मना घडवी संस्कार ...

ईरा : लेखणीचा योग्य संस्कार


मना घडवी संस्कार

संस्कार हे कांही उपजत निर्माण होता नसतात तर ते घडवावे लागतात. घर , परिवार , समाज , सभोवतालचे वातावरण यातून संस्कारांची निर्मिती होत असते.संस्कारांची सर्वात मोठी जबाबदारी आई - वडिल , पालक आणि शिक्षक यांची असते.संस्कार हे आपल्या चालण्या , बोलण्यातून येत नाहीत तर ते वर्तनातून व आचरणातून येत असतात.घरातील सगळ्या गोष्टींचे मुले बारकाईने निरीक्षण करत असतात.चांगल्या वाईट गोष्टी ती चटकन ग्रहण करतात त्यामुळे परिवारात कसे वागायचे याचे भान सर्वाँनी ठेवणे गरजेचे आहे.

मन हे सर्व गोष्टींचा उगम आहे.मनाला जसा तुम्ही आकार द्याल तसे ते घडत असते.बालमन निरागस असते त्यावेळी त्याच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे असते.हे कार्य सर्वप्रथम आई करत असते.आपल्या लहान बाळाला उपजत संस्कार देणारी ती पहिली आदर्श असते.त्याला झोपवताना गायलेले अंगाई गीत , त्याला भरवताना सांगीतलेली चिऊकाऊची गोष्ट हे संस्कार त्यांच्या मनावर खोल बिंबल्यामुळे त्यांचे वर्तन लहाणपणीच सुधारते.घरात कसे बोलायचे , आदर कसा राखायचा , स्वच्छता कशी ठेवायची , स्वतःची कामे स्वतः कशी करायची याचे सारे संस्कारक्षम धडे आई मुलांना देत असते.ती मनाला केवळ आकार देत नाही तर ती संस्काररुपी नागरीक तयार करत  असते.

आईवडिलांकडून ज्यावेळी मूल शाळेत जाते तेंव्हा शिक्षकच त्यांना घडवण्याचे काम करत असतात.आईवडिलांचे झालेले मुलांच्यावर चांगले संस्कार शिक्षकांना जेंव्हा समजतात तेंव्हा त्यांना आईचे कार्य मुलांच्या जडणघडणीत किती महत्वाचे आहे हे समजते.आईने घडवलेली ही मुले शिक्षणात तरबेज होतात आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने ती आणखी सक्षम बनतात.शिक्षकही अत्यंत कुशलतेने त्यांना हाताळतात त्यांनी छान शिकवतात , वाचन मनन , व्यायाम , खेळ याव्दारे त्यांचे मन सुसंस्कारक्षम करतात.त्यांच्या वाईट सवयीवर बारीक लक्ष ठेवतात प्रसंगी त्यांना शिक्षा करतात पण चांगले घडवतात.आईवडिलांनंतर शिक्षकच मुलांचे बाप असतात.शिक्षणाचे संस्कार योग्य झाले तर मनही संस्कारशील बनते व ते अनेक वाईट गोष्टींना परतवून लावू शकते. हे काम शिक्षकच अत्यंत निष्ठेने करुन उद्याची प्रज्ञावान पिढी निर्माण करतात.

चांगला समाज घडायचा असेल तर , चांगला नागरीक घडायचा असेल तर संस्कार फार महत्वाचे आहेत त्यासाठी प्रत्येक घराघरात , परिवारात संस्कार पेरा व उद्याचा संस्कारशील भारत निर्माण करा ...!!

©नामदेवपाटील