माझ्या आयुष्यातील ती भाग १४

Story Of Pradnya And Prerna

माझ्या आयुष्यातील ती भाग १४


मागील भागाचा सारांश: प्रज्ञाच्या बाबांचं त्यांचं एका शालिनी नावाच्या मुलीवर प्रेम होते आणि त्या दोघांना एक बाळही होतं. बाळाला जन्म देऊन शालिनीने प्राण सोडला होता, हे त्यांनी प्रज्ञा व प्रेरणाला सांगितले.


आता बघूया पुढे…..


"मी सहा महिन्यातून एकदा त्या अनाथ आश्रमात चक्कर मारत होतो, लांबून त्या बाळाला बघायचो. मी शालिनीवर आणि आता त्या बाळावर अन्याय करत आहे, हे मला जाणवत होतं. 


मी दरवर्षी आश्रमाला निधी देत होतो. बाबा एक्सपायर झाल्यावर मी माझ्या बाळाला घरी घेऊन येऊ शकलो असतो, पण समाज काय म्हणेल या भीतीने तो विचार तिथेच सोडून दिला. कालांतराने मी इतका बिजी झालो की, आश्रमात चक्कर मारणे मी सोडून दिले होते. दरवर्षी मात्र निधी देणे बंद केले नाही.


अचानक एके दिवशी आश्रमाच्या व्यवस्थापकांचा मला फोन आला व मी जे बाळ त्यांच्याकडे सुपूर्द केले होते, त्या बाळाला रक्ताचा कॅन्सर असल्याचे सांगितले." बाबा बोलत असतानाच त्यांना अडवून प्रेरणा म्हणाली,


"म्हणजे ते बाळ मी आहे का?"


"हो ते बाळ म्हणजे तुच आहेस. शेवटची काही वर्षे तरी तू आनंदात रहावी म्हणून मी तुला माझ्या सोबत घेऊन आलो. प्रेरणा तू शालिनीची कार्बन कॉपी आहेस. तुझ्याकडे बघितलं की मला तिचीच आठवण येते. तुझ्यावर मी अन्याय केला आहे. तू इथे प्रज्ञा सोबत वाढायला हवं होतं, पण तुला अनाथ आश्रमात रहावे लागले. 


प्रज्ञा इथे राहूनही मी तुला बापाचे प्रेम देऊ शकलो नाही आणि तुला तुझा हक्क दिला नाही. मला दोघींनी माफ करा." बाबांनी हात जोडून सांगितले.


मला तर यावर काय बोलावं? हेच कळत नव्हते. मी काहीही न बोलता रुमच्या बाहेर निघून जात होते, तोच प्रेरणाने मला थांबवलं.


"तुमच्यात मी देव बघत होते. एखादी व्यक्ती एखाद्या अनाथ मुलीसाठी इतकं सगळं कसं करु शकते? असं वाटायचं. वडील जिवंत असताना सुद्धा मला एका अनाथ मुलीप्रमाणे रहावं लागलं. तुम्हाला माझं दुःख कधीच कळू शकणार नाही. मी तुम्हाला कधी माफ करु शकेल की नाही हे मला माहीत नाही. मला एकच आनंद झाला आहे की, मला प्रज्ञा सारखी एक लहान बहीण मिळाली आहे. मी एकच विनंती करेल की आम्हाला दोघींना जास्तीत जास्त वेळ एकत्र राहुद्यात. तिलाही माझी गरज आहे आणि मलाही तिची गरज आहे." 


"प्रज्ञा तू काहीच बोलणार नाहीयेस का?" बाबांनी माझ्याकडे बघून विचारले.


"मी काय बोलणार? तुम्ही माझ्या आईला फसवलं. बाबा तुम्ही इतकी मोठी चूक केली होती. तुम्हाला या सगळ्याचे प्रायश्चित्त करावे वाटले नाही का? बाबा मी तुमच्याशी कधी बोलत नसले तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल कमालीचा आदर होता. जेव्हा कोणीही म्हणायचं ना की, मी तुमच्यासारखी आहे, तर त्यावेळी मला खूप भारी वाटायचं. 


असो मी प्रेरणापेक्षा वेगळं काहीच सांगणार नाही. प्रेरणाच्या रुपाने मला मोठी बहीण मिळाली आहे. आमचं नातं टिकू द्या. इथून पुढे तरी तुम्ही काही लपवणार नाही, अशी आशा करते." एवढं बोलून मी रुमच्या बाहेर पडले. प्रेरणाही माझ्या पाठोपाठ बाहेर पडली.


पुढील जवळपास दोन आठवडे प्रेरणा गावी होती. आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या होत्या. प्रेरणाच्या संगतीने माझ्यात बऱ्यापैकी बदल झाला होता. प्रेरणाला ट्रीटमेंट घेण्यासाठी मुंबईला जावे लागले होते. बाबांनी आम्हाला दोघींना दोन स्मार्टफोन घेऊन दिले होते. आम्ही दररोज व्हिडिओ कॉल वर गप्पा मारत होतो.


माझे बारावीचे वर्ष असल्याने मला मुंबईला जाता येत नव्हते, पण प्रेरणा अधूनमधून गावी येत होती. बाबांचं वागणं पहिल्यापेक्षा खूप बदललं होतं. बाबा माझ्यासोबत संवाद साधायला लागले होते. मी बाबांशी बोलायचे, पण फक्त कामापुरतंच. प्रेरणा व माझ्यातील बोलणं वाढल्याने प्रेरणाच्या तब्येतीत सुधारणा होत होती. 


बारावीच्या सुट्टीत मी, प्रेरणा व बाबा कोकणात फिरायला गेलो होतो. बाबांनीचं ही ट्रीप प्लॅन केली होती. प्रेरणा माझ्या आयुष्यात आली नसती, तर मला नात्यांची किंमत कधीच कळाली नसती.


कोकणच्या ट्रीपची सुरुवात मस्त झाली होती, पण शेवट मात्र वेगळाच झाला होता. मी व प्रेरणा बीचवर एकमेकींच्या मागे धावत होतो. प्रेरणाला अतिधावण्याचा त्रास होऊ शकतो, हे त्यावेळी माझ्या डोक्यात सुद्धा नव्हते. 


धावता धावता प्रेरणा अचानक चक्कर येऊन पडली, तिच्या तोंडातून रक्त येत होते. मी तिला असं बघून शॉक झाले होते. बाबा जवळचं असल्याने बाबांनी अंबुलन्सला बोलावले. तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्रेरणावर प्राथमिक उपचार केले आणि आम्ही तिला अंबुलन्स मधून मुंबईला हलवले. प्रेरणा बेशुद्धचं होती. प्रेरणा आपल्याला सोडून जाते की काय? ही भीती त्यावेळी मनात होती. 


एकवेळी असं वाटतं होत की, माझीच चूक झाली. मी प्रेरणाची काळजी घ्यायला हवी होती. कोकण ते मुंबई हा प्रवास आम्ही अंबुलन्सने केला होता. माझ्या आयुष्यातील भयानक प्रवास होता. मन चिंती ते वैरी न चिंती असं होत होतं.


प्रेरणा जर यावेळी आपल्याला सोडून गेली तर आपलं काय होईल? हे विचार मनात येत होते. इतक्या दिवस कुठेतरी माहीत होते की, प्रेरणा एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाईल, पण ती वेळ अशा रितीने येईल असं वाटलं नव्हतं. 


प्रेरणाला जीवनदान मिळावे यासाठी मी देवाचा सतत धावा करत होते. देवाला न मानणाऱ्या मी प्रेरणासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन देवासमोर हात जोडले होते. मी देवासमोर उभी असताना बाबांनी माझ्या डोक्यावरुन हात फिरवला, तेव्हा मी बाबांना मिठी मारली व खूप रडले. बाबांच्याही डोळयात अश्रू होते. मी पहिल्यांदा बाबांना मिठी मारली होती.


प्रेरणा वाचेल की नाही? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all