मनाला भावलेली डॉक्टर..

समाजात कळत नकळत आपसूकच काही ऋणानुबंध जुळले जातात. तसेच लेखनीच्या या दुनियेत असे अनेक बंध जुळले. इथेच एक हुशार अशी डॉकटर मैत्रीण मला लाभली. डॉक्टर डे च्या निमित्ताने तीच्यविषयी लिहिण्याचा योग आला.


डॉक्टर म्हणजे मानव रुपातील खरा देवदूतच असतो. कोरोना काळात आपणा सर्वांनाच खऱ्या अर्थाने त्याचा प्रत्यय आला. स्वतःच्या जिवापेक्षाही जास्त त्यांनी त्यांच्या कर्तव्याला महत्त्व देत अनेकांचे प्राण वाचविले.

आज समाजात असे अनेक डॉक्टर आहेत जे प्रामाणिकपणाने त्यांचे कर्तव्य बजावत असतात. आणि नकळतपणे त्यांच्याविषयी मनात आदराची भावना आपोआपच निर्माण झाल्याशिवाय मग राहत नाही.

अशाच एक अत्यंत हुशार, मनमिळावू अशा डॉक्टर ज्या त्यांच्या कर्तव्याबरोबरच त्यांचे छंद, आवडीनिवडी वेळात वेळ काढून अगदी मनापासून जोपासतात. त्याबरोबरच विविध माध्यमातून स्रीयांच्या जनजागृतीचे काम मोठ्या चिकाटीने त्या करत आहेत.

अशा प्रसिद्ध स्रीरोगतज्ज्ञ डॉ.शिल्पा क्षीरसागर... सद्ध्या डॉक्टरकी बरोबरच लेखन क्षेत्रातही दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेले हे नाव.
लिखाणाच्या माध्यमातून त्या समाजातील अनेक स्त्रियांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पटवून देतात. स्वतःच्या अनुभवातून केलेले त्यांचे हे लिखाण आम्हा स्रीवर्गासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरत आहे.

साधारणपणे एक वर्षांपूर्वी डॉ. शिल्पा आणि माझी ओळख झाली. ओळख तशी जुजबी. लेखणीच्या एका ग्रुपमधे आम्ही एकत्र एवढाच काय तो परिचय सुरुवातीला.

प्रत्यक्ष बोलणं जरी होत नसलं तरी हळूहळू दुरुन का होईना पण आम्ही एकमेकींना ओळखू लागलो. तिची हुशारी दिवसागणिक तिच्या लिखाणातून समजत होती. मनाच्या कप्प्यात कुठेतरी तीच्याबद्दल खूप आदर वाटत होता. पण ही एवढी मोठी तज्ज्ञ डॉक्टर पण सर्वांशी किती आपलेपणाने बोलते. वेळप्रसंगी आरोग्य विषयक तिचे सल्लेही खूप उपयुक्त ठरतात.
मैत्रीच्या एकाच धाग्यात आम्ही बांधलो गेलो. सुख दुःखाची देवाणघेवाण हळूहळू होवू लागली. हसतखेळत मिळेल तसा वेळ लिखाणाबरोबरच गप्पांमध्ये जावू लागला.

या एक वर्षाच्या काळात आता मी शिल्पाला खूप छान ओळखू लागले होते. पण तरीही आमच्यात पर्सनली बोलणं कधी झालं नव्हतं. तिचे लेख मात्र मी आवर्जून आजही वाचते. उत्तम प्रकारे संदेश तिच्या लिखाणातून ती देत असते. प्रत्येक वर्गातील स्री गटासाठी तिचे लिखाण म्हणजे मोलाचा सल्ला असतो. अत्यंत उपयुक्त माहिती ती तिच्या लिखाणातून नेहमीच देत असते. गेल्या एक वर्षात तिचे लेख वाचून माझे तर खूप मोठे अज्ञान दूर झाले असे मी म्हणेन.

स्रीयांनी स्वतःची कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी? काय करावे आणि काय टाळावे? याचे उत्तमरीत्या मार्गदर्शन करणारे तिचे लेखन स्री वर्गासाठी नेहमीच प्रेरणादायी असते.
एवढेच नाही तर डॉ.शिल्पा जितकी हुशार डॉक्टर तितकीच हुशार लेखिका देखील आहे. आणि एक माणूस म्हणून, एक मैत्रीण म्हणून तिचा मला खूप अभिमान आहे. तिची एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे शक्य त्यापरीने समजात, स्री वर्गात जनजागृती घडवून आणायची हा तिचा ध्यास.

मागे एक दीड महिन्यापूर्वी मी मासिक पाळीशी संबंधित एक लेख लिहिला होता. आता त्याबाबतीत माझेही ज्ञान तेवढे पुरेसे नव्हते. पण तरीही सकारात्मक दृष्टिकोनातून मी तो लेख लिहिण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लिखाणात थोड्या त्रुटी होत्या. काही गोष्टींचे अपुरे ज्ञान यामुळे थोडी चुकीची माहिती माझ्याकडून लिहिली गेली होती. ब्लॉग लिहिला आणि पोस्ट केला. एव्हाना कुणी वाचलाही नव्हता. तोच पाचव्या मिनिटाला शिल्पाचा फोन आला.

डॉ. शिल्पा क्षीरसागर..स्क्रीन वर नाव पाहिले आणि मनातून खूपच आनंद झाला. एकमेकींशी कधीही न बोललेलो आम्ही, जेव्हा शिल्पाचा फोन आला तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. का बरं फोन केला असेल शिल्पाने? या विचारातच मी तिचा फोन उचलला. सुरुवातीला काय बोलू काही समजत नव्हते.

तिनेच बोलायला सुरुवात केली...
"अगं तू आता जस्ट जो ब्लॉग पोस्ट केलाय ना त्यात थोडीशी सुधारणा करशील का?"

"हो. नक्की. सांग ना.." मी म्हणाले.

"Sorry अगं तुझी चूक दाखवते आहे असं अजिबात समजू नकोस. फक्त कुणी वाचायच्या आधी त्यात दुरुस्ती कर. कुणी ऑब्जेक्शन घ्यायला नको एवढेच वाटते. तिथे कमेंट केली असती मी पण मला ते योग्य नाही वाटलं. म्हणून मैत्रीच्या नात्याने हक्काने फोन केला."

तिचे आपलेपणाचे आणि हाक्काचे ते बोलणे ऐकून क्षणभर मन भरून आले. कारण ती तिथेही कमेंट करू शकली असती पण तिने तसे न करता मला msg देखील केला नाही तर डायरेक्ट फोन करून माझी चूक इतरांच्या लक्षात यायच्या आधी मला समजावून सांगितली. एवढेच नाही तर त्या पाच ते सात मिनिटाच्या काळात माझे खूप सारे अज्ञान तिने दूर केले. ज्या गोष्टी खरंच प्रत्येक स्रीला माहिती असायला हव्यात नेमकं त्याच पासून आपण खूप दूर असतो. शिल्पाने खूप छान पद्धतीने माझ्या अनेक शंकांचे निरसन केले.

आणि खरंच शिल्पाने जर तिथे कमेंट करुन मला माझी चूक दाखवली असती तर मलाही कुठेतरी वाईट वाटले असते. आणि वाचकांच्या मनात माझ्याविषयी, माझ्या लिखाणाविषयी संभ्रम निर्माण झाला असता. माझ्या भावना न दुखावता तिने तिचे कर्तव्य पार पाडले. त्या दिवशी मनाला खरंच खूप समाधान वाटले.

क्लिनिक मध्ये गेल्यावर देखील आपण काही गोष्टी डॉक्टरांना विचारायला, सांगायला घाबरतो, कसं विचारायचं? म्हणून गप्प बसतो. आणि स्वतःच आपल्या अज्ञानात तसेच पुढे जावून उद्भवणाऱ्या अडचणींत भर पाडून घेत असतो. आणि हा अनुभव अनेक स्रीयांना येतच असतो. शिल्पाने मात्र स्वतःहून खूप सारी माहिती मला दिली. आणि माझ्या ज्ञानात त्यामुळे भरच पडली.

माझा लेख वाचून ती दुर्लक्षही करू शकली असती पण तिने तसे न करता उगीच चुकीची माहिती प्रसारित व्हायला नको म्हणून एक डॉक्टर म्हणून तिने तिचे कर्तव्य पार पाडले. आणि मैत्रीच्या नात्याला अधिक महत्त्व देत माझ्या भावना समजून घेत उत्तमप्रकारे नातेही जपले. यावरून तिच्या स्वभावाची आणखी एक बाजू माझ्या लक्षात आली.
तिच्याशी बोलताना मला खूप अभिमान वाटत होता. पण तिला मात्र एका गोष्टीची खंत वाटत होती. "मी तुझी चूक दाखवली." दोनदा तीनदा तिचे एकच वाक्य.. "वाईट वाटून घेवू नकोस मी तुझी चूक दाखवली. तुझी चुक दाखवण्याचा खरंच माझा उद्देश नव्हता."

इतरांच्या मनाचा इतका विचार करणारी ही तज्ज्ञ डॉक्टर खरंच इतकी भावनाप्रिय आणि हळवी असेल याचा मी विचारही केला नव्हता. त्याक्षणी माझ्या मनात तिच्याशिवाय जो आदर आणि आपलेपणा निर्माण झाला तो शब्दांत मांडणे अशक्यच.

पण खरं सांगू, माझ्या त्या एका चुकीमुळे डॉ. शिल्पाला मी त्या पाच मिनिटात खूप छान आणि जवळून ओळखले. किती हळवी आहे ही असे क्षणभर वाटले. माझी चूक दाखवून जसा काय तिने खूप मोठा गुन्हा केला होता असेच वाटत होते तिच्या बोलण्यातून. आणि माझ्या मते माणूस तेव्हाच एखाद्याची चूक दाखवू शकतो किंवा तिला एखाद्याची चूक दाखवण्याचा अधिकार तिला असतो जेव्हा तिच्याकडे त्या गोष्टींचे पुरेसे ज्ञान असते. जे की शिल्पाकडे ठासून भरलेले आहे.

तिच्या बोलण्यातील तो तिचा नम्रपणा खरंच मनाला खूपच भावला. यावरून तिच्या स्वभावाचा एक अंदाज मला आला.
"ही जर एखाद्याच्या भावनांचा इतका विचार करत असेल तर तिच्या पेशंटला ट्रीट करताना ती त्यांच्या भावना किती मनापासून समजून घेवून त्यांना लाखमोलाचे मार्गदर्शन करत असेल. जे की सामान्य मनुष्यासाठी खूप गरजेचे असते.

डॉक्टर जर पेशंटचे मन जाणणारा असेल, पेशंटच्या भावना समजून घेवून आपलेपणाने त्यांच्या शंकांचे निरसन करणारा असेल तर तिथेच पेशंटचा अर्धा आजार बरा झालेला असतो. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. शिल्पा आहेत.

खरंच खूप कमी वेळात मला समजलेली ही माझी डॉ.मैत्रीण जिचा मला खूपच अभिमान वाटतो. तिचे लेखन म्हणजे माझे स्री आरोग्यविषयक अज्ञान दूर करण्याचे जणू साधनच बनले आहे. लिखाणातून त्याबरोबरच तिच्या लाईव्ह सेशन मधून ती जे काही सल्ले देत असते ते मी मनापासून आमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. आणि इतर महिलांनी देखील तिचे लेख आवर्जून वाचावेत. त्याचा नक्कीच त्यांना फायदा होणार याची मला खात्री आहे. अगदी सोप्या भाषेत आणि साध्या साध्या प्रसंगांमधून ती लाखमोलाचे तसेच सर्व वयोगटातील महिलांना उपयुक्त ठरतील असे सल्ले देत असते. म्हणूनच तिचे लिखाण नेहमीच प्रेरणादायी वाटते.

एवढेच नाही तर आमची ही लाडकी डॉ. मैत्रीण जिच्यामध्ये अनेक कौशल्य दडलेली आहेत बरं का. एक उत्तम डॉकटर आणि लेखिका याबरोबरच ती अर्णव आणि अर्जुन या गुणी आणि हुशार बाळांची एक हुशार आई, कवयित्री, वेळात वेळ काढून सण समारंभ साजरे करून परंपरा जपणारी ती एक उत्तम गृहिणी देखील आहे. एवढेच नाही तर तिच्यात एक उत्तम कलाकार दडलेला आहे. उत्कृष्ट अभिनय कौशल्य ही डॉ. शिल्पाची एक जमेची बाजू आहे. लिखाणाबरोबरच ती व्हिडिओच्या माध्यमातून देखील लाखमोलाचे संदेश देवून जनजागृती करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न करत असते.

परवाच तिने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महिला वर्गाच्या अनेक शंकांचे निरसन केले. कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देवून तिच्यातील एका हुशार डॉक्टरचे पुन्हा एकदा दर्शन झाले.

"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हा शिल्पाचा गुण मनाला खूपच भावतो."
अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तिचे छंदही ती मनापासून जपते याचा खूप अभिमान वाटतो. कारण आजकाल आपण पाहतो "वेळच नाही" म्हणत आपण अनेक गोष्टींपासून माघार घेतो. पण शिल्पा मात्र तिच्या बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून ती तो सत्कारणी लावत असते.

खरंच एक डॉक्टर म्हणून मला तिचा नेहमीच अभिमान आहे आणि तो यापुढेही असेल पण त्याहीपेक्षा जास्त ती एक मनमिळावू, हळवी अशी लेखिका मैत्रीण म्हणून आम्हाला लाभली हे सांगताना जास्त आनंद होतो.

आज ईरामुळे मला डॉ.शिल्पा विषयी व्यक्त होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी ईराची खूप खूप आभारी आहे.
डॉ. शिल्पा तसेच समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या या क्षेत्रातील सर्व डॉक्टर वर्गाला त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल खूप खूप शुभेच्छा. अशीच सेवा त्यांच्याकडून नियमितपणे होत राहो हीच सदिच्छा.

धन्यवाद...

©® कविता सुयोग वायकर