1. शरदाचं चांदणं

मखमली कवडसा ही एक ललित लेखांची मालिका आहे. मनातल्या हळव्या , रेशमी कप्प्यातील काही भावना !


१. शरदाचं चांदणं !


तिने घड्याळाकडे पाहिलं. . १२ वाजायला अजून वेळ होता.


दूध आताच प्यावं का , बारा पर्यंत  कशाला थां

असं काही नसतं. . १२ वाजताच का प्यायचं ? ठीक आहे ना . . एकटीच आहे मी इथे. . कोण पाहणार ?

पण मन काही मानेना!

मग ती अपार्टमेंट  च्या टेरेसवर आली.

शरदाचं

नितळ शुभ्र चांदणं पडलेलं!

चंद्र दर्शन झालं नाही. दुधाचं पातेलं तिने गच्चीवर मध्यभागी ठेवलं. .

कोजागिरीचं मसाला दूध किती भारी बनलं होतं. त्याचा रंग आणि सुवासच सा्ंगत होता.

बाबांना फोन करून तिने विचारून घेतलं होतं. . . बाबा म्हणाला "सोड ना मित्तू कशाला एकटीसाठी काय कोजागिरी?"

पण मन नाही मानलं.

मधूमिता नोकरीसाठी परप्रांतातल्या मोठ्या शहरात आली होती. पण इथली संस्कृतीच वेगळी.

कोजागिरी पोर्णिमेसारख्या तिच्या आवडीच्या सणाबद्दल तिच्या रूममेटला सुद्धा काहीच कल्पना नव्हती.

तिला मात्र लहान पणापासून या चंद्राचं अन त्या मसाला दूधाचं खूप आकर्षण!

लहानपणी कॉलनीतली सार्वजनिक कोजागिरीच्या सणाच्या आठवणी मनात  कोरलेल्या होत्या .



वर्गणी गोळा करून मोठ्या मैदानात जोशी काकांच्या निगराणीत मोठ्या पातेल्यात उकळणारे ते दूध!



मुलींची नाच- गाणी ,टिपर्‍या!

मुलांचे मैदानी खेळ!



बायकांची भजन मंडळी जमलेली!



पुरुषांच्या कधी गप्पा ,तर कधी गाण्याच्या भेंड्या!  म्हणजे सगळेच बिझी!



मग बारा वाजता तो पातेल्यात चंद्र पाहणं !

थोड्याशा गारव्यात ते मधुर गरम दूध पिणं . . अन  चंद्र  न्याहाळणं! 



ते शरदाचं चांदणं अविस्मरणीयच!



" शिट्ट यार . . एक तर चंद्र कुठे लपलाय अन त्यात ही रेंज पण नाही!" या भारी आवाजाने मधुमिताची विचारांची तंद्री तुटली.

कोण बोलतंय . . इतक्या रात्री. . शांत वातावरणांत . . ?



"अरे, मराठी कानावर पडतंय? इथे ? " तिची उत्सुकता चाळवली.

अपार्टमेंट  ची पाण्याची टाकी होती. व बोलण्याचा आवाज पलिकडून येत होता. दुसरा ब्लॉक तिकडून जोडलेला होता.

" काय गं आईऽ तुम्ही सगळे आणि ताई -जीजू धमाल करताय अन मी एकटाच इकडे. . या विराण गच्चीवर! चंद्र उगवण्याची वाट पाहतोय. . . कसलं चेन्नई यार? जाम बोअर होतंय. . आपली माणसं , आपली भाषा. . काहिच नाही इथे. . . हो गं . . अच्छा हो का ?"

मधुमिताने प्रयत्न करून टाकीजवळून वाकून पाहिलं.



नेमकं त्यावेळीच तो बोलत त्या जागी आलेला. . दोघांची नजरानजर झाली. . त्याचवेळी त्याने वर पाहिलं  " आई चंद्र उगवला गंऽ. . पुन्हा बोलतो!"

त्याने फोन ठेवला.



मधुमिता उगाच लाजली जणु तो तिलाच चंद्र म्हणाला.

"एक्सक्युज  मी. . येस. . काय?" तो तिला पाहून चरकलाच . .तो एकटाच आहे असे समजून तो मोठ्यांदा बोलत होता पण  एक मुलगी आपल्याला पाहतेय म्हणल्यावर तो एकदम वरमला.

" नथिंग. . जस्ट सरप्राईज्ड टू हियर द मराठी फ्रॉम यू!" ती हळूच म्हणाली. म्हणजे ती त्याला पाहत होती व पकडली गेली असं वाटलं.

"ओह . . !यू अंडरस्टँड  मराठी?"

" अहो मी पक्की महाराष्ट्रीयन मुलगी. . पण इथे कुणीच नाही बोलायला, त्यामुळे. . ?"

" अरे व्वा काय सांगताय.  . . किती भारी. . चला कुणीतरी मराठी बोलणारं भेटलं. . !"

"सेम हियर.  . . बाबांना विचारून मी मसाला दूध बनवलं. . तुम्ही पण कोजागिरीच ना ???"

तो मोठ्यांदा हसला. . " अहो पण आईला विचारूनच दूध बनवलं पण माहित नाही कसं बनलंय? तुम्ही चाखाल का ? बारा वाजून गेलेत. . चांदणही छान पडलंय अन चंद्रही स्पष्ट दिसतोय. . !" हे शेवटचं  तो  खट्याळपणे म्हणाला.

ती लाजली.

"अहो मी तुम्हाला नाही त्या खर्‍या चंद्राला म्हणालो."

तो वर पहात म्हणाला.

"बाय द वे ! मी पण मस्त बनवलंय ते मसाला दूध. . तुम्हीपण  चाखू शकता. . मि.?. . मी काही अहो नाही. . मी मधुमिता!"

" नक्की आवडेल मला. . तुम्ही मधुमिता ओके. मी चिन्मय. . अगदी चिनू म्हणालात तरीही चालेल."

" थँक्यू  नाईस टू मीट यू! पण माझ्याकडे एकच ग्लास आहे. " ती बिचकत म्हणाली.

" नो प्रोब्लेम!"

तो पटकन गेल त्याचं दुधाचं पातेल व ग्लास घेवून आला. तिच्या हातात दिलं व आरामात पॅराफिट वॉलवर उडी मारून मधूच्या टेरेसवर आला.

मग त्या शरदाच्या चांदण्यात , त्या नीरव शांततेत दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. मुळात शांत असणारी मधुमिता हळू हळू त्याच्याशी बोलायला लागली. कितीतरी दिवसांनी प्रत्यक्ष मराठी बोलणारं कुणीतरी भेटलं होतं.

मग दोघांनीही मस्त एकमेकांकडील  मसाला दूध एक्सचेंज केलं.

मग गप्पा सुरू झाल्या.

हळू हळू नोकरीबद्दल, मग शिक्षणाबद्दल. . मग आवडी निवडी, बालपण. . सगळ्या गप्पा !

किती मस्त होतं ते शेअरिंग ! दोघेही अनोळखी पण दोघांनाही कळत होतं सगळंच. . एकमेकंबद्दल . . अगदी कमी शब्दात !

म्हणजे दोघांची विचारसरणी. . , संस्कार, आवडी निवडी आणि भविष्याचे नियोजन . . किती जुळत होतं एकमेकांशी. . असं क्वचितच घडतं.



" यालाच म्हणतात वेव्हलेंथ जुळणं! . . तसा मी मुलींशी फारसा बोलत नाही पण खूप कंफर्टेबल  वाटलं तुझ्याशी बोलताना !" चिन्मय म्हणाला.

" हो का! माझंही सेम. इतक्या कमी ओळखीत मी नाही बुवा कुणाशी गप्पा मारत. . पण आज मात्र. .?" आणि ती हसली.



इतक्यात टेरेसचं लोखंडी दार करकचून वाजलं आणि श्राव्या प्रकटली. . थोडी भीत व थोडी रागात.



"वाट इज दिस मधू??? आय वाज सो स्केअर्ड. . . माय गॉड. . वाट आर यू डूइंग हियर? प्लीज सी द टाइम!"



चिन्मयला या प्रकाराने खूप वरमल्यासारखं झालं. त्याने मोबाईल ऑन करून पाहीला तर सकाळचे चार वाजून गेले होते. बापरे सतत  मोबाईल हातात घेवून वावरणारा चिन्मय. . त्याने चार तास मोबईलला हातही लावला नव्हता.



" नो प्रॉब्लेम  श्राव्या! कूल डाऊन. मीट चिन्मय , माय फ्रेंड, स्टेज हियर. . द नेक्स्ट  बिल्डिंग . . वी वेयर शेअरिंग  द फेस्टिव मिल्क. . कम जॉईन  अस!"  मधूने होईल तितकं वातावरण नॉर्मल  करण्याचा प्रयत्न  केला.



श्राव्या , मधुमिताची रूम मेट . .तमिळ मुलगी होती. अचानक झोपेतून जागी झाली तर पाहिलं की मधू रूम मधे नाहिय. वॉशरूम पण चेक केली. मग ती घाबरली. कारण असं कधीच झालं नव्हतं.

मग तिला आठवलं की मधूमिता रात्री कोजागिरी बद्दल सांगत होती.  सहज पायर्‍यांवर  आली तर गच्चीवर कुणीतरी बोलतंय हळूहळू असं वाटलं म्हणून जीव मुठीत धरून ती वर आली होती.



चिन्मय चे दोन रूम मेट पण पहाटे उठून गच्चीवर व्यायाम व जॉगिंग  साठी यायचे . . त्यामुळे त्याला वाटलं की ते दोघे येवून काहितरी भांडे फुटण्या अगोदर इथून निघावे. पण मधुमिता ला सोडून जावे वाटेना.



"हॅलो मायसेल्फ चिन्मय !"



"येस हाय, दिस इज श्राव्या, मधूज रूमपार्टनर! नाईस टू सी यू!"



" अॅक्चुअली वी शेअर सेम लॅंग्वेज अँड कल्चर सो आय वाज हियर इन द नाईट.  . अँड शी वाज अलोन ऑन द टेरेस. . सो. . वी. . !" चिन्मय जणु स्पष्टीकरण देत होता.



मधूने त्याला थांबवलं. . " चिन्मय जाऊ दे ना कशाला तिला पटवून सांगण्याचा प्रयत्न  करतोय. . तिला नाही कळणार हे सगळं! आपण उद्या भेटू!"

" ओके. . देन ! सी यू श्राव्या! आणि मधू उद्या भेटू काय? टाईम बघ. . उद्या उजडलाय अलरेडी!. . मग  पुन्हा कधी भेटायचं?"



त्यांचं मराठीत बोलणं पाहून श्राव्या म्हणाली," ओके मधू आय अॅम गोईंग . . प्लिज कम!" तिने खट्याळपणे मधुला एक चापटी मारली.



मधूला पुन्हा वरमल्या सारखं झालं.



दोघांनी रात्रभर एकमेकांना शरदाच्या चांदण्यातच पाहिलं होतं. .

श्राव्या जाताच चिन्मयने अधीरपणे तिचा हात हातात घेतला. . " मधू मी निर्णय घेण्यात कधीच इतका प्रॉम्प्ट नव्हतो. .पण देवाशप्पथ . . मला प्रत्येक कोजागिरीला तुझ्यासोबत जागायला आवडेल आणि हे तुझ्याहातचं मसाला दूध असं प्यायला आवडेल. . !"



या अचानक ऐकलेल्या संवादामुळे मधूच्या अंगात जणु विजेचा झटका बसला.



" अरे काय हे. . सच अ क्यूट अँड लवली प्रपोजल . . पण मी काय बोलू?"



" मधू,  प्लीज! एक क्यूट उत्तर पण असतं गं, प्रपोजलला!"

" अरे तुला मसाला दूध पिण्यासाठी माझ्याशी लग्न करायचंय. . ? मग ते मसाला दुधाची रेसेपी सांगणार्‍या  माझ्या बाबांना पण विचारावं लागेल ना !"

तिच्या ह्या अबोध. . निरागस उत्तराने तो जाम खुश झाला आणि जवळ येणार इतक्यात मधू म्हणाली. . "अरे तुझे रूम पार्टनर्स!"

"कुठे?"

चिन्मयने मागे वळून पाहिले. . परत पाहेपर्यंत मधू बाऽय असं म्हणून खाली जात होती.

चिन्मयने आकाशाकडे पाहिलं आणि ते मिटलेल्या चांदण्यांना मनोमनी धन्यवाद  दिले ज्यांनी आयुष्यात इतकी सुंदर  चंद्रिका शोधून दिली होती.  तो त्याच्या गच्चीवर आला व निश्चिंतपणे रूम मधे आला.

समाप्त 

(चिन्मय आणि मधुमिताच्या मनात चमकलेला मखमली कवडसा कसा वाटला? )



© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

दिनांक -८.०२ .२०२१




(मखमली कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!
मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.?)

🎭 Series Post

View all