भाग 7 वरून पुढे वाचा.....
ICU मधून डॉक्टर मोघे म्हणजे जयंताचे सासरे, बाहेर आले. लगेच सर्व त्यांच्या भोवती गोळा झाले. आता डॉक्टर काय सांगतात असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
जयंतराव पेशंट ला हाय फीवर आहे आम्हाला टायफॉइड ची शंका आहे ब्लड टेस्टिंग ला लॅब मध्ये पाठवलं आहे. रीपोर्ट आल्यावरच नक्की कळेल.
शुद्धीवर आलेत का ? जयंता ने विचारलं.
ते शुद्धिवरच आहेत. परंतु अनिवार थकवा आहे त्यामुळे ग्लानीत आहेत म्हणून तुम्हाला ते बेशुद्ध आहेत असं वाटलं. टायफॉइड ची शंका त्यामुळेच आली आहे. यांनी किमान एक ते दीड आठवडा तरी ताप अंगावर काढला असावा. आधीच काळजी घेतली असती तर ताप एवढा वाढला नसता. पण आता ते इथे आहेत, आणि आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेउच. बरं यांच्या घरी कोण कोण असतं ? त्यांच्या पैकी कोणाला तरी बोलावून घ्या. म्हणजे त्यांना अपडेट देता येईल आणि जर काही लागलं तर त्यांना सांगता येईल.
ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवल आहे ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.
ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही चला आता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला काळवुच. सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला.
दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनीता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती.
डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ? – अनीता
अजून ग्लानीतच आहेत. कारण अशक्तपणा खूप आहे. तापही आहेच. पण काळजी
करू नका. योग्य ती ट्रीटमेंट चालू आहे.
ICU मध्ये किती दिवस रहाव लागेल?
आम्ही आज त्यांना रूम मध्ये शिफ्ट करतो आहोत. ICU मध्ये काल ठेवण्याचं इतकंच कारण होतं की पेशंट 24 तास आमच्या नजरे समोर राहील. पण आता आम्ही रूम मध्येच 24 तास attendance राहील अशी व्यवस्था करतो आहोत. एक नर्स त्यांच्याच रूम मध्ये राहील आणि ती सर्व गोष्टी मॉनिटर करेल. म्हणजे व्यवस्था सगळी आयसीयू ची पण रूम मध्ये. म्हणजे तुम्हाला पण तिथे राहता येईल. आयसीयू मध्ये कोणाला प्रवेश नसतो. आणि यांची प्रकृती तशी फार गंभीर नाही आहे.
डॉक्टर काही संदर्भ लागत नाहीये. एकीकडे म्हणता की प्रकृती गंभीर नाहीये आणि दुसरीकडे 24 तास नर्स असणार आहे म्हणता. मला कळलं नाही.
अहो तुमचा पेशंट ठीकच आहे. त्यांची ट्रीटमेंट चालूच आहे. पण माझे जिजाजी, म्हणजे जयंत देसाई, कंपनी चे मालक, त्यांचं म्हणण असं आहे की कुठलीही कसर राहता कामा नये. श्रीयुत मधुकर सरनाईक हे त्यांच्यासाठी आणि कंपनी साठी अत्यंत महत्वाचे आहेत. अमोल आहेत. आता तुम्हीच सांगा माझे वडील म्हणजे त्यांचे सासरे जावयाचा शब्द खाली पडू देतील का ? काळजीच खरंच काही कारण नाही. टायफॉइड आहे थोडा वेळ लागेल पण नो worries. म्हणूनच मी स्वत: यात पूर्ण लक्ष घालते आहे.
अनितांचं समाधान झालं आणि बरही वाटलं.
आठवडा झाला. माधुकरची तब्येत आता झपाट्याने सुधारू लागली होती. अशक्तपणा होता पण आता बरीच सुधारणा झाली होती. मेघना म्हणाल्या प्रमाणे ती खरंच रात्रंदिवस चकरा मारायची. एकदा अनिता ने विचारलं देखील की एवढ्या रात्रि बेरात्री कशा काय येता ? तर म्हणाली की शेजारच्याच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो. आणि हॉस्पिटल आणि घर यांच्यामध्ये एक फाटक आहे.
अनिताचे सासू, सासरे तसे वयस्कर होते आणि अनीता त्यांच्या जवळ मुलांना
सोपवून ती इथे आली होती. तिला आता जास्ती दिवस राहणं शक्य नव्हतं. मधुकरची तब्येत आता सुधारली होती आणि त्याची काळजी पण खूप चांगल्या रीतीने घेतल्या जात होती. म्हणून मधुकर आणि मेघना ला विचारून ती इंदूरला जायला निघाली. मेघना म्हणाली की आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. तुम्ही निश्चिंत पणे जा. रोजच्या रोज तुम्हाला फोन वरून अपडेट देत जाऊ. अनीता मग जरा जड अंत:करणानेच निघाली.
दोन तीन दिवस असेच गेलेत. आता मधुकरची तब्येत बरीच सुधारली होती. रूम मध्येच तो हिंडा फिरायला लागला होता. अशक्तपणा होताच पण बराच कमी होता. मेघना अजूनही पूर्णपणे मधुकरच्याच तैनातीत होती. मधुकरशी ती मुद्दाम इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची. त्याला आनंदी ठेवण्यासाठी तिचे आटोकाट प्रयत्न चालले होते. एक दिवस मधुकरने तिला विचारले की
अजून किती दिवस इथे राहायचे आहे ? आता मला बरं वाटतंय. स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकेन. किती दिवस फॅक्टरीत गेलो नाहीये, तिथे पण जायला पाहिजे.
अजून तुमचा अशक्तपणा पूर्ण गेला नाहीये. तो भरून येई पर्यन्त तरी इथेच रहाव लागेल. आणि का हो ? इथे काही त्रास होतो आहे का ? का मी सारखी येते आणि बडबड करते म्हणून ते आवडत नाहीये. मी नको येऊ का ?
अहो, नाही नाही, तुम्ही आहात म्हणून तर जरा सुसह्य होतेय. नाही तर आढ्या कडे पहात वेळ घालवावा लागला असता. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. खरं तर तुम्ही डॉक्टर आहात आणि हे तुमचंच हॉस्पिटल आहे. मी असा प्रश्नच विचारायला नको होता. किती कष्ट घेता तुम्ही माझ्यासाठी, रात्री बेरात्री सुद्धा माझी तब्येत पहाण्यासाठी येता. सॉरी..
बापरे, तुमच्या सारखा कणखर इंजीनियर, ज्याने सर्व वाईट लोकांचे मनसुबे उधळून
लावले, इतका emotional होतो ! आश्चर्यच आहे.
तुम्हाला कोणी सांगितलं की कणखर माणसांना भावना नसतात म्हणून ? बरं ते जाऊ दे, एक विचारू का ?
काय ?
काल जयंत साहेब आले होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी पण होत्या. त्या तुम्हाला ताई म्हणत होत्या आणि तुम्ही जयंत साहेबांना जिजाजी म्हणालात. तुमचं काही नातं आहे का ?
हो. जयंत साहेबांची बायको माझी सक्खी बहीण.
अरे. पण ती तर तुमच्याहून लहान वाटते.
आहेच ती लहान. त्यांचं लव मॅरेज आहे. मला MD करायचं होतं म्हणून मीच
म्हंटलं की माझ्यासाठी थांबण्याची गरज नाही, मग बाबांनी तिचं लग्न लाऊन दिलं.
अस आहे होय ! कशात केलं MD तुम्ही ? म्हणजे मला त्यातलं काहीच कळत नाही. या बाबतीत आम्ही अंगठा छाप आहोत. जस्ट जनरल माहिती असावी म्हणून विचारलं.
मेडिसीन मध्ये केलं PG. आणि तुम्ही म्हणता तसं अंगठा छाप वगैरे काही नसतं. मला कुठे कळतेय metallurgy मध्ये काय असतं ते. प्रत्येकाचं आपापलं क्षेत्र असतं.
लोखंड आणि स्टील हे वेगवेगळ असतं आणि पोलाद म्हणजेच स्टील आणि स्टेनलेस स्टील वेगळं हे जिजाजीनी सांगितल्यावर कळलं. म्हणजे आपण दोघेही एकमेकांच्या क्षेत्रात अंगठा छाप आहोत. फिटटं फाट. असं म्हणून ती खळखळून हसली.
मधुकर तिच्याच कडे बघत होता. बोलतांना ती इतकी लोभस दिसत होती की तो तिच्या कडे एक टक बघतच राहिला. इतके दिवस त्याच तिच्याकडे लक्षच नव्हतं. इतर डॉक्टरांसारखीच एक अशीच त्याची नजर होती. पण आता त्याला जाणवलं की ती खूप आकर्षक आहे आणि तिचं हसणं तर.. आणि हसतांना पडणारी खळी... तो वेडावूनच गेला. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं, मेघना त्याला एकदम आवडली आणि हा साक्षात्कार त्याला आयुष्यात प्रथमच झाला. आज पर्यन्त कामापलिकडे काही जग असतं हेच त्याला माहीत नव्हतं. कधी मनात विचार पण आला नव्हता. त्यांची नजर मंत्रमुग्ध होऊन तिच्यावरच खिळली.
मेघना त्याच्याच कडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार तिला कळले आणि ती अवघडून गेली. सुखावली पण. तसंही माधुकरच्या सान्निध्यात जास्तीत जास्त कसं राहता येईल याच साठी तिचे प्रयत्न असायचे. सुरवातीला तिच्या बाबांनी तिला मधुकरला attend करायला सांगितलं तेंव्हा तिला जरा रागच आला होता. ती म्हणाली सुद्धा तिच्या बाबांना की मला तर तुम्ही नर्सच बनवून टाकल आहे. पण हळू हळू परिस्थिति वळण घेत होती आणि तिला ते वळण हवं हवस वाटत होतं. पण मधुकरकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता जेंव्हा मधुकरची अवस्था तिने पाहिली तेंव्हा ती एकदम सुखावून गेली. पण तेंव्हाच तिला कळलं की आता निघायची वेळ झाली आहे.
बरं येते मी आता. बराच उशीर झाला आहे. पेशंट ने जागरण करायचं नसतं. पुन्हा हसली आणि गुड नाइट म्हणून निघून गेली.
मधुकर वेडाच झाला. त्याच्या डोळ्या समोरून तिचा हसरा चेहरा काही जाईना. बराच वेळ तो जागा होता. तीचाच विचार करत होता. शेवटी नर्स म्हणाली सुद्धा की आज झोप येत नाही का ? त्याने मान हलवली मग तीने त्याला झोपेची गोळी दिली तेंव्हा त्याला झोप लागली.
रात्री मेघना पण बराच वेळ जागीच होती. केंव्हा तरी डोळा लागला त्यामुळे उठायला उशीरच झाला. हॉस्पिटलला पोचली तेंव्हा अकरा वाजले होते. मधुकरच्या रूम च्या बाहेरच तिला नर्स भेटली.
कसा आहे पेशंट ? मेघनाने विचारले.
काल रात्री झोपेची गोळी द्यावी लागली. साहेबांना झोपच येत नव्हती. कारण माहीत नाही. पण आज सकाळ पासून तुमच्या नावाचा घोषा लावला आहे. आता पर्यन्त 10 वेळा तरी विचारून झालं असेल डॉक्टर मेघना केंव्हा येणार ते. काय झालं मॅडम ? काही complications आहेत का ?
नाही नाही, तू जा. तुझी ड्यूटि संपली असेल न ? जा लवकर, मी बघते काय झालय ते.
ठीक आहे मॅडम.
काय म्हणताहेत मॅनेजरसाहेब ? कसं वाटतंय आता ? अरे वा चेहरा बराच टवटवीत दिसतो आहे. घरी जायचं का आज ?
घरी जायचं ? आज ? म्हणजे, मेघना पासून दूर जायचं. मधुकरचा चेहरा पडला.
काल पर्यन्त तर सारखं म्हणत होता की घरी जायचं, घरी जायचं म्हणून. मग आता काय झालं ? दवाखान्यातच बरं वाटतंय का ?
अहो डॉक्टर मेघना, तुम्हीच तर म्हणत होता की थकवा पूर्ण गेल्याशिवाय सोडणार नाही म्हणून.
पण आज fit and fine दिसताहात. काय म्हणता मग ?
आता तुम्हीच म्हणता आहात तर ठीकच असेल. माधुकरचा स्वर जड झाला होता.
पण एक गोष्ट आहे. ती ही की तुम्हाला अजून 15 -20 दिवस तरी फॅक्टरीत जाता येणार नाही, आणि घरी पण फॅक्टरीच काम करता येणार नाही. बाहेरचा डबा नाही. तुमची जेवणाची व्यवस्था इथूनच केल्या जाईल. डाएटिशयन जे लिहून देईल तेच इथून डब्यात दिलं जाईल. सकाळी 12 वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता डबा तुम्हाला मिळेल. पूर्ण आराम करायचा, याच अटीवर घरी सोडतो आहोत. एंजॉय.
घरी राहूनही फॅक्टरीच काम करायचं नाही हा कसला जुलूम ? तुम्ही संगळ्यांचीच अशी काळजी घेता का ?
नाही. बाकी पेशंट च्या घरी लोक असतात. त्यामुळे ते काळजी घेतात. तुमच्या कडे कोण आहे ?
पण आता मी माझी काळजी घेउच शकतो. तुम्हीच आता म्हणालात ना की fit and fine आहे म्हणून. आणि आता काय घरी पण सुद्धा 24 तास नर्स ठेवणार आहात की काय ?
इलाज नाही.
अहो नको नको, मला जरूर नाही. आणि वरतून हॉस्पिटल च बिल किती येईल ?
माझ्या जवळ एवढे पैसे पण नसतील. उसने घ्यावे लागतील ताई कडून.
बिलाची काळजी तुम्ही कशाला करताय ? ते जयंत देसाई बघून घेतील. त्यांनीच सांगितलं आहे की कुठलीही कसर राहता कामा नये म्हणून.
अरे देवा, आता जयंत साहेबांशीच बोलावं लागेल. तुम्ही इतकं काही करू नका मी साहेबांशी बोलेन या बाबतीत.
ठीक आहे तुम्ही बोला. त्यांनी जर सांगितलं तर आम्ही सर्व व्यवस्था काढून घेऊ. मग तर झालं. ?
मधुकरला संमती दर्शक मान हलवण्या खेरीज गत्यंतरच नव्हतं. डिस्चार्ज पेपर तयार करण्यात आले आणि मधुकरची घरी पाठवणी करण्यात आली. तो घरी पोचला तेंव्हा घर स्वच्छ करून झालं होतं. अंथरूण व्यवस्थित घालून ठेवलं होतं. पाण्याचा जग भरून ठेवला होता. बेड च्या जवळ काही मासिक, पुस्तकं पण ठेवली होती. मधुकर खुर्चीवर बसला आणि मग त्याला सोडायला जी मंडळी आली होती ती निघाली. आता मधुकर एकटाच. काय करायचं हा प्रश्नच होता. मग बेड वर झोपून थोडावेळ मासिकं चाळली आणि त्याला डुलकी लागली.
खोलीतला दिवा लागल्यामुळे त्याला जाग आली. समोरच घडयाळ होतं आठ वाजले होते. क्षणभर त्याला आपण कुठे आहोत तेच कळेना. मग आठवलं की दुपारी पांच वाजता आपण घरी आलो आहोत. डावी कडे वळून बघितलं तर मेघना दिसली. पण आत्ता तिच्या अंगावर पांढरा कोट नव्हता. लेमन कलर ची सिल्क ची साडी नेसून आली होती.
क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मेघना इथे कशी आली, का आपण अजून हॉस्पिटल मध्येच आहोत ? त्याला प्रश्न पडला.
त्याला गोंधळलेलं पाहून मेघनाच म्हणाली
मॅनेजर साहेब, तुमच्यासाठी डबा आणला आहे. जेवायचं आहे ना .
हे ऐकल्यावर तो स्प्रिंग सारखा उठून बसला. म्हणजे मेघना खरंच आली आहे तर.
डॉक्टर मेघना मला चिमटा काढा.
मी इथे डॉक्टर म्हणून आलेले नाहीये. मेघना म्हणून आली आहे. आणि चिमटा कशाला काढायचा ?
अहो तुम्ही खरंच आल्या आहात हे मला कळू तर द्या.
ओके कुठे काढू ? आणि तिने मधुकरचा कान पकडून जोरदार चिमटा काढला.
ओय,ओय मधुकर किंचाळला, मेघना नी चिमटा जरा जोरातच काढला होता.
अहो हे काय ? किती जोरात ! चिमटा काढा म्हंटल्यांवर सर्व जोर एकवटून काढला की तुम्ही . जरा हळू काढायचा.
मधुकर अजून कान चोळत होता. आणि हे बघून मेघना ला प्रचंड हसू कोसळलं.
तिला खळखळून हसतांना बघून मधुकर पूर्ण विरघळला कानाचं दुख: कुठल्या कुठे पळून गेलं आणि तो ही तिच्या बरोबर हसण्यात सामील झाला. पांच मिनिटं झाल्यावर, हसणं ओसरल्यावर मेघना म्हणाली
मोकळं वाटतंय ना आता.
मधुकरनी मान डोलावली. छान वाटतंय.
यांच्या आधी कधी असं हसला होता तुम्ही ?
असं ? इतक खळखळून ?
हो
मधुकरनी थोडा विचार केला. नाही आठवत.
म्हणजे, हसणं विसरून गेला होता की काय ?
मी हसणं विसरूनच गेलो होतो. किती तरी दिवसांनंतर अस मोकळं हसतोय.
म्हणूनच एवढे रुक्ष झाला आहात. कायम आपला गंभीर चेहरा. एखादी गोष्ट आवडली की नाही हे ही समोरच्याला कळत नाही. आणि मग चित्रात जसं दाखवतात की परमेश्वर भक्ताला हात समोर करून भक्ताला वर देतात त्या प्रमाणे पोज घेऊन म्हणाली की मॅनेजर साहेब, हसत रहा, जीवन सुखाचं होईल. आणि पुन्हा हसायला लागली. अर्थात मधुकर ला पण हसू आवरलं नाही. थोड्या वेळाने मेघना भानावर आली आणि म्हणाली
अरे आपण हसत काय बसलो आहोत, मी ज्या कामासाठी आली, ते राहूनच गेलं. तुमचं जेवण व्हायचं आहे. चला तुमचं पान घेते. आणि ती किचन मध्ये ताट आणायला गेली.
अरे ! अहो, डॉक्टर मेघना, काय करता आहात तुम्ही ? ताट वगैरे राहू द्या. मी डब्यातच जेवतो. मला त्याची सवय आहे. अहो तुम्ही हे काय करता आहात ? अरे भयी हमे शरमिंदा मत कीजिये. आणि असं म्हणत तो पण किचन मध्ये गेला.
मी इथे डॉक्टर म्हणून आलेली नाहीये. कितीदा सांगू तुम्हाला मॅनेजर साहेब ? मी तुम्हाला जेवायला घालायला आलेली आहे.
अहो पण तुम्हाला हाक मारायची तर डॉक्टर मेघना असच म्हणावं लागेल ना. तुमचं दुसरं काही टोपण नाव आहे का ?
चांगलं मेघना नाव आहे. टोपण नाव कशाला हवं ?
मग काय नुसतं मेघना म्हणू ?
करेक्ट.
अहो मेघना ताई, छे, असं म्हणायला कसं तरीच वाटतं.
मग ए मेघना म्हणा.
चालेल तुम्हाला ?
मॅनेजर साहेब, चालेल न त्यात काय ? तसेही तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात.
मधुकरच्या मनात आनंदाच कारंज. आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर मेघनाला वाचता आला.
म्हणजे मी वयाने मोठा आहे म्हणून अरे तुरे करू तुला ?
अं SS , तसंच काही नाही. पण ते जाऊ द्या हो. जेवायला चला, मला उशीर होतो आहे.
मग ते मॅनेजर साहेब वगैरे आहे, ते काय ?
मग काय म्हणू ?
मधुकर म्हण की. तुझ्याच शब्दांत सांगायचं तर फिटटं फाट.
मेघना च्या चेहऱ्यावरचा आनंद तिने मुळीच लपवला नाही. एक झकास स्माइल दिलं मधुकर कडे बघून, मधुकर घायाळ.
ओके माय डियर मधू जेवायला चल. का भरऊ तुला ? एक घास काउचा करून ?
मेघना you are marvellous. माझी हरकत नाहीये. तुला हवं असेल तर तसं कर.
बघ हं, चालेल तुला ?
I will enjoy it. एकच काय, 10 डबे संपवायला तयार आहे मी.
आणि मेघना नी खरंच चार घास त्याला भरवले. तिच्या नाजुक मुलायम बोटांचा स्पर्श त्याला स्वर्ग सुख देऊन गेला. तो जमिनीवर नव्हताच. हवेतच विहार करत होता.
जेवण झाल्यावर ती म्हणाली की बराच उशीर झाला आहे आणि तिला आता निघायला हवं.
दोघांसाठीही आता ते अवघड होतं पण इलाज नव्हता. उद्या सकाळी अकरा वाजता येते असं सांगून मेघना निघाली. आता अकरा वाजे पर्यन्त वाट पहाणं आलं. मधुकरला त्या रात्री झोप आली नाही. घरीच असल्याने झोपेच औषध पण नव्हतं. सारी रात्र तो कल्पनेच्या राज्यात रमला. मेघनाशी मनातल्या मनात गप्पा मारत होता. केंव्हा तरी पहाटे डोळा लागला.
सकाळी डोंअर बेल वाजली तेंव्हा जाग आली. घड्याळात पाहिलं तर अकरा वाजले होते. अरे बापरे, मेघना आली असेल असा विचार करून घाई घाईने दरवाजा उघडला. दारात मेघना उभी होती. प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे बघत होती. त्याचं स्वत: कडे लक्ष् गेलं सगळाच गाबाळा अवतार होता. त्याला एकदम ओशाळल्यासारख झालं. तो झटक्यात बाजूला झाला आणि म्हणाला की पटकन फ्रेश होऊन येतो आणि बाथरूम मध्ये जवळ जवळ पळालाच.
मेघनाच्या लक्षात आलच की तो रात्रभर जागा असणार म्हणून. तिला बरंच वाटलं. तिलाही आज पर्यन्त म्हणजे मधुकर भेटे पर्यन्त अभ्यासा पलीकडे पहावस वाटलच नव्हतं. तसं तिला चार पांच जणांनी propose केलं होतं पण तिने त्याकडे फारसं लक्षच दिलं नव्हतं, पण आता अचानक सर्वच बदललं होतं. आता मधुकरनी तिच्या मनातली सगळीच जागा व्यापली होती. दुसऱ्या कुठल्याही विचारांना तिथे थारा नव्हता.
अर्ध्या तासांनी मधुकर दाढी, आंघोळ वगैरे आटपून बाहेर आला. एकदम फ्रेश. थोडा पर्फ्यूम चा स्प्रे मारून, अर्थात केंव्हा तरी मित्रांनी दिलेला आणि आजपर्यन्त न वापरलेला. इतके दिवस जेंव्हा कोणी पर्फ्यूम लावलेला भेटायचं तेंव्हा हा नाक मुरडायचा. पण आज, आजचा दिवस वेगळा होता. तो बाहेर आला तेंव्हा मेघना किचन मध्ये त्याचं जेवण गरम करत होती.
अरे हे काय करते आहेस ? मला गरमाचं वेड नाहीये. राहू दे.
पण तू गरम गरम खावस अशी माझी इच्छा आहे.
ओके. आता तुझी इच्छाच आहे म्हंटल्यांवर मी काय बोलणार ? ओके बॉस.
मेघना वळली आणि त्यांच्या कडे पाहून म्हणाली,
मी म्हणते आहे म्हणून तू ओके म्हणतो आहेस ?
मग ? आपकी हर बात सर आँखों पर. जो तुम कहोगी वही हम करेंगे. फाइनल.
मेघना सुखावली. छानशी हसली. आणि मधुकर तिच्या गालावरच्या खळीतच अडकला. आणि मग ध्यानी मनी नसतांना नकळतच दोन्ही हात पसरून त्यानी मेघना ला मिठीत घेतलं. मेघनाला हे अचानकच होतं, पण तिच्या नकळतच ती त्याच्याकडे ओढली गेली आणि मग तिची ती राहिलीच नाही.
क्रमश:....
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com