८. अभिसारिका

एका वाट पाहणार्‍या प्रमिकेची तगमग!
(मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया  कळवावी.?
मखमली  कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!)

मखमली कवडसा -६ # *अभिसारिका*

तुझ्यासाठी मी जितकी व्याकूळ झाले तितकी यापूर्वी कधीच कुणासाठी झाले  नव्हते. 
तसे अनेकजण या जीवनात भेटले.
कुणी प्रभावित करून गेला. .  कुणी मनावर छाप सोडून गेला.  . कुणी मित्र झाला. . भाऊ झाला. .  पण तू. . . ?
मला माहीत नाही तू काय आहेस? पण तू सर्वांपेक्षा वेगळा आहेस. .  हे नक्की! अन् तू मनाच्या  सर्वात जवळचा आहेस! 

तशा तर आठवणी सगळ्यांकडेच  असतात. आठवणीच जगण्याचं भांडवल आहेत माझ्यासाठी!
आठवणीही किती प्रकारच्या आहेत. .  पण तरीही यापूर्वी आतापर्यंत. . .  आठवणी मला सतवायच्या, त्रास द्यायच्या . . .  चांगल्या आठवणी  चेहऱ्यावर हसू फुलवायच्या. . . पण राजा आतापर्यंत कुणाचीच आठवण माझ्यासाठी अश्रू  बनली नव्हती!

काल तू गावी  गेलास . . जाताना छानसं स्मित देऊन गेलास. . . ती एक मुद्रा डोळ्यात साठवून मी रात्र काढली!. .   पण आज असह्य होतय.

ते सगळे प्रसंग आठवताहेत . . आत्तापर्यंतचे! फक्त तुझ्या माझ्या नजरेचा सामना!
शब्दांची तशी गरजच पडली नाही रे!
तुझा एक कटाक्ष . . आणि भिडणारी माझी  एक नज़र . .  बस्स!
  सगळं बोलून व्हायचं . .  डोळ्यांनीच!
  पण तरीही काल  कळलं नाही का तुला? माझ्या नजरेतले भाव.  . .  निरोप देताना मन म्हणत होतं . . जाऊ नकोस न रे. . गेलास तरीही  लवकर ये! तुझी आठवण मला जखम  देण्यापूर्वी तू ये !

  मनात खूप भडभडून येतंय रे . . बोलू तर कुणाजवळ बोलू?. .  कुणीच समजू शकणार नाही!  आणि हो. .  तसंही नाही . . राजा मी कोणालाही कसं  सांगेन हे !. .  तू माझं रेशमी हळुवार जपलेलं  गुपित आहेस. .  सुखद मनाच्या मखमली  घडीखाली दडलेलं!

आज मला तुझी प्रत्येक  वेळची नजर आठवतेय. . .  असंख्य दृष्टिक्षेप . . ते लाघवी कटाक्ष. . ते कोपर्‍यांतून पाहणं. .  तू किती वेळा वेगवेगळ्या अनुषंगाने हसलास. . त्या मुद्रा . . . मी आठवतेय!
आता  सायंकाळ झालीय  आणि या कातरवेळी सगळंच कसं असह्य झालंय. .  तू येणार नाही हे माहीत असतानाही इतक्या आतुरतेने प्रतीक्षा करणं. . याला काय म्हणाव। .  शुद्ध खुळेपणा!

आज सगळी  दुखी अाणि प्रेमाची गाणी माझी सोबती झालीयत, प्रत्येक गाण्यात,  कवितेच्या ओळीत .  मी तुला शोधत होते.

तुला तिथे कल्पनाही नसेल  मी इथे कशी जळतीय. . तू आल्यावरही कशी सांगणार मी?. .   कारण या वेदना. . संवेदना  मुक्या  आहेत . . किंवा एकतर्फी !

तुला एकच सांगावंसं  वाटतं. . . म्हणजे सतत  वाटत राहतं मनातल्या मनात . .  हवं तर तू. . बोलू नकोस माझ्याशी . . पण फक्त दिवसातून एकदा तरी मला दिसत जा ना ! काही नको फक्त नजरे समोरून जा.  त्या एका  समाधानावर मी  माझा पूर्ण दिवस घालवेन!. .  पण हा असा असह्य दुरावा  देऊ नकोस
विरह गीतं ऐकून डोळे तुडुंब भरलेत आणि अश्रू डोळ्यांच्या कडातून कानाच्या पाळीपर्यंत पोहोचून उशीची वाट धरतायत. . . . बाहेरचं  चांदणं मला  सलतंय . . फक्त तू दिसायला हवं होतंस. .आज?

  तू  उद्या  येशील, पुन्हा  तिर्‍हाईतासारखा  राहशील आणि जाशीलही!
तुझ्या लेखी माझं स्थान काय आहे हे मी जाणत नाही.जाणण्याचा प्रयत्नही केला नाही. पण माझी जीवननाव ज्या किनार्‍याला  थडकली. . तो. .  तू होतास इतकंच मला कळतं.

  माझी शिफारस मला तुझ्याकडे करता येणार नाही . . पण मनाला मी एकच बजावते  . स्वप्न तरी का पहावी. .  इतकी रंगीत. . सुरेख . .
जेंव्हा माहीत आहे की ती पूर्ण होणार नाहीत! तरीही मी सजवतेच तुझ्या  स्वप्नांच्या मैफिली . . एकटीच  आनंद घेते . .  तुला कल्पनेतल्या रिकाम्या जागेत  सजवून!
जर माझ्या मनातल्या स्वप्नांना वास्तविक स्वरुप मिळालं नाही तर . . ? मला माहीत नाही. .  !
मी त्याची कल्पनाही करु शकत नाही .
आज मी. .  आज मी त्या गोष्टींचा विचारही  करणार नाही. .  शेवट काहीही होवो  मला पर्वा नाही! पुढचं पुढं पाहीन  . . नाही  तर मी संपेनही. . !

पण आज या घडीला मला इतकंच वाटतं. .  तुझ्यासाठी जळण्यात  तडफडण्यात. .  वेदना सहन करण्यात जो आनंद आहे . . जे सुख आहे . . ते अवर्णनीय आहे!  मला पण तेच  हवं  आहे. .  मग तू काहीही  म्हण . . या मनोगताला. . हे मनातलं अदृश्य  प्रेमपत्र किंवा मनाचा संदेश!
   . . .   तू काहीही म्हण किंवा म्हणू नकोस फक्त तू लवकर येणारे राजा! माझा एक कटाक्ष मला दे . . माझ्या हक्काचा!

तुझ्या प्रतीक्षेत -
तुझीच अभिसारिका  !

समाप्त

©सौ. स्वाती बालूरकर देशपांडे, सखी


🎭 Series Post

View all