मळभ

आपल्या संसारावर आलेले मळभ नमिता कसे दूर करते..

" मुलांनो, उठा.. सकाळ झाली, सूर्य उगवला.."

" आई प्लीज, सकाळी, सकाळी तुझे भारूड नको ना.."

" तुम्हाला कसे माहीत याला भारूड म्हणतात ते.."

" कारण गेले अनेक वर्षे आम्ही ते ऐकत आहोत.. प्लीज आज तरी आम्हाला झोपू दे ना.." नमिताचा नवरा अनिकेत कानावर उशी घेत म्हणाला..

 "तुम्हाला ना माझे कशाचेच कौतुक नाही.. मी एवढ्या सकाळी उठून तुमच्यासाठी इडली सांबाराची तयारी केली.. आणि तुम्हाला झोपेचे पडले आहे.."

" प्लीज आमची झोप घालवू नकोस. वाटल्यास तू ही इथे येऊन झोप.." अनिकेत आणि मुले तिला जागा करून देत म्हणाले..

" झोपा तुम्ही.. मी जाते खाली.." ती चिडून म्हणाली..

" चावी घेऊन जा.." छोटी परी पुटपुटली..

" हो......." जोरात ओरडून ती बाहेर पडली..

बाहेर पडली तर खरी, पण जाणार कुठे हा प्रश्न आता नमितापुढे पडला होता.. अनिकेतची नुकतीच या शहरात बदली झाली होती.. त्यामुळे तिला इकडची काहीच माहिती नव्हती.. परीचे आणि पार्थचे शाळेत ॲडमिशन झाले होते, ती शाळा आणि बाजार या व्यतिरिक्त बाकी कुठे ती फिरलीच नव्हती.. तशीच ती फिरत फिरत निघाली.. आजूबाजूला तिला एक पार्क पाहिल्यासारखे आठवत होते. तिने तिथेच जायचे ठरवले.. नमिता पार्कात पोचली तेव्हा बरेचजण तिथे फेऱ्या मारत होते.त्या सर्वांचे बघून तिनेही एक फेरी मारायची ठरवली.. पार्काच्या मधोमध एक छोटेसे गणपतीचे मंदिर होते.. आपल्या आराध्याचे दर्शन घ्यावे म्हणून ती मंदिरात जाणार इतक्यात समोरून येणाऱ्या व्यक्तीवर ती धडकली.. 

      "सॉरी हा.. ॲक्चुली माझी चप्पल पायातून सरकली. तिथे असलेला चिखल मला दिसलाच नाही."

 " इट्स ओके.. बरेच जण इथे घसरतात. पार्कातील माती आणि इथे झाडांना घातलेले पाणी.. सकाळी चिखलच असतो इथे.. तुम्हाला लागले नाही ना?"

" नाही.. थँक यू.." नमिताने स्वतःला सावरले.. कसेबसे तिने देवाचे दर्शन घेतले.. निघताना तिला जाणवले कि तिची चप्पल मगाच्या धक्क्यामुळे कधीही तुटू शकते.. त्यामुळे आल्यावेगाने जाणे तिला शक्यच नव्हते.. त्या तरुणाची नजर आपला पाठलाग करते आहे हे तिला जाणवत होते.. तिने शक्य तशी पावले उचलत घर गाठले आणि सुटकेचा निश्वास टाकला.. इथे घरी अजूनही सगळे झोपेतच होते.. ती गेले एक तास बाहेर होती याचा काहीच फरक न पडता.. आता मात्र ती थोडी वैतागली.. आधी हातपाय धुवून आली.. आणि गुपचूप जोरात रेडिओ लावून बसली.. अपेक्षेप्रमाणेच लगेचच सगळे मेंबर्स उठून रेडिओ बंद करायला धावले.. झोप पूर्ण झाल्यामुळे कटकट न करता सगळे आवरायला लागले.. त्यांच्यामागे लागता लागता नमिता सकाळची गोष्ट विसरून गेली.. रविवार असल्यामुळे सगळ्यांचेच रमतगमत चालले होते.. संध्याकाळी फिरायला जाताना गर्दीत एक ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला.. पण परत बघेपर्यंत तो नाहिसा झाला होता.. तिनेही मग जास्त विचार केला नाही.. रात्री झोपताना तिने नवर्‍याशी बोलायचा प्रयत्न केला.. पण त्याला आता वेध लागले होते, त्याच्या उद्याच्या कामाचे.. मग नमितानेही तो विषय वाढवला नाही.. 

       दुसर्‍या दिवशी दोन्ही मुले शाळेत, नवरा ऑफिसला गेल्यावर काय करायचे हा प्रश्नच होता.. मग नमिताने कालच्याप्रमाणे पार्काला एक फेरी मारून येण्याचे ठरवले.. काल गणपतीचे नीट दर्शन घेता आले नव्हते, आज तरी घ्यावे म्हणून ती मंदिरात गेली.. नमस्कार करून निघणार इतक्यात तिच्या ओढणीला हिसका बसला. बघितले तर ती कालचीच व्यक्ती.. नमिताची ओढणी नेमकी त्याच्या घड्याळात अडकली होती.. 'आज परत' नमिताच्या मनात विचार आला.. 

"सॉरी हा.. माहित नाही ओढणी कशी अडकली ते.."

" ते मगाशी तुम्ही ओढणी पाठी ढकलली ना तेव्हाच अडकली.. पण तुम्ही मनोभावे नमस्कार करत होता म्हणून डिस्टर्ब केले नाही.."

" एकच मिनिट हं.. मी सोडवते.."

" तुम्ही रोज येता इथे.."

" नाही.."

"मी आधी कधी पाहिले नाही तुम्हाला."

" माफ करा.. मला ना जास्त बोलायला आवडत नाही.. निघाली ओढणी.. निघते मी.."

त्या अनोळखी तरूणाच्या धाडसाने नमिता थोडी घाबरली सुद्धा होती, वैतागली तर जास्त होती.. तशीच धुसफुसत ती घरी आली.. 'का हा माणूस सतत माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो.. दोनदाच योगायोगाने झालेली भेट.. दिसली एखादी बाई, कि करायची बोलायला सुरुवात.. आणि माझ्याशीच का?' मनात विचार करता करता नमिता आरशासमोर येऊन उभी राहिली.. पस्तिशीचे वय.. पण आरशात ती स्वतःलाच तिशीची भासत होती.. दोन मुलांच्या जन्मानंतर भरलेले पण जास्तीची चरबी जमा न झालेले शरीर.. कंबरेपर्यंत आलेली वेणी.. चेहर्‍यावर ना मेकअप ना काही.. फक्त टिकली.. 'आहे काय माझ्याकडे कि कोणीही येऊन बोलण्यासारखे.." अस्वस्थ मनानेच तिने अनिकेतला फोन लावला.. नेहमीप्रमाणे मी कामात आहे, नंतर बोलतो म्हणून त्याने फोन ठेवला.. "घ्या लोकं इथे मी त्यांच्याशी बोलावे म्हणून प्रयत्न करतात आणि हा नवरा ना.. म्हणतात ना.. दुनिया है मेरे पिछे, लेकिन मै तेरे पिछे, अशीच गत झाली आहे माझी.." नमिता स्वतःशीच बडबडत होती. घर आवरेपर्यंत मुले सुद्धा शाळेतून घरी आली.. परत त्यांचा अभ्यास, खाणेपिणे यात तिला सगळेच विसरायला झाले.. मुले संध्याकाळी खेळायला गेल्यावर तिला विचार करायला थोडा वेळ मिळाला.. खरेतर इतक्या वर्षात कोणी त्यातही एखादा पुरुष समोरून बोलायला यायची तिला सवय राहिली नव्हती.. लग्नाआधी ती कामाला जायची, पण अनिकेतची चांगल्या पगाराची पण फिरतीची नोकरी आणि सगळ्यांनी एकत्र राहायचा तिचा अट्टाहास म्हणून ती घरातच होती.. नवीन ओळखी झाल्या तरी मुख्यतः बायकांच्या आणि त्यांच्या तर्फे त्यांच्या नवर्‍यांच्या.. हा अनुभव तिच्यासाठी नवीनच होता. नकोच हि काही भानगड.. उद्यापासून पार्कात जाण्याची वेळ बदलू म्हणजे झाले.. तिने स्वतःशीच ठरवले.. 

        दुसर्‍या दिवशी तिने आधी घर वगैरे आवरले, मग आरामात फिरायला निघाली.. पण आज तर तो पार्कच्या प्रवेशद्वारापाशीच उभा होता.. पाहिले न पाहिल्यासारखे करून ती पुढे निघाली.. तेवढ्यात तो समोरच आला, "आज उशीर झाला वाटते?"

" हो, थोडा.."

" तुम्ही जास्त बोलत नाही का?"

" मी अनोळखी लोकांशी बोलत नाही.."

" ओह्ह.. मग आता ओळख करून घ्यायला काय हरकत आहे?"

" हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे.."

" गैरसमज तुमचा होतो आहे.. मला फक्त तुमच्याशी बोलावेसे वाटले, तर त्याचा तुम्ही बाऊ करता आहात.."

" हे बघा, तुम्ही जे कोण असाल ते, मी फक्त इथे राऊंड मारायला येते.. गप्पा मारायला नाही.." तुटकपणे बोलून नमिता तिथून निघाली.. आज पहिल्यांदाच तिने त्याला पाहिले.. चेहर्‍यावरुन तो तिशीच्या आसपास वाटत होता.. 'लहान मुलगा आहे.. पण म्हणून कोणालाही त्रास द्यायचा?'

तिने फेरी पूर्ण केली.. तो अजूनही तिथेच एका खांबाला टेकून उभा होता.. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तशीच घरी निघून आली.. 'आता वजन वाढले तरी चालेल, पार्क नको आणि ती राऊंड पण नको..' आणि खरेच पुढचे दोन दिवस ती गेलीच नाही पार्कात.. घरी बसून करणार काय? खूप दिवसात फेसबुकवर काय चालले आहे,पाहिले नव्हते म्हणून ते चालू केले.. तर दोन तीन नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट.. एक त्या मुलाची होती.. त्याला माझे नाव कसे कळाले? तिने त्याचे नाव वाचले.. "ऋषीकेश" नाव तर छान आहे.. पण कर्म? तिने ती रिजेक्ट केली.. आता तर मोबाईलवर पण मन होईना.. तशीच उठून ती खिडकीत उभी राहिली.. तो तिथे उभा होता.. 'हा काय निर्लज्जपणा लावला आहे त्याने?' नमिता तशीच खाली गेली..

" काय हवे आहे तुम्हाला?"

" मी सांगितले ना, मला फक्त तुमच्याशी मैत्री करायची आहे.."

" मी हि सांगितले ना, मला नाही करायची.. मग का असा त्रास देतो आहेस? आणि ओळखतोस तरी कितीसा मला? दोनदा काहीतरी घटना घडली..बस.."

" तेच तर ओळखायचे आहे.."

" मला गरज वाटत नाही.. आणि यापुढे जर परत असा प्रयत्न केलास तर पोलिसात देईन.." नमिता तिथून निघून घरी आली. आपल्या धमकीचा परिणाम झाला कि नाही हे पाहण्यासाठी तिने खिडकीतून खाली पाहिले.. तो तसाच उभा होता.. हे काहीतरी गंभीर आणि विचित्रच प्रकरण आहे हे तिला जाणवले.. एक क्षण तिला वाटले, आपण हे अनिकेतला सांगूया, पण होणार दोनच गोष्टी. एकतर तो चिडवणार, या वयातही मजनू आहेत तुझे म्हणून किंवा चिडून मारामारी तरी.. मधला रस्ताच नाही. असेच काही दिवस गेले.. नमिताने स्वतः खाली जाणेतर सोडलेच होते.. मुलांनाही ती फार कमी पाठवायची. सतत कसली तरी भिती वाटत रहायची.. तिच्या सुखी संसारावर मळभ आल्यासारखे तिला वाटत होते. अनिकेत त्याच्या कामात एवढा गुरफटला होता कि त्याला घरात लक्ष द्यायला वेळच नव्हता.. आणि तो जेव्हा घरी असायचा मुले आणि तो तिघांचेच काहीतरी चालू असायचे..  

        मुलांना शाळेत सोडून ती बसली होती.. अचानक फोन वाजला.. अनोळखी नंबर होता..

" हॅलो.."

" मी बोलतो आहे.." नमिताने शांतपणे मनात एक ते दहा अंक मोजले.. 

" बोला.."

"प्लीज, मला समजून घ्याना.. त्या दिवशी तुम्ही पडताना, तुमचा झालेला स्पर्श, तुमचा तो चेहरा.. मी पाहता क्षणीच तुमच्या प्रेमात पडलो आहे.."

नमिताने एक दीर्घ श्वास घेतला..

"प्रेम आहे म्हणता ना?"

" हो.."

"मग माझ्या प्रेमाचे काय? माझे माझ्या नवर्‍यावर, मुलांवर जीवापाड प्रेम आहे त्याचे काय? आज तुमचे जे काही वागणे आहे, ते जर माझ्या नवर्‍याला कळले, तर माझ्या सुखी संसारात विघ्ने येतील चालेल तुम्हाला?"

समोरून काहीच आवाज येत नव्हता.

"मला माहीत नाही, तुमचा असा गैरसमज का झाला कि मीही तुम्हाला प्रतिसाद देईन. प्रत्येक विवाहित स्त्री संसारात असमाधानी असेल असा जर समज असेल तर काढून टाका..  तुमच्या एका चुकीमुळे एखादा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. तिच्या मुलाबाळांवर काय परिणाम होऊ शकतो.. थोडा तर विचार करा.."

 समोरून फोन कट झाल्याचा आवाज आला.. आपले बोलणे योग्य होते कि अयोग्य नमिता याचाच विचार करत होती.. नंतरचे काही दिवस ऋषीकेश दिसलाच नाही.. नमिताला एका बाजूला हायसे वाटले तर दुसरीकडे त्याचे काय झाले असावे असा मनात विचार येत होता.. नमिताने परत पार्कात जायला सुरुवात केली.. एक दिवस अचानक तो समोर आला..

" हाय.."

" हॅलो.."

" दोन मिनिटे वेळ आहे?"

नमिताने एक दोन क्षण विचार केला..

" हो.."

" एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची होती.. चालेल का?"

" हो.." त्याने एक फोन केला..

" तुमच्या बोलण्याचा मी खूप विचार केला.. भूल पडल्यासारखे झाले होते माझ्यावर ते काही दिवस.. मग नंतर ठरवले कि ज्या व्यक्तीला प्रेमाची गरज नाही तिच्यासाठी झुरण्यापेक्षा ज्याला गरज आहे.. तिथे ते प्रेम द्यावे.. मी लग्न केले आहे.. एका अनाथ आश्रमातल्या मुलीशी.."

समोरून एक तरूणी येत होती.. त्याला साजेशीच वाटत होती.. 

" हि मेघा, माझी बायको.."

तिने नमिताला नमस्कार केला.. 

" हिला घेऊन नक्की एकदा ये घरी.. आणि सुखाने संसार करा.."


आपल्या संसारावरचे मळभ निघून गेल्याच्या आनंदात नमिता हसत हसत घरी आली..