मनाची खंत

Nokari Karnarya Sunechi Gosht


"आई, तू कुठे चाललीस?" देवांश अनुराधा भोवती घुटमळत होता.

"देवू, मी मीटिंगला चालले. दोन दिवसांनी येईन. तोपर्यंत आजीला त्रास द्यायचा नाही. अगदी शहाण्या सारखं वागायचं. कळलं?" अनुराधा आपली बॅग भरत देवांशला म्हणाली.

"हे काय? आता तू कुठे चाललीस?" सरलाताई खोलीत येत म्हणाल्या.

"आई, मीटिंग आहे उद्या आणि हे दुपारी ठरलं. आता जावं तर लागेल. मी शकू मावशींना दोन दिवस स्वयंपाक करायला सांगून जाईन. तुम्ही उगीच दमत बसू नका. आधीच देवू हट्टी आहे. पण माझ्यापेक्षा तुमचं ऐकतो तो सगळं. फक्त त्याच्याकडे लक्ष द्या." अनुराधा एका दमात सगळं बोलून गेली.
हे ऐकून सरलाताईंनी फक्त मान डोलावली.

"आई, मी निघते. उशीर होतो आहे. अक्षयला फोन करेन मी. तो उद्या संध्याकाळी येईल घरी. तोपर्यंत वाटलं तर सोबतीला ताईंना बोलावून घ्या." अनुराधा भराभरा गेटमधून बाहेर पडली.

"अगं, थोडं खाऊन तर जा." सरलाताईंचे शब्द हवेतच विरले.

"काय म्हणावं या पोरीला? जेव्हा पाहावं तेव्हा ऑफिसच्या कामात दंग. घरात आपलं सात वर्षाचं लेकरू आहे, नवरा आहे. त्यांना वेळ द्यायचा सोडून ही नसती उठाठेव हवीच कशाला? या वयात लेकराला आईची गरज असते. हेही कळू नये एका आईला? माझंच चुकलं म्हणायचं, मीच तिच्या मागे लागून नोकरी धरायला लावली." सरलाताई स्वतःशी बडबडत अंगणात फेऱ्या मारू लागल्या.

इतक्यात गेटचा आवाज आला. तसा सरलाताईंनी आपल्या डोळ्यावर चष्मा चढवला.
"अरे, अक्षय तू? उद्या यायचा होतास ना?"

"हो आई. उद्याची मीटिंग कॅन्सल झाली. मग म्हंटल आधी घर गाठावं. खच्चून चार तासांचा प्रवास. लगेच निघालो तिथून." अक्षय आत येत म्हणाला.

"अनु, चहा ठेव गं." अक्षय आपल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी गेला.

इकडे सरला ताईंनी दोन कप चहा बनवला आणि त्या डायनिंग टेबलवर बसून अक्षयची वाट पाहू लागल्या.

"अनु कुठे गेली? पुन्हा मीटिंग? हो ना? आई, मी दोन दिवस मस्त सुट्टी टाकली आहे. म्हंटल जरा आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवू. तर या मॅडम लगेच पळाल्या मीटिंगला." अक्षय नाराज होत म्हणाला.

"तू विषय काढलाच आहेस तर एक बोलू अक्षय?" सरलाताई.

"आई, परवानगी कसली मागतेस? बिनधास्त बोल." अक्षय.

"तुमचं लग्न झालं तेव्हा अनु इतकी करियर ओरिअंटेड नव्हती. मीच मागे लागून तिला नोकरी धरायला लावली. पुढे ती नोकरीत रमत गेली, तसं यश तिच्या पदरात पडत गेलं आणि तेच तिचं जग बनलं. सतत काम आणि काम. काय त्या लांबलचक मीटिंग्ज, प्रेझेंटेशंस, कॉल्स, वेळी अवेळी येणं- जाणं, खाणं..
माणसाने काम करावं, मात्र स्वतःची तहान भूक विसरू नये रे. मान्य आहे आजकाल पैसा भरपूर मिळतो. अर्थात कामही कष्टाचं असतं. पण कितीही नोकरी केली तरी घरच्या बाईला आपल्या माणसांना वेळ हा द्यावा लागतो. मीही नोकरी करत होते. घरचं सगळं सांभाळून काम करत होते. पण घरी वेळ देता येत नाही, ही खंत कुठेतरी मनात राहतेच. तुम्हा मुलांना आम्ही आमचा संपूर्ण वेळ नाही देऊ शकलो. पण आता वाटते आपल्या देवांशच्या बाबतीत तसे व्हायला नको." सरलाताई.

"आई, प्रमोशन मिळाल्यानंतर अनुचे काम जास्त वाढले. त्याआधी सारे व्यवस्थित होते आणि तूच तर तिच्या मागे लागली होतीस, नोकरी कर म्हणून! आता तूच तक्रार करते आहेस?" अक्षय.

"अक्षय, मी तक्रार करत नाही. पण हे प्रमोशन नाकारलं असतं, तर काही अडलं नसतं. आज तुझ्या मुलाला आईची गरज आहे. रोज ते लहान लेकरू आई ,आई करत कुशीत झोपून जातं रे. त्याला समजवताना नाकी नऊ येतात." सरलाताई.

लग्नानंतर अनुराधा घरातच रमली. स्वखुशीने घरचा सगळा कारभार तिने हातात घेतला. मात्र सरलाताई सुनेने नोकरी करावी म्हणून अक्षयच्या मागे लागल्या.
"घरचं पाहायला मी अजून समर्थ आहे. घरी बसून काय करेल ती? आणि इतके शिकून काय फायदा? मी पस्तीस वर्षे नोकरी केली. तशीच तिलाही नोकरी करू दे."

"आई, नोकरीत माझे मन रमत नाही आणि केवळ पैसा मिळावा म्हणून मी मनाविरुद्ध काम करू शकत नाही. मला घर सांभाळायला खूप आवडतं. तेच करेन मी." अनुराधाने स्पष्ट केले.
पण सरलाताई आपला हट्ट सोडायला तयार होईनात.

अखेर अक्षय अनुला म्हणाला, "बाळ होईपर्यंत नोकरी कर. मग पुढचे पुढे पाहू." त्याच्या ओळखीने अनुला नोकरी मिळाली.
हळूहळू अनु कामात रुळली आणि तिच्या कष्टाचे फळ पदरात पडत गेले. तिच्या ऑफिसमधले सहकारी चांगले होते. कामाच्या जोरावर लवकरच अनुला मोठी पोस्ट मिळाली. यामुळे आत्तापर्यंत नोकरी करण्याचा विचारही मनात न आणणाऱ्या अनुला आपल्या सुप्त गुणांचा जणू शोधच लागला. यश तिचा पाठलाग करत आले.

सरलाताई खूप खुश झाल्या. अनुच्या यशाचे श्रेय त्यांनी स्वतःला दिले. "सासू असावी तर अशी!" नातेवाईकांनीही सरलाताईंचे कौतुक केले.

त्यानंतर अनुने मागे वळून पाहिले नाही. त्यातच देवांशाचा जन्म झाला. पुरे नऊ महिने अनु काम करत होती. डिलिव्हरीनंतर मात्र तिने सहा महिने सुट्टी घेतली. सहा महिन्यानंतर घर कामाला मावशी लावून अनुने पुन्हा नोकरी करायला सुरुवात केली.
सरलाताई मागच्या आठवणीतून बाहेर आल्या.

"बाबा..आपण दुसरी आई आणू. ही आई मला अजिबात वेळ देत नाही. बघ ना, सारखी कामाला जाते. माझे सगळे मित्र -मैत्रिणी आईबरोबर शाळेत येतात आणि जातात. पण आई मला शाळेत सोडायलाही येत नाही आणि आणायला सुद्धा येत नाही. माझा अभ्यासही घेत नाही ती." देवांश अक्षयच्या मांडीवर बसून तक्रारीच्या सुरात बोलत होता.

"देवू, आई ही एकच असते. अशी दुसरी आई नाही आणता येत आणि तुझी आई माझ्यासारखेच बाहेर जाऊन काम करते. तिला वेळ नसतो कारण तिला खूप काम असतं. विचार तुझ्या आजीला, तीही आईसारखेच बाहेर जाऊन काम करत होती." अक्षय देवांशला समजावत म्हणाला.
हे ऐकून देवांशचे समाधान झाले आणि तो अभ्यासाला पळाला.

सरलाताई आवरायला आत गेल्या आणि अक्षयने अनुला फोन लावला.
"सॉरी अक्षय, मी फोन करायचा विसरले. तू उद्या येशील ना? जरा लवकरच ये. आई आणि देवू दोघेच आहेत घरात." अनु गडबडीने म्हणाली.

"अनु, मी घरी आलो आहे. तू नको काळजी करू. तुझं काम आटोपून ये." बाकी बोलून अक्षयने फोन बंद केला.

अनु घरात नसल्यामुळे अक्षयची काहीच तक्रार नव्हती. मात्र सरला ताईंची हल्ली जास्त चिडचिड होत होती. अक्षयने आपले पुरते दोन दिवस देवांशला दिले. त्याला शाळेत सोडले. अभ्यास घेतला. शिवाय त्याला फिरायला घेऊन गेला. त्यामुळे देवांश खुश होता.

मात्र दोन दिवस होऊनही अनु घरी आली नाही. सरलाताई काळजी करू लागल्या. त्यात तिचा फोनही बंद असल्याने अक्षयलाही तिची काळजी वाटू लागली.

तिसऱ्या दिवशी अनु पहाटे अचानक घरी आली. तिला पाहताच सरला ताईंना खूप बरं वाटलं.
"अगं, काल येणार होतीस ना? किती वाट पहिली आम्ही..त्यात तुझा फोनही बंद होता." अनु काहीच बोलत नाही हे पाहून अक्षय चिंतेत पडला.

"आई, मी नोकरीचा राजीनामा दिला." बऱ्याच वेळाने अनु म्हणाली.

"काय?" सरलाताई आणि अक्षय एकदमच म्हणाले.

"हो. आई, मला तुमची तगमग कळत होती. देवांशला माझी गरज आहे हेही समजत होते मला. मात्र माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या, त्या अर्धवट सोडून चालणार नव्हत्या. तितकीच टेन्शन्सही होती. हे सारं सांभाळता सांभाळता थकले मी.
बऱ्याच महिन्यापासून नोकरीतून ब्रेक घ्यावा हा विचार माझ्या मनात घोळत होता आणि नेमकी परवाची मीटिंग हेड ऑफिसला असल्याने मी तिथेच बॉसकडे राजीनामा सोपवून रिकामी झाले. सरांनी राजीनामा स्वीकारायला पहिल्यांदा नकार दिला. या महिन्याचे पंधरा दिवस अजून विचार करा म्हंटले..पण माझा विचार पक्का आहे. देवांश कळत्या वयाचा झाल्यानंतर पुढचे पुढे पाहू."
अनु म्हणाली.

सरलाताई समाधानाने हसल्या. "काही दिवस जड जातील तुला. पण सवय झाली की सारे काही नीट होईल." त्यांना आपल्या मनावरचे ओझे उतरल्या सारखे वाटले. मनातल्या मनात त्या म्हणाल्या, "काहीही झाले तरी घरच्या बाईला आपल्या माणसांना वेळ द्यावा लागतोच. नाही का?"

समाप्त.
©️®️सायली जोशी.