Mar 03, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मना घडवी संस्कार

Read Later
मना घडवी संस्कार


मना घडवी संस्कार

जीवन जगत असताना "संस्कार" हा शब्द अनेकदा कानावर पडतो. एखाद्याची स्तुती, कौतुक करतांना किती छान संस्कार झाले यांच्यावर अन् एखाद्या व्यक्तिकडून चुक झाली, गुन्हा झाला,अपराध झाला तर यांच्यावर कोणतेही संस्कार नाहीत अशी वाक्ये नेहमीच आपण ऐकतो.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.
गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प (कमी) करायचे.

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे, उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.

तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा.

चांगले संस्कार मुलांमध्ये व स्वतःमध्ये रूजवावेत

सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी.

सकाळी उशिरा उठणे, सतत दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात बसणे, अभ्यास न करणे, उलट बोलणे, अस्वच्छ रहाणे, पुस्तकांचा खण व्यवस्थित न ठेवणे, खोटे बोलणे इत्यादी वाईट गोष्टीमुळे व्यक्ती अपयशी होतो व जीवनात निराशा येते.

संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला ‘आई-वडिलांना रोज नमस्कार कर’, ‘दुसऱ्याची निंदा करू नको’ इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे – तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने. आठ वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४ दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ”मी नाही करणार.” त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे. आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आत मुलगा तुमच्या पाठीमागे येऊन घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल. त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज आजी-आजोबांना नमस्कार करतात. मी मात्र बेशरमासारखा उभा आहे. संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू !
लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता
चांगले संस्कार झाल्याने जीवन आदर्श बनते

पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन (दररोज) वंदन करत. जेवण्यापूर्वी श्‍लोक म्हणत. सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत. रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत. मुलांनो, तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी ओळखावे, असे वाटत नाही का ? आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही गुणी व्हायला हवे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्श व्हाल.

चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी बनते
आई-वडिलांचे ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे, देवाची भक्ती करणे इत्यादी संस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनते. याउलट दुसर्‍यांची टिंगलटवाळी करणे, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे, खोटे बोलणे इत्यादी कुसंस्कारांमुळे पाप लागत असल्याने जीवन दुःखी बनते.

आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.

ज्या वातावरणात व्यक्ती वाढतो तेच संस्कार नकळतपणे लहान मुलांमध्ये व व्यक्ती मध्ये रूजतात. म्हणूनच जीवनात चांगल्या व आदर्श व्यक्तींचा सहवास,संगत केली पाहिजे.
चंदनाप्रमाणे स्वतःचे व इतरांचे जीवन सुगंंधीत केले पाहिजे.
आदर्श व्यक्तिमत्वांचे जीवनचरित्र,पुस्तके,कथा यांच्या वाचनातून नकळतपणे चांगले संस्कार रूजविले जातात.
म्हणूनच,

जन्म घेऊन या जगतात
होतो सुरू प्रवास जीवनाचा
मंगल आगमनाचा दिवस
असतो मात्र अत्यानंदाचा

होत असतो विकास व वाढ
संस्कार व नितीमूल्ये रूजवून
व्यकतीने कायम जगावे
मातृऋण लक्षात ठेऊन

पित्याचा त्याग,बहिणीची माया
उभारी देई जीवनाला
सकारात्मक दृष्टिकोन करी
प्रगत आयुष्यात मानवाला

समस्या व संकटे येती*
परीक्षा पाहण्यास सर्वांची
खरी वेळ असते तीच
शांतता व संयमाने वागण्याची

दया,क्षमा, सहानुभूती,स्नेह
अनमोल अलंकार मानवाचे
हास्य व मनमिळाऊपणा
गमक सुखी समृद्ध आयुप्याचे

क्षणभंगूर जीवनाचा प्रवास
निस्वार्थीपणेच करावा
समाजसेवा करत करत.
आपला चरितार्थ साधावा

अंतिमसमयी मानवाच्या
समारंभ साजरे व्हावे
कर्तृत्वाने आयुष्यात
जनांच्या ह्रदयात राहावे

संताच्या व ऋषीमुनींच्या देशात
जपले आजतागायत चारित्र्याला
शिकवण व संस्कार मिळाले
भविष्याला आकार देण्याला

स्वतःच्या इच्छापूर्ती साठीच
सर्व काही आज चालू आहे
आधुनिक भारताच्या भविष्याशी
नक्कीच खेळ चालू आहे

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Suhas Mishrikotkar

Teacher

I like writing poems,playing games,Reading

//