Login

मना घडवी संस्कार...

Mna ghadavi sanskar

मना घडवी संस्कार...

संस्कार... संस्कार म्हणजे काय? संस्काराचा पाया मजबूत असला तर माणूस जीवनात कधीच हरणार नाही.  संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडले. शिवाजी,  संभाजी, तानाजी असे अनेक कीर्तिवान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावर हिंदुंच राज्य उभं करू शकले.

संस्कार करणे म्हणजे काय तर चांगल्या सवयी लावणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्यांना आई-वडिलांना रोज नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको, सगळ्यांशी प्रेमाने बोल, सगळ्यांचा आदर कर. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांची बोलताना आवाजात नम्रपणा हवा.
इत्यादी शिकवावयाचे.  पण ते कसे शिकवावयाचे तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने. कारण
पालक जसे वागतात त्यांचं अनुकरण करून मुलंही तसच वागतात.
 

सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी एकंदरीत काय तर चांगली वागणूक म्हणजे संस्कार.
 

आई-बाबांना नमस्काराची. “मातृदेवो भव, पितृदेवो भव” ह्या वचनाप्रमाणे ज्यांनी आपल्याला हे जग पाहण्याची संधी दिली आणि चिमुकल्या जीवाचे प्रेमाने संगोपन केले म्हणून आपण त्याची जाणीव व कृतज्ञता ठेवण्यासाठी त्यांना नमस्कार करण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

 

लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे.

"काडी ओली आहे तोवर तिला कसंही वाकवा कसाही आकार द्या ती वाकेल पण एकदा का ती काडी वाळली मग
तुटेल पण वाकणार नाही."

मुलांचंही असंच आहे, लहानपणी आपण त्यांच्यावर जे संस्कार करतो जी शिकवणूक आपण देतो ती त्यांची आयुष्याभराची पुंजी असते. आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यास तीच मदत करते.

योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार...

संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते.

जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होउन दिव्य तेजाचा उदय होतो.

शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पीढी घडवणे हेच संस्कारांचे ध्येय आहे.

संस्कारचं माणसाला घडवतात.

समाप्त: