Jan 19, 2022
नारीवादी

मनाच्या तळाशी

Read Later
मनाच्या तळाशी

"सख्यांनो, आज दुपारी ४ वाजता माझ्याकडे भिशी आहे,लक्षात आहे ना? येताय ना सगळ्या?? मी वाट बघते." असा मेसेज ग्रुप वर टाकला आणि मी तयारीला लागले. आम्ही १० जणी आहोत भिशी मध्ये. शाळेतल्या मैत्रिणी, लहानपणी एकाच शाळेत होतो, सध्या एका शहरात राहतो त्यामुळे भिशीचे फक्त निम्मित भेटण्याचे. शाळा संपुन जवळ जवळ २० वर्ष होतील आता, पण आम्ही मैत्री जपली आहे.

दुपारी ४ चे सुमारास एक एक जणी यायला लागल्या.

रश्मी ने मला विचारलं "आज काय थीम ठेवली आहेस तू?"

मी:"थांब सांगते, सगळ्याजणी येऊ तरी दे आधी."

आम्ही मैत्रिणी भेटलो ,की एक थीम ( विषय) ठरवतो, कधी कोणी वाचलेल्या पुस्तका बद्दल सांगते, तर कधी एखादी मैत्रीण छान पाककृती शिकवते. मागच्या महिन्यात भेटलो तेव्हा नेहा ने सगळ्यांना वॉटर कलर चे पेंटिंग शिकवले. खूप मज्जा आली. कित्येक जन्निनी शाळेनंतर प्रथमच ड्रॉइंग पेंटिंग केले.

आज, मी थीम ठरवली होती "आठवणीतले बालपण".काही गमती-जमती सांगायच्या, काही गुपित मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेली, आज सगळ्या मैत्रिणींनी एकमेकीना सांगायची. जुन्या आंबट गोड आठवणींना उजाळा म्हणून ही थीम मी निवडली.

सगळ्या मैत्रिणी जमल्या.समोसे, बटाटे वडे,चहा असा फक्कड बेत होता.खाऊन पिऊन पोट शांत झाल्यावर तोंड मात्र आता जोमात होती .

कविता म्हणाली,आजच्या थीम ची सुरुवात मी करते.गप्पा रंगू लागल्या.कविता नंतर अर्चना, सुवर्णा, सुनीता ह्यांनी ही लहानपणीच्या मजेदार गोष्टी,केलेल्या खोड्या, गमती ,खाल्लेला मार सगळे सांगितलं .खाऊन पिऊन भरलेलं पोट आता हसून हसून दुखू लागले.

प्रीती मात्र जरा शांत वाटली, तोंड देखल हसत होती.तिच्या मनात कसला तरी गोंधळ सुरू होता असं वाटलं!"काय ग काय झालं ?" नेहा ने विचारल!

"गोड, गमतीशीर आठवणी आहेतच पण माझ्या लहानपणी चा एक कटु प्रसंग त्या छान गोड आठवणीन वर मात करत आहे" प्रितीच्या आवाजातल गंभीर सूर सगळ्यांना जाणवत होता.

"मी शाळेत असताना पोहायला जायचे, मला खूप आवडायच पोहायला, मामाच्या गावाला विहिरीत उडी मारून शिकले पोहायला, म्हणून बाबांनी मला इथे, आपल्या शहरात एका तलावात जायची परवानगी दिली. खूप आवडीने मी नियमित पोहायला जायचे. पण एक दिवस जेव्हा तिथल्या सरांनी मला बोलवून सांगितलं," तू चांगली पोहतेस पण तुझं शरीर स्थूल आहे, जरा वजन कमी कर.तुझ पोट आणि छाती एकच वाटतंय" अस म्हणत त्यांनी माझ्या छातीवरून पोटाकडे त्यांचा हाथ फिवरला. तो दिवस, ती आठवण माझ्या मनातून वजा होत नाही. मी पुन्हा कधी पोहायला गेले नाही. त्याच काय कुठल्याच जलतरणवर मी जाण्यास नकार दिला.घरच्यांना खरं कारण मी आजवर नाही सांगू शकले." हे सांगताना प्रितीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या!

"माझा हि लहानपणीचा असाच  एक अनुभव आहे, जो मी ही आजवर कोणाला बोलले नाही." सगळ्यांच्या नजरा रोहिणीकडे वळल्या.

"माझ्या लहानपणी आम्ही वाड्यात रहात होतो. तेव्हा कसं असायचं सगळा वाडा एक मोठं कुटुंबच होतं.एकत्र मिळून मिसळून सगळें राहायचे.शेजारचे म्हणजे अपले मानलेले नातेवाईक. कुणी  काका , मामा , मावशी, आत्या असायचे. २ घर सोडून आईची खास मैत्रीण राहायची. मावशी कधी माहेरी किंवा गावाला गेली तर काकांना, म्हणजे तिच्या नवऱ्याला आमच्या कडून जेवणाच ताट जात असे.हे ताट न्हेऊन द्यायचे काम मी किंवा पिंट्या माझा धाकटा भाऊ करत असे."

"मी ताट घेऊन गेले की काका, माझ्या हाताला हात घासून, ते ताट हातात घेत. हे काय असलं, मला काहीं कळेना! मी लहान होते, चवथी पाचवीत असेन.एकदा मला त्यांनी घरी बोलावल मावशी गावाहून खाऊ घेऊन आली होती, तो द्यायला. मी ही उड्या मारत गेले खाऊ खायला. मला त्यांच्या मांडीत बसवले आणि मी हाताने खाऊ भरवणार असे म्हणत त्यांनी मला जवळ ओढल. मला काहीं कळायच्या, सुचायच्या आत मी त्यांच्या मांडीत बसले.५-७ मिनिटांनी मला काहीतरी विचित्र वाटू लागले. कसली तरी जाणीव होऊ लागली काय ते कळण्याचे वयच नव्हतं.माझ्या मांडीवर त्यांचा एक हाथ आणि दुसऱ्या हाताने ते मला भरवत होते"

मोठं झाल्यावर कळलं आपल्या बरोबर जे झालं ते काय होत!! आईला तेव्हा काय, नी कसं  सांगावं हे आजवर मला समजलं नाही!! हे सांगताना रोहिणी चां कंठ दाटून आला!

भिशी मध्ये मी ठेवलेली ही थीम,बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन, पुन्हा त्यात रमून,ते बालपण जगता याव म्हणून मी ही थीम ठरवली. पण प्रीती आणि रोहिणीच्या ह्या कटू आठवणी ज्या मनाच्या कोपऱ्यात खोल गाडल्या गेल्या होत्या ,आज त्यांना आपल्या सख्यांना सांगाव्याश्या वाटल्या, मन मोकळं करावसं वाटलं!

कुठे तरी मनात साचलेले हे मळप मोकळं आणि स्वच्छ होण्याची गरज होती! आज ती वेळ आली, आपल्या मैत्रिणी ज्या  सम वयस्कर होत्या त्या नक्की समजू शकतील आपली व्यथा. हा त्यांना विश्वास होता आणि म्हणून त्यांना मन आज मोकळं  करता आल!

मी रोहिनीला पाणी दिले, तिला घट्ट मिठी मारत पाठीवरून मायेचा हात फिरवत तिला शांत केलं.

तेव्हढ्यात प्रज्ञाचा मोबाईल वाजला.तिच्या घरून फोन आला होता." ६.३० वाजले कधी येतेस घरी ? " पलीकडून विचारण्यात आले. "उशीर होईल थोडा" प्रज्ञा ने सांगून मोबाईल कट केला! प्रज्ञाला ही काहीं सांगायचे होते.

" मी लहान असताना मला गणपती आले की त्याचीं सुंदर, मोहक आरास पाहायला जाण्यात खूप मज्जा वाटायची. दर वर्षी बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे " आम्ही रात्र भर फिरायचो, गणपती बाप्पा ला जवळून पाहता यायचं, गोड प्रसाद खायला मिळायचे, आणि दमलो की पाऊल घरा कडे परतायची."

"एक वर्ष असच आम्ही गेलो होतो, खूप गर्दी असायची, मोठ्या रांगा लावून लोक उभी असत, बाप्पा च दर्शन घेण्यासाठी. मी ही अशीच एकदा रांगेत उभी असताना मागचा माणूस माझ्या जरा जास्तच जवळ येऊन उभा असल्याची जाणीव होताच मी पुढे  सरकले. पण पुनः काही वेळाने तो मला विचित्र स्पर्श करतोय हे जाणवल आणि मी माझ्या हाताच्या कोपर्याने त्याला मागे  रेटल"!

ते वर्ष झालं आणि मी पुन्हा कधी त्या घाणेरड्या गर्दीत गेले नाही. बाबा ना सांगितलं, बास खूप पाहिले गणपती. आता नहीं जायचं मला."हे  सांगताना  प्रज्ञाच्या डोळ्यात "त्या" व्यक्ती विषयी प्रचंड चीड आणि तिरस्कार  स्पष्ट दिसत होता.

आम्ही सगळ्याजणी वर वर  शांत दिसत होतो, पण प्रत्येकीच्या मनात मात्र राग, चीड , भीती अश्या अनेक भावनांचा सागर उसळत होता!पुढच्या भिशी ची तारीख ठरली,आणि सगळ्यांनी निरोप घेलात. आज भिशी मध्ये, हा बालपणीच्या आठवणी विषय अश्या पद्धतीन होईल ह्याची पुसटशी  कल्पना देखील मी केली नव्हती.

रात्रीं जेवण झाल्यावर नवऱ्या ने  चौकशी केली, "काय म आज मैत्रिणी भेटल्या, खुश का? कशी झाली भिशी? काय नवीन केलंत आज ? "

"आज का...आज मनातल्या आभाळात दडलेले ते काळे ढग गडगडून बरसले....शब्दं आणि अश्रू रुपात! "

" म्हणजे?" त्याने विचारलं...

मी भिशित घडलेला सगळा प्रकार सांगितला.

"आपण आपल्या मुलांना नेहेमी शिकवत असतो स्वतःला सांभाळा, बाहेर लोकं कशी असतील माहित नाही. चांगल्या  वाईट स्पर्शा बद्दल सांगतो. कारण सध्या ,आपण सारखं ऐकतच असतो, वाचत असतो लहान मुलांचे बाबतीत घडणारे विचित्र,विकृत  प्रकार. मला आठवत नाही आमच्या लहान पणी हे सगळं आम्हाला आमच्या आई बाबांनी असे काही सांगितलेलं ते "Good touch bad touch " !!

तेव्हा काळच असा होता, की हे मुलाना सांगायची गरज वाटली नसेल. आता मुला ३/४ वर्षांची झाली की आधी त्यांना शिकवण दिली जाते. स्पर्श ओळखा, स्वतः ला जपा. काही वेगळं वाटलं किंवा तुमच्या बरोबर काही घडलं बाहेर तर मनमोकळे पणाने घरी आई बाबांना सांगा.

"शोषण, तेव्हा पूर्वी देखील होतच असे.आज माझ्या वयाच्या, माझ्या मैत्रिणी जेव्हा सांगत होत्या त्यांचे अनुभव तेव्हा जाणवलं, बाल शोषणला बळी पडलेल्या कित्येक मुला/मुलींवर त्या वाईट प्रसंगांची सावली ही "बालपणीची कटु आठवण"  मनाच्या तळाशी कुलूप बंद करून ठेवण्यात आली आहे."

"आमच्या ग्रुप मधल्या ३-४ जणी ने आपले हे अनुभव सांगितले.  ती "मी टु " मोहीम सुरू झाल्यामुुळे हा विषय बोलला जातोय. नाही तर अश्या कित्ये मी टू, थ्री,फोर.... अगणित .... काय माहित कितीजणं असतील ज्याांना आपलं हे दुःख आज ही व्यक्त करता आलं नसेल! अल्लड वयात तो शरीराला झालेला स्पर्श वरवरचा आणि तात्पुरता असला तरी त्यामुळे मनावर झालेला आघात मात्र खोल आणि कायम स्वरुपी आहे!

© तेजल मनिष ताम्हणे

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Tejal Manish Tamhane

Home maker and Private Tutor.

Fun loving , Happy go Lucky person. Likes to write short stories and poems. Best friend of my daughters and a caring person at heart.