२. कबूली

एक अनोखी प्रेमाची कबूली! वाचून तर बघा !



 



कबूली



प्रेमाची कबुली देताना हात कापत होते; पण अखेर मोबाइलवर शब्द टिपले गेले " माझं तुझ्यावर प्रेम आहे !"



शब्द लिहिल्या गेले , काही क्षण खूप हलकं वाटलं त्याला . . पण लगेचच  बेचैन वाटायला लागलं.



ती हे वाचेल का ?



तिला काय वाटेल ?



ती होकार देईल का ?



किमान समजून तरी घेईल का?



बापरे ते जर दुसरं  कुणी पाहिलं तर  ?!!!!



आणि मग त्याने पटकन मेसेज डिलीट करण्याचा विचार केला .



मेसेज सेलेक्ट केला आणि दोन ब्लू टिक्स!!



त्याची धडधड एकदम वाढली.



आता. . ?



तो पटकन ऑफलाइन  झाला.



मेसेज कुणी पाहिला असेल. . तिनेच की?

तीच पाहिल ना । मोबाईल तिचा म्हटल्यावर तीच पहाणार ना !



मी पण काय भितोय?



पण तिची रूम मेट पण असते ना बाजूला. . त्यांचे फोन बर्‍याचदा  एकमेकांकडे असतात . . मग?

ती काय करेल हा मेसज बघून . . जुईला सांगेल का? की मेसेज डिलीट करेल?



अरे वा डिलीट कशाला करेल? 



तिला काय त्रास आहे या मेसेजचा?



विचार करेपर्यंत  घाम फुटला. एकदा पहावं का पुन्हा. . त्याने वाट्सप क्लिक केलं. तर. 

वर दिसलं टायपिंग!!



आता मात्र अजूनच धडधड वाढली!

काय म्हणेल ती . . हो की नाही ?

उत्तर आलं.



" याचं उत्तर द्यावं लागेल का ?"



बापरे. . ती तर तयारच आहे.  . खूप भारी मग त्याला जोश चढला.



"अर्थात. . मी माझी बाजू मांडली तर तुझी बाजू कळालीच पाहिजे  ना !"



" ठीक आहे धन्यवाद . पण उद्या भेट एकदा!"



"कुठे?"



"आपल्या नेहमीच्या ठिकाणी!"



"ओ. के. "



त्याने ओके टाईप केलं आणि त्याच्या लक्षात आलं की अशी कुठलीच नेहमीची जागा नाहिय.

तो जुईला नुसतीच लांबून पाहतो .



ती त्याला खूप खूप आवडते.



कधी कधी संध्याकाळी पानीपुरीच्या गाड्यावर तिला व तिच्या रूमपार्टनरला पानीपुरी खाताना तो पहायचा.

त्याक्षणी त्याला वाटायचं की तो पानीपुरीवाला भैया किती लकी आहे. . किती हक्काने एक सूखी पुरी,एक मसाला पुरी असं ती मागते.



लायब्ररी मधे तिच्या टेबलासमोर बसून पुस्तकाच्या फटीतून तिला अभ्यास करताना पहायचं!



किती अानंद त्या मूक पाहण्यात.



कॉलेजच्या गॅदरिंगच्या  वेळी मात्र दोन चार वेळा तिच्याशी बोलणं झालं. नावं कळाली व गाण्याच्या स्पर्धेसाठी वाद्य हवीत म्हणून तिने आपला मोबाईल नंबरही त्याला दिला होता.

मग काय?



छोटे छोटे गुड मॉर्निंग  मेसेज. . सुंदर सुविचार आणि सुंदर  फुलांचे फोटो वगैरे तो वाट्स अॅप वर पाठवत होता. तिने विशेष  रिसपॉन्स दिला नाही पण विरोधही केला नाही.



एवढीच काय त्यांची मैत्री!



हे सगळं त्याच्या मनातलं. . होतं. . आकर्षण किंवा प्रेम. . एकतर्फी. . बहुधा !

दुसरा दिवस उजडेपर्यंत तो खूप बेचैन झालेला!

ती काय म्हणेल यावर त्याचं आयुष्य  अवलंबून होतं .  . !

ती नाही म्हणेल तर पुढची कल्पनाच करवत नव्हती.

सकाळी त्याने सुंदर  गुड मॉर्निंग  मेसेज पाठवला. तिचा हसणारा इमोजी आला.



"आपली नेहमीची जागा कुठली??

म्हणजे आपण कुठे भेटायचं?"



" तूच सांग?"



त्याची धडधड वाढली. ही आता का सांगत नाहीय?



"कुठे भेटायचं?कॉलेजच्या बस स्टॉपवर?"



"चालेल! किती वाजता?"



आता काय उत्तर द्यावे ? सुचेना!



"११ वाजेच्या आसपास मी असेन तेथे!!"



"ओके!"



निशांतने पटकन गौरव ला बोलावून घेतलं.

काय ते सगळं त्याला माहित होतं. निशांतचा सगळ्यात जवळचा मित्र होता ना!  काल पासूनच्या सगळ्या घटना सांगितल्या अन जीवाची होणारी घालमेल व्यक्त करत होता.

"निश्या मला माहित आहे रे हे  सगळं. . मागच्यावर्षी  मंजूला पटवताना हेच सगळं टेंशन होतं ना गड्या मला! पण तू तर माझी खेचत होता ना . . मग आता पहा ?"

"गौर्‍या प्लीज ना रे. .. बस स्टॉपवर चल ना रे सोबत!

"आयला वेडा का बे ? मी कशाला दोघांत अडचण?"

"गौर्‍या, अडचण काय रे? अजून कशातच काही नाही ना !. . . तू असला तर हिंमत राहिल मला. . "

" हो ना निश्या . . ते पण हायच!. चल मग. . पण तिकडं काही अडचण वाटली माझी तर इशारा करायचा. . मी जाईन निघून !"

" डन!"

कॉलेजच्या बाहेरच्या बस स्टॉपवर दोघे उभे होते. ती आली नव्हती. स्टॉपवर जास्त गर्दी नव्हती. २-४ स्त्री पुरुष असतील.

निशांतची बेचैनी वाढत होती.

"गौरव . . बस्स हे शेवटचं वर्ष. . महिन्याभरात मला कॅम्पस मधे जॉब मिळेल. नाहीच वाटला समाधान कारक तर पप्पाची  फॅक्टरी आहेच ना. . मग तिला काय अडचण आहे?"

" मला माहित आहे रे सगळं. . पण तिला व तिच्या कुटुंबियांना पटलं पाहिजे ना!"

" हो ना रे किती साधी सरळ आहे ती. . . तिच्या मनाचा अंदाज बांधता येत नाहिय मला. . खूप नर्व्हस  वाटतंय! जुईसोबत संपूर्ण भारत भ्रमण करायचय मला .  . .होईल का रे गौर्या?"

गौरवने त्याच्या पाठीवर हात टाकला व म्हणाला , "अरे निशांत, तुला लहानपणापासून ओळखतो ना मी! तुझं नियोजन किती भारी असतं , मला माहित आहे ना!  आयुष्य सगळं कसं प्लॅन्ड आहे. . बस्स एवढं सुरळीत  झालं की झालं!"



"हो रे अगदी बरोबर!"



२० मिनिटे तो गौरव जवळ बोलत राहिला अन क्षणोक्षणी तिची वाट पहात राहिला. . पण ती आली नाही.



"निशांत, तिला तुझ्या या हळवेपणाची किंमत नाही बहुतेक! ती आली नाही. कितीवेळची आपण दोघेच बोलत थांबलोय. . चल कॉलेजात जाऊया !"

"नाही गौर्‍या. . ती खूप पंक्चुअल आहे, असं प्रथमच घडतंय. ती यायला हवी होती खरंतर . . पण असेल काही अडचण! पण नकार तर नसेल ना रे. . ?"

" मला तर काही कळत नाहीत यार. . पण तू खचून जाऊ नकोस. . !"

" एक्सक्युज  मी!"स्टॉपवर उभ्या असलेल्या काकू बोलल्या.

"हो काकू, बोला-"

"तुम्ही इथे कोणाची वाट पाहताय का?" त्या महिलेने प्रश्नार्थक पहात विचारले की कोणाची वाट?

गौरव पटकन निशांतच्या कानात कुजबुजला "आता यांना काय करायचंय ? इतक्या वेळचं आपलं बोलणं ऐकतायत वाटतं!"

"बापरे. . . खरच रे ! पण आमच्या आईची मैत्रिण  असू नये म्हणजे मिळवली. . . "

"मी काय विचारलं बाळांनो . . तुम्ही कुणाची वाट पाहताय का?"

" जाऊ द्या ना काकू ते आमचं पर्सनल आहे. . तुम्हाला कशाला. . ?" गौरव कसाबसा बोलला.

"तुमचं पर्सनल  आहे ते कळतंय पण तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून . . मी माझी बसपण सोडली. मग कॉफी घेवू शकतो ना समोर?"



आता मात्र निशांतला काहिच समजेना. हो म्हणावे की नाही? ती आली असती तर समोरच्या कॉफी हाऊस मधे तिला सोबत नेण्याचा प्लॅन होता. . पण हे काय आता काकूंसोबत कॉफी घ्यावी लगणार!



पण अंतर्मन  मात्र काहिच नकारात्मक सांगत नव्हतं त्यामुळे चला चान्स घेवूयात असं वाटलं.

गौरव मात्र पूर्णच हबकला.



निशांतला बाजूला नेवून तो बोलला-

"अरे निशा, कॉफी विथ जुई हा प्रोग्राम होता ना तुझा? आता काय कॉफी विथ काकू ?. . अौर कॉफी के साथ दस सवाल! जवाब दे तू. . . . अन घरी गेल्यावर फटके!"



"नाही रे असं काही! जस्ट कॉफी घेवूयात ना. . तसं वाटलं तर  आपण केव्हाही उठून जावू शकयो ना !"



"असं म्हणतोस का . . ओके चल मग!"



" काय झालं मुलांनो. . ?" काकू निघण्याच्या तयारीत होत्या.



"चला काकू!"



तिघेजण कॉफी हाऊस मधे गेले. 



काकूंनीच तिघांसाठी कॉफी ऑर्डर केली. ते सांगण्या अगोदर त्यांनी दोघांना नाश्ता किंवा स्नॅक्स  घेणार का असं विचारलं होतं.



बोलता बोलता काकूंनी विषय जुईकडे वळवला.

"निशांत तुझं प्रेम आहे जुईवर ?"



"काकू ते सांगीतलं ना पर्सनल  म्हणून. . !" तो अडखळला.



"अरे, कबूली दिलीस ना प्रेमाची. . लिखित रूपात. .  मग सांगायला का भितोयस ?"



" मी ? कबूली? कधी?"



"काल मोबाईलवर. . आणि आज भेटायला बोलावलंस ना . .



"पण काकू तुम्हाला कुणी सांगितलं? जुईने? काय यार या पोरी?"



"नाही निशांत .  तिला तर माहित पण नाही. . की तू प्रेमाची कबूली दिलीस. . तिच्या मनात काय आहे ते सुद्धा मला माहित नाही!"



आता मात्र निशांत व गौरांगच्या चेहर्‍यांवरचा रंग उडाला.



"पण काकू. . ? तुम्ही ओळखता जुईला. .  आणि ते तिला माहित नाही . . ते कसं काऽय?"



" जास्त ताणत नाही आता! हा पहा जुईचा फोन . . काल सकाळपासून माझ्याकडेच आहे!"



" काकू तुम्ही ? ते ? जुई? वाट्सअप चाट?"



"अरे इतका घाबरतोस कशाला. . प्रेम आहे ना तिच्यावर. . आता फायनल इयरला आहेस . . नोकरीही मिळेल ना कॅम्पस सिलेक्शन मधे. .

मी जुईची आई. . !"



तिने हात पुढे केला.



त्याने हात मिळवला. पण आ वासून. तो कालपासून सगळ्या घटनांचा विचार करायला लागला. . फोन काकूंकडे मग काही खरं नाही. . मनात वाटलं.



" भिऊ नकोस निशांत. . तुमचं प्रेम पूर्णत्वास जावं यात मला आनंद आहे. मी बस स्टॉपवर तुमचं बोलणं ऐकलय. माझ्या मुलीवर इतका जिवापाड प्रेम करणारा मुलगा मला आवडला.तुम्ही दोघं सेट व्हा.  . जुईच्या वडिलांना तयार करण्याची जिम्मेदारी माझी!"



आता मात्र निशांत थक्कच झाला. हे सारं त्याच्यासाठी अनपेक्षित  होतं. 



" पण काकू तुम्ही कसं काय? म्हणजे?"

"निशांत जुईच्या बाबांचं आणि माझं पण १२ वी पासून अफेयर होतं . आम्ही खूप नियोजन करून घरच्यांकडून  परमिशन घेवून लग्न करण्याचा विचार केला होता. पण दोघांच्या  घरून परवानगी नव्हती. मग आम्ही रजिस्टर  मॅरेज केलं। . त्यामुळे आमचा विरोध होणार नाही."

" थँक्यू  काकू. . तुम्हाला माहित नाही तुम्ही मला जणु जीवनदान दिलंय. . आता बघाच मी कसा सेटल होवून जुईला किती सुखात ठेवीन."

" एकच अट किंवा विनंती आहे माझी. . . ?"

तो घाबरला. 

"अट. . ती काय काकू. . ?"

" " जुई तुला एक वर्ष ज्युनिअर आहे तर तिचं चौथ्या वर्षीचं एक सेमिस्टर  होईपर्यंत  तिला तुझी प्रेमाची कबूली देवू नकोस!. . "



"पण का. . आणि पण अलरेडी  मी तिला मेसेज केलाय !"

"हो ना. . पण ती कबूली माझ्याकडे आहे. जुईला गंधही नाही या गोष्टीचा. तुझे जुने मेसेज पाहून मी विचारलं तर म्हणाली की आई तो सिनियर आहे आमचा आणि चांगला फ्रेड आहे. तुमची फ्रेंडशिप  असू देत. हरकत नाही. पण प्रेमाचं बोलू नकोस! "

"काकू. . थँक्यू  ! तुम्ही निशांतला सपोर्ट करताय पण . . ही अट का ?" गौरांग मधेच बोलला .

" हां तर गौरांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर . . आमची जुई खूप इमोशनल आहे. .निशांत  तुझ्या कबूलीने ती स्कॅटर होईल किंवा तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष  होईल. . किंवा काहीही होईल, म्हणजे दडपणात राहील . . काहीही होवू शकतं. . पण तिला तू आवडत असशील तर मात्र मी तुमच्या प्रेमाच्या आड येणार नाही. थोडा वेळ जावू देत. परवा बँकेच्या कामासाठी आले आणि काल सकाळी पाण्यात पडून माझा फोन खराब झाला. काल सकाळपासून तिचा फोन माझ्याकडे आहे. मला फोन वापरायला देताना तिने एक मिनिटही विचार केला नाही किंवा आढेवेढे घेतले नाहीत. "

"खरंच . . कमाल आहे. पण मी फक्त कालच तिच्याशी फोनवर चाटिंग केली. "

"हो ना पण तिकडे मी होते. . " त्या मोठ्यांदा हसल्या.

"ठिक आहे ! काकू आता निघूयात का? मी माझा शब्द पाळीन. तुम्ही तुमचा शब्द पाळा!"



" नक्की . . मी म्हणाले म्हणू संपर्क तोडू नकोस तिच्याशी. . मैत्री राहू दे. . भेटत बोलत जा. . ते गरजेचे आहे. तुम्ही पोरं कुटुंब सोडून इथे राहता. . तेव्हा. . मित्र मैत्रिणीं  गरजेच्या आहेत."



" थँक्यू  काकू. . पण माझं जुईवर जिवापाड प्रेम आहे. . तिच्या सोबत मला जगायचंय . . !" असं म्हणून निशांत आशीर्वाद  घेण्यासठी झुकला. . तर काकूंनी त्याच्याशी हात मिळवला.

"सुखी रहा! यशस्वी हो!. .ही कबूली मात्र अनोखी आहे ना गौरांग. . कुठल्याच मुलाने मुलीच्या आईकडे कबूली दिली नसेल!"

तिघेही मोठ्याने हसत कॅफेच्या बाहेर पडले.



समाप्त

©सौ. स्वाती बालूरकर  देशपांडे, सखी

दिनांक - 18.02.2021


(मखमली कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!
मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.?)

🎭 Series Post

View all