७. अबोल प्रेम

एकतर्फी प्रेमाची अबोल कथा


(मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.?
मखमली कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!)

मखमली कवडसा - 7 #  अबोल प्रेम
जेव्हा जेव्हा तू मला तिच्याबद्दल सांगत गेलास त्यावेळी नकळतही तुझ्या लक्षात आलं नाही का? तू माझ्या रक्ताळलेल्या ह्रदयावरून काटा फिरवतोयस. . .माझी तगमग शब्दांत न मावण्याजोगी. . !
तू तिला लिहिलेले सुंदर- सुंदर वाक्य! फुलांसारखे, मोगरीच्या सुगंधासम, गुलाबाच्या दवांसारखे शब्द जेव्हा मी वाचले ना . . . तुला कल्पना नसेल, त्यावेळी माझ्या प्रेमाच्या धगधगता निखाऱ्यावर माझ्या भावनाच थेंब -थेंब होऊन वितळल्या गळून पडल्या आणि करपून गेल्या रेऽ ! त्याच्या दुर्गंधीचा मागमूसही तुझ्यापर्यंत आला नाही. .याचच वाईट वाटतं.
तू तिला काय - काय म्हणालास किंवा ती जे काय- काय बोलली हे केवढं आनंदाने ऐकवत होतास. . पण त्यावेळी माझ्या कानाची पेशी-न - पेशी, मस्तकातली एक- एक शीर बधिर होत होती. . .पण तिच्या प्रेमाचा हवेत सावरीच्या कापसासारखा उडणारा तू. . तुला कशा दिसतील माझ्या अंतरातल्या घडामोडी किंवा उलथा पालथ!
या सगळ्यांवर कुरघोडी किंवा कहर किंवा कळस म्हणून की काय एक दिवस तू तिला; घरी घेवून आलास .मला भेटण्यासाठी!
दोघं जोडीनं आलात . . ओळख करून देण्याची गरज उरली नव्हती . . मी समजुन चुकले. . ती सुंदर होती. . सत्य आहे ! तुझ्या योग्यही असेल . . पण . . . मी ? माझं काय?
समुद्रातल्या खलाश्याप्रमाणे तहानलेली!
तुझ्या सहवासात राहूनही किती कोरडी राहिले रे मी . . तुझ्या स्नेहाविना!
तिच्याकडे पाहताक्षणी मी माझे डोळे गच्च मिटले . . . पुन्हा ते डोळे उघडावेसे वाटले नाहीत रे!
तू. . केवढ्या आनंदात तरंगत होतास. .ती ही कदाचित मनातल्या मनात अलगद फुलत असेल . . पण मी . . . तिला पाहिलेल्या त्या क्षणानंतर मी जेव्हा डोळे मिटले ना . . ते एवढ्यासाठीच की त्यावेळी माझ्यातली मी संपले हाेते. . . शिल्लक उरलं होतं हाडामांसाचं. . भावनाविरहित शरीर !
प्रेमाचा आत्मा . . आतल्या आत थिजून नष्ट झाला होता . . हे सारं तुझ्या लक्षातही आलं नाही. . आलं नसावं का ?. . म्हणजे पुसटसंही नाही !
आत्ता सांग . . अजूनही एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे हे सांगण्याची गरज राहिलीय का ?
राजा माझे तुझ्यावर प्रेम आहे . . म्हणजे होतं!


समाप्त

© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

🎭 Series Post

View all