माणसाची वाचा बंद झाली तर?

अरे बापरे! हे काय??
अरे बापरे! .... हे काय?.... समस्त मानव जातीची वाचाच बंद झाली तर?.... तर काय होईल?......

        नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रत्येक गोष्टीलाही दोन बाजू असतात. एक वाईट आणि एक चांगली....
तर या विषयाची एक बाजू अशी की....
      
      माझा तर आनंदाच गगनात मावणार नाही. खरचं आहे.... जगाच्या या रहाटगाड्यात कुणाला कुणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही,हितगुज करायला वेळ नाही...ना ही कुणाचं ऐकून घ्यायला. कुणी बोललाच तर तेही चार शब्द आणि त्या चार शब्दात सुद्धा दुसर्‍यांची निंदा, नालस्ती, वाईट बोल आणि स्वताच गार्‍हाणं..... बाकी काय?

           काही माणसं अशी असतात, उचलली जीभ लावली टाळ्याला.... पण समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. मग माणसाची वाचा बंद झाली तर हे वाईट बोल कुणाला ऐकायला मिळणार नाहीत. आणि कुणाच्या मनावर माणसांचे वाईट बोल घाव घालणारं नाहीत.

          वाचा बंद झाली तर माणसं कृतीतून बोलू लागतील आणि गंमत बघा की, हजारो वेळा एखाद्या गोष्टीबद्दल सांगून, ओरडून माणसांना कळत नाही ते एका कृतीतून लगेच लक्षात येते, समजते.

या विषयाची दुसरी बाजू अशी की.....
        मला तर खूप वाईट वाटेल की, आपली म्हणजेच माणसांची वाचा बंद झाली तर?.... आपल्या वाचेच्या माध्यामातून माणूस स्वतःला व्यक्त करत असतो आणि हीच वाचा जर बंद पडली तर त्याला भावना व्यक्तच करता येणार नाहीत.

       आपण पाहातच आहोत... पूर्वीसारखी वाचन संस्कृती राहिली नाही. माणसांना जी काही. माहिती हवी आहे ती ऑडिओ,व्हिडिओ प्रकारातीलच. मग माणसाची वाचा बंद झाली तर या ऑडिओ किंवा व्हिडिओ मधील जी माहिती, जो आवाज आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण कुणाचा आवाज त्यात असणार आहे त्याचीही वाचा गेलीच असेल.... नाही का.....

         बातम्या समजणार नाहीत, फोनवरून बोलता येणार नाही. जे काही असेल ते कृतीतून घडेल. म्हणजे पूर्वीच्या काळी असणार्‍या मुकपटासारखेच की.... आणि या आधुनिक युगात हे शक्य होईल का?
 
           म्हणजेच माणसाची वाचा बंद झाली तर प्रथम जितके चांगले वाटले तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त वाईट परिणाम समस्त मानव जातीवर होईल. मनुष्यामध्ये असणार्‍या विचारांची देवाणघेवाण त्याच्या वाणीच्या माध्यामातून होत असते. मग ही वाणी, वाचा बंद पडली तर माणसाची प्रगती नक्कीच खुंटेल......

धन्यवाद!
    ~ सौ. प्रणाली चंदनशिवे.


🎭 Series Post

View all