माझ्या तिची कहाणी

STORY OF HIS PRINCESS....

आज बऱ्याच दिवसांनी तिच्यासोबत निवांत वेळ घालवायला मिळाला, एरव्ही कामात व्यस्त असल्याने इतकं निवांत भेटणं शक्य होत नाही. भेट झाली तरी येता जाता कामापुरत भेटत असेल तेवढंच. लॉकडाऊनचा काळ तिचा आणी माझा खरा परीक्षेचा काळ होता, एकमेकांना न भेटता न बोलता इतक्या लांब राहुनही तिच्या माझ्या नात्यात फरक पडला नाही , हा जेव्हा लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुरवातीला जरा तिने जरा नाराजीचा सुर दाखवला पण पुन्हा नव्याने जणु काही झालंच नाही अशा अविर्भावात तिने माझ्यासोबत जुळवुन घेतलं. 

तिला नटण्याची फार आवड नाही, Acessories किंवा दागिन्यांची जास्त हौस नाही, फक्त तिला टापटीप राहायला आवडतं. हिच आवड माझीही आहे म्हणुनच तिला ती आवडत असावी असं माझं मत आहे. मला आजपण तो दिवस आठवतो , जेव्हा ती पहिल्यांदा घरी येणार होती. फार धावपळीत गेला तो दिवस, तिला आमचं घर आवडेल का? तिला घरच्यांसोबत जुळवुन घेता येईल का? आमच्या मातोश्री तिला आपलंसं करून घेतील का? एक ना अनेक प्रश्न , पण जेव्हा ती प्रत्यक्षात उंबरा (गेट) ओलांडुन आली;  तेव्हा आई हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती, आईने पाहताक्षणी तिला पसंत केलं आणी मग माझ्या सगळ्या प्रश्नांना पुर्णविराम लागला. माझ्या बहिणीने पण खुप कमी वेळात तिला आपलंसं करून घेतलं, याचं कारण ती घरी येण्याआधीच मी तिचे काही फोटो तिला गुपचुपपणे दाखवले होते. 

माझ्या एक दोन मित्रांनी सुरवातीला माझे कान भरण्याचा प्रयत्न केला होता, पण या बाजारगप्पांवर विश्वास न ठेवता मी तिच्यासोबत राहायचा निर्धार पक्का केला होता. मला आठवतं आई परदेशात असल्याने तिला यायला वेळ लागत होता, तेव्हा तर ती माझ्या स्वप्नांत देखील येऊन जायची. एकवेळ अशी आली होती कि मला जिथे तिथे तिच असल्याचा भास व्हायचा. एकंदरीत थोड्या बहुत अडचणींवर मात करून आल्यामुळे तिच्यावर माझा जरा जास्तच जीव जडला होता.

सुरवातीच्या काळात आई-बाबांना विचारून तिची भेट घ्यावी लागायची, पण हळु हळु हे चित्र पालटत गेलं. नंतर मला वाटेल तेव्हा मी आई बाबांची नजर चुकवुन तिला भेटु लागलो, माझ्या आवडीची नवनवीन ठिकाणी आम्ही दोघेजण पाहु लागलो, तिलाही हळुहळु मला हवं नको ते कळायला लागलं. आणी ती माझ्या मर्जीप्रमाणे वागू लागली. मला आठवतंय एकदा फिरायला गेलं असताना चुकुन तिला थोडं खरचटलं होत, ती रात्र मला झोपचं लागली नाही, रात्रभर अपराधीपणाची भावना मनात घर करून राहिली होती. तिने मात्र याबद्दल कधीच काही तक्रार केली नाही, मग मी अजुनच प्रेमाने तिची काळजी घ्यायला लागलो. 

आज संध्याकाळी निवांत असल्याने माझ्या गाडीसोबत मारलेल्या गप्पा तुम्हाला आवडल्या का? होय आज खुप निवांतपणे तिला छान धुवुन काढलं आणी तिच्याबद्दलच्या  सर्व आठवणी जाग्या झाल्या. त्यानिमित्त केलेला हा भावनीक  प्रपंच कसा वाटला नक्की कळवा ???? 


===========================

लेखकाचं नाव असल्याशिवाय साहित्य कोठेही पब्लिश करू नये.

©स्वप्नील घुगे