणासोबत घालवायचे आहे? हे ठरवण्याचा तिला अधिकार आहेच ना. 
हल्ली लग्नाचा विषय निघाला की, मुलीच्या अपेक्षा कश्या अवास्तव असतात? याबद्दल सरार्स बोललं जातं आहे. लग्न करताना मुलाच्याही अपेक्षा असतातच ना, त्याला सुंदर मुलीसोबत लग्न करायचं असतं, ती मुलगी शिकलेली पाहिजे, पण तिला घरातील सर्व कामही करता आली पाहिजे, ती सुगरण असली पाहिजे, तिने नोकरी करुन घरही सांभाळलं पाहिजे.
मुलाच्या अपेक्षा या वास्तविक आणि मुलीच्या अपेक्षा अवास्तविक. हे असं का? हा फरक का?
अपेक्षा फक्त मुलीकडूनच का?
आता माझा एक मावसभाऊ आहे, त्याने लग्न करायचे नाही म्हणून जाहीर केले आहे, त्याच्या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. पण हेच जर मी जाहीर केले तर, घरी जागतिक महायुद्ध होईल.
मला लग्न या विषयावर चर्चा नको, म्हणून मी नातेवाईकांकडे जायला आईला नकार दिला, तर तिला माझा राग आला. अग प्रत्येकजण माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत म्हणतात की, देवा आमच्या स्वातीला तिच्या मनासारखा जोडीदार भेटूदेत. बिचारी इतकी चांगली आहे, पण तिचं लग्न काही जमत नाही. स्वातीचं लग्न झालं म्हणजे तिच्या आईवडिलांच्या डोक्याचं टेन्शन कमी होईल.
काहीजण तर मला विचारतात की, लाडू कधी खाऊ घालणार आहेस? 
मला कितीही राग आला, वाईट वाटलं, तरी काहीच बोलायचं. या सर्व प्रश्नांची उत्तरं हसून, गोड बोलून द्यायची. 
आता माझ्या ज्या काकांनी मला तो लेख पाठवला, त्यांना माझी खरी परिस्थिती माहीत तरी आहे का? अग आजवर मी कोणत्याच मुलाला नकार दिला नाही. मलाही माझं लग्न लवकर व्हायला पाहिजे होतं, पण माझा फोटो बघून कोणी मला प्रत्यक्षात बघायलाच आलं नाही, यात माझा काय दोष?
अजूनही बायोडेटा आणि फोटो बघितला की, मुलाकडचे त्यांच्या मुलाचा बायोडेटा किंवा फोटो सुद्धा पाठवत नाही. वधू वर सूचक केंद्राचे इतके ग्रुप मोबाईलवर आहेत, पण त्यातील एकाने सुद्धा माझा बायोडेटा बघून आम्हाला संपर्क साधला नाहीये ग. जेव्हा कोणी नातेवाईक घरी आल्यावर "हिचं कुठं जमलं नाही का?" हे विचारतात, तेव्हा मनाला इतक्या यातना होतात म्हणून सांगू, पण त्या यातना चेहऱ्यावर दाखवायच्या नाही, कारण मुलीला तो अधिकारचं नाहीये.
आईला वाईट वाटू नये, म्हणून मी सतत चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करते. मागच्या आठवड्यात माझी एक चुलत बहीण घरी आली होती, ती बोलता बोलता बोलून गेली की, "स्वातीच्या लग्नासाठी घागरा घेऊन ठेवला होता, तो जुना होऊन गेला, पण अजून काही आपल्या स्वातीचं लग्न होत नाही."
माधुरी हिला हिच्या घागऱ्याची पडली आहे. मी तर इतके काही स्वप्न पाहिले होते. कोणाचंही प्रीवेडिंग शूट बघितलं की, आपल्यालाही असंच करायचं, ही गाणी टाकायची. कपल्सचे रिल्स बघताना सुद्धा मनाला त्रास होतो. आतातर मी ते बघणंही सोडून दिले आहेत. मला कोणाचा हेवा वाटत नाही, पण मलाही एक जोडीदार असावा असं वाटतं ना. जे क्षण तुम्हा सर्वांनी अनुभवले आहेत, ते मलाही अनुभवायचे आहेत ग. आता तर असं वाटतं की, हे आपल्या नशिबातचं नाहीये.
आयुष्य जे समोर आणेल ते क्षण जगायचे, असं मी ठरवलं आहे. वाईट एवढंच वाटतं की, मी ज्यातून जात आहे, त्याची कोणाला काहीच कल्पना नाहीये. कोणाला समजून ते काहीच करु शकणार नाही. माधुरी दिवसभर कामाच्या गडबडीत हे सगळे विचार डोक्यात येत नाहीत, पण रात्री झोपताना आणि सकाळी उठताना मात्र हे सगळे विचार डोक्यात येतात. आपल्याला काय करायचं होतं? आणि आपण काय करत आहोत? हेच डोक्यात चालू राहतं. माधुरी मी सगळं काही सकारात्मक दृष्टिकोनातून स्विकारते, पण एखादी वेळ येते की, मन पूर्णपणे नकारात्मक होऊन जातं. माधुरी दुःख एकच आहे की, मला स्वतःलाच समजून सांगावं लागतं. स्वतःलाच मोटिव्हेट करावं लागतं. मन गुंतून रहावं म्हणून काहीतरी नवीन करावं लागतं."
बोलता बोलता स्वातीचा कंठ दाटून आला होता.

यावर माधुरी म्हणाली,
"स्वाती अग तुझ्या मनात किती साचलं आहे? It's dangerous for health. तू माझ्यासोबत या विषयावर का बोलली नाहीस? मी कोणी परकी आहे का?"

स्वाती म्हणाली,
"तुलाही माझं रडगाणं ऐकून कंटाळा यायला नको, म्हणून मी हल्ली या विषयावर बोलणं टाळते. तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण मलाही वाटतं की, तू समोरुन मला याबद्दल कधीतरी विचारावं. मला राग नाही येत, पण थोडसं वाईट वाटतं. मलाही तुझी परिस्थिती समजते, पण तुझ्याशिवाय मला जवळची अशी मैत्रीण कोणीच नाहीये, म्हणून अपेक्षा वाटते बाकी काही नाही. तसाही माझा तुझ्यावर एवढा हक्क नाहीये."

माधुरी म्हणाली,
"जवळची मैत्रीण म्हणते आणि हक्क नाही, असं कसं? स्वाती मी माझ्या आयुष्यात इतकी व्यस्त झाले आहे की, तू या सगळ्यातून जात असशील ही कल्पनाच मला नव्हती. मला विचारायला नाही जमलं तरी, तू हक्काने माझ्याकडे येऊन मन मोकळं करत जा. Afterall we are best friends."

स्वाती म्हणाली,
"हो म्हणून तर मी तुझ्याकडे मन मोकळं केलं. नाहीतर हल्ली मी कोणासोबत माझ्या मनातील बोलत नाही. माझ्या मनातील ही विचारांची घुसमट अशीच चालू राहील. बरं चल तुला बाहेर जायचं होतं ना, मी फ्रेश होऊन येते, मग आपण जाऊयात."
©®Dr Supriya Dighe