मानाचं पान.. अंतिम भाग

मानाचं पान
मानाचं पान.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की दादापुता करून शशांक सुमेधाच्या माहेरी लग्नाला जातो. सगळे लाड पुरवून घेतो. आता बघू पुढे काय होते ते.


" सुमेधा, झाली का तयारी? आवर लवकर. " स्वतःचं आवरत शशांकने आवाज दिला. आवाज देऊनही सुमेधा बाहेर आली नाही म्हणून आश्चर्याने तो आत गेला तर ती बसून फोनवर गप्पा मारत होती.

" कधीचा आवाज देतो आहे. आवरलं का नाहीस अजून?" शशांकने आवाज चढवला.

" मी करते हो परत फोन.." सुमेधाने फोन ठेवला. "काय झालं?"

" काय झालं म्हणजे? आत्याकडे आज पूजा आहे. आपल्याला आमंत्रण आहे ना मेहुण म्हणून."

" आपल्याला? मला कोणीच नाही सांगितलं ते." सुमेधा चेहर्‍यावर आश्चर्य दाखवत म्हणाली.

" आईबाबा तुझ्यासमोर आत्याकडे काल रहायला गेले. तरी तुला माहित नाही म्हणतेस?"

" आईबाबा आत्यांकडे पूजा आहे म्हणून गेले आहेत हे माहीत आहे मला. पण आपल्याला मेहूण म्हणून बोलावलेले नाही माहित. " मोबाईल परत हातात घेत सुमेधा म्हणाली.

" मला सांगितलं आत्याने. तेवढं पुरेसं नाही का?" शशांकचा पारा चढत होता.

" नाही.. " सुमेधा तेवढ्याच शांतपणे बोलत होती.

" का?"

" तुमच्याकडे आमंत्रण देण्याची पद्धत नाही का? ज्याला बोलवायचे आहे किमान त्याला तरी सांगायचे ना? आता मला सांगितले का नाही? पण त्यातूनही तुम्हाला जर बायकोच्या मानाची चिंता नसेल तर तुम्ही जाऊ शकता. मी येणार नाही." सुमेधाने शशांकच्या भाषेत उत्तर दिले. ते ऐकून त्याचा चेहरा उतरला. पण उसन्या अवसानाने तो म्हणाला,

" नवरा बायको हे वेगळे असतात का? मला आमंत्रण मिळालं म्हणजे तुला यायला काहीच हरकत नाही."

" माझी हरकत आहे. नवराबायको हे वेगळेच असतात. मामाने नाही मला, तुम्हाला इतकंच नाही तर तुमच्या आईवडिलांना सुद्धा आमंत्रण केले.. तसंच आहे हे. मी चहा करणार आहे. घेणार तुम्ही?" उत्तराची अपेक्षा न करता सुमेधा स्वयंपाकघरात गेली. शशांक दिग्मूढ होऊन उभा राहिला. त्याला काहीच सुचेना. निघताना आईबाबांनी त्याला बजावून सांगितलं होते की काही झाले तरी येणं कॅन्सल करू नका. सगळे नातेवाईक जमणार आहेत. नाही आलात तर घरात काही अडचण आहे असा सगळ्यांचा ग्रह होईल.

" सुमेधा, काय केले तर तू येशील तिथे?" आता वाघाची शेळी झाली होती.

" आत्यांना मला फोन करून आमंत्रण द्यायला सांगा."

" आत्ता? त्यांच्याकडे लोकं जमली असतील. "

" जमू देत की.. आमच्याकडे तर लग्नाचं वऱ्हाड जमलं होतं त्यातून मामाने नाही केला फोन?" सुमेधाचा आवाज चढला होता.

" अग पण.."

" पण नाही आणि बिण नाही. कळलं कसं वाटते ते. आज जी लाज तुम्हाला वाटते तशीच लाज त्यादिवशी मला वाटत होती. पण मला माझ्या माणसांना भेटावेसे वाटत होते म्हणून मी ते सहन केले. आता तुमच्या नातेवाईकांसमोर मान खाली जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सहन करा."

" सुमेधा, प्लीज यार.. नको ना अशी वागू. ती आत्या खूप टोमणे मारेल आईला."

" माझ्या आईला नसतील मारले कोणी?"

" मग काय करू ते सांग?" शशांक हताश झाला होता.

" पुढच्या वेळेस कुठेही जाताना सतत मानपान मिळेल अशी अपेक्षा करायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला जो मान हवा आहे तो आपण आधी दुसर्‍यांना देऊ शकतो का ते बघायचं.. दुसरी आणि महत्वाची गोष्ट. जसं आपल्याला सासरी जाताना मानाचं पान हवं असतं तेच बायकोला तिच्या सासरी मिळावं याची काळजी घ्यायची. कारण तुमची बायको या नात्याने जर तुम्ही मान राखलात तरच बाकीचे तिचा मान ठेवणार.. ही साधी गोष्ट लक्षात ठेवायची. "

"नक्की ठेवीन.." सुमेधापुढे हात जोडत शशांक म्हणाला.


आमंत्रण किंवा मानाचे पान.. कितीही पुढारलो तरिही जो मान जावयाला मिळतो तो सुनेला कधीच मिळत नाही हेच खरं. नवर्‍याला आमंत्रण मिळाले की बायकोला मिळाले हे समजणारी लोकं अजूनही आसपास दिसतात. ते मांडण्याचा केलेला छोटासा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all