मला ना जेवणच जात नाही.. भाग २

कथा एका जेवणाची


मला ना जेवणच जात नाही.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की दुसर्‍या शहरात राहणाऱ्या आपल्या लेकीला सुधाताई आपल्याला जेवण जात नाही असे सांगत असतात. ते ऐकून चित्रा आईकडे यायला निघते. आता बघू पुढे काय होते ते.


" अग चित्रा.. तू? अशी अचानक कशी आलीस? काहीच बोलली नाहीस फोनवर?" सुधाताईंना लेकीला बघून आनंद झाला होता. चित्रा मात्र इथे तिथे बघत होती.

" ते तुला सरप्राईज द्यायचे म्हणून."

" चांगलंच सरप्राईज दिलेस ग.. तू हातपाय धुवून ये. मी चहापाण्याचे बघते." सुधाताई लगबगीने आत गेल्या. नाही म्हटलं तरी चारपाच तासांच्या प्रवासाने चित्रा थकली होती. हातपाय धुवून ती सोफ्यावर बसली. तर तिथे चणेशेंगदाणे ठेवलेले होते.

" आई, वहिनी मुलांना ओरडत नाही का ग? खायच्या वस्तू इथे सोफ्यावर टाकून गेले आहेत?" चित्राने आईला विचारले.

" काय आहे तिथे?"

" चणेशेंगदाणे.." ते ऐकून सुधाताई पटकन बाहेर आल्या.

" अग, मुलं नाही काय.. मीच खात होते ते. संध्याकाळी खायला बरं वाटतं."

" मुलं आणि वहिनी कधी येतील?"

" मुलं आत्ताच गेले आहेत ट्युशनला. येताना सहाच्या सुमारास समिधाच घेऊन येईल त्यांना. तू चहा घे ना." आईला बघून चित्राला पण बरं वाटत होतं. तिला वाटलं होतं तशी आई खंगलेली वगैरे वाटत नव्हती. खूप दिवसांनी भेटल्यामुळे दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. सहाच्या आसपास सुमेधा सुद्धा मुलांना घेऊन आली. आत्याला बघून सोहम आणि साक्षी खुश झाले.

" अरे, चित्रा.. अचानक. आणि मुले कुठे आहेत?" सुमेधाने विचारले.

" नाही आणलं अग मुलांना. आईला खूप भेटावसं वाटत होतं. मग वाटलं की एका दिवसासाठी मुलांना कशाला त्रास?" चित्रा आवाजावर ताबा ठेवत बोलली.

" बरं.. तुम्ही बसा गप्पा मारत. मी आलेच." सुमेधा आत गेली. आतून साक्षी दोन ग्लास फळांचा रस घेऊन आली. तिने ते सुधाताईंच्या हातात दिले.

" आज अचानक फळांचा रस?" आश्चर्याने चित्राने विचारले.

" अचानक नाही आत्या. आमच्या क्लासच्या इथे एक ज्युस सेंटर आहे. आई रोज पैसे देते. मी आणि सोहम तिथेच पितो. आजीसाठी पार्सल आणतो." साक्षी बोलत होती.

" आणि आई?" चित्राने कुतूहलाने विचारले.

" ती कधी आली लवकर तर भाजी वगैरे आणायला जाते. नाहीतर कधी मी आणि सोहम जबरदस्ती करून तिला आमच्यातला रस प्यायला लावतो." सुधाताईंचा पोटभर रस पिऊन झाला. त्या तिथेच टिव्ही बघत बसल्या. काहीतरी आठवल्यासारखे त्यांनी सुमेधाला आवाज दिला,

" अग काहीतरी गोड कर.. इतके दिवसांनी ती आली आहे तर.."

" हो.. शिरा करते." सुमेधा म्हणाली.
चित्रा काही न बोलता फक्त बघत होती. शशांक आल्यावर सगळे जेवायला बसले. सुधाताई फक्त शिरा खात होत्या. बाकी त्यांनी काही खाल्ले नाही. सुमेधा इतरांना काय हवं नको ते बघत होती. आवडतो म्हणून चित्राने शिरा खायला सुरुवात केली, तर त्यात काजूबदाम काहीच नव्हते. तिने चमकून सुमेधाकडे बघितले. तिला ती नजर जाणवली. बाकीचे सगळे गप्पपणे जेवत होते म्हणून चित्रा काहीच बोलली नाही. पण आपल्या आईला सुकामेवाही खायला मिळत नाही. ही गोष्ट तिच्या मनाला लागली होती.


बोलून टाकेल का चित्रा मनातले दादा आणि वहिनीला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all