पुरूषासारखा पुरूष असून . . .

Tragedy of a Man


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !

©® स्वाती बालूरकर , सखी


सुट्टीचा दिवस, सकाळचे ९ वाजून गेलेले.
दिलीप गाढ झोपेत होता व दारावरची बेल वाजली. कितीतरी वेळ बेल बाजली. मग त्याने दार ठोठावले. दोन चार वेळा ते झाल्यावर घरात कुठेतरी हालचाल झाली.

दिलीपने वैतागून आवाज दिला, "आलो आलो. . कोण आहे इतक्या सकाळी"

दार उघडताच दाराला रेलून उभा असलेला शोभित त्याच्या अंगावर कोसळता कोसळता राहिला.

"तू आहेस काय? कसले मित्र . .. काय दोस्त यार तुम्ही सुट्टी दिवशी झोपू पण देत नाय आरामाने."

असं बोलेपर्यंत शोभित सावरला होता.

दिलीपचं लक्ष गेलं त्याच्याकडे. डोळे लालबुंद म्हणजे आरक्त !

"शोभ्या मायला विकेंड मिळाला की एवढी ढोसायची का बे ? डोळे बघ बेवड्यासारखे झालेत. . . तुम्ही लोकं ना लग्न करूनही सुधरत नाही राव!"

शोभित जणु काहिच ऐकत नव्हता त्यावेळी.

"आत आणखी कुणी आहे का ?" शोभित ने हरवल्यागत विचारलं.

"एवढं कुढलं नशीब आमचं. . . बेडरूम मधे कुणी असायला?"

दिलीप अजूनही झोपेच्या अधीनच होता, खांद्यावर चादर व डोळे किलकिले करून कधी शोभीतकडे तर कधी छताकडे पहात होता.

"माधव नाहीय ना आत?" हे विचारताना ही शोभितच्या आवाजात ओलावा आलाच होता.

" नाही यार ,गावी गेलाय तो." दिलीपने दरवाजा बंद केला आणि वळून पाहतो तर शोभित हॉलमधे नव्हता.

दिलीप आत बेडरुम मधे गेला तर पाहून बेचैन झाला.

शोभित बेडवर अस्ताव्यस्त पडून हुंदके देवून रडत होता.

दिलीपची झोप झटक्यात उडून गेली.

"शोभ्या काय झालं यार ? मी तर काहिच नाही बोललो तुला ! रडतोय कशाला?"

दिलीपने अंगावरची चादर फेकली आणि पटकन पाणी घेवून आला.

शोभित तसाच हमसून रडत होता.

"अरे पाणी घे, शोभ्या गप ना! कशाला रडतोय ते तर सांग ? तुला तर कधीच रडताना पाहिलं नव्हतं "

राहून राहून तो रडतच होता. एक घोट पाणी पिऊन तो दिलीपच्या गळ्यात पडला व आणखीनच रडायला लागला.

"दिल्या संपलं रे सगळं !"
"अरे गप ! काय संपलं ? काहीही काय? इतकी मोठ्या पगाराची नोकरी लागलीय, कसली सुंदर आवडीची बायको मिळालीय अन काय रे संपलं म्हणून रडतोय. . . काय हे? आमचं तर कशात काही नाही मग आम्ही काय करायचं?"

" दिल्या गंमत नाही रे. . मला मोठ्याने हंबरडा फोडून रडावं वाटतंय . . . काय करू सांग ना?"
शोभित ओरडून म्हणाला. त्या कर्कश पण दुखाने भरलेल्या आवाजाने दिलीपला काहीतरी वेगळच वाटलं.

"हंबरडा फोडून रडावं वाटतंय ! शोभ्या काय गोंधळ आहे हा? विचार कर अन स्पष्ट सांग काय झालंय ते ? मी काय करू शकतो? . . . रडणं बंद कर अगोदर, पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय यार ?"

" पुरूषासारखा पुरूष . . . ? पुरुष ?पुरूषासारखा पुरूष . .. . अरे काय हे? जगू देता की नाही माणूस म्हणून. . . ? पुरूष असला तरीही आहे तर माणूसच ना ! रोबोट नाही!"

आता त्याच्या या आवाजातला आक्रोश कळाल्याने दिलीप स्तब्धच झाला.

दिलीप चार वर्षांपासून शोभितला ओळखत होता पण त्याचं असं रूप त्याने कल्पनेतही पाहिलं नव्हतं .
किती सुव्यवस्थित , शिस्तीतला हुशार व संतुलित मुलगा म्हणून ओळख होती त्याची!

मन मिळावू व खूप कामसू, मेहनती मुलगा!
काय झालं असेल याला? सांगेल का? पण मग सर्वांना सोडून हा माझ्याकडे आलाय म्हणजे मला त्याला वेळ दिलाच पाहिजे.
त्याला मोकळं रडू द्यावं या विचाराने दिलीप पुन्हा त्याच्या जवळ बसला व त्याला मिठी मारली.

शोभित खूपच भावनिक झाला आणि मग थोडावेळाने शा्त झाला.

"काय झालं शोभ्या? बोलनारे!"

"दिल्या, ती गेली रे . . मला सोडून ?" तो पुन्हा अश्रुमय डोळ्यांनी बोलला .

"कोण?"
मनात हजार प्रश्न उभे राहिले , ती म्हणजे कोण असे?

" शर्वरी! अजून कोण?"

"शर्वरी गेली?? काय बोलतोयस ? कधी ?"

"आजच सकाळी ?"

"अन तू इथे काय करतोयस? कशाने गेली ? काय झालं होतं . . ?"

"अरे मूर्खा. . . गेली म्हणजे दूर गेली . . . मला सोडून . . ! "

"मायला जीव काढतो राव तू! तसं सांग ना की शर्वरी गावाला गेली. . . असं रडत होतास तर वाटलं. . कुणी ?" दिलीपने पटकन तोंडावर बोट ठेवलं.

क्रमशः
(कळेलच पुढच्या भागात, नेमकं काय झालंय ते!)

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक १०. ११ .२२

🎭 Series Post

View all