मला सुट्टी हवी आहे

कहानी हर घर की कहानी घर घर की

"आम्हाला सुट्टी हवी आहे!" सतत उभं राहून दमलेले पाय म्हणाले.. अन् ती चक्क जमिनीवर फतकल मारून बसली.


"आम्हाला पण सुट्टी हवीय.." सतत संगणक अन् मोबाईलवर काम करून थकलेले डोळे म्हणाले अन् तिने डोळे बंद करून एक मस्त डुलकी काढली.

"सतत धडधडून मी पण दमलोय.. माझ्याकडे दुर्लक्ष होतंय तुझं! बघ बरं, मी पण सुट्टी मागेन नाहीतर!" हृदयाने क्षीण आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला होता.. पण तो तिला ऐकू गेलाच नाही!!

अखेर हृदयाने सुट्टी घेतली.. अन् आईबाप, नवरा अन् पोरंबाळं एका क्षणात पोरकी झाली..

***

"आई,आपण रितूदीदीच्या लग्नाला जायचंय ना?"प्रणिती आत्तेबहिणीच्या लग्नाला जायला उत्सुक होती.

"नाही! पप्पा एकटेच जातील. तुझे एक्स्ट्रा क्लासेस आहेत ना! आपण घरीच राहणार!" आईने जरबेने सांगितलं.

"मी अभ्यास मॅनेज करेन ना! फक्त दोन दिवस!! मागे आपण विशूदादाच्या मौंजीला पण नव्हतो गेलो.. तेव्हा तर सुट्टी होती क्लासला! सगळे आले होते.. फक्त आपणच नव्हतो!" प्रणितीने चिडचिड केली.

"हे बघ,प्रणिती! आमच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.. ह्या फालतू समारंभांसाठी तू तुझं करियर धुळीला मिळवणार आहेस का?" आई संतापली.

"आई!" प्रणितीनेही आवाज चढवला.. "मला सुट्टी हवीय.. सतत चालणाऱ्या एक्स्ट्रा क्लासेसमधून.. तुमच्या अपेक्षांमधून.. अन् मी न पाहिलेल्या स्वप्नांमधून!!मला मोकळा श्वास घ्यायचाय!"

"बाळा,हेच वय आहे अभ्यासाचं! हे दिवस वाया गेलेत तर पुन्हा मिळणार नाहीत!" आई कळवळून म्हणाली.

"तेच तर! हेच दिवस आहेत तिचे बागडण्याचे! पुन्हा परत येणार नाहीत!" प्रणितीचे पप्पा म्हणाले.. अन् आई निःशब्द झाली.

***

"खूप दमलेय रे! मला सुट्टी हवीय!!" रेवा तिच्या नवऱ्याला म्हणाली.

"अगं, मग घे की! त्यात काय!!" नवरा बेफिकीरीने बोलला आणि रेवाने ऑफिसात रजा टाकलीच.

"आई, तुझी रजा आहे तर आज मटारपनीर करूया!" चिरंजीव म्हणाले अन् रेवा तयारीला लागली.

"आज तुला सुट्टी आहे तर थोडं फराळाचं करू या!मेधाकडे पाठवायचंय!" सासूबाईंनी फर्मान सोडलं..अन् रेवाने पदर खोचला.

"तुझी सुट्टी आहेच तर टेलिफोन ऑफिसमध्ये जाऊन ये गं! लॅंडलाईनचं बिल खूप जास्त आलंय!" सासऱ्यांनी आज्ञा केली अन् लगोलग रेवाने स्कूटी काढली.

रात्री रेवा नवऱ्याला म्हणाली, "खूप दमलेय रे! मला सुट्टी हवीय!"

"सुट्टी? अगं आजच तर घेतलीस ना! आता पुन्हा?" नवरा बेफिकीरीने म्हणाला अन् मान वळवून झोपी गेला.