मानाचं पान

मानाचं पान
मानाचं पान..


" अहो, आपण निघायचे ना?" सुमेधाने शशांकला विचारले.

" कुठे निघायचे?" शशांकने मोबाईल मधली नजर वर न करता विचारले.

" अहो, असं काय करता? त्या दिवशी तर मामाने आमंत्रण दिले ना? उद्या प्रिशाचे लग्न आहे. त्याने चार दिवस आधीच रहायला बोलावले होते. पण.." बोलता बोलता सुमेधा थांबली. शशांकचा मूड कशावरून बिघडेल काही सांगता येणार नव्हतं. आणि तिथे लग्नात तिला सुखाने जायचे होते.

" त्याला आमंत्रण म्हणतात का? आमंत्रण म्हणजे घरी येऊन अक्षत द्यायला हवी. तुमच्याकडे जावयाचा असा मान राखतात का?" शशांक म्हणाला.

" मामा येणार होता. तो पडला म्हणून कुठेच जाऊ शकला नाही. पण तो तुमच्याशी आणि सासूबाईंशी बोलला ना? तेव्हा तर तुम्ही हो म्हणाला होतात." सुमेधा काकुळतीला आली होती. खरंतर मामाने सगळ्यांनाच आठ दिवस रहायला बोलावले होते. ती सोडून सगळेच बहिणभावंडं तिथे मजा करत होते आणि ही मात्र इथे अडकली होती. त्यांचे फोटो बघून मूकपणे रडत होती. शशांकचा स्वभाव माहित होता म्हणूनच तिचा मामा आमंत्रण द्यायला येणार होता आणि सुमेधा मग आईसोबत लग्नाला जाणार होती. आमंत्रण द्यायला म्हणून गेलेला मामा गाडीवरून पडला आणि सुमेधाच्या ह्र्दयाचा ठोका चुकला. या लग्नाची खरंतर ती आतुरतेने वाट बघत होती. लग्नानंतर आजोळी जाण्याचे प्रसंग फार कमी यायचे. गेले तरी भेटायचे आणि परतायचे. मामालाही कोणाला बोलवायला जमायचे नाही म्हणून त्याने मुद्दाम यावेळेस सगळ्याच भाचेकंपनीला बोलावले होते. कितीतरी दिवसांनी सगळे भेटणार. आजोळी रहायला मिळणार म्हणून सुमेधाही उत्साहात होती. पण मामा पडल्याचे निमित्त झाले. तिच्या मामेभावाला एकट्याला सगळीकडे जाणं शक्य नव्हते म्हणून मग मामाने पोस्टाने पत्रिका पाठवल्या आणि फोन केला होता. फोनवर शशांकचे बोलणे ऐकून तिच्या आशेला पालवी फुटली होती. पण ती खोटीच ठरली. शशांकने बिब्बा घातलाच होता.

" तेव्हा हो म्हणालो होतो म्हणून मी गेलंच पाहिजे असं नाही. त्यांना जर मी यावं असं खरंच वाटत असतं तर त्यांनी परत फोन केला असता.. पण नाही. तोंडदेखलं आमंत्रण दिलं आणि झालं. संपलं.. परत विचारलं देखील नाही." शशांकचा थयथयाट सुरू होता.

" अहो पण, लग्नाची धावपळ, खरेदी, त्याचा अपघात.. त्यातून नाही मिळाला त्याला वेळ. समजून घ्या ना. " सुमेधा रडकुंडीला आली होती.


काय करेल शशांक? जाऊ देईल का तो सुमेधाला लग्नाला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते बघू.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all