मला भावलेले गुरु

ईरा : शब्दांचा गुरु

मला भावलेले गुरु…!!

   

   आई , वडिल , शिक्षक , मित्र , सहवासातील व्यक्ती या नेहमी आपल्याला  मार्गदर्शन करत असतात.यांची शिकवण , यांचे थोर संस्कार जीवनाला वेगळी कलाटणी देतात.यांच्या संस्कारातून जीवनाचे मार्गक्रमण करत असताना आपण त्यांच्या विचारांचे किती आचरण करतो यावर आपले यश अवलंबून असते.निश्चितच अशा गरुंना दैनंदिन जीवनात अढळ स्थान आहे.अशाच माझ्या जीवनाला सकारात्मक वळण देणा-या गुरुंची आठवण झाली की त्यांचे योगदान आठवते आणि त्यांच्या आठवणी मनाला रुंजी घालतात.

    माझ्या लहाणपणीचे दिवस आठवतात.मला शाळेला जायाला फार कंटाळा येत असे.कोणत्या ना कोणत्या कारणाने शाळा चुकवायची हाच माझा नित्यक्रम असे.शाळेची वेळ झाली की मी धूम ठोकलेली असायची.मी सैरावैरा पळत सुटायचा माझा पाठलाग वडिल करायचे पण घाबरुन रडून गोंधळ ठरलेला होता.घरातील सगळेजन माझ्या वागण्याला कंटाळलेले होते.शेवटी गोड बोलून आजीसोबत मी शाळा जाऊ लागलो.शाळा मंदिरात भरलेली आसायची. आजी माझ्यासोबत बसलेली असायची.माझे शाळेत बिलकूल लक्ष नसायचे.बेचैन मन कावराबावरे व्हायचं…! गुरुजी शिकवत राहायचे , आजी मी शाळेत बसेल या भावनेने हळूच घराकडे जायाची.पण माझी नजर आजीकडे जाताच ती दिसलेली नसायची मग मी पुन्हा घराकडे जाण्यासाठी तयार असायचो.मला लगेच गुरुजी पकडून धरायचे.प्रचंड हालचालीनंतर मी त्यातून पळत घराकडे सुटायचो.घरातील मंडळीना यातून कायच मार्ग सुचत नव्हता.शाळा शिकत नसलेमुळे हे पोरगं आडगचं राहाणार अशी चिंता आईवडिलांना लागली होती.

     पण आयुष्यात अशा व्यक्ती भेटतात आणि आयुष्य खूप  सुंदर होतं..! माझा हा शाळेला जाण्याचा दररोजचा खेळ आमचे चुलते आदरणीय गुंडू गुरुजी पाहत होते.ते प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते.अंगात नेहरु शर्ट , पांढरे स्वच्छ धोतर , पांढरी टोपी असा पोशाख असणारे हे गुरुजी शेजारील निंगुडगे शाळेत शिकवत होते.अत्यंत प्रेमळ आणि शिस्तबद्ध असणा-या या गुरुजींना आण्णा या नावाने सारी ओळखत असत. त्यांना मी शाळेला जावे व भरपूर शिकावे असे वाटत असत.माझा शाळेला जायाचा त्रास त्यांनी प्रत्यक्ष बघीतला होता.गावात मी शाळा शिकत नाही हे त्यांनी मनोमन जाणले होते.एकदिवस आईला त्यांनी ' नामदेवला मी निंगुडगे शाळेत घेऊन जाणार आहे ' हे सांगीतले.आईवडिलांनाही बरे वाटले.कुठंही जावू दे खरं शाळा जावू दे …!! ही भावना त्यांच्या मनात होती.माझीही बळजबरीनेच शाळेला बाहेर गावाला रवानगी होऊ लागली.मी आदराने आण्णांचा शब्द मोडला नाही त्यामुळे आणांच्याबरोबर शाळा जाऊ लागलो.शाळेला जाण्यासाठी मला ते घराजवळ नेहमी नेण्यासाठी येत असत.पाठीला दफ्तर घेऊन आम्ही बोलत चालत दोन किलोमीटर अंतर कापत शाळेला जात होतो.जाताना मला ते शिक्षणाचे महत्व  सांगत होते.शिक्षण , वाचन , मनन , चिंतन , सकारात्मक विचार , कसे वागायचे याचे दररोज धडे देत असत.आपली नजर कायम माझ्यावर राहावी यासाठी ते मला आपल्या वर्गातच बसवत असत.त्यांच्या शिकवण्याचा प्रभाव नकळत माझ्यावर होत होता.ऊन , वारा , पाऊस झेलत मी मात्र आता शाळेत रमलो होतो.आण्णा आणि माझे नाते गुरु शिष्याचे झाले होते.त्यांचा सहवास मला अत्यंत प्रिय वाटू लागला.शाळेतील दुपारच्या जेवणाच्यावेळी सर्व गुरुजींच्या बरोबर मी जेवत असे त्यामुळे आण्णा मला आपुलकीने सर्वांच्या बरोबर संवाद साधण्याची संधी देत.आण्णांच्यामुळे मी शाळेत रुळलो होतो. शाळा मला आता आवडू लागली होती.

    आण्णांच्या शिकवणीमुळे मला शाळा जाण्यात आनंद वाटत होता.पाठीवरील दफ्तराचे ओझे आता हलके वाटू लागले होते.पेन्सिल पाटीवर अक्षरे गिरवू लागली होती.मुलांच्यात मन आनंदात बागडू लागले होते. आण्णांना  मला शाळेला दररोज येताना पाहून आनंद होत होता.माझ्यातील झालेला बदल आण्णांना विस्मयकारक वाटत होता.त्यांची " पोरं शिकली पाहिजेत ' ही उक्ती खरी ठरली होती.मी नेहमी आण्णांना मनात जपत होतो.मी गावातील शाळेत एकटा जाईन ही आण्णांना खात्री झाली होती ' नामदेव तुला शाळेची सवय झाली हे त्यामुळे तुला गावातील शाळेत जावे लागेल '   असा सल्ला मला दिला.मलाही तो पटला होता.मला आता शाळा चुकवायची नव्हती.पण आण्णांचा सहवास मला सोडवत नव्हता.शेवटी जड अंतःकरणाने तो घ्यावा लागला.

       आण्णांचे संस्कार , त्यांची शिकवण , त्यांना माझी लागलेली ओढ , शिस्त आणि नियमितता , आदर , सन्मान आणि शिक्षणाचे महत्व ही आण्णांची शिदोरी घेऊन मी गावातील मराठी शाळेत नियमित जाऊ लागलो.सुरवातीचे कांही दिवस आण्णांच्या आठवणीने मन व्याकूळ होई परंतू त्यांनी दाखवून दिलेला जीवनमार्ग किती महान आहे याच्या जाणीवेने मन पुढील शिक्षण घेऊ लागले.प्राथमिक,  माध्यमिक , महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाले.नोकरीही लागली.शेतीतील ज्ञान मिळाले , प्रापंचिक गोष्टींचे अवलोकन झाले.स्थिरस्थावर  जीवन जगण्याचा आनंद मिळत आहे.पण हे सगळे घडले आण्णांच्या कृपेमुळे …!! त्यांनी शाळेचा श्रीगणेशा केला , नवनवीन गोष्टी शिकवल्या , संकटात उभे राहण्याचे सामर्थ्य दिले.जीवनातील प्रत्येक कामात त्यांची क्षणांक्षणांला आठवण येते.आज जरी ते हयात नसले तरी त्यांची मुर्ती नेहमी डोळ्यासमोर येते.एका गुरुचे वर्णन करताना लेखणीसुद्धा आनंदली होती.आज ती कृतार्थ झाली होती कारण शिष्याची शब्दसुमने त्यांच्या पायावर अर्पण केली होती.

      आण्णा तुमचे संस्कार व शिकवण अवश्य जपेन तुमचा ज्ञानाचा दिप अखंंड तेवत ठेवेन.तुमच्यासारख्या महान गुरुंना  गुरुपौर्णिमेनिमित्त  वंदन …!!

                ©नामदेवपाटील