मानाचं पान.. भाग २

मानाचं पान
मानाचं पान.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की शशांक व्यवस्थित आमंत्रण आलं नाही म्हणून सुमेधाच्या माहेरच्या लग्नाला जायला नकार देतो. आता बघू पुढे काय होते ते.


" आई, प्लिज मामाला घरी एक फोन करायला सांग ना. नाहीतर मला लग्नाला यायला जमणार नाही." सुमेधा फोनवर रडत होती.

" अग, मामा बाहेर बोलतो आहे. त्याचं झालं बोलणं की सांगते. काय हा जावई असा? कामाला येणार नाही.. पण मानाचं पान मात्र सतत हवं. आपलंच नशीब फुटकं." लेकीला यायला मिळत नाही म्हणून आईचा जीव तडफडत होता.

" आई, लगेच सांग ग. दुपारची गाडी गेली तर यायला मिळणारच नाही."

" हो ग.. हो.. माझंच मेलीचं चुकलं. सकाळीच फोन करायला हवा होता."
आईने बोलून फोन ठेवला. सुमेधा विषण्णपणे बेडरूममध्ये बसून राहिली. इकडे मामाने लाडक्या भाचीसाठी फोन केला.

" काय जावईबापू, निघालात की नाही? इथे सगळं रखडलंय तुमच्यासाठी?"

" हो.. निघतोच आहोत.. हातातली कामे उरकतो आणि निघतोच."

" काय राव तुम्ही? अहो जावयांचे जावई तुम्ही. एवढं मोठं मानाचं पान म्हणजे लवकर यायला हवं तुम्हाला. आम्ही कधीची वाट बघतो आहोत. मला वाटलं पोस्टाने पत्रिका पाठवली म्हणून येताय की नाही?" मामाने गुगली टाकला.

" असं कसं. तुम्ही एवढं प्रेमाने बोलावल्यावर येणारच. फोन ठेवतो आणि निघतोच." शशांकचा चेहरा आता अभिमानाने फुलला होता.

" सुमेधा.. आवर पटकन.. निघूयात. गाडी गेली तर पंचाईत होईल." शशांकने आवाज दिला. सुमेधा सुद्धा पटापट डोळे पुसून तयार झाली. कारण आता काहिही झालं तरी तिला जो काही आनंद मिळणार होता त्याला मुकायचं नव्हते. शशांक, सुमेधा सपरिवार मामाच्या घरी पोहोचले. तिथे जाताच सगळ्यांनी शशांकचं स्वागत केलं. त्याला बसवून त्याच्या चहापाण्याकडे खास लक्ष दिलं. रात्री आहेराचा कार्यक्रम झाला. त्यातही सगळ्यात आधी शशांक आणि सुमेधाला मानपान करण्यात आला. शशांक सगळी हौस पुरवून घेत होता. सुमेधा आपल्या भावंडांमध्ये रमली असली तरी तिचा एक डोळा शशांकवरच होता. कधी त्याचा पापड मोडेल आणि आरडाओरड सुरू होईल याची धास्ती तिच्या मनात होती. पण तिच्या माहेरच्यांना शशांकचा स्वभाव माहित पडल्याने सगळे आटोकाट प्रयत्न करत होते त्याचं मन जपण्याचा.

लग्न लागले. प्रिशा सासरी गेली. मामामामीच्या आग्रहाने सुमेधा आणि शशांक अजून एक दिवस तिथे राहिले. शशांकची नाटके बघून वैतागलेल्या सुमेधाने मनात स्वतःशीच निश्चय केला.

मानाच्या पानासाठी याने मला जसा त्रास दिला तसाच त्रास देण्याची एकतरी संधी मिळाली पाहिजे.. छान अद्दल घडवीन मी याला.

सुमेधाची ही इच्छा होईल का पूर्ण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all