माझ्या आयुष्यातील ती भाग १३
मागील भागाचा सारांश: प्रेरणाने तिला कॅन्सर असल्याचे प्रज्ञाला सांगितले, तसेच प्रेरणा व प्रज्ञाच्या बाबांची भेट कशी झाली? हेही तिने सांगितले.
आता बघूया पुढे…..
बाबांनी मला व प्रेरणाला बोलावले आहे हे कळल्यावर आम्ही दोघींनी पटपट आवरले. आम्ही दोघी बाबांच्या रुममध्ये जाऊन त्यांच्या समोर उभ्या राहिलो.
"प्रज्ञा माझ्यावरचा राग गेला का?" बाबांनी मला विचारले.
"बाबा तुम्ही काल माझ्यावर पहिल्यांदा रागावला किंवा ओरडला नाहीयेत. मला या सगळ्याची सवय होऊन गेली आहे. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. तुम्ही येऊन सॉरी म्हणाल अशी आशा असायची, पण कालांतराने ती आशाही मावळत गेली." मी सरळ सरळ माझे मत मांडले.
मला वाटलं होतं की, बाबांना माझ्या बोलण्याचा राग येईल, पण तसं झालं नाही. बाबा हसून म्हणाले,
"तू एकदम माझ्यासारखी आहेस."
"तुम्ही आम्हाला इथे का बोलावलं?" प्रेरणाने बाबांना विचारले.
यावर बाबा म्हणाले,
"तुम्ही दोघी बसा. मला तुमच्या सोबत जरा महत्त्वाचं बोलायचं आहे."
आम्ही दोघी सोप्यावर बसलो. बाबांच्या रुममध्ये जाऊन त्याआधी कधीच बसले नव्हते. मला बाबांच्या वागण्याचं त्यादिवशी आश्चर्य वाटत होतं.
बाबांनी बोलायला सुरुवात केली,
"सर्वप्रथम प्रज्ञा मला तुझी माफी मागायची आहे. माझे वडील माझ्या सोबत जसं वागायचे, तसंच मी तुझ्या सोबत वागण्याचा प्रयत्न केला. तुझ्या मनात काय सुरु आहे? तुला माझ्या प्रेमाची गरज आहे का? यातील कसलाच विचार केला नाही. काल प्रेरणाने माझे डोळे उघडले.
मला माझ्या आयुष्यातील एक सत्य तुम्हाला दोघींना सांगायचं आहे. माझं लॉ झाल्यावर मी एका ऍडव्होकेटच्या हाताखाली प्रॅक्टीस करत होतो. ते ऍडव्होकेट खूप प्रसिद्ध होते, त्यांच्याकडे खूप केसेस यायच्या. मला शिकायला भरपूर मिळालं होतं. गरीब लोकांकडून एकही रुपया न घेता ते केस लढवत होते.
जवळपास सहा महिन्यांनी त्यांनी माझ्या हातात केसेस सोपवायला चालू केले. त्यातच एक केस शालिनीची होती. शालिनीचा नवरा अपघातात वारला होता, तिच्या सासरच्यांनी तिला प्रॉपर्टी देण्यास नकार दिला होता व तिला घराबाहेर काढले होते. शालिनीच्या माहेरी गरिबी होती. शालिनी आपल्या हक्कासाठी लढत होती.
शालिनीला मी बघितलं तेव्हाच ती माझ्या मनात भरली होती. शालिनीच्या राहणीमानामुळे कोणी तिच्याकडे ओढले जात नव्हते, पण ती दिसायला अतिशय सुंदर होती. शालिनीच्या डोळ्यांनी मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो. वयाच्या सतराव्या वर्षी शालिनीचे लग्न झाले होते आणि पुढील दोन वर्षांत ती विधवा झाली होती.
शालिनीची केस मीच हाताळत असल्याने माझी व शालिनीची अनेकदा भेट व्हायची. मी तिची केस फ्रीमध्ये लढवत असल्याने तिला माझ्याबद्दल विशेष आदर होता. शालिनीच्या गावची जत्रा असल्याने तिने मला त्यांच्या गावाला बोलवले होते. शालिनीने माझ्यासाठी स्पेशल स्वयंपाक केला होता. शालिनीने मला गाव दाखवलं. आम्ही दोघे जत्रेत फिरलो. जेवण करताना आमच्यात बऱ्याच गप्पा झाल्या. शालिनी घरी एकटीच होती.
शालिनीच्या जवळ जाण्यासाठी मी आतुरलेला होतोच. जेवण करताना शालिनीही माझ्याकडे आकर्षित झाली आहे, हे माझ्या लक्षात आले होते. शालिनीची नजर सर्व काही सांगून गेली होती. घरात कोणी नसल्याने मी तिला माझ्या मनातील भावना बोलून दाखवल्या. शालिनीने लाजून माझ्या भावनांना होकार दर्शवला.
शालिनीच्या व माझ्या भेटी वाढू लागल्या होत्या. आम्ही शरीराने व मनाने जवळ येऊ लागलो होतो. शालिनीची केस आम्ही जिंकलो होतो, तिच्या सासरच्यांनी पैसे देऊन केस मिटवून घेतली होती. शालिनी सोबत मला लग्न करायचे होते. आम्ही आधीच शरीर व मनाने एकरुप झाल्याने लग्नाचा विधी तेवढा बाकी होता.
मी सुट्टी काढून बाबांशी त्या विषयावर बोलायला आलो होतो, पण इकडे बाबांनी माझं लग्न आधीच दुसऱ्या मुलीशी म्हणजे शोभना सोबत ठरवले होते. बाबांसमोर बोलण्याची हिंमत मला होत नव्हती. मी हेच सांगायला शालिनीकडे गेलो तेव्हा ती गरोदर असल्याचे मला कळले. आता या अवस्थेत तिला तसंच सोडणं मला पटत नव्हते. मी तिला माझ्यासोबत शहरात घेऊन गेलो. आम्ही दोघे एकाच रुमवर राहत होतो.
बाबांनी लग्नाची तारीख काढल्यावर मला घरी बोलावून घेतले होते. मला लग्नाला उभं राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. शालिनीला माझ्या लग्नाबद्दल सर्व काही माहीत होते. लग्न झाल्यावर आठवड्यातील काही दिवस इकडे आणि काही दिवस तिकडे रहाण्याची सोय मी करुन ठेवली होती. शालिनीची मी पुरेपूर काळजी घेत होतो.
बाबांना वंशाला दिवा पाहिजे म्हणून हट्ट सुरु होता, शिवाय शोभनाला माझा संशय येऊ नये म्हणून मी तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करु लागलो होतो. लग्नानंतर सहा महिन्यांत शोभनालाही दिवस गेले होते. शालिनीच्या डिलिव्हरीच्या वेळी मी तिच्या सोबत होतो. डिलिव्हरीच्या वेळी शालिनीने बाळाला जन्म देऊन प्राण सोडले.
आता त्या बाळाला कुठे ठेवायचे? हा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. घरी तर घेऊन जाऊ शकत नव्हतो. एका अनाथ आश्रमाचे संस्थापक माझ्या ओळखीचे होते, मी त्यांच्याकडे त्या बाळाला सोपवले.
शालिनी व त्या बाळाबद्दल इकडे कोणालाही माहीत नव्हते. समाजातील प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने मी माझ्या आयुष्यातील हे सत्य गाडून ठेवले. शोभनाला हे सत्य सांगावे असे अनेकदा वाटले, पण ती माझ्या बद्दल काय विचार करेल? ह्या विचाराने मी तिला कधी काही सांगितलंच नाही.
तुम्हाला दोघींना हे सत्य माहीत असावे, म्हणून मी सांगत आहे. मी जेवढं प्रेम शालिनीवर केलं होतं, तेवढं प्रेम कधीच शोभनावर करु शकलो नाही. शोभना सोबत संसार करुन मी फक्त माझे कर्तव्य निभावत होतो."
"बाबा ते बाळ आत्ता कुठे आहे? जे सत्य तुम्ही सर्वांपासून लपवले ते सत्य आज तुम्ही आम्हाला दोघींना का सांगितले?" मी लगेच बाबांना प्रश्न विचारले.
प्रज्ञाचे बाबा काय उत्तर देतील? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा