४. गूढ नाते- तुझे माझे

मनातून एकरूप असणार्‍या सामान्य पण अद्भुत मैत्री असणार्‍या मैत्रिणींची भावनिक गुंतागुंत!

तुझे माझे नाते  असा विषय वाचला की मला तू आठवलीस गं मनू!

हो मनूच . . मी तुला दिलेलं नाव होतं ते. . आणि तू ते घेतलंस ही! मला लिहिताना तू नेहमी तुझीच मनू असं लिहायचीस. . ना !

अगं तुझं तुला नाव होतंच की. . अन घरचं टोपण नाव सुद्धा होतं. . पण मतू माझ्या मनातली मनू गं!

कसे भारावलेले दिवस होते ते. . स्वप्नागत वाट तं आता! तू एखाद्या वर्षानेच लहान असावीस  माझ्यापेक्षा!

आपली ओळख झाली अन तु कशी माझ्या मनात जागा केलीस कळालंच नाही. किती निखळ व निरागस मैत्री गं आपली! बोलायला विषयांची मर्यादा नाही. . फक्त वेळेचं बंधन  तेवढं होतं. संध्याकाळ झाली की वेगळं व्हावं लागायचं अन सकाळची  वाट पाहायची भेटण्यासाठी। . किती ती ओढ गं!

आपण नशीबवानच तशा की हे अनुभवलंय. . मोबईल नव्हता गं तेव्हा. . काही भलं अन काही बुरं पण या मोबाईलचं! म्हणून तर तुझी पत्र अजुनही जपून ठेवलीत ना  मी.

रोज भेटायचो ना आपण आणि एकमेकांना चिठ्ठ्याही द्यायचो. . हे आता कुणाला सांगितलं तर वेड्यात काढतील आपल्याला! कितीतरी मनातलं सांगायचं व बोलायचं शिल्लक राहून जायचं गं आपलं मग तो पत्रप्रपंच ! पत्राला उत्तर मात्र पत्रानेच आणि बोलण्याचे उत्तर बोलण्याने!

कशी मैत्री गं आपली. तू येण्या अगोदरची माझी जवळची मैत्रीण होती राणी. . मग आपण तिघी झालो.

आजही आश्चर्य  या गोष्टीचं वाटतं की आपण तिघी असताना कसला मस्त माहौल असायचा. . गप्पा गाणी अन किस्से! पण राणी व तू वेगळंच नातं मैत्रीचं! मी व राणी जणु मेड फॉर इच अदर सारखं फिरायचो, जोडी म्हणून आणि मी व तू???

काय नातं गं आपलं कधी मैत्रिण  कधी तू लहान बहीण कधी कधी तर तू निरागस कोकरू! आपल्या संभाशणात कितीदातरी मला ही भावना येवून गेली की तू माझी लेक आहेस. . कुठल्या तरी जन्माची  माझी हरवलेली लेक गं ! तुलाही ती मदरली फिलिंग आली होती माझ्यासाठी.

तुला संरक्षण देणं व नकोशा लोकांपासून वाचवणं जणु मी माझं आद्य कर्तव्य  मानत होते.

तुला सांगणं किंवा समजावणं नेहमीच असे.

एकदा आठवतं का गं, काहीतरी चुकलं  होतं तुझं अन मी भयंकर  रागावले होते. . तू ते ओळखलंस ! माझ्याकडे पहात  एक गाल पुढे केलास . माझ्या हाताने एक गालफडात मारून घेतलीस मग दुसरा गाल पुढे केलास! तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहवले गेले नाहित गं मला. . मग मलाच घट्ट मिठी मारून किती वेळ रडत होतीस. . "आई आहेस गं तू माझी कुठल्यातरी जन्माची. . तुला अधिकार आहे ना चुकल्यावर शिक्षा करण्याचा!"

कसं विसरू गं मनू ते सारं!

तुम्ही दोघींनी पायी मला घरी सोडायला येणं सोबत म्हणून. . मी लांब रहायचे ना. . मग माझं पुन्हा तुम्हा दोघींना अर्ध्या रस्त्यापर्यंत  शॉर्टकट ने सोडायला येणं. . मग त्या आवरत्या घेतलेल्या चौकातल्या गप्पा. . मग तुझं व राणीचं पुन्हा एकमेकींना सोडणं!

कसं जादूई  होतं गं सारं!

मनू, आज तू तुझ्या संसारात मी माझ्या व राणी तिच्या संसारात दुखी व मग्न आहोत पण मला खात्री आहे की मैत्र  किंवा मैत्रिणीं  शब्द आला की तुमच्या मनातही असंच सगळं उसळून येत असणार!

पण हे मनात रुतलेलं आपलं जगावेगळं नातं खरच खूप अद्भुत  होतं व राहील.



मनात चालत राहणारं. . शब्दांत न मावणारं. . हे नातं तुझं माझं !



©®सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

दिनांक २० .०२ .२०२१




मखमली कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!
मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.?

🎭 Series Post

View all