मॅनेजरशीप भाग 3

कंपनी वाचवायला एक मॅनेजर किती कष्ट घेतो आणि सर्व राजकारणावर कशी मात करतो याची कथा

भाग 2 वरून पुढे वाचा ...........

संध्याकाळची वेळ होती आणि चक्रवर्ती सुशील बाबूंच्या बंगल्याच्या व्हरांड्यात उभा होत. बाबू अजून बाहेर आले नव्हते. थोड्या वेळाने ते आले. 

काय रे आज काय प्रॉब्लेम घेऊन आला आहेस ?

सुशील बाबू, ते मधुकर साहेब फार हुशार आहेत. त्यांचं तुम्हीच काही तरी करा. 

अरे काय झालं ते तरी सांगशील का ?

साहेब त्यांनी रीजेक्शन रिपोर्टस पाहिले. आणि त्यांनी मला आणि विक्रम ला दोघांना एका नवीन डिपार्टमेंट ला ट्रान्सफर केलंय. जनरल शिफ्ट मध्ये बोलावलय आणि रीजेक्शन चे गेल्या वर्षभरातले रिपोर्टस काढायला सांगितलय आम्हा दोघांचा आता कंट्रोल सुटत चाललाय. बाबू आजकाल आमचं कोणी ऐकत नाही. सगळे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे काम करतात. आता काय करायचं ते तुम्हीच बघा. तुम्ही जे प्लॅनिंग दिलं होतं त्या प्रमाणे आता काहीच करता येण शक्य नाही. आम्ही जो पर्यन्त जनरल शिफ्ट मध्ये आहोत तो पर्यन्त काहीच नाही. 

हूं ! इतकं सगळं झालंय ? या मधुकर साहेबांची कुंडली पहावी लागणार अस 

दिसतंय. 

आणि सुशील बाबू 

आता अजून काही आहे ?

G.M. साहेब आणि सातपुते साहेबांची मीटिंग झाली. त्यांच्या नंतर वेणू गोपाळ साहेब पण आले होते. आणि नंतर फिरके साहेब आणि GM साहेबांची पण मीटिंग झाली. 

फिरके कशाला आले होते ? मीटिंग मध्ये काय झालं ?

ते माहीत नाही. प्रयत्न केला पण ऐकू नाही आलं. 

हूं सुशील बाबू संतापले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरूनच तसं दिसत होतं. प्रकरण गंभीर होत चाललं होतं. कुठेतरी आळा घालणं जरुरीचं झालं होतं. त्यांनी चक्रवर्तीला जायला सांगितलं. 

.

हॅलो सातपुते मी सुशील अग्रवाल बोलतो आहे. 

अरे ! बोला साहेब इतक्या उशिरा फोन केलात ? काही अर्जंट आहे का ?

नाही नाही, सहजच. मला बरेच दिवसांत फॅक्टरीत यायला जमलं नाही म्हणून हाल हवाल जाणून घेण्यासाठी फोन केला. कस काय चाललंय ?

एकदम छान चाललंय सुशील बाबू. नवीन साहेब आलेत त्यांच्या सुचने नुसारच चालू आहे. आता रीजेक्शन लेवल खूप कमी झाली आहे. 

अरे वा हे ऐकून फार बर वाटलं, म्हणजे आमचा निर्णय बरोबरच होता. उत्तम.  

बर हे साहेब मिटिंगा वगैरे घेतात की नाही. 

घेतात न साहेब, आजचा दिवस भर मिटिंगाच चालू होत्या. 

असं काय झालं आज मीटिंग मध्ये ? अजेंडा काय होता ?

खास अस काही नाही त्यांना आमच्या डिपार्टमेंट बद्दल डीटेल मध्ये माहिती हवी होती. ती दिली. त्यांनी नंतर काही सूचना पण केल्या. 

काही खास विषयावर चर्चा झाली ?

नाही साहेब खास अस काही नाही. 

ठीक आहे आता यापुढे एक गोष्ट करा मोठ्या साहेबांबरोबर मीटिंग झाली की मिनिट्स ऑफ दी मीटिंग बनवत चला आणि मला पाठवत चला. इतर कोणाला कॉपी पाठवायची गरज नाही. कळलं ?

हो साहेब. 

त्यानंतर वेणु गोपाल आणि फिरके दोघांना पण सुशील बाबूंनी फोन केलेत. त्यांची पण अशीच उत्तरं आलीत की डिपार्टमेंट च कामकाज कसं चालतं याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी मीटिंग झाली म्हणून. Nothing special.

त्यांना पण सुशील बाबूंनी मिनिट्स बनवून पाठवायला सांगितलं. 

एवढ झाल्यावर सुशील बाबू खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा आक्रसला होता. नवीन माणूस त्यांच्या मुळावर उठला होता. त्याला कसही करून एक तर थांबवलं पाहिजे, आपल्या बाजूने वळवलं पाहिजे किंवा घालवलं पाहिजे. पण कसं ? बराच विचार केल्यावर त्यांनी आपल्या डायरीत एक फोन नंबर शोधला आणि फोन लावला. 

हॅलो वकील साहेब, मी सुशील अग्रवाल बोलतो आहे. 

***

या वेळी कोण असाव असा विचार करतच मधुकरने फोन उचलला. 

हॅलो 

हॅलो मी सातपुते बोलतो आहे. 

सातपुते ह्या वेळी ? Anything serious?

नाही साहेब जरा भेटायचं होतं. 

उद्या ऑफिस मध्ये सकाळी बोलूया ? If the matter can wait of course.

साहेब आत्ता बिझी आहात का ? थोडा वेळ पण काढता येणार नाही का ?

नाही बिझी नाहीये. या तुम्ही. 

अर्ध्या तासाने सातपुते पोचले.

या सातपुते बसा. काय विशेष काम काढलंय ?

साहेब खरं सांगायचं तर काम अस काहीच नाहीये पण तसं पाहिलं तर खूप काही आहे. तुम्हाला थोडा वेळ आहे न ? कारण आज जर आपण बोललो नाही तर कदाचित नंतर बोलायला जमणार नाही. 

सातपुते सध्या तुमच्याशी बोलण्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच काम नाहीये तेंव्हा तुम्ही जे मनात असेल ते बोला.

साहेब, आज संध्याकाळी सुशील बाबूंचा फोन आला होता. आणि आपल्या मीटिंग मध्ये काय झालं हे विचारत होते. मी त्यांना सांगितलं की डिपार्टमेंट कसं चालतं यांची माहिती साहेब घेत होते बाकी विशेष काही नाही म्हणून.

अरे! अस का ? डायरेक्टर आहेत ते आणि आपण अस काय खासगी बोलत होतो की जे त्यांना सांगायचं नाही. 

नाही साहेब ते इतकं साध सरळ नाही आहे. तुम्ही रिजेक्शन अनॅलिसिस करायला घेतलं आहे हे त्यांना कळलंच असेल आत्तापर्यंत. आणि असाच फोन वेणुगोपाळ आणि फिरके साहेबांना पण आला होता. संध्याकाळी आम्ही तिघे बोलत असतांना हे समजलं. म्हणून अस ठरलं की तुमच्या कानावर घालावं.

सातपुते मला अजून कळत नाहीये की यामध्ये इतक्या तातडीने आणि ते ही घरी येऊन सांगण्या सारखं काय आहे ? आपल्या जनरल मिटिंग्स होत्या आणि डायरेक्टर म्हणून त्यात काय झालं ते जाणून घेण्याचा त्यांनी विचार केला तर त्यात वावगं काय आहे ?

साहेब rejections च्या मुळाशी जाण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करता आहात हे आता सर्वांनाच कळलं आहे. आणि लोक त्यावरून खुश आहेत. काय आहे साहेब, जवळ जवळ संगळ्यांचीच खात्री आहे की हे rejections होत नाहीयेत, तर केल्या जाताहेत. पण कोणी बोलायला धजत नाही, कारण नोकरी जाण्याची भीती. देसाई साहेब आणि पटेल साहेबांच्या पण हे लक्षात आलं आहे आणि म्हणूनच त्यांनी जनरल मॅनेजर च्या पोस्ट वर तुमची नेमणूक केली. साहेब foundry community मध्ये तुमचं फार नाव आहे म्हणून साहेब लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सर्व streamline कराल अशी आशा त्यांना आहे. साहेब तुम्ही आता जे काही कराल त्यात आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. 

आधीचे जे G M होते, पात्रीकर साहेबच होते न, ते का सोडून गेलेत ?

ते खूप चांगले होते साहेब, प्रेमळ होते. स्वच्छ चारित्र्यांचा आणि technically very sound माणूस होता पण fighter instinct नव्हतं म्हणून जेंव्हा सुशील साहेबांनी खूप त्रास दिला तेंव्हा कंटाळून निघून गेले. नेमकं माहीत नाही पण त्यांना कौटुंबिक अडचणी बऱ्याच होत्या. आणि कौटुंबिक अडचणी आपल्याबरोबर आर्थिक अडचणी पण घेऊन येतात. सुशील बाबूंशी मिळतं घेतलं असतं तर त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता पण कामात तडजोड करण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता म्हणून ते सोडून गेलेत. देसाई साहेबांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना चांगली नोकरी मिळाली होती , ते चालले गेले.

बराच वेळ कोणीच बोललं नाही. 

बरं मी निघतो साहेब. 

अरे थांबा. मी कॉफी करतो ती घेऊन जा. इतका वेळ बोलण्याच्या भरात हे लक्षातच आलं नाही. बसा पांच मिनिटं.

कॉफी पिता पिता मधुकर बोलला 

जयंत साहेब आणि किरीट साहेबांची काय भूमिका आहे ?

साहेब ते दोघंही २३ - २४ वर्षांचे आहेत. एकदम सुशील साहेबांशी टक्कर घेऊ शकत नाहीत म्हणूनच तर तुम्हाला इथे आणलं त्यांनी. गेली चार महीने ते वाटच पाहत होते की तुमची पुढची स्टेप काय असेल ते. गेला महिना भर तुम्ही जे reforms करायला घेतले आहेत त्याचं, आम्हाला माफ करा साहेब, पण आम्ही रोजच्या रोज दोघांनाही रिपोर्टिंग करायचो त्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला आहे. ते दोघंही तुमच्या पाठीशी उभे आहेत साहेब. चिंता करू नका. 

तुमचे मालक लोकांशी बरेच घनिष्ट संबंध दिसताहेत.

आम्ही सगळे म्हणजे मी, वेणु गोपाळ, फिरके मोठ्या साहेबांच्या वेळेपासून आहोत. आम्ही बघत होतो की वातावरण झपाट्याने बदलत होतं. पात्रीकर साहेब होते तो पर्यन्त जरा तरी वचक होता पण ते गेल्यावर तर मोकळं रानच मिळालं. अश्या बदलत्या परिस्थितीत आम्ही ठरवलं की कितीही त्रास झाला तरी सोडून जायचं नाही. जयंत आणि किरीट साहेबांना सपोर्ट म्हणून इथेच राहायचं. आणि दोघाही साहेबांना त्यांची जाण आहे साहेब. ते आमचा खूप मान ठेवतात. तुमची नेमणूक झाल्यावर त्यांनीच आम्हाला बोलाऊन सांगितलं की चित्र बदलायचं असेल तर तुम्हाला फूल सपोर्ट करा. आता बाकी सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे साहेब.

***

दुसऱ्या दिवशी मधुकर जरा लवकरच फॅक्टरी मध्ये पोचला. आदल्या रात्री सातपुते जे काही सांगत होते त्यावरच डोक्यात विचार चालू होते. कार मधून उतरता उतरताच त्यांच्या लक्षात आलं की ट्रक लोडिंग चालू आहे. माधुकरला आश्चर्य वाटलं. आज तर कुठलेच dispatches नव्हते. असते तर त्याला माहीत असायला हव होतं. काय प्रकार आहे ते बघायला तो ट्रक पाशी गेला. तिथे स्टोर ऑफिसर बर्डे उभे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली लोडिंग चालू होतं.

काय बर्डे कोणाच मटेरियल पाठवता आहात ?

साहेब मटेरियल नाहीये. स्क्रॅप पाठवतो आहे. 

एकदम अचानक ?

नाही साहेब दर चार पांच महिन्यांनी पाठवतो साहेब. 

बोलता बोलता मधुकर ट्रक च्या पाठीमागे गेला आणि काय काय स्क्रॅप आहे हे 

बघायला लागला. ट्रक मध्ये खाली बरेचसे इनगॉट होते आणि त्यावर हॉट चॉक ने नंबर पण टाकले होते. त्यांच्या वरती बरीचशी कास्टिंगस पण लोड झाली होती. हे तसं बरोबरच होतं कारण फौंडरी मध्ये अजून काय असणार ? पण मधुकरला जी गोष्ट खटकली ती ही की त्याला या बद्दल काहीच सांगण्यात आलं नव्हतं. 

हे स्क्रॅप disposal कोण अप्रूव करतं ? सातपुते ? का वेणुगोपाल ?

नाही साहेब सातपुते साहेब जे जे मटेरियल रीजेक्ट करतात, ते आम्ही बाजूला ठेवतो. जागा भरत आली की विकायला काढतो. 

ओके. हरकत नाही, आता एक काम करा, हे मटेरियल खाली उतरवा आणि ट्रकला सोडून द्या. 

साहेब, त्याचं भाडं ?

देऊन टाका. 

साहेब, मग हे केंव्हा पाठवायचं ?

ते बघू नंतर, आधी मला सातपुते साहेबां बरोबर मटेरियल चेक करू द्या. 

साहेब excise invoice पण बनला आहे. 

Cancel करा.

साहेब excise invoice मध्ये खाडा खोड केलेली सुशील बाबुना चालत नाही. माझी शाळा घेतील ते. 

ते मी बघेन . तुम्ही काळजी करू नका माझं नाव सांगा आणि मोकळे व्हा.

साहेब सुशीलबाबूंचा राग फार भयंकर असतो. तुम्हाला त्रास होईल. बर्डे साहेब जे करताहेत ते त्यांना करू द्या. कितीतरी वर्षं ते, हे काम करताहेत. चक्रवर्ती तिथे आला होता आणि तो मध्येच बोलला. 

माधुकरने चक्रवर्तिकडे लक्षच दिलं नाही. म्हणाला बर्डे जे सांगितलं ते करा. लगेच. वेळ न घालवता. आणि तो ऑफिस कडे चालायला लागला. ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांनी गेट वर फोन केला आणि सांगितलं की जे ट्रक उभे आहेत ते रिकामेच गेले पाहिजेत. त्यात जर माल असेल तर जावू देऊ नका आणि मला तबडतोब फोन करा.

अर्धा तास झाला गेट वरुन काहीच फोन आला नाही तेंव्हा त्यांनीच गेटला फोन 

लावला, तेंव्हा कळलं की ट्रक मध्ये सामान भरणं चालूच आहे. माधुकरने जरा विचार केला आणि किरीट साहेबांना फोन लावला. 

हॅलो सर, मी मधुकर सरनाईक बोलतो आहे. I am sorry to disturb you, but I would like to share some information with you and seek your advice.

Go ahead

आज सकाळी मी फॅक्टरीत आलो तेंव्हा स्टोर ऑफिसर काही ट्रक भरून स्क्रॅप पाठवत असतांना बघितलं, मला आश्चर्य वाटलं की मला माहिती न देता फॅक्टरीतून माल बाहेर कसा जातो आहे म्हणून मी ट्रक चेक केले तेंव्हा अस दिसलं की जे मटेरियल high molybdenum आणि high tungsten मुळे reject झाले आहेत तेच पाठवले जात आहेत. सर हे दोन्ही मटेरियल अतिशय कॉस्टली आहेत आणि मुळात त्यांचं प्रमाणा बाहेर अॅडिशन कसं झालं त्यांची चौकशी सुरू आहे. आणि पुनः हे स्क्रॅप नॉर्मल स्टील स्क्रॅप च्या भावात चाललं आहे म्हणून मी ते रोकायला सांगितलं. पण स्टोअर ऑफिसर बर्डे ऐकायला तयार नाही आणि चक्रवर्ती त्याला धमकावतो आहे की सुशील बाबूंना सांगून नोकरीवरून काढून टाकेन म्हणून. मी दोघांचही suspension लेटर तयार केलं आहे. फक्त तुमची परवानगी पाहिजे. Trucks ताबडतोब थांबावायला हवेत. 

तुम्ही जे करता आहात ते बरोबर आहे अशी तुमची खात्री असेल तर go ahead with your planning. Don’t get scared of anybody. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की If required, you will have to justify your actions. Only thing is that, just ensure that whatever you do is in the interest of company. You have my support.

हे ऐकल्यावर माधुकरला समाधान वाटलं. मग त्याने क्लर्क ला बरड्यांच सस्पेंशन लेटर टाइप करायला सांगितलं. लेट्टर झाल्यावर त्यांनी बरड्यांना बोलावणं पाठवलं. 

बर्डे ट्रक अजूनही इथेच का उभे आहेत ?

साहेब, चक्रवर्ती म्हणाला की माल पाठवला नाही तर तोच सुशील बाबूंना फोन 

करेल मग माझी नोकरी जाईल साहेब. 

बसा पांच मिनिटं. 

क्लर्क ला पुन्हा बोलावलं आणि चक्रवरतीचं लेटर पण टाइप करायला सांगितलं. 

चक्रवर्तीला बोलावणं पाठवल. तो आल्यावर दोघांच्याही हातात पत्र ठेवली आणि वॉचमनला बोलावून सांगितलं की यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. दोघांनाही सस्पेंड केलं आहे. त्यांना त्यांच्या जागेवर सुद्धा जावू देऊ नका. जे काही सामान हव असेल ते तुम्ही जावून आणून द्या. आणि मग मधुकर बाहेर पडला. स्वत: जाऊन त्यांनी ट्रक मधून माल उतरवायला लावला. शिंदे सुपरवायझर ला बोलावून त्याला ट्रक रिकामे करायला सांगितले. सातपुते साहेबांना बोलाऊन नीट वर्गवारी करून ठेवायला सांगितल. आणि सगळं झाल्यावर केबिन मध्ये यायला सांगितलं , मग तो ऑफिस मध्ये जाऊन बसला. 

क्रमश:.....

🎭 Series Post

View all