Jan 23, 2021
माहितीपूर्ण

मला आवडलेले पुस्तक

Read Later
मला आवडलेले पुस्तक

 

मला आवडलेले पुस्तक

 

“वाचले ल्या  पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं  खरं  वाचन सुरु होत. नाहीतर बाईने केसात गजरा  माळावा   तसं  त्या पुस्तकाचं होतं . तिला स्वत: ला तो गजरा  कधीच दिसत नाही . गजरा आहे इतकाच समाधान”

अगदी तसेच माझं झालंय . हे वरील वाक्य हे माझ्या आवडीच्या पुस्तकातीलच आहे . आणि हे पुस्तक आतापर्यंत खूपदा वाचलं आहे . आणि खूपदा चाळलं  पण आहे . होय चाळलं  या साठी म्हणाले कि या पुस्तकाची हीच तर खासियत आहे . सर्व साधारण पणे आपण एखादे नवीन पुस्तक वाचायला घेतो तेव्हा सुरुवातीपासून शेवट पर्यंत असेच वाचतो . एका दमात हल्ली नाही वाचू शकत म्हणून बुकमार्कस ठेवतो . पण पॅटर्न हाच असतो . हे पुस्तक असे आहे कि त्याला न सुरुवात आहे न शेवट . ना आदी ना अंत अगदी तसेच . सहज पुस्तक हातात घ्या आणि कुठलेही पान  उघडा आणि वाचायला सुरुवात करा . काहीतरी नवीन नक्कीच वाचायला मिळेल . एक अगाध अर्थ असलेले वाक्य कानी पडेल . एक नवीन विचार तुम्हाला देऊन जाईल कि ज्याने तुमचा एखादा अडकलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल . अनेक अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर मिळेल .

तसे म्हटले तर मला प्रत्येक पुस्तकच आवडते कारण मुळात वाचायला फार आवडते . नाव  घेऊन सांगायचेच झाले तर मृत्युन्जय .. हि कादंबरी मी आठ वेळा तरी वाचली असेल .. वर्णन इतके जिवंत पणे  केले आहे कि वाचताना साक्षात कर्ण डोळ्यांसमोर उभा राहतो ..  पु.ल. देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली ..प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या व्यवहारातले आहे कि काय असे भास होऊ लागतात इतके क्लोज टू  रिअल लिहले आहे . अग्निपंख  या पुस्तकाची पहिली दोन पाने वाचली कि पंख फुटू लागतात . अशी आणि अनेक पुस्तके आहे त जी कि माझ्या मनात घर करून उभी आहेत . अजून एक   "दासबोध" रामदास स्वामींनी लिहिलेला ३०० वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ म्हणजे आत्ताच्या काळात मॅनेजमेन्ट गुरु म्हणून वापरू शकतो इतका महत्वाचा आहे .. जीवन जगताना काय करावे , काय करू नये , कसे वागावे , कसे वागू नये , भक्ती कशी असावी, व्यवहार कसा असावा , परमार्थ कधी केव्हा करावा आणि तो कसा प्राप्त करावा .. मूर्खांची लक्षणे , उत्तम पुरुषाची लक्षणे , अशे अनेक विषय हाताळले आहेत .. मी तर म्हणते हा ग्रंथ प्रतेय्काने आयुष्यात एकदा तरी वाचावा कारण  दासबोधातून खूप बोध  घेण्यासारखा आहे  .

त्यामुळे या सर्व पुस्तकातून एका पुस्तकाची निवड करून त्याच्या बद्दल लिहिणे म्हणजे आई ला विचारावे कि तुझे कोणते मूल तुला अधिक प्रिय आहे असेच मला वाटते .. आणि तरीही हा प्रश्न  जर त आई ला विचारला  तर ती म्हणेल मला माझी सर्वच मुले सारखी आहेत . माझं पण अगदी  तसेच झालय. मी वाचलेली सर्वच पुस्तके मला आवडतात आणि त्यातील एका बद्दल मी आज इथे बोलणार आहे

हे पुस्तक एकदम स्पेशल आहे .. हे पुस्तक कथा , कादंबरी , अशा  कोणत्याही  साहित्य प्रकारात मोडत नाही .. या पुस्तकाला अनुक्रमाणिका नाही .. एका परिच्छेदाचा दुसऱ्या परिच्छेदाशी कोणताही संबंध नाही . तरीही तो एका साखळीप्रमाणे बांधल  गेलय .. या पुस्तक ला कुठलाही  संदर्भ सुद्धा दिलेला नाही ..

हे पुस्तक एका दमात आणि सुरुवातीपासून शेवट पर्यंत वाचायचे नाही .. आता ५ मिनिटाचा वेळ आहे पुस्तक हातात घेतले आणि उघडले  ,येईल ते पान वाचू शकता . प्रत्येक ओळींमध्ये विचारांचे मोती आहेत .. हे मोती तुम्ही जर वाचलेत तर तुमचे विचार पण मोत्यांसारखे चमकायला लागतील .

माझ्या ह्या वर्णनावरून नक्कीच आता पर्यंत त्या पुस्तकाचे नाव तुम्हला कळले असावे .. नसेल ओळखले तर अजून सांगते

लेखक " वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व. पु . काळे ..

                पुस्तकाचे कव्हर पेज पासूनच आपल्या ज्ञानात भर पडायला लागते . कव्हर पेज वर रिका म्या  ग्लास चे चित्र आहे आणि त्याबद्दल व. पु. नी खूप छान लिहले आहे. त्याचा आशय असा कि मुखपृष्ठाचा हा पेला रिकामा आहे  आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळमटे , जळजळ स्वतः बाबतच्या अभ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला  रिकामा राहतो आणि रिकाम्या पेल्यामध्ये नव्या विचारांचे आकाश उतरते .. आणि हा पेला रिता  रहावा  असा आशीर्वाद द्या !

डोक्यामध्ये स्वतः बद्दलच्या भ्रामक कल्पना भरून डोक्याची वाट न लावून घेता ते नेहमी नवीन विचारांसाठी रिकामं राहिल पाहिजे .

व. पु . काळे यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकातील सगळे शब्दमोती बाजूला काढून ह्या पुस्तका मध्ये एकत्रित पणे  छापून विचारांचा एक गुलदस्ता बनवला आहे ..

 मला  आवडलेले पुस्तक  , माझ्या मनाच्या कुपीत ज्याने स्थान मिळवले आहे ते म्हणजे " वपुर्झा "

एका संसारिक स्त्री च्या मनात शिरून तिला नक्की काय हवे असते हे तिला सुद्धा कळत नसते ते व.पु. काळ्यांना कळले. 

"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही तो होतो भक्तीतून,प्रेमातून . प्रेमाचा उगम मनात असतो.भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो आणि या प्रेमात तिला भागीदार नको असतो . "

बायको नवर्याच्या सगळ्या चुका माफ करू शकते. अगदी त्याने तिच्यावर प्रेम केले नाही हे  सुद्धा  तिला चालते पण जर नवऱ्याच्या आयुष्यात जर दुसरी स्त्री  आल्यास  मात्र ती त्याला माफ नाही करू शकत . हे म्हणजे अगदी या गाण्यासारखेच आहे  " तुम अगर मुझको ना चाहो  तो कोई बात नहीं ... तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी "

“जी माणसे भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी घडते .काही माणसे गप्प बसतात , मनातल्या मनात कुढतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य शुष्क घालवतात .ह्याउलट काही माणसे चिडून उठतात . सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात . अशी माणसं एके काळी भावनाप्रधान होती , हे सांगून खरं वाटत नाही .”

वरील वाक्य  मनुष्य च्या स्वभावाचा इतका  गाढा विचार करून लिहिलेले अभ्यास पूर्ण वाक्य आहे .. अशी हि भावना प्रधान माणसे बदलेली आपण नेहमी बघतो पण आपल्या  लक्षात येत नाही.

असे हे वपुर्झा संसार , राजकारण , व्यक्ती स्वभाव , परमार्थ , पुरुषार्थ , अध्यात्म , भक्ती , प्रेम,भावना , स्त्री , पुरुष, लहान मुले , ज्येष्ठ व्यक्ती , प्रेमभंग , एकतर्फी प्रेम,लग्ना बाहेरील प्रेम, अशा अनेक विषयांवर त्यांनी काहींना काही तरी लिहुन  ठेवले आहे .. प्रेत्येक वेळी एक नवा विचार हे पुस्तक देऊन जाते . प्रतेय्क प्रश्नाचे उत्तर शोधले तर सापडते . क्षमा , दान, सल्ला  द्यावा कि घ्यावा , समाज , पैसा , कोणताही विषय जो आपल्या आयुष्यात जगताना महत्वाचं असतो , माणूस म्हणून समजून घ्यायचा असतो तो हाताळला आहे .

आणि भाषा तर इतकी सोप्पी आहे कि मनाला जाऊन भिडते जसे कि " संसार म्हणजे एक कोर्स आहे आणि न संपणारा अभ्यासक्रम आहे . रोज परीक्षा द्यायची असते . ”

"हू इझ wrong  "ह्याऐवजी "व्हॉट इझ wrong " ह्याचाच शोध घ्यायचा  दोघांनी ठरवले तर संसार बहरलाच पाहिजे .

कोणत्या परिस्थितीत कसे वागावे यासाठी हे पुस्तक आपण गाईड म्हणून वापरू शकतो इतका व्हास्ट त्याचा आशय आहे ..

प्रत्येक वाक्यात अगाध अर्थ आहे . जसे कि “एकाकी पण वेगळं , एकांत वेगळा . परिसराचं मौन म्हणजे एकांत . निर्वीचार मन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण .” एका साध्या वाक्यात पण किती गूढ अर्थ आहे .

अजून एक "निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तीशी चर्चा करताना सेफ वाटत नाही ." काही माणसांना कोणत्याही गोष्टीं चा  निर्णय घ्यायची खूप घाई असते त्यामुळे त्यांचे तर होतेच पण  त्यांनी  घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या बरोबर जर आपण असलो तर आपले पण  नुकसान  होते .. असा अनुभव आपल्यला आयुष्य  जगताना कित्येकदा येतो . एकदम सा ध्या सा ध्या गोष्टीमधून व. पु  नी  मोठे तत्वज्ञान सांगितले आहे . त्यांची  निरक्षण शक्ती अपार होती . ते निरीक्षण तर करीतच असत पण त्या निरीक्षणाला सोप्या भाषेत त्यांनी या पुस्तकात लिहुन  ठेवलय.

आता हेच वाक्य बघा " ह्यांना साय हवी , दूध तापवण्याचा खटाटोप नको . सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको . गती हवी ,प्रगती नको , प्रसिद्धी हवी , सिद्धी नको .. हि अशी माणसं आयुष्य काढतात.  जगत नाहीत  .”

बऱ्याच जणांना काही करायला नको असते पण त्याचा उपभोग मात्र घ्यायचा असतो . अशा विचार सरणीच्या लोकांची एक प्रकारे कान  उघडणी या पुस्तकातून  होते

 “द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजे पुरुषार्थ नाही . जोडीदारावर अमाप माया करणं , बायकोची शक्ती ओळखणे , तिला सुरेख साथ देणे , तिला आपली साथ सोडावीशी न वा टेल  इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणे हा सगळं पुरुषार्थ”

प्रत्येक घरात जो  कमवणारा आहे मग तो पुरुष असो किंवा स्त्री तिला थोडा  तरी अहंकार येतोच . आणि न जाणते पणे ती व्यक्ती समोरच्याला दुखवत असते . आणि जी व्यक्ती पैसे कमवत नाही ते निमूटपणे ते सहन  करते . पण या पुस्तकातील या वाक्यात खरा पुरुषार्थ कशात  आहे हे सांगितले आहे . त्यामुळे नक्कीच विचारात फरक पडेल .

"ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही . एकदा का विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो "

कितीदा तरी खूप लांबचा  प्रवास माणूस एकट्याने करत असताना त्यांना एकट्याला कंटाळा येईल कि काय असे वाटत असते पण खरं तर असा एकांत हा माणसाला विचार करायला भाग पडतो . आणि हे विचार सगळेच एका मागून एक न थांबता समोर  येतात . प्रवास संपेल पण विचार संपत नाहीत .

 

" आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतःचीं गती  घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो . असच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो .पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात कि आयष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते "

 

आता वरील वाक्याचेच बघा ना . उपग्रह जेव्हा अवकाशात जातो तेव्हा नक्की काय होते याचा अभ्यास करून त्याच्या हि अर्थ मानवी स्वभावाशी तंतोतंत कसा जुळतो हे सांगून ते सामान्य माणसाला खूप काही सांगून , शिकवून जाते ..

                सुखी संसार करायचा असेल तर वपुर्झा हे पुस्तक प्रत्येकाने जवळ ठेवावे . त्याच्या प्रत्येक ओळींमध्ये , प्रत्येका  परिच्छेदामध्ये  नवीन गोष्टीचा बोध मिळेल .  पुन्हा पुन्हा वाचला तर पुन्हा मिळेल . असा हा अगाध ज्ञानाचा सागर  एका छोट्या पुस्तकामध्ये एकत्र केला आहे .. म्हणूनच हे पुस्तक मला खूप आवडते आणि ते मी पुन्हा पुन्हा वाचते आणि दर वेळी मला काही तरी नवीन शिकायला मिळते.

© सौ. शीतल महामुनी माने