Login

मॅनेजरशीप भाग 1

कंपनी वाचावण्या साठी एक मॅनेजर किती कष्ट घेतो आणि सर्व राजकारणावर मात करतो त्याची कथा

गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या कंपनीत जनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच आडाखे बांधले होते. काही गोष्टींचे आराखडे मनात तयार होते. आता या दृष्टीने प्लॅनिंग करून त्याचं efficient implementation कसं करता येईल हे बघण आवश्यक होतं. आणि याकरता शांतता फक्त सुटीच्या दिवशीच मिळू शकते म्हणूनच आज मीटिंग बोलावली होती.

बाकीच्या लोकांना यायला वेळ होता म्हणून मधुकर फॅक्टरी मध्ये गेला. मेंटेनेंस स्टाफ आलेला होता आणि कामाची विभागणी चालू होती. माधुकरला पाहून सारे गप्प झाले. मधुकरणे सहजच चौकशी केली की

काय प्रोग्रॅम आहे आजचा ?

सर, दोन मशीन फार त्रास देताहेत त्या उघडून ठीक करायच्या आहेत.

कोणत्या मशीनस् ?

सर मोल्डिंग मशीन आणि सॅंड प्लांट. १०-१२ तास तरी लागतील.

चालू द्या. चालू द्या. मीटिंग संपल्यावर मी चक्कर मारीन. अस सांगून मधुकर परत ऑफिस मध्ये आला.
मीटिंग मध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. बऱ्याच कामांची रूपरेषा ठरली. कामाच्या पद्धतीं मध्ये मधुकरने काही बदल सुचवले जेणेकरून कामांचा जलद गतीने निपटारा होईल. प्रॉडक्शन प्लॅनिंग मध्ये खास करून असे बदल सुचवले की प्रॉडक्शन आणि मार्केटिंग आणि परचेस यांचा योग्य समन्वय साधला जाईल. मीटिंग जवळ जवळ दुपारी चार पर्यन्त चालली.

सगळे पांगल्यावर मधुकरची पावलं फॅक्टरी कडे वळली. शॉप फ्लोर वर खास काही चाललेलं दिसत नव्हतं. ज्या दोन मशीनस् बद्दल सकाळी बोलणं झालं होतं तिथे कोणीच नव्हतं. माधुकरने सुपरवायझर ला हाक मारली.

या दोन्ही मशीन ठीक झाल्या ? तुम्ही तर म्हणाला होता की १० तास लागतील म्हणून. वेळे अगोदरच काम झालं, छान छान अभिनंदन. अस म्हणून मधुकर जाण्यासाठी वळला.
नाही सर मशीन overhaul नाही झाल्या.
अरे ! का ?
सर चक्रवर्ती नाही आला म्हणून. तो या कामात एक्स्पर्ट आहे. तोच करणार होता हे काम.
चक्रवर्ती कोण ?
साहेब जुना फिटर फोरमॅन आहे.
तुम्ही सुपरवायझर आहात न ? मग तुम्हाला हे काम करता यायला पाहिजे
कंपनी एकट्या माणसाच्या भरवश्यावर कशी चालणार ?
तो कोणालाही मशीन ला हात लावू देत नाही. आणि तुमच्या आंगोदार जे सर होते त्यांनी सुद्धा आम्हाला मशीन overhaul करायला मना केलं होत.

आश्चर्य आहे. but any way मी सांगतो तुम्ही करायला घ्या. तुम्हाला कोणी
काही म्हणणार नाही. याच्या आंगोदार पण केलंच असेल न ? मग ?

नाही सर तो आम्हाला इकडे फिरकू पण देत नव्हता. आणि सर्व manuals पण त्यांच्या कपाटात लॉक केलेले आहेत.
आता हा सगळा काय प्रकार आहे ते मधुकरच्या लक्षात आलं. काम अवघड होतं
पण एका माणसाची मक्तेदारी कंपनी साठी हानिकारक होती. ती तोंडणं आवश्यक होतं.
ओके. शिंदे, तुमची टीम कुठे आहे ? बोलवा त्यांना. कितपत अनुभवी आहेत ?
सर ४-५ वर्ष इथे काम करताहेत. काय करायचं ?
बोलवा त्यांना. आपण उघडू मशीन.
सर आपण उघडायची ? manuals पण नाहीत, मग ?
बोलवा त्यांना. आणि हात हलवत येऊ नका टूल बॅग घेऊन या म्हणावं. लगेच.

ताफा आल्यावर मधुकरनी त्यांना चार अॅलन बोल्ट दाखवून उघडायला सांगितले. आणि एका पेपर वर पाच स्टेप्स लिहून दिल्या. आणि सांगितलं की या स्टेप्स फॉलो करा. झाल्यावर सांगा. आपली बुद्धी चालवू नका. सांगतो तेव्हडच करा आणि आपण काय करतो आहोत ते लक्षात ठेवा. पुढच्या वेळी तुम्हालाच करायचय.
एवढ झाल्यावर माधुकरने दुसऱ्या सुपर्वायजरला घेऊन सॅंड प्लांट कडे मोर्चा वळवला. तिथे पण अशाच सूचना कागदावर लिहून दिल्या आणि पहिल्या मशीन वर आला.
दोन्ही मशीनस् च काम पूर्ण व्हायला रात्रीचे १२ वाजले. चार चार वेळा ट्रायल घेऊन झाल्यावर मग मधुकर घरी जायला निघाला.
दुसऱ्या दिवशी मधुकर वेळेच्या आधीच फॅक्टरीत पोचला. सकाळी नेहमी प्रमाणे फॅक्टरीत एक राऊंड मारून प्रॉडक्शन व्यवस्थित चालू आहे हे बघून मग ऑफिस मध्ये जाण्यासाठी वळला. रात्री दुरुस्त केलेली मशीनस् ठीक ठाक काम करताहेत हे बघून त्याला जरा बर वाटलं. वाटेत मेंटेनेंस च्या रूम मधून जोर जोरात आवाज येत होते म्हणून जरा थांबला. डोकावून बघितल्यावर दिसलं की शिंदे सुपरवायझर वर कोणी तरी ओरडत होता आणि बाकी शांत पणे उभे होते. मधुकर ला पाहिल्यावर बाकी सगळे सावरून बाजूला झाले पण तो माणूस काही ओरडायचा थांबला नाही.

काय प्रकार आहे हा ? माधुकरने जोरात विचारले.
सर हा चक्रवर्ती. हा म्हणतोय की हा नसतांना मशीनस् ना हात लावायची हिम्मत कशी झाली. शिंदे सुपरवायझर बोलला. हा म्हणतोय की G M ला कोणी आधिकार दिला हे काम करायचा ?

चक्रवर्ती वळला मधुकर च्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. दारूचा एकदम भपकारा आला. मधुकरने तोंड फिरवलं. चक्रवर्ती मधुकरला म्हणाला की

हे माझं काम आहे. वर्षानुवर्षं मीच करतोय. माझ्या शिवाय ज्यांनी हात लावला ते fail गेले. तुम्ही ऑफिस मध्ये बसायचं सोडून मशीन कडे कशाला आलात ? तुम्हाला मशीनच काय ज्ञान आहे ? आता जर मशीन बिघडली तर मी जिम्मेदार नाही. सांगून ठेवतो.

चक्रवर्ती तू दारू पिऊन आलेला आहेस. duty वर दारू पिऊन येणं मना आहे. तू काय बोलतो आहेस हे तुझ् तुलाच काळात नाहीये त्यामुळे तू आत्ता ताबडतोब घरी जा. आपण उद्या बोलू.
मेरेको आज तक किसिने जानेको बोलनेकी हिम्मत नही की. तूम कौन है कल आये हो और कल चले जाओगे मै यही था और यही रहुंगा. तूम मेरेको जानते नही.
माधुकरने एका helper ला सांगितलं की गेट वर जा आणि दोन वॉचमन ला बोलावून आण .
वॉचमन आल्यावर त्यांना सांगितलं की हा माणूस दारू पिऊन आला आहे. त्याला गेट च्या बाहेर काढा. चक्रवर्तीने थोडा दंगा केला पण वॉचमन त्याला बाहेर घेऊन गेले.
आपल्याशीच बडबडत चक्रवर्ती घरी गेला. संध्याकाळी दारूचा अंमल उतरल्यावर संध्याकाळी तो डायरेक्टरच्या म्हणजे सुशील अग्रवाल च्या घरी गेला. सुशील बाबू बाहेर जायच्या गडबडीत होते. ते बाहेर आले त्यांना एका महत्वाच्या मीटिंग ला जायचं होतं. कपाळावर आठ्या घालत त्यांनी विचारलं
काय झालं ? लवकर बोल माझ्याजवळ वेळ नाहीये.
सुशीलबाबू, गुरवारी मोल्डिंग मशीन आणि सॅंड प्लांट overhaul करायचं शिंदे सुपरवायझर नी ठरवलं होतं. पण शुक्रवार आणि रविवार high tungsten आणि high molybdenum च्या castings होणार होत्या. आपल्या सांगण्याप्रमाणे मशीन मध्ये अश्या प्रकारे बदल केले होते की त्या माशीनवरचे सर्व कास्टिंगस रीजेक्ट होतील.
मी काय करायला सांगितलं हे सांगायला तू आता आला आहेस ?
नाही, मशीन ओव्हरहॉल झाले असते तर रीजेक्शन आलं नसतं म्हणून मी गुरवारी गेलोच नाही. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे शिंदे नी ओव्हरहाल करायचं कॅन्सल केलं. पण नवीन मधुकर साहेब आलेत, त्यांना सर्व माहीत होतं आणि त्यांनी मशीन ठीक करून टाकल्या. म्हणून मी शिंदेला आज सकाळी खूप झापला. पण तेवढ्यात तिथे मधुकर साहेब आलेत आणि त्यांनी मला गेट बाहेर काढलं. आता काय करायचं
हा मोठाच प्रश्न होता. पुढची सगळी चेन थांबणार होती. सुशील बाबू विचारात पडले.
थोड्या वेळाने काही विचार मनाशी करून ते चक्रवर्ती ला म्हणाले
विक्रमसिंग ला मदतीला घे आणि नाइट शिफ्ट मध्ये केमिकल कॉम्पोझीशन मध्ये गडबड करा म्हणजे रीजेक्शन येईल. पण हे फक्त दोन हीट मध्येच करा आणि ते ही वेगवेगळ्या दिवशी. आणखी एक तू शांत रहा, साहेबांची माफी माग. त्यांच्याशी कुठलाही पंगा घेऊ नकोस. म्हणजे आपली कामं बिनबोभाट करता येतील. कळलं ?
ठीक आहे सुशील बाबू. तसंच करतो.

क्रमश:.......

🎭 Series Post

View all