माझ्या आयुष्यातील ती भाग ५

Conversation Between Pradnya And Prerna

माझ्या आयुष्यातील ती भाग ५


मागील भागाचा सारांश: प्रज्ञा तिच्या भूतकाळाबद्दल निलमला सांगत होती. प्रज्ञाचे आजोबा, वडील, आई यांच्या बद्दल थोडक्यात प्रज्ञाने सांगितले. दहावीच्या सुट्टीमध्ये प्रज्ञाला तिचे बाबा मुंबईला घेऊन आले, तिथे तिची व प्रेरणाची पहिली भेट झाली.


आता बघूया पुढे….


बाबांनी माझी व प्रेरणाची ओळख करुन दिल्यावर मी तिच्या सोबत एकही शब्द न बोलता माझ्या रुममध्ये निघून गेले. माझ्या रुममध्ये दोन बेड होते, ते बघून तर माझं डोकं सटकलं होतं. मला माझी रुम कोणासोबत शेअर करायची नव्हती. दोन्ही बेडवर एकसारखे बेडशीट होते. दोन कपाटे होती, तीही एकसारख्या रंगाची होती. बघायला गेलं तर रुम खूप छान सजवलेली होती. 


पुढील काही वेळातचं प्रेरणा रुममध्ये येऊन तिच्या बेडवर बसली. मी तिच्याकडे बघितलंही नव्हतं.


"प्रज्ञा तुला आपली रुम आवडली का?" प्रेरणाने विचारले.


"मला रुम खूप आवडली आहे, पण मला या रुममध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीही नकोय. मला माझ्या रुममध्ये एकटीला रहायला आवडतं." मी चिडून उत्तर दिले. 


प्रेरणा मिश्किल हसून म्हणाली,

"प्रज्ञा ही रुम माझी आहे. माझ्या रुममध्ये तू राहत आहेस. तुला इथं नसेल रहायचं तर गेस्टरुम मध्ये जाऊन रहा. गीता ताईंच्या रुमचा एसी बिघडला आहे, म्हणून त्या दोन-तीन दिवसांसाठी गेस्टरुम मध्ये राहत आहेत. तू त्यांच्या सोबत तिथे जाऊन राहू शकतेस."


"आता ह्या गीता ताई कोण?" मी रागातच विचारले.


"गीता ताई ह्या घराची देखभाल करतात. गीता ताई स्वयंपाक खूप छान बनवतात. घरातील बाकीची कामं करायला बाया आहेत, त्यांच्याकडून घराची साफसफाई करुन घेण्याचे काम गीता ताई करतात." प्रेरणाने अतिशय शांतपणे उत्तर दिले.  


"तू इथे आमच्या घरी का राहते?" मी प्रेरणाला विचारले.


"हे घर माझंही आहे. हवंतर बाबांना जाऊन विचार." प्रेरणाने सांगितले.


"ते फक्त माझे बाबा आहेत. तू त्यांना बाबा म्हणू शकत नाही." मी सांगितले.


यावर प्रेरणा म्हणाली,

"मला त्यांनी बाबा म्हणायला लावलं आहे. बाकी मला काही माहिती नाही."


आमच्या दोघींचं बोलणं सुरु असताना गीता ताई आमच्या रुममध्ये येऊन म्हणाल्या,

"हाय प्रज्ञा, माझं नाव गीता आहे. प्रेरणा मला गीता ताई म्हणते. तुझे बाबा कामासाठी बाहेर गेले आहेत, त्यांनीच मला इकडे पाठवलं आहे. तू आजचं गावावरुन आली आहेस, तर दमली असशील. आज आराम कर. उद्यापासून आपण तिघीजणी मुंबई दर्शनाला जाऊयात. दररोज थोडं थोडं फिरुयात. 


या घराचे काही नियम आहेत, त्याची कल्पना तुला असायला हवी. दररोज सकाळी नऊ वाजता ब्रेकफास्ट साठी डायनिंग टेबलवर येऊन बसायचे. दुपारचे जेवण एक वाजता होते, तर रात्रीचे जेवण साडेआठला होते. संध्याकाळी काही स्नॅक्स खावेसे वाटले तर मावशींकडून मागून घ्यायचे. 


तुला पुस्तकं वाचायला आवडतात, हे मला तुझ्या बाबांकडून समजलं. इथे जवळचं एक लायब्ररी आहे, तिथे भरपूर पुस्तके आहेत. तुला तिथं जायचं असेल, तर प्रेरणाला सोबत घेऊन जाऊ शकते. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यासोबत येऊन बोलू शकतेस." गीता ताई एवढं बोलून निघून गेल्या.


मला गीता ताईंच्या बोलण्याचा राग आला होता. मी माझं घर समजून मुंबईला आले होते आणि इथे मात्र घराचे नियम एक परकी व्यक्ती सांगत होती. 


"तुला काही बोलायचं आहे का? तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, हे तुझ्या चेहऱ्यावरुन समजतं आहे. तुला जे बोलायचं असेल, ते बिनधास्त बोल. मनात अनुत्तरित प्रश्न किंवा राग राहिला तर काही दिवसांनी त्या व्यक्तीबद्दल मनात अतिराग व गैरसमज निर्माण होतात. मी कोणाला काही सांगणार नाही. तू बोलू शकतेस." प्रेरणा म्हणाली.


मी आल्यापासून प्रेरणा सोबत रागात बोलत होते, मात्र ती अतिशय शांतपणे माझ्यासोबत बोलत होती. माझ्या मनात काहीतरी चालू असल्याचे तिला बरोबर समजले. 


मी बोलायला सुरुवात केली,

"प्रेरणा तू कोण आहेस? इथे माझ्या घरात का राहते? तू माझ्या बाबांना बाबा का म्हणतेस? मी माझी रुम तुझ्यासोबत शेअर का करायची? हे प्रश्न मनात असताना आता ह्या गीता ताई कोण? माझ्याच घरात राहण्यासाठी मला ह्यांनी सांगितलेले नियम पाळावे लागणार आहेत, असं का?


प्रेरणा आजपर्यंत मला एकटीला रहाण्याची सवय लागली आहे. अचानक असं कोणासोबत मी कशी राहू शकेल? माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांची उत्तरे कोणीच देणार नाहीत. बाबा तर माझ्यासोबत कधीच बोलत नाहीत. 


मी अगदी लहानपणापासून एकटी राहत आली आहे. आता अचानक कोणासोबत ऍडजस्ट कसं होऊ? मी मुंबईला येऊन चूक केली की काय? असं मला वाटत आहे. बाबांनी मला आधी काहीच सांगितलं नाही." मी एकदम स्पष्टपणे बोलून गेले होते.


"आपण दोघी एकाच रुममध्ये राहत आहोत, हे तुला सहन होत नाहीये, हे मला कळलंय. मी कोण आहे? इथे का आहे? याची उत्तरे मी तुला देऊ शकणार नाही. तुला माझ्यापासून काही त्रास होणार नाही, याची काळजी मी घेईल. तुला माझ्या एखाद्या सवयीचा त्रास झाला, तर तसं मला स्पष्टपणे सांग. 


मी या घरात येण्याआधी गीता ताई इथे होत्या. आजवर त्यांनी जसं सांगितलं, तसंच मी वागत आले आहे. घर असेल तर तिथे काही नियमही असतात आणि ते आपल्याला सगळ्यांना पाळावे लागतात." प्रेरणा म्हणाली.


मी प्रेरणा सोबत इतक्या रागात बोलले होते, पण अजिबातही चिडली नव्हती. ती अतिशय शांतपणे माझ्यासोबत बोलत होती. मला तसंही तिच्यासोबत बोलण्यात काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता, म्हणून मी पुढे काही बोललेच नव्हते.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all