Jan 23, 2022
वैचारिक

मन में हैं विश्वास

Read Later
मन में हैं विश्वास

विश्वास

आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजे योग. असा हा योग सहजपणे येण्यासाठी स्वतःला आत्मा म्हणजे एक बिंदू समजायचे व सतत मनाने परमेश्वराशी आपली नाळ जोडायची . अशाच काहीश्या अध्यात्मिक वातावरणात माझे  लहानपण  गेले . काही घरांमध्ये रोज देवपूजा , मंत्र स्तोत्रे यांचे पठण व्हायचे . संध्याकाळी शुभंकरोती , मनाचे श्लोक  असायचे . आमच्याकडे यातलं काहीही नसायचे पण तरीही मुलांना शुभंकरोती अथर्वशीर्ष पाठ असायचे . म्हणजे मुलांना ते आले पाहिजे यात दुमत नसायचे. पण हे सर्व देवाला खुश करण्यासाठी किंवा देव बाप्पा कान  कापेल म्हणून नसायचे .

 

घरात अध्यात्मिक वातावरण म्हणजे काही एन्जॉयमेंट नाही असेही काही नव्हते बरे का ? दंगामस्ती , भांडणं , खेळणं , नाचणं , गाणं .सिनेमा सगळं असायचे . त्यात माझा स्वभाव बोलका आणि माणसे जोडण्याची आवड . शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्यात भाग घेत असल्याने स्वयंसेवक म्हणून कोणतेही काम करायला मागे न बघणारी असल्याने सर्वांची आवडती असायचे . घरात कांदा लसूण खात नसल्याने आम्ही पार्टीला गेलो कि माझे मित्र मैत्रिणी पण माझ्यासाठी बिना कांदा -लसणाचे खाणं बनवायचे . पण चिडवायचे हे तुझं डबल कांदा लसणाचं स्पेशल . सांगायचा  मुद्दा असा कि घरातून बाहेर गेल्यावर जरी मी कांद्याचं  खाल्लं तर कोणाला कळणार होतं .. आणि खाऊ नये अशी जबरदस्ती पण नव्हती . तरीही मनाने ते पाळत होते . जसे अनेक मित्र मैत्रिणी बरोबर असायच्या तसाच ' परमेश्वर 'ज्याची आठवण मी लहानपणापासून करते तो माझ्या बरोबर सतत वावरत असायचा . सगळ्या ऍक्टिव्हिटी करताना तो मनात असायचा . ती सवयच लागली होती मनाला .. कि मनातल्या मनात त्याच्याशी बोलून च सर्व करण्याची . त्यामुळे आपण काय करतोय , कसं करतोय यावर एक प्रकारचा  वचक असायचा . जीवनात एक पॉझिटिव्ह एनर्जीचे वलय सतत बरोबर असायचे .

 

तरीही कॉलेज मध्ये मित्र - मैत्रिणी कधी माझी तर उडवण्यासाठी हा एक ठरलेला टॉपिक असायचा . तेही त्यांचे एक प्रेमचं असायचे . कितीही छेडलं तरी मी मात्र ठाम असायचे . माझा विश्वास होता कि कोणीही काहीही बोलले तरीही  मी बरोबर आहे ना .. म्हणून कधी दुःख नाही वाटले .

 

परमेश्वर , देवी देवता , आहेत कि नाही ? तुम्ही नास्तिक आहेत का ? अश्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असे . कधी कधी आपला विश्वास कमी पडतो कि काय असे वाटायचे. तो आहे ह्यात दुमत नसले तरी हो फक्त माझ्याच मनात आहे कि काय ? असे प्रश्न पडायचे . आपण स्वकष्टाने स्वतःला सिद्ध करू शकतो पण प्रत्यक्ष परमेश्वराला सिद्ध करण्याची टाप कोणात आहे  ? कोण म्हणतो तो प्रत्येक कणात आहे तर कोण म्हणतो तो निर्गुण निराकार एकच आहे . त्याच्या असण्याला कोणी नाकारले नाही पण अस्तित्वाला स्वीकारले का ?हाच एक प्रश्न .  

 

आता हा प्रश्न सुटणार कसा ? तर त्याचे उत्तर माझ्या दृष्टीने ' विश्वास ' असे आहे . जेवढा आपला विश्वास त्याच्या अस्तित्वावर आहे , तेवढा विश्वास त्याच्या नसण्यावर नाहीये . हाच माझा विश्वास पक्का , घट्ट होण्यामागे एक छोटीशी घटना आहे .. माझा एक अनुभव आहे , तोच आज मी सांगणार आहे

 

साधारण २००५ सालची गोष्ट आहे . मी आल्रेडी एक जॉब करत असताना मला चांगल्या करिअर साठी दुसऱ्या कंपनीत जॉबला जायचं होतं . इंटरव्हयूहसाठी मीच संध्याकाळी ६ वाजताची वेळ ठरवली होती . कारण त्या दिवशी रजा मिळत नव्हती . मग संध्याकाळी ऑफीस मधून १५ मिनिटे लवकर निघून मी घरी आले . त्यावेळी आम्ही पुणे - नाशिक हायवे वर राहत होतो . आणि  इंटरव्हयूह पुण्यात वाकडेवाडी इथे होता . माझ्याकडे टू व्हीलर होती आणि तिनेच मी इंटरव्हयूह ला जाणार होते .

छान तयार  होऊन मी इंटरव्हयूह ला वेळेत पोहचावे म्हणून लगेचच निघाले . गाडी सुरु केल्यावर लक्षात आले कि गाडीत पट्रोल कमी आहे . पण आता पट्रोल भरत बसले तर वेळेत पोहचणार नाही .. उशीर  होईल म्हणून  तशीच  गाडी चालवत राहिले . भोसरी गावा  जवळ जाता जाता वाटेत एक पेट्रोल पंप  लागला तरीसुद्धा पण थांबले नाही .कारण वेळेत पोहचणे महत्वाचे होते .

 

तिकडे गेले इंटरव्हयूह झाला ; पण निघता निघता ७ वाजले . तिथून निघाले ते पट्रोल पंप शोधतच पण काय गम्मत वाकडेवाडी ते कासारवाडी एकही पेट्रोल पंप  नाही . खडकीत एक पेट्रोल पंप होता पण तो बंद होता . मनात  विचार चालू झाले .. त्या भोसरी गावा  जवळच्या पेट्रोल पंपा पर्यंत गाडी जाऊ दे मग तिथे भरेन . असा विचार करता करता गाडी चालवत होते आणि गाडी नाशिक फाट्यावरून आतमध्ये पुणे नाशिक हायवे ला वळवली आणि पुढील दोन मिनिटांतच  गाडी ड्राय होऊन बंद पडली .

त्यावेळीची ती इतकी गंभीर  सिचवेशन होती . नाशिक फाटा ते भोसरी गाव रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठाली झाडे .. रस्त्यावर लाईट नसायचे .. त्यावेळी मोबाईल पण नव्हते . फोन करायचा झाला तर एस टी डी बूथ वरून किंवा कॉइन बॉक्स वरून करावा लागायचा . नॉर्मलीच जाताना असे वाटायचं कि जंगलातून जातोय आणि अशा काळोखात माझि गाडी बंद पडली होती . जाणारे येणारे  ट्रक  दिसत होते .. मधेच एखादी रिक्षा फास्ट जाताना दिसायची .. मी आजू बाजूला पाहिले .. रस्त्यावर चिट पाखरू पण नव्हते .. मागेही जाऊ शकत नव्हते आणि पुढेही जाणे शक्य नव्हते . रात्रीचे ८ वाजून गेले होते .. आणि नुसता कला कभिन्न अंधार होता . अशा वेळेला कुत्र्या मांजराची तर भीती वाटतेच पण मनुष्यप्राण्याची पण भीती वाटते . घसा  सुकायला लागला .. खूप टेन्शन मध्ये आले होते.

 

तितक्यात एक मिडल एज व्यक्ती डायरेक्ट समोर आली . कशी कुठून आली  मला काहीच कळलं नाही . मला म्हणाली " पेट्रोल संपलं का ?"

 मी घाबरतच  म्हटले " हो "

 

मला ते म्हणाले " तू चालव .. मी तुझ्या गाडीला मागून ढकलतो . भोसरी गावात पुढे पेट्रोल पंप आहे "

 

छातीत धडधड होतीच पण मीही पटकन हो म्हटले आणि गाडीवर बसले .  मी गाडीचे हॅन्डल आणि ब्रेक हातात धरला होते आणि ते मागून गाडी ढकलत होते . मी त्यांचा चेहराही नीट पहिला नव्हता .. फक्त एक आपल्या वडिलांच्या वयाची व्यक्ती आहे एवढे कळले होते . काळोखात त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता . माझी गाडी जोरात पुढे चालली होती.. मागून ते गाडी ढकलत असल्याने श्वासांचा आवाज जाणवत होता .. थोडा दम  लागल्या सारखा .

 

मला भीती तर खूप वाटत होती पण त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त काही पर्याय नव्हता . ढकलताना ते मला म्हणाले

 

“मला डॉक्टरांनी रोज चालायला सांगितलंय म्हणून मी रोज भोसरी गावातून नाशिक फाट्या  पर्यंत चालत जातो आणि  येतो . आता परत निघालोय . मला हार्ट चा प्रॉब्लेम आहे . "

 

इतक्यात १० मिनिटातच भोसरी गावातील त्या पेट्रोल पंपा जवळ गाडी पोहचली . मी गाडी थांबवून मागे वळाले त्यांना थँक यु म्हणायला .. मागे बघते तर कोणीच  नाही .. ती व्यक्ती कुठे गेली सेकंदात डोळ्याआड कशी गेली . काहीच कळलं नाही . जशी अचानक समोर आली तशीच अचानक गायब झाली . गायब म्हणण्यापेक्षा दिसेनाशी झाली . खरंतर त्यांचा चेहराही मला नीट दिसला नाही . पण आजही पुसटशी आकृती माझ्या डोळ्यासमोर आहे .

गाडीत पट्रोल भरले आणि भर्रकन घरी आले . क्षणभर शांत बसले . छातीत एक अनामिक धडधड सुरूच होती . कोण होते ते ?कुठून आले ? कुठे गेले ? जाताना मला दिसले का नाहीत . फक्त अंधारात बरोबर होते . उजेड आल्या आल्या कुठे गेले ? असंख्य प्रश्न पडले . आणि या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती आणि आजही नाहीयेत . पण हेच प्रश्न मला बरेच काही सांगून गेले .. शिकवून गेले .

 

माझा परमेश्वरावर विश्वास होताच पण आता तो दृढ विश्वास विश्वास झाला होता . " त्याचा " माझ्या बरोबर असण्याचा फील  मला आला होता . कदाचित ती व्यक्ती खरोखरं सामान्य असेल पण माझ्या साठी ती असामान्यच होती . हार्ट चा  प्रोब्लेम असेलेली व्यक्ती साधारण १० किलोमीटर इतकं अंतर धावून जाऊ शकते का ?

असो आजही बाहेर पडताना , चांगल्या कामाला जाताना परीक्षेला जाताना शुभ कार्याला जाताना मी परमेश्वराला माझ्या बरोबर घेऊन जाते आणि हो माझा विश्वास आहे कि तो हि माझ्या बरोबर येतो !!!

https://fb.watch/4m0VYpvX8w/

©शीतल महामुनी माने

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now