११. अप्राप्य

कल्पनेतल्या सुंदरीचा भास!


(मनोगत-  मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे. मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
यात आठवणींचे काही कवडसेही असतील . . कुठलीच कथा पुर्ण कथा म्हणून समोर येणार नाही.? त्यातला तो रेशमी व मखमली कवडसा तुम्हाला अनुभवायचा आहे. . इतकच!
वाचून  प्रतिक्रिया  नक्की द्यावी.?
प्रोत्साहन  आणि स्टिकर्स च्या प्रतिक्षेत- सखी)


मखमली कवडसा-११# अप्राप्य

दुधाळ चांदणं पडलं होतं . तसं यापूर्वी  मला चांदण्यांशी काहीही  घेण् देणं नव्हतं . .ते तिलाच होतं.
पण आज मला काय झालं कुणास ठाऊक . . रात्री सहजच गच्चीवर आलो. सर्वत्र  शांतता. . खाली मात्र मिट्ट काळोख वाटला पण छतावर विखूरलेलं रूपेरी चांदणं .  . (तिच्या भाषेत) मला तो रंग रूपेरी कसा आहे हे कधीच कळालं नाही. खरंच चंद्राने किती सुरेख वरदान दिलंय  पृथ्वीला . . . .  हे आज अचानकच वाटलं!

वर आलो अन थक्कच झालो. ती एकटीच पहुडलेली होती. . छतावर मध्यभागी. . गहिऱ्या  निद्रेच्या आधीन झालेली.  फिकट गुलाबी रंगाच्या  ड्रेसमधे .  . दुधाळ चांदण्यात. . स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली ती!
ती जणु एखाद्या अप्सरेगत भासत होती.

तिच्या जवळ जाऊन मी तिला मनसोक्त न्याहाळलं. . रोज सावळ्याशा छटेत दमकणारी ती चंद्राच्या चांदण्यात विलक्षण आकर्षक दिसत होती. सगळंच कसं शब्दांत सांगता येत नसतं ! काही अनूभवावं लागतं .
ती मला कशी दिसली सांगू जणु एखादं अल्लड, अवखळ बाळ खेळून दमून झोपतं ना तसं !
तिच्या चेहर्‍यांवरचे  निरागस भाव पाहून मला एखाद्या नवजात शिशूला पाहिल्यागत वाटलं. म्हणजे या जगाचा किंवा दुनियादारीचा, व्यवहाराचा गंधही नसावा असं!
रोज ती डोळे मटकावून खळखळून हसते ना तेव्हा मी मनात खोलवर हलतो. . का माहित नाही. . पण ती त्यावेळची  वेगळी असते . . आज खूप वेगळी होती रोजच्यापेक्षा!  ती कुणाच्या स्वप्नांत हरवली असेल? उगीचच  विचार आला!
तिला पाहून मनात अनेक विचार दाटले. .तेव्हा वाटायला लागलं. . इतके दिवस मनात दाबलेलं वादळ उसळून येइल की काय?
ती झोपलेली नसती तर कदाचित. . ? मी बोलून गेलो असतो का मनातलं सगळं. . पण कदाचित नाही!
मनात होतं तिच्या त्या निरागस गालांना एकदा स्पर्श करावा. हात शिवशिवला पण जवळ जावून परतला.

गर्भ रेशमी कप्प्यातला कवडसा हाती येत नसतो पण खुणावत असतो.

मी महत्प्रयासाने संयम राखला व  तिला मनसोक्त पाहूनच खाली परतलो.  तिचं ते रूप मनात खोलवर साठवून घेतलं. . . बस्स!

परिकथेतल्या परीसारखी  ती. . कल्पनेतच बरी वाटते कारण ती दुनियादारी  जाणत नसली तरीही मला वास्तविकतेची जाण आहे. . मला विषमतेची जाण आहे. . सगळ्याच विषमता.
शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि हो महत्वाचं म्हणजे आर्थिक ही!

तिचं मनात साठवण्यामागचं  कारण असं होतं की मला माहित होतं की ती माझ्यासाठी अप्राप्य आहे. . याजन्मी ती कधीच मला मिळणार नाही!

गच्चीवरून खाली आलो व पाठीत धपाटा अन मी खाटेवरून खाली. .. . पडलेलो!

आई कालीमातेच्या अवतारात समोर  . . . "एऽ दिन्या. .  दिवस उगवेपर्यंत  झोपलास तर भाजी आणायला काय तुझ्या स्वप्नातली परी जाईल का?"

मन म्हणालं . . "आयला खरंच की!"

समाप्त

© स्वाती बालूरकर देशपांडे, सखी
दिनांक -  १८ . ०१. २२

🎭 Series Post

View all