६. अनामिकेची डायरी

असफल प्रेमाची गाथा जिथे एक अनामिका मनातले भाव लिहिते की कशी ती प्रेमाला विसरण्यासाठी जीवलग चिट्ठ्या फाडते.



(मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे, त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.. . प्रेम!
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.  हा कवडसा कुणाच्याही मनात दडलेला असू शकतो,  अगदी कुठेही जगाच्या पाठीवर . . !)
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.  प्रोत्साहन  अपेक्षितच.)


चिट्ठ्या 



आज एवढं सगळं झाल्यावरही मी शांतपणे तुझ्या चिठ्ठया फाडायला बसले .
चिठ्ठ्या म्हणजे काय मोठ - मोठी पत्रं किंवा प्रेमपत्र नव्हती किंवा भावनांचे शब्दहंस वगैरेही नव्हते!
साध्या साध्या निरोपाच्या चिठ्ठ्या, कसलासा अभिप्राय दिलेला , सहजच काहीतरी लिहिलेलं, त्या छोट्या -छोट्या चिठ्ठ्या!

तू जेव्हा जेव्हा अपसेट व्हायचास त्यावेळी मला आठवून काहीतरी लिहून ठेवायचास ती  वाक्य, ते वाचून वाचून पाठ झालेले सुविचार होते जणु माझ्यासाठी, किती आणि काय?

त्या चिठ्ठ्या म्हणजे साध्याच चिठोर्‍या वाटतील पाहणार्‍याला पण माझ्यासाठी तसं नव्हतं .
त्या चिठ्ठय़ा म्हणजे मृत अक्षर नव्हती ,ते तुझं अस्तित्व होतं  माझ्यासाठी!

शब्दांमध्ये लपलेली ती अक्षरं एकेक प्रसंगाच्या आठवणींची कोरीव लेणी होती जणु!

सगळ्या , सगळ्या आठवणी , प्रसंग मनात तसेच्या तसे  साठवलेले होते तरीही जगाच्या रहाट गाड्यात कुठेही  विस्मरण आलंच तर त्या चिठ्ठय़ा पाहून पुन्हा पुन्हा सगळं जिवंत व्हायचं!

इतके दिवस किती  किती जपलं मी त्या चिठ्ठय़ांना! अगदी ऊन आणि वाराही लागू दिला नाही ,कुणाच्या नजरेस सुद्धा पडू दिलं नाही, लपवीत राहिले.
  कुण्या सखीला ते दाखवलं तरी ती वाचताना त्याला तिच्या हाताची धूळ लागू नये ही काळजी. . तिने थोडी जरी चिठ्ठी हाताळली तर अगदी मनातून हलणारी मी ! केवढी बावळट होते ना ?
त्या चिठ्ठीला काही झालं की तुला काहीतरी होईल . . किंवा जाणवेल असं वाटायचं मला.  आणि आज त्याच चिठ्ठ्या मी माझ्या हातांनी, उघड्या डोळ्यांनी फाडणार आहे मनावर दगड ठेवून , हे  करावंच लागेल याला आता पर्याय नाही.

फाडण्यापूर्वी मनसोक्त पाहिल्या आणि वाचल्या मी त्या चिठ्ठय़ा  . . जणु पुन्हा एकदा तुझ्या सगळ्या आठवणींची मोळी मी घट्ट घट्ट बांधली !
तुझी अनेक  रूपं, पुन्हा एकदा विचारात पाहिली . . अक्षरा गणिक कागदावर चिकटलेला तुझा चेहरा. . . ? तुझे भाव . .? काही वाचनीय , काही अवाचनीय !

आज जेव्हा सगळं संपलंच आहे तेव्हा  त्या तुझ्या आठवणींच्या निर्मल्याला कुरवाळीत का बसू ?
तुझ्या त्या आठवणींची आठवण ही माझे डोळे ओले करायला पुरेशी आहे.

पहिली चिठ्ठी हातात घेतली ,मन दगडाचे .  .  हात पाषाणाचे करून त्या चिठ्ठीचे बारीक बारीक तुकडे करीत राहिले. त्यातलं एकेक अंश उचलला तरीही तुझं अक्षर कळू नये म्हणून ! त्यावेळी डोळ्यातल्या अश्रूत तरंगलास तू. . . माझ्यावर फिदा होऊन एकटक पाहणारा तू. . .   त्यावेळी तुझ्या नजरेत विरघळत चालले होते . . मी पटकन तुझ्या  डोळ्यांवर  हात ठेवला. तू बोलला काहीच नाहीस पण. . ही पहिली चिठ्ठी लिहिली होतीस!
दुसर्‍या चिठ्ठीला  संपवतानाही पुन्हा तूच  वेगळ्या मूडमध्ये . . . बाहेरच्या कामाने त्रस्त झालेला. .   माझ्या पदराशी खेळत, माझ्या कुशीत लहान बाळासारखं डोकं ठेवून झोपणारा तू. . . पुन्हा पुन्हा मान हलवून तुझं मांडीवर स्थिर होणं आणि माझी बोटं तुझ्या केसांत  किती वेळ फिरत होती. . तो क्षण कशी  विसरेन मी . . . त्यानंतरचिो ती चिठोरी कुठलं तरी पान फाडून लिहिलेली! . . तरीही तो कागद मी फाडणं जरुरी होतं!

पुढच्या चिठ्ठीमधल्या तुझ्या ओळी वाचून हसू फुटलं . . . माझ्यासारखी कविता लिहिण्याच्या प्रयत्नात  तू शब्दांना इतकं वेडंवाकडं बांधलं होतंस  की  तुझ्या मनातली भावना तिथे उतरलीच नव्हती . . . तरीही तू मला  ती प्रेझेंट दिलीस . . . मीही तितक्याच आत्मीयतेने समजून घेतली व ती जपली.

  एकदा माझ्या वेणीला दोरा बांधून त्याचं दुसरं टोक स्वतःच्या हातात धरून ठेवलं होतं आणि मला खूप छळलं होतं. मी जायचं म्हणाले की थांबवण्याची युक्ती होती ना ती!  त्यानंतर परतताना तू दिलेला मजकूर. . .  तो ही मी फाडतीय. .  तो तरी  मी का ठेवू?

शेवटी जेव्हा तू निरोप दिला होतास "अंधार पडल्यावर ये . . . मी आज खूप  डिस्टर्ब आहे. .  पण तुझं काही खरं नाही हं!"
एवढं माहीत असतानाही तुला भेटण्यासाठी इतक्या आतुरतेने मी आले होते, काळजी पोटी!
मी आले. . तू रिलॅक्स  झालास. . मला खूप सतावलंस. . जणु मी कधीच तुला पुन्हा भेटणार नाही अशी मिठी मारलीस. . अन मी गहिवरले. तुला प्रतिकारही नाही केला.
बाबांना सहा महिन्यापासून  होकारासाठी. . पुढे ढकलत होते. .त्यांनी पसंत केलेल्या स्थळाला!
तुझा निर्णय  कळेल या आशेत. . !

पण त्याचवेळी परतताना दुर्दैव  दत्त म्हणून समोर उभं ठाकलं.  तुझे आई बाबा समोर आले. . तुझी छापलेली लग्नपत्रिका  घेवून.
औपचारिकता म्हणून तू मला ती दिलीस. . त्यांच्यासमोरच!
म्हणजे हे सगळं तुला माहित होतं?

मी उद्ध्वस्त  झाल्यागत घरी आले.

मलाही आज उद्या होकार कळवावाच लागेल.

कुणा अनोळखी व्यक्तिसोबत जगावच लागणार आहे, पर्याय नाही. 

मग नवीन आयुष्याची सुरुवात करताना जुन्या आठवणींची मुळंदेखील नकोत म्हणूनच!


किमान आठवणी मिटवाव्यात  म्हणून बसलीय बंद खोलीत माझी पर्सनल पेटी काढून !

एक सांग ना. .
या चिठोर्‍या अन चिठ्ठया फाडल्या म्हणून मी तुला विसरणं शक्य आहे का रे ?

समाप्त

© स्वाती  बालूरकर देशपांडे, सखी
दिनांक - ०३ .०१.२०२२

🎭 Series Post

View all